Monday, April 29, 2019

कथा- अश्लील बोलणारे सदाना


एक अत्यंत चावट गोष्ट सांगून झाल्यावर माझा मित्र किशोर मला म्हणाला होता, मनोहर ही गोष्ट मला माझ्या सीनियर सांगितली. असल्या पुष्कळ गोष्टी तो सांगत असे. त्यामुळे लोक तो भेटला की त्याला चावट गोष्टी सांग म्हणतात आणि त्याच्या माघारी त्याला पांचट म्हणतात. तेव्हा एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव अश्लील गोष्ट कुणाला सांगू नकोस. पर्सनॅलिटीचा सर्वात मोठा डॅमेज... व्यक्तिमत्त्वावरचा सर्वात वाईट कलंक म्हणजे अश्लील गोष्ट सांगायची सवय, हे मनावर कोरून ठेव. मलाही सीनियरची सवय लागली आहे. या सवयीमुळे लोक माझा अनादर करतात.
अश्लील गोष्ट सांगण्याच्या सवयीचा बळी असलेला किशोर असा सल्ला देत होता. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार होतं. पण किशोरने आपली सवय मोडून टाकली होती. आता तो फक्त आम्हा मोजक्या मित्रांनाच असल्या गोष्टी सांगत असे. म्हणूनच मी त्याचा सल्ला शिरोधार्य मानला. कधी कधी एखादी अस्सल चीज हाती लागते. एखादा विनोद, एखादी कविता, एखादी गोष्ट अश्लील वाटली की मी तिथेच संपवतो. हे कुणाला तरी सांगावं असं वाटतं, पण मी तो मोह आवरतो. कधी कधी वाटतं हे सारं लिहून काढावं, पण मग विचार येतो, त्यामुळे तर पर्सनॅलिटीला परमनंट डॅमेज होईल. याच कारणाने मी मला माहीत असलेल्या अश्लिल गोष्टी कोणालाच सांगितलेल्या नाहीत. सांगत नाही. काही काही फारच सुंदर आहेत. त्या आठवतात, पण हा आनंद मी वाटत नाही. कारण एकच.. किशोरचा सल्ला. आज मात्र मी मित्राचा सल्ला धुडकावून ही गोष्ट सांगणार आहे. राहवत नाही म्हणून असं म्हणालात तरी चालेल. तर गोष्ट अशी आहे...
या प्रचंड महानगरीच्या प्रचंड कोलाहलात आमची विसोबा धारकऱ्यांची चाळ गुण्यागोविंदाने वर्षानुवर्ष जगत आली आहे. अख्ख्या चाळीत 24 कुटुंबे आहेत. खालील बारा आणि वरती शौचालय आणि कपडे धुवायला वापरतात ते मोठें न्हाणीघर. चाळीत जे जे आणि जे जेवकाय हवं ते आहे. एकमेकांच्या नागदुऱ्या काढल्या जातात, कागाळ्या केल्या जातात, पण तरीही कोणी आजारी पडलं, जन्माला आलं की सर्व चाळकरी घरातल्यासारखे सुख दुःख वाटून घेतात. बटाट्याच्या चाळीसारखे नमुने आमच्या चाळीत नाहीत, पण तरीही सगळे सारखे आहेत असं नाही. असाच एक नमुना म्हणजे आमचे सदाना. त्यांची ही अश्लील गोष्ट. एकटा सडाफटिंग माणूस... सदाना सदासर्वदा खोली बाहेर उभे असत. कमरेखाली चटेरीपटेरी चड्डी आणि वर बनियन... त्यांची नोकरी म्हणे अर्ध्यावर सुटली. तेव्हापासून त्यांनी दुसरी नोकरी केलेली नाही. मिळालेल्या पैशात त्यांचा घरखर्च भागतो. तो फारसा नाहीच. व्यसन कसलंच नाही. लोक तंबाखू खातात, तसे सदाना बडीसोप खातात. कधीकधी चाळीतल्या कोणा ना कोणाच्या घरची भाजी सदानाच्या घरात पोहोचत असे. कुणाकडे काही काम असलं म्हणजे सदानाना आवाज दिला जाई. सदाना कोणाला नाही म्हणत नसेत. मयतापासून बारशापर्यंत कोणतंही काम सदाना एकाच उत्साहाने करत असत.  सदाना पांचट होते. ते उभ्या उभ्या येणार्‍य जाणार्‍या माणसाला काही ना काही बोलत. लहान मुलांना पोपट म्हणून तर तरुणांना राघू म्हणून हाक मारत. बायांना काय बाय... बाय बाय.... म्हाताऱ्या पुरुषांना जमतं ना अजून... असं निलाजरे होऊन विचारत. वय साठीच्या पार असल्याने कुणी त्यांना काही बोलत नसे. एखादी बाई गॅलरीत कपडे सुकायला घालू लागली की ते तिच्याकडे बघूनबघून बोलत राहात. चाळीसमोरून जाणाऱ्या बाया... मुली... सदानाना अंगप्रत्यंगात जवळजवळ पाठ झाल्या होत्या. चाळीतल्या एखाद्या मुलाचं लग्न झालं किंवा एखादी मुलगी लग्नानंतर माहेरी आली की सदाना हमखास विचारत, कसं वाटतंय आता... सगळे छान चाललंय ना... हे प्रश्न विचारताना त्यांच्यासमोर त्या नवदांपत्य त्याचे शरीरसंबंध चालू आहेत, असे चित्र तरळून जाई. त्यांच्या चेहऱ्यावर तसे भाव उमटत. समोरचा माणूस लाजून रागावून वैतागून सरपटत निघून जाई. कारण बोलायचं तर बोलायचं काय... यांच्या बोलण्यात एकही शब्द आक्षेपहार्य नाही. रोजच्या वापरातल्या एकएका शब्दाला सदाना म्हणताम्हणता अश्लील अर्थ चिकटवून टाकीत. कोणी आक्षेप घेईल असे वाटले की वाच्यार्थाबद्दल निशंक असल्याचा आत्मविश्वास चेहऱ्यावर मिरवीत साळसूदपणे पुढे बोलू लागत.
सदानाचा हा छळ गेली अनेक वर्षे चाळकरी भोगत आहेत. पण एवढ्या वर्षांत सदानाला कोणी उलट बोलल्याचं उदाहरण नाही. सदानाचं बोलणं कोणी मनावर घेत नसेल म्हणालात तरी चालेल. पण चाळीत चर्चा चाले. बायकाही कधीकधी त्यांच्या गोष्टी सांगून फिदीफिदी हसत. या गोष्टी ऐकत मोठ्या होणाऱ्या मुली वयात येताच सदानापासून फटकून राहत.
मी सातवीत असताना सदानाच्या घरी गेलो होतो. सदाना चटेरीपटेरी पॅंट घालून पत्र्याच्या खुर्चीत बसले होते. त्यांच्या हातात रंगीत पुस्तक होतं. मी जाताच त्यांनी ते खाटेवरच्या गादीखाली सरकवलं. मी विचारलं, सदाना कसलं पुस्तक, तर ते म्हणाले होते, मनोहरा, तुला सू करता येते का नीट... जमलं की सांग... मग देईन तुला... मला त्यांचा राग आला. त्या रागाने मी त्यांच्याकडे जाणं टाळलं. पुढे दहावी झाल्यावर मी बाहेरगावी होस्टेलवर राहून शिकू लागलो. घरी आलो म्हणजे सदानांचे किस्से कळत. पण मी त्यांच्या वाऱ्याला थांबत नसे.
बारावी होऊन इथे आल्यावर मात्र मला त्यांचे एकाहून एक किस्से कळू लागले आणि हा माणूस चाळ सोडून जाईल तर बरे, असे वाटू लागले. अर्थात चाळीत कोणी माझ्या मताशी सहमत नव्हते. कारण सदांनांनी कधीही आक्षेपार्ह वर्तन केलं नव्हतं. ते सर्वांच्या कामाला येत असत. गेल्या वीस वर्षांत लाईट बिल भरण्याचे काम दरमहा सदाना विनामोबदला करत आले होते. कोणाला कधी पैसे लागले तर सदा नाही म्हणत नसेत. पाहुणारावळा आल्यावर आणि सणसमारंभ असल्यावर सदाना आपले घर वापरायला देत असत.
दोन महिन्यांपूर्वी शहाणेउठणे कुटुंब चाळीत राहायला आले. सदाना सवयीने त्यांचं सामान उचलायला गेले होते. सामान घरात येऊन पडल्यावर मिस्टर शहाणेउठणे सर्वांना थांबायला सांगून बाहेर गेले. थंडा घेऊन आले. सदानांना थंडा देत त्यांनी मिसेस शहाणेउठणे यांची ओळख करून दिली. त्यावर सदाना म्हणाले. नवरा-बायको कळतात हो पटकन. त्याला काय वेळ लागतो. आता ही मुलगी तुम्हा दोघांची, हे काय सांगायला हवं. इथे दोघांची या शब्दाचा अश्लील उच्चार मिसेस शहाणेउठणेंना बरोबर कळला.
मग हळूहळू सदानांच्या या सर्व कथा कळल्या. शहाणेउठणे दिसायला सुंदर नव्हत्या, पण त्यांची शरीरठेवण आव्हान आणि आवाहन करणारी होती. भल्याभल्यांना मानेवर नियंत्रण ठेवता येत नसे. अर्थातच सदाना त्यांना न पाहतील तर नवल... पुन्हा गोची... आक्षेप घ्यायचा तर घ्यायचा काय... सदाना एकही आक्षेपार्ह शब्द उच्चारत नसत... आणि शहाणेउठणे यांच्या खोलीत डोकावतही नसत. दिसल्या म्हणजे पाहात. त्या वैतागल्या होत्या. सदानांना कधी एकदा काहीतरी सुनावते असे त्यांना झाले होते. त्या जणू संधीची वाट पाहत होत्या...
आणि एक दिवस ती संधी मिळाली. चाळीतल्या केकण्यांचा मुलगा हनिमून वरून परत आला. त्याच्या स्वागताला घरात होते तेवढे लोक गॅलरीत आले होते. तो चाळीच्या पायऱ्यांवर होता, तोच अश्लील खोकत सदाना म्हणाले, तरंगत असल्यासारखं वाटतंय ना... की हाडं खिळखिळी झाली प्रवासात.... इथे प्रवासात शब्दाचा उच्चार अश्लील. हीच संधी नेमकी साधत मिसेस शहाणेउठणे म्हणाल्या, सदाना तुम्हीही एकदा कुठेतरी तरंगून या ना. या वयात तोंडाची अशी वाफ जाणं बरं नाही. चाळीत बाया माणसं राहतात. एकदा कफ  निघून की खोकलाही यायचा नाही पुन्हा. पैसाअडका नसला तर सांगा, आम्ही वर्गणी काढू. रोज कानात गटारगंगा ओतून घेण्यापेक्षा ते बरे.
मिसेस शहाणीउठणे मनस्वी संतापल्या होत्या. रागाने तणतणत त्या घरात निघून गेल्या. अवघी चाळ स्तब्ध झाली होती. अनेकांना वाटत होतं शहाणेउठणे बोलल्या ते काही चुकीचं नाही, कुणीतरी बोलायलाच हवं होतं सदानांना. सदाला तोंड पाडून घरात गेले.
पहिल्यांदाच मला फार बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी सदानाच्या घराला कुलूप लावलं होतं. त्यावर एक चिठ्ठी होती-
या तोंडाला गटारगंगा पाहण्याची सवय लागली आहे. ते आता गंगाजल देणे शक्य नाही. तेव्हा मी चाळ सोडून जातोय. कुठे आहे मला माहीत नाही. चाळकऱ्यांनो, आजवर जे प्रेम दिलात त्याबद्दल धन्यवाद. माझ्या या खोलीच काय करायचं ते मिसेस शहाणेउठणेंना विचारा. त्यांना म्हणावं एखादा सभ्य पुरुष तुमच्या पाहण्यात असेल तर ठेवा त्याला या खोलीत. धन्यवाद.
सदाना पांचट होते, तरी ते कुठे गेले असतील, कसे असतील याची काळजी शहाणेउठणेंसह सगळ्यांनाच लागून राहिली. सदाना चाळ सोडून गेल्यापासून सगळे जण त्यांच्याबद्दल, त्यांच्या चांगुलपणाबद्दल बोलू लागले. मला त्या सगळ्या दुतोंडी माणसांचा राग आला.
पण काल आमचे बाबा म्हणाले, तोडणे घाण होता हे खरंच, पण अडीअडचणीला उभा राहायचा पाठीशी... आमच्या मनोहरच्या शिक्षणाचा खर्च केलान दोन वर्षे. पण एका शब्दाने बोलला नाही कोणाला. मला म्हणायचा, तुझा पोरगा हुशार आहे, नाव काढील चाळीचं. माझे पैसे ठेवून काय कुत्र खाणार आहे...
बाबांच्या तोंडची वाक्य ऐकताना मी भोवंडून निघालो. सदाना अश्लील होते, पण फक्त अश्लील नव्हते, हे कळायला फारच उशीर झाला होता...
- वैभव बळीराम चाळके
9702 723 652


No comments:

Post a Comment