कथा स्वर्गसुख
त्यावेळी मी त्या तिघींच्या चेहऱ्यावरून स्वर्गसुख ओसंडून
पाहताना पाहिलं....
काही काही गोष्टी
अशा असतात, ज्या कुठे घडल्या, किती
वाजता घडल्या आणि नेमक्या कोणत्या माणसाबरोबर घडल्या हे महत्त्वाचं नसतंच मुळी.
तसंच याही गोष्टीचं आहे असं मला वाटतं.
जुलै की ऑगस्टचा महिना होता. तुम्ही जुलैच म्हणा हवे तर. २६
जुलै असं म्हटलात तरी चालेल सोयीसाठी… स्थळ शहरच
होतं. आपण मुंबई समजू तुमच्या सोयीसाठी.
मी ऑफिसला सुट्टी घेतली होती. एका नातेवाईकाला भेटायला गेलो
होतो. पाऊस वाढायला लागला, म्हणून आम्ही घाईगडबडीत निघालो. येताना
आधी शेजारी फोन करून मुले पोहचली का चौकशी केली. दोन्ही मुलं कॉलेजातून वेळेवर घरी
परतली होती. मोबाईल नव्यानेच घेतला होता मी. त्यावर माझी बायको रंजना मुलांशी
चांगली पंधरा मिनिटे बोलली. मुलाला बाहेर जाऊ नकोस, टीव्ही
लावू नको, गॅस लावू नकोस, जेवण मी
आल्यावर करते वगैरे वगैरे.
बाहेर सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. छत्र्या उघडलेल्या
होत्या, पण अंगावर बोटभर जागाही सुखी नव्हती. अवघे
ओलेचिंब झालो होतो. पाण्यातून पाय उचलत नव्हते, तरी मी
रंजनाला, पटपट चल, शक्य तेवढ्या लवकर
पाय उचल, म्हणून सांगत होतो. शेवटी ती
वैतागली म्हणाली, काटनचा परकर घातलाय, तो
चिकटून बसलाय आत. खाली पाण्यामुळे आणि वर परकरमुळे पायाला बेड्या पडल्यासारखे झालंय.
मी म्हटलं, जरा हळू बोल, आजूबाजूला लोक
चालताहेत याचं भान ठेव. ती म्हणाली, कोण ऐकतंय, ज्याला त्याला कधी घर गाठतो झालंय. त्यात या पावसाचा आवाज... आणि कुठं
अश्लील बोलले मी?
बरं! बाई! मी चुकलो, मी
चुचकारत म्हणालो, मला माफ कर... पण पाय उचल. जाईपर्यंत किती
वाजताहेत कुणास ठाऊक !
साधारण सात मिनिटांच्या अंतरासाठी वीस-पंचवीस मिनिटे खर्च
केल्यावर आम्ही स्टेशनात पोहचलो. माझा पास होता. तिचं रीर्टन तिकीट काढलं होतं.
स्टेशनात शिरण्यापूर्वी मी तिचं तिकीट आहे ना खिशात, याची
खात्री केली. गर्दीतून वाट काढत स्टेशनात पोहचलो.
स्टेशनातली गर्दी पाहून भर पावसात,
पाण्यानं निथळत असताना घाम फुटायची वेळ आली. इंडिकेटर बंद होते.
माणसांनी प्लॅटफार्म पूर्ण भरलेला. तसेच
निथळत हात चोळत उभे राहिलो. बायकोने पदर
अंगाभोवती गुंडाळून घेतला. अर्धा तास उलटला तेव्हा एक गाडी मुंगीच्या गतीने स्टेशनात
आली. पण गाडीत चढणे दूर, गाडीच्या आसपासही आम्हाला फिरकता
आले नाही. गाडी आली तशीच हळूवार निघून गेली. शेकडो माणसं अगतिकतेने तिच्याकडे पाहत
होती. त्यात आम्ही दोघे. बायकोला घेऊन आता या वेळी, अशा
भरलेला गाडीतून शिरणे, केवळ अशक्य हे कळून आल्यामुळे मी
विचारात.
म्हणता म्हणता तास दीड तास झाला. पाऊस अखंड पडत होता. एक
दोन गाड्या येऊन गेल्या. त्या गाड्यांमध्ये चढण्याचा विचार सोडा,
त्या गाड्यांमध्ये चढण्याचा विचार करण्याचंही धाडस झालं नाही माझं.
दुकानदारांनी दुकानं बंद केली. ट्रॅकवर पाणी चढलं. काही लोक बस मार्गाने जायला
स्टेशन बाहेर पडले. ज्यांना बसने जाणं शक्य नव्हते, ते
केविलवाण्या चेहेऱ्याने पाऊस थांबण्याची आणि रेल्वे सुरू होण्याची वाट पाहत
थांबले.
आमच्या हिने पुन्हा शेजारी फोन केला. मुलीला कुकर लावायला
सांगितला. मुलाला पुन्हा एकदा बाहेर न जाण्याची ताकीद दिली. तेवढ्यात एक बाई रंजना
जवळ येऊन तिला म्हणाली, एक फोन करू का? इथं
कुठं पीसीओही नाही.
तिने तिला फोन दिला. माझ्याकडे फोन करत तिने फोन लावून
देण्याची विनंती केली. मी तिच्या घरचा फोन लावला. रिंग वाजल्यावर तिला दिला. ती
बाई, मी सुखरूप आहे वैगेरे बोलली. काळजी करू नका,
खूप माणसे आहेत म्हणाली.
आता अंधार पडू लागला होता. पाऊस आणि अंधार उतरोत्तर वाढतच
गेला. पाणी ट्रॅकवरून प्लॅटफार्मवर चढलं. हळूहळू पाणी आणखी वाढलं तसे लोक
जिन्याकडे सरकले. एकेक पायरी वर चढू लागले. शेकडो माणसं असह्य ताणाने ताणलेली.
काही जण त्या ताणातही हसायचा प्रयत्न करत होते. मघाशी फोन मागणारी बाई आता
रंजनाबरोबर गप्पा मारू लागली.
हळूहळू पाऊस वाढत गेला. प्लॅटफार्मवरचे लोक विरळ झाले.
पाण्याचा जोर वाढला तसे सगळेच हळूहळू प्रथम जिना... मग ब्रिजवर चढले. पाणी म्हणता
एकेक पायरी पादक्रांत करत होते.
मी रंजनाला घेऊन सरळ ब्रिजवर गेलो. एका बाजूस जाऊन उभे
राहिलो. मघाशी तिच्याशी बोलणारी बाईही सोबत होतीच. ट्रॅक पाण्याखाली गेले होते.
प्लॅटफार्मही पाण्याखाली होता. पाण्याचे हजार हत्ती मनसोक्त झुलत होते. खांबाना...
भिंतीना धडका देत होते. लोकांमध्ये आता टेन्शन वाढलं होतं. मुलं,
पालक, नातेवाईक घरी काळजी करत होते आणि इथे
शेकडो लोक अडकून पडलेले. काय करावं तेच कळेना.
अनेक पुरुष पायऱ्यांवर बसले. दोन-चार तास उभे राहून आम्ही
हैराण झालो होतो. शेवटी ब्रिजवर जरा बरी जागा पाहून बसलो. म्हणता म्हणता ब्रिजवर
उभ्या माणसांनी बैठक मारली. रात्र बरीच झाली होती. पाऊस सुरूच होता. आता किती
वेळाने सुटका होईल सांगता येत नव्हते.
दोन्ही बाजूने अथांग पाण्यात उतरणाऱ्या ब्रिजवर साधारण
शे-दीडशे माणसं एकाकी अडकून पडलेली. अर्थातच त्यांची कुणाला फिकीर नव्हती. कारण
सगळं शहर पाण्याखाली होतं आणि जागोजागी माणसं अडकली होती.
रात्रीचे दीड दोन वाजले असतील... रंजना आणि त्या बाईकडे
दुसरी एक बाई आली. ती त्या रंजनाच्या मैत्रिणीच्या कानात काहीतरी बोलली. मग ती
मैत्रीण रंजनाच्या कानात बोलली. मघाशी तिच्या एकटीच्या चेहऱ्यावर ताण होता. आता तो
रंजना आणि तिच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर उतरला. रंजना म्हणाली,
बसा ना इथे... सोबत कुणी आहे का?
नाही... त्या बायकांबरोबर बसले होते तिथे... त्यांना
सांगितलं तर कुणी काही लक्षच देईना, गप्प बस
म्हणतात...
थांब काही तरी उपाय निघेल, रंजना
तिला म्हणाली, मग माझ्याकडे सरकत म्हणाली, तिला बाथरूमला लागलेय जोरात. हैराण झाली आहे. काय करता येईल?
मी म्हटलं, पाहतो,
मी उठलो. ब्रिजचं अवलोकन केलं. काहीच मार्ग सापडेना
एवढ्या ब्रिजवर शे-दीडशे माणसं बसली होती. त्यात सगळ्या पायऱ्यांवर
तरुण मुलं बसली होती. काही बाया आणि मुलीही होत्या. पण जिथे बाई-माणसाला मोकळ्याने सुटका करून घेता येईल, अशी जागाच
दिसेना कुठे.
मी निराश होऊन परत फिरलो. त्या बाईचा केविलवाणा चेहरा पाहून
कुठेच संधी नाही हे शब्द माझ्या तोंडातून फुटेनात. मी रंजनाला म्हणालो,
अवघड आहे. दोन शब्द बोलताना माझा कंठ दाटला उगाचच. रंजनाला माझ्या
भरून आलेल्या आवाजाचं कारण कळलं असावं, पण चेहरा केविलवाणा
करून ती म्हणाली, मलाही...
मला काय करावं तेच कळेना.
रंजनाची ती पहिली मैत्रीण आणि दुसरी मैत्रीण दोघी आपापसात
काहीतरी बोलत होत्या. जीवघेण्या आजारानं आजारी असलेल्या मुलांच्या आया बोलतात
तशा... अगतिक.
हिला पण.. दुसरी मैत्रिण रंजनाला म्हणाली.
माझंही तेच आहे... पण करणार काय?
दुसरी मैत्रीण मघाशी अवघडत आही होती,
पण आता तिच्या चेहऱ्यावर लाज कमी भीती जास्त दाटून आली होती. ती थेट
माझ्याकडे पाहत म्हणाली, भाऊ, काय
करूया...
तिच्या थेट प्रश्नानं मी बावरलो. मी उत्तर तरी काय देणार
होतो! तिचा चेहरा असा केविलवाणा होता की या क्षणी
तिच्यासाठी देहाची कातडी करून आडोसा करता आला असता तरी केला असता मी.
जरा... जरा थांबा... काहीतरी मार्ग निघेल,
मी म्हणालो.
ती मांडी घालून बसली होती ती उकडवी बसली. रंजनाने तिचा हात
धरला. शेजारच्या एका काकांनी रंजनाकडे पाहत विचारलं, तब्येत
ठीक नाही का?
रंजना म्हणाली, नाही...
गार वाटायला लागलंय तिला!
मग ते काका झुलणारे हत्ती बघण्यात गर्क झाले.
गार तर आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. पाण्यातच तर बसलो होतो
आम्ही. मी आणखी एक प्रयत्न म्हणून ब्रिजच्या इकडच्या टोकापासून तिकडच्या
टोकापर्यंत चक्कर टाकायला उठलो. आशेचा अंधुक दीप जळत होता. ईश्वराकडे प्रार्थना
करून मी उठलो. पलीकडे टोकाला आलो तर पाण्यावर दिसणाऱ्या शेवटच्या पायरीवर उभे दोन
तरुण लघवी करताना दिसले. मीही त्यांच्याशेजारी उभा राहून मोकळा झालो. लघवी करताना
मला मोकळा झाल्याचा आनंद आणि त्या बाया अवघडून पडल्यात याची लाज एकाच वेळी वाटत
राहिली.
पॅंटची बटणं लावताना माघारी फिरून तीन पायऱ्या चढलो तर त्या
तिथे बसलेले एक आजोबा म्हणाले, सोडा की कपड्यांतच. जरा गरम तरी वाटेल. कळतंय
कुणाला...
मला एकदम उपाय सापडला. झपाझप पावले टाकत मी आलो. माझ्या
बॉडी लॅंग्वेजवरून काहीतरी उपाय सापडल्याचं तिघींनीही ओळखलं. त्यात जास्त अवघडलेली
दुसरी मैत्रीण उत्सुकतेने- आशेने पाहत राहिली.
मी आलो. रंजनाच्या बाजूला बसलो. म्हटलं,
सोडा बसलाय तिथेच. काही कळत नाही कुणाला.
रंजनाने त्या दोघीकडे पाहिलं.
काय? त्यांचा चेहरा बोलला. त्या दोघींनाच आवाज
जाईल एवढ्या आवाजात रंजना म्हणाली, द्या सोडून जागेवर
म्हणताहेत.
दोघींचे चेहरे वेगळेच दिसले. कळतंय. पण वळत नाही सारखे.
मी त्यांना म्हटलं, आता दुसरा
पर्याय नाही. मी तिकडे पाहतो. तुम्ही कार्यक्रम आटपा.
दोघींनी खोल श्वास घेतला. चेहऱ्यावर डावा हात दाबला. रंजना
म्हणाली, आधी मी सोडते, मग
तुम्ही सोडा हवं तर.
तिने माझा दंड पकडला आणि डोळे मिटले. त्या दोघी आणि मी
तिच्या बंद डोळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचा ताण
उतरला. कळीचं फूल व्हावं तशी ती फुलून ताजीतवानी झाली. एकदम मोकळी. मग माझ्याकडे
पाहत हसली आणि म्हणाली, तिकडे पाहा. मी मान फिरवली. पाण्याचे क्रूर
हत्ती झुलत धडकत होते.
माझ्या दंडावर चापटी मारत रंजना म्हणाली,
झालं...
मी वळून पाहिलं, तर तिघीही
एकदम मोकळ्या झालेल्या. त्या दोघी नजरेनच थॅक्स म्हणाल्या मला. मलाही एकदम
सुटल्यासारख वाटलं.
त्यावेळी... मी त्या तिघींच्या चेहऱ्यावरून स्वर्गसुख
ओसंडून वाहताना पाहिलं.
-
वैभव बळीराम चाळके,
संपर्क- ९७०२७२३६५२
No comments:
Post a Comment