(वैभव बळीराम चाळके, दै. नवाकाळ, 2 जून 19)
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी वजन घटवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खात राहण्याचा सल्ला दिला होता. हिंदी चित्रपटसृष्टीपासून सुरू झालेला वजन घटवण्याचा हा नवा फंडा चांगलाच गाजला. त्यानंतर दिवसातून फक्त दोन वेळ जेवा असे सांगत जगन्नाथ दीक्षित यांनी नवा प्लॅन लोकांसमोर ठेवला. त्यालाही चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता डॉ. तनवीर देशमुख यांनी आणखी एक नवा प्लान आणला आहे. तो समाजात लोकप्रिय होऊ लागला आहे. राहुरी येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. तनवीर देशमुख यांचा हा नवा डाइट प्लान नेमका कसा आहे, हे आम्ही त्यांच्याकडूनच विस्ताराने जाणून घेतले.
40 दिवसात तब्बल 18 किलो
इतके वजन कमी केले
डॉक्टर सांगतात, माझे स्वतःचे वजन तब्बल एकशे दोन किलो होते. ते कमी करण्यासाठी मी अनेक गोष्टी केल्या. ज्यांनी ज्यांनी जे जे सांगितले ते ते करून पाहिले. पण वजन कमी झाले नाही. फार तर एखाद किलो वजन कमी होत होते. त्यासाठीसुद्धा दोन-दोन महिने तो विशिष्ट डायट पाळावा लागत होता. मग मी स्वतः वजन का वाढते, याचा अभ्यास करायला सुरुवात केली. वजन वाढण्याची कारणे शोधली. मग 40 दिवसात तब्बल 18 किलो इतके वजन कमी केले.
कमी खाल्ले तरी शरीरात
जास्त कॅलरीज जातात
सर्वसाधारण भारतीय माणसाला चोवीस तासांसाठी साधारणपणे दोन हजार कॅलरीज लागतात. आपण मात्र आपल्या आहारात 4000 ते 5000 कॅलरीज घेत असतो. वजन कमी करू इच्छिणारे लोक कमी खातात, पण त्यांचे खाणे अधिक कॅलरीज युक्त असते. त्यामुळेच कमी खाल्ले तरी शरीरात जास्त कॅलरीज जात असतात. आपण कमी खातो, पण काय खातो त्याकडे पाहत नाही. म्हणून मी सांगतो की, उपाशी राहण्याची गरज नाही. शरीरात कॅलरीज कमी जातील, असे पाहा. तसे केल्याने वजन सहज कमी होते. वजन कमी करायचे म्हणजे शरीरात जाणार्या कॅलरीज कमी करायच्या, एवढे सूत्र लक्षात ठेवा. कमी कॅलरीज असलेला आहार पोटभर घ्या. आता हे कॅलरीजचे गणित कसे ते प्रथम समजून घेतले पाहिजे. सर्व प्रकारच्या भाज्या या कमी कॅलरीज असणार्या असतात. म्हणजे शंभर ग्रॅम हिरवी भाजी घेतली तर त्यात 20 कॅलरीज असतात. त्याउलट ते साखर, तळलेले पदार्थ घेतले तर 100 ग्रॅम मध्ये तब्बल 900 कॅलरीज असतात. म्हणजे तुम्ही वजन कमी करण्यासाठी इतर आहार कमी केला, पण त्याच दिवशी चार गुलाबजाम खाल्लात तर उपयोग होणार नाही. कारण गुलाबजाममध्ये शंभर ग्रॅममध्ये तब्बल 900 कॅलरीज असतात. म्हणून तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर सर्वप्रथम साखरेचा त्याग करा. चहा पूर्ण सोडून द्या.
नाश्त्यामध्ये फळे खा
नाश्त्यामध्ये फळे खा. सर्व प्रकारची फळे चालतील. बीट, सफरचंद, डाळिंब, केळे अशी सर्व प्रकारची फळे चालतील. ही सगळी फळे मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात साखर टाकू नका. वाटलेली ती फळे सर्व चौथ्यासहित खा. तुम्हाला हवे असेल तर या मिश्रणात अर्धा ग्लास दूध टाका. म्हणजे ते थोडे पातळ होऊ शकेल. पोटभर हा आहार घ्या. म्हणजे भुकेचा प्रश्न मिटेल आणि कॅलरीज कमी जातील.
दुपारच्या जेवणात भाज्या
दुपारच्या जेवणाचासुद्धा आपण नीट विचार केला पाहिजे. आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट फार मोठ्या प्रमाणात असतात. ते शरीराला फारशी ऊर्जा देत नाहीत. शिवाय ते पचनाची गती मंद करीत असतात. म्हणून आपण आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट कमी केले पाहिजेत. पोळी किंवा चपाती यातून कार्बोहायड्रेट शरीरात जात असतात. म्हणून दुपारच्या आहारात चपाती बंद करा. बाजरी, ज्वारी यांची भाकरी हीसुद्धा कार्बोहाइड्रेटसंपन्न असते. म्हणून बाजरी किंवा ज्वारी यापैकी एका धान्यापासून बनवलेली अर्धी भाकरी दुपारी घ्या. अर्ध्या भाकरीने पोट कसे भरेल, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. त्याचा विचार आपण केलेला आहे. या अर्ध्या भाकरीसोबत खाण्यासाठी पुरेशी हिरवी पालेभाजी करून घ्या. त्यासोबत कोबी, पालक, काकडी, गाजर, फळे यांचे सलाड करून घ्या. तुमची अर्धी भाकरी खाऊन झाली की मग पोट भरेपर्यंत ही शिजवलेली हिरवी पालेभाजी आणि सलाद खा. उपाशी राहू नका. भरपेट खा.
संध्याकाळच्या नाश्त्याच्या
वेळेला उसाचा रस प्या
संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेला उसाचा रस प्या. अगदी चार-पाच ग्लास प्यायलात तरी चालेल. टोमॅटो हा कमी कॅलरीज असलेला पदार्थ असल्याने नाश्त्याच्या वेळी तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात टोमॅटो खाऊ शकता. शंभर ग्रॅम टोमॅटोमध्ये केवळ सात ते आठ ग्रॅम कॅलरीज असतात.
रात्री प्रोटीनयुक्त आहार घ्या
आता रात्रीच्या आहाराचा विचार करू. तुम्ही शाकाहारी असाल तरीही तुम्हाला रात्री प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारच्या डाळी घ्या. त्या कुकरला लावा. त्यामध्ये आले, लसूण आणि गायीचे तूप आणि तुम्हाला हवा तो मसाला हव्या त्या प्रमाणात टाका. त्या डाळी चांगल्या शिजवून घ्या. तेल मात्र वापरू नका. या डाळी चांगल्या शिजल्या पाहिजेत. त्यासाठी कुकरला आठ ते दहा शिट्ट्या होऊ द्या. रात्रीच्या जेवणात पोळी किंवा भाकरी घेणे पूर्ण वर्ज्य करा. दिवसभरातील या आहारातून तुमच्या शरीराच्या सर्व पोषणमूल्यांच्या गरजा पूर्ण होतील.
चार अक्रोड आणि चार बदाम
रात्री चार अक्रोड आणि चार बदाम पाण्यात भिजायला घाला. सकाळी ते खा. न भिजवलेले अक्रोड किंवा कसे बदाम खाऊन शरीराला फायदा होत नाही. ते तसेच शरीरातून बाहेर फेकले जातात.
तेलाविषयी जागरूक व्हा
तेलाविषयी थोडे जागरूक व्हा. जेवढे तेल कमी खाल तेवढे वजन घटवण्यासाठी चांगले ठरते. आज बाजारात चांगल्या कंपनीचे चांगले तेल 110 ते 120 रुपये लिटरने उपलब्ध आहे. तुम्ही घाण्यावर जर शेंगदाणे घेऊन गेला तर तीन किलो शेंगदाण्यापासून एक लिटर तेल निघते. 80 रुपये किलो असा शेंगदाण्याचा भाव धरला तर एक लिटर शेंगदाणा तेलासाठी तीन किलो शेंगदाणे म्हणजे तब्बल 225 ते 240 रुपये इतका खर्च येतो. असे असताना बाजारात शेंगतेल 110 ते 120 रुपये किलो कसे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ते तसे मिळते, कारण त्या तेलामध्ये विविध केमिकल आणि पामतेलाचा वापर केलेला असतो. म्हणून मी सांगत असतो की, असे तेल ही अत्यंत खराब गोष्ट आहे. पिशवीतले तेल नको. रिफाइंड तेल नको. तेल वापरायचे झाले तर नैसर्गिक पद्धतीने काढलेले घाण्यावरचे तेल वापरा. गाईचे तूप सगळ्यात चांगले. तेही प्रति माणशी चार चमचे यापेक्षा जास्त नको.
सकाळी उठल्यावर
सकाळी उठल्यावर एक चमचा जिरेपूड, आल्याच्या चार कापा, दालचिनीची पूड चिमूटभर, सात पाकळ्या लसूण (तीही दगडावर ठेचलेली), दीड ग्लास पाण्यात टाकून घ्या. हे पाणी चांगले उकळवून घ्या. साधारण निम्मे होईपर्यंत ते उकळा. आटलेले पाणी बशीत घ्या. त्यात मध व लिंबू पिळा. त्याचे सेवन करा. हा चहाचा एक पर्यायच आहे. वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पेयांमुळे मेटाबोलिक हालचालींना वेग येतो. शरीरातील चरबी जळून जाण्यास मदत होते.
कोमट पाण्यामध्ये केलेले लिंबूपाणी तुम्हाला हवे तेव्हा पिऊ शकाल. भात मात्र पूर्ण टाळला पाहिजे. गव्हाच्या पिठाची पोळी टाळली पाहिजे. कधी खावी असे वाटलेच तर दुपारी एक पोळी घ्यावी.
आठवड्यातून एकावेळी सुट्टी
आठवड्यातून एकावेळी सुट्टी घ्या. त्यावेळी तुम्हाला हव्या त्या हॉटेलात जाऊन तुम्हाला हवे ते पदार्थ खा. महिन्यामध्ये असे चार दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकाल. त्याप्रमाणे याच दिवसातील एका वेळी तुम्ही तुमच्या आवडत्या हॉटेलात तुमचा आवडता पदार्थ हवा तेवढा खाऊ शकाल, मात्र आठवड्यातले उरलेले साडेसहा दिवस आपला डायट प्लान व्यवस्थित पाळला पाहिजे. या डायट प्लानचे शंभर टक्के पालन केल्यास 100% रिझल्ट मिळेल. आपले वजन कमी होईल. महिन्याकाठी 14 ते 16 किलो वजन कमी करणे या डायटमुळे शक्य आहे.
मी चालत नाही
व्यायाम करीत नाही
मी 40 दिवसात 18 किलो वजन कमी केले. मी चालत नाही. व्यायाम करीत नाही. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ओपीडीमध्ये असतो. अनुलोम-विलोम सारखा व्यायाम प्रकारसुद्धा मी करत नाही. तरीही सध्या माझे वजन कमी करून स्थिरावले आहे. याआधी वजन कमी करण्यासाठी मी खूप धावलो आहे. चाललो आहे. व्यायाम केला आहे. पण चुकीच्या आहारामुळे माझे वजन हे सारे करूनसुद्धा घडले नव्हते. गाईचे दूध हळद टाकून पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढे घेऊ शकता. मी स्वतः आठवड्यातून एक दिवस जे हवे ते खातो. कधी लग्नवगैरे कार्यक्रमात गेलो तर तेवढा वेळ अपवाद करतो.
21 हजारांची औषधे फुकट गेली
असे केल्याने वजन नक्कीच कमी होईल. औषधांची गरज पडणार नाही. मी अनेक प्रकारे प्रयत्न केले. खर्च केला. व्यायाम केला. फायदा झाला नाही. मात्र या फ्लॅनने माझे वजन घटले. मी एका कंपनीची तब्बल 21 हजारांची औषधे खाल्ली होती. फारसा फरक पडला नव्हता. मी खूप खर्च केला. तुम्ही तसा खर्च करु नका. तुम्ही खर्चाशिवाय आपले वजन कमी करू शकाल. अर्थात त्यासाठी मनाचा ठाम निर्धार करायला हवा. तुम्हाला जर या प्लॅनवर विश्वास असेल तरच हा प्लॅन सुरु करा. एक महिन्यात फरक पाहा. एक महिन्यानंतर मला येऊन आपल्याला किती यश मिळाले याची कल्पना द्या.
डॉ. तनवीर देशमुख यांनी सांगितलेला हा नवा प्लॅन अमलात आणून आपल्याला औषधाशिवाय जर आपले वजन आटोक्यात आणता आले तर ते एक वरदानच ठरावे. डॉ. देशमुख यांनी कोणतेही अघोरी उपाय सांगितलेले नाहीत. कदाचित पुढच्या काही महिन्यात हा डायट प्लॅन आणखी लोकप्रिय होऊन जाईल.
संपर्क- 8605 606 664
Asa Dikshit diet madhe navhata or chukich spread zala asel ....Karan mi je aikala hota te asa hota ki ....tumhala je kahi aawadata te 45 min kha pot bhareparyant kha ......ani asa divasatun fakt donnvela cha kha .....arroound 8 te 10 tasachya antarane ......pan madhe dusara khihi khayach nahi ...... Ani tyavels mala.acharya vatala hota ki he kasa kay posible aahe ......jar ekhadya manasala gulabjam.aawadat asatil Ani tyane potbhar gulam ja khalle tar tyach vajan kasa kay kami hoil ?
ReplyDelete