Tuesday, June 22, 2010

कबीर म्हणे...मराठीत!

कबीर म्हणे...मराठीत!


कबिराचा पहिला परिचय कधी झाला, असा विचार करू लागलो की बालपण कधी तरी ऐकलेलं एक गाणं आठवतं-
"कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई'
त्यानंतर हिंदी पाठ्यपुस्तकात कबिराच्या काही रचना वाचावयास मिळाल्या होत्या. कॉलेजात असताना मंगेश पाडगावकरांनी केलेला कबिरांच्या दोह्यांचा समवृत्त अनुवाद वाचला होता. मराठीतरल्या कितीतरी रचनांचा- विशेषत: संत परंपरेतल्या कितीतरी अभंगांचा कबिरांंच्या रचनांशी असलेला अन्वय प्रकर्षानं लक्षात आला होता. गदिमांचं "माती सांगे कुंभाराला' हे गाणं कबिराच्या दोह्याचं मराठी रूपांतर आहे, हेही तेव्हाच लक्षात आलं होतं. प्रेमात पडलो असता प्रेयसीच्या गावी पहिली चक्कर टाकली तेव्हा तिच्या स्थानकात कबिराचा पुढचा दोहा वाचावयास मिळाला-
पोथी पढि पढि जग मुवा, पंडित भया न कोय
ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय।
त्या दिवशी त्या ढाई अक्षराचं महत्त्व मला पक्क कळलं. तेव्हा "सूफी' म्हणजे काय याचा पत्ता नव्हता. पण आपल्या समर्थनार्थ चक्क संत कबीर फलाटावर उतरला याचा केवढा आनंद झाला होता तेव्हा!
त्यानंतर मी कुठे कबिराचे दोहे मिळाले तर आस्थेने वाचत होतो. अनेकदा ते उलगडत नसत. मग मी अवघड म्हणून कबिराला टिळा लावला.
पण एक दिवस-
हिंदी कविताकोष नावाच्या वेबसाईटवर कबिरांचे काही दोहे दिसले - तेही चक्क देवनागरीत लिहिलेले! मी ते प्रिंटआऊट काढून घेतले.
पहिलाच दोहा होता-
चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहेनशाह
मला तो भलताच आवडला. पुढे आणखी एक दोहा होता-
सात समिंदर की मसी करो लेखनी सब बनराई
धरती सब कागज करो, हरिगुण मावत नाही
व्वा! तोंडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया निघाली. खलील मोमीन यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या-
जो गंध फुलातुन झरतो, वाऱ्याच्या उरी उतरतो
होऊन लेखणी वारा तो भवतालावर लिहितो
एकदम वाटून गेलं- कबिराचे दोहे आपण मराठीत भाषांतरित करावे का? प्रयत्न तर करू म्हणून मी सुरुवात केली आणि दोन दोहे पक्के उतरले मराठीत. निदान त्यांनी "जम गया यार!' अशी प्रतिक्रिया तरी दिली आनंदाने!
त्यानंतर मी गाडीच्या तासभराच्या प्रवासात आणखी पाचसहा दोहे अनुवादित केले. एक वेगळीच मजा येऊ लागली. एक तर कबीर कळू लागल्याचा आनंद, त्यात त्याला मराठीत समजून देता येऊ लागल्याचा- समजून घेता येऊ लागल्याचा आनंद याने मी अगदी फुलून गेलो.
पहिल्या दोह्याचं भाषांतर केलं-
"ज्याची आशा नुरली ज्याला चिंता उरली नाही
बादशहा तो जगातील या, ज्याला हवे न काही!'
दुसऱ्याचंही भाषांतर जमून आलं-
सप्तसागराची कर शाई, लेखणी कर वनराई
धरतीचा जरी कागद करशी, हरिगुण मावत नाही!
आणि मग मजाच मजा यायला लागली. पुढचे काही दिवस जेव्हा जेव्हा वेळ मिळाल्यानंतर तेव्हा तेव्हा मी कबिराला घेऊन त्याच्याशी बोलत राहिलो. चल आपण हे मराठीत लिहूया म्हणालो. कबिरानेही होकार दिला.
म्हणता म्हणता दोहे मराठी वेशभूषा घेऊन प्रकटले. "साधू गॉंठ न बांधे'चं मराठी केल्यावर तर मी आनंदानं उडीच मारली.
दोहा होता-
साधू गॉंठ न बांधे, उदर समाता लेय
आँगे पीछे हरी खडे, जब मागे तब देय
भाषांतर झालं-
साधू गाठिशी नच बांधि, पोटी चिमटा घेई
ईश पुढे अन् ईशच मागे, तो मागे हा देई
कबिराने जब मागे तब देय म्हटलं आहे इथं हा दोहा मराठीत होताना "तो मागे हा देई' झाला. साधू आणखीनचं मोठा दिसू लागला.
साधूवरचाच आणखी एक दोहा आहे-
साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय
सार-सार को गहि रहे, थोथा देई उडाय।।
तो मराठीत जमून आला-
साधू सुपासमान असावा फोले उडवून देई
विवेकवाऱ्याच्या मदतीने निके तेवढी ठेवी।।
कबिराची ही मैत्री मला निव्वळ स्वर्गीय आनंद देणारी ठरली आहे. कुणा समीक्षाला ही मैत्री नव्हेच असंही वाटू लागेल. कुणी म्हणेल - तुम्ही म्हणता तेवढं काही जमलं नाही अजून तुमचं, कुणी म्हणेल कोसो मैल दूर आहे कबीर अजून!
पण तरीही मला त्याची चिंता नाही. मला कबिरानंच सांगून ठेवलं आहे-
धीर धरी रे मना धिराने सर्व साधती सोयी।।
- वैभव चाळके