Monday, June 24, 2019

कथा... सांगू या... ऐकू या...



गोष्ट ऐकायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. आपलं बालपण आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यातच गेलं. या गोष्टींमधून आपल्या बालमनावर संस्कार झाले. रात्री झोपण्यापूर्वी आजीच्या कुशीत जावे... आजी गोष्ट सांगणार, म्हणून तिला आग्रह करावा आणि मग आजीने रोज नवी गोष्ट सांगावी असे ते दिवस होते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मुलांच्या जगण्यातली गोष्ट हरवली.
आटपाट नगर होतं... किंवा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या... किंवा कोणे एके काळी असं घडलं... असं म्हणून सुरू होणारी गोष्ट... त्यात आमची पिढी रमली आणि रमतगमत मोठी झाली. आज मात्र गोष्ट आपल्या आयुष्यातून हद्दपार झाली की काय, असं वाटावं अशी स्थिती आहे
यू-ट्युबसारख्या माध्यमातून खरेतर आता आपल्याला हव्या तेव्हा आणि हव्या तेवढ्या गोष्टी ऐकायला आणि ऐकवायला मिळू शकतात. पण ‘गोष्ट’ ही महत्त्वाची गोष्ट आहे हेच कदाचित आपण अलीकडच्या काळात विसरून गेलो आहोत.
मुलांसाठी काम करीत असताना मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखादी गोष्ट सांगू लागलो की, मुलं आणखी सांगा म्हणतात. मला ते शक्य नसतं, पण वाईट वाटत राहतं की, ही मुलं गोष्टीची उपाशी आहेत. म्हणूनच गेली काही वर्षे ‘आम्हालाही मुलांसाठी काही करायचं आहे’, असे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो, जवळच्या शाळेत जा आणि मुलांना गोष्टी सांगा.
गोष्ट ऐकायला फक्त मुलांनाच आवडते असे नाही, मोठ्या माणसांनाही गोष्टी आवडतात. म्हणूनच तर कथा-कादंबर्‍यांचा वाचकवर्ग मोठा आहे. कथाकथनाचे कार्यक्रमही अनेकदा होत असतात. आपल्याकडे त्याची मोठी परंपरा आहे. अलीकडच्या काळात त्याचे प्रमाण कमी झाले हे खरं, पण आपला कथाकथनाचा इतिहास मात्र चांगलाच मोठा आहे
काही महिन्यांपूर्वी साठ्ये महाविद्यालयात ‘कथा-कट्टा’ एक नावाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला. कथाकट्टा हा एक असा उपक्रम आहे, जो भाषा वाचवू पाहतो आहे. या लोकांना आपल्या सगळ्या प्रादेशिक भाषा जिवंत राहाव्यात असे वाटते आणि भाषांचं रक्षण करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी कथाकथनाला सुरुवात केली आहे. जागोजागी जाऊन हे लोक लोकांना गोष्टी सांगतात. त्यातलाच एक कथाकथनाचा कार्यक्रम मला ऐकायला मिळाला. सदाहत हसन मंटो या उर्दूतील महान कथाकाराच्या काही कथा त्यांनी या कार्यक्रमात सादर केल्या. कार्यक्रमाच्या पूर्वी मधुरा अभ्यंकर म्हणाली, ‘भाषा जतन करण्याचा हा एक मार्ग आहे म्हणून आम्ही हा उपक्रम चालवतो आहोत. जमिल हे लेखक याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर कार्यकर्ते कथाकथन करतात.’
मी ऐकला तो कार्यक्रम उर्दूतील कथांचा होता. हिंदुस्तानी बोली म्हणतात त्या बोलीतील  सदाहत हसन मंटो  यांनी लिहिलेल्या कथा त्यांनी वाचल्या. पण त्यांनी असं भाषेचं बंधन घालून घेतलेलं नाही. सगळ्यातच प्रादेशिक भाषांमधून कथाकथन व्हावं आणि त्यातून आपली भाषा जोपासली जावी यासाठीचा त्यांचा हा उपक्रम असल्याचे ते सांगतात.
खरे तर आपणही आपल्या भाषेसाठी आणि आपल्या लोकांसाठी असे कथाकथनाचे छोटे-मोठे प्रयोग करू शकतो. आपल्याकडे कथालेखनाची मोठी परंपरा आहे. आजही अनेक सशक्त कथाकार कथा लिहीत आहेत. त्यातल्या कथा घेऊन त्यांचे अभिवाचन केले तर लोकांना ते नक्कीच आवडेल. आपल्या महाविद्यालयांनी, विविध सांस्कृतिक संस्थांनी... एवढेच काय आपल्या सोसायट्यांनीही असा एखादा वाचकांचा गट करून कथा सांगायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सांगणारे आले की ऐकणार येतीलच. मग त्या कथेच्या निमित्ताने आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं जगणं टिकून राहील. प्रवाही होईल. संवर्धित होईल. आपल्या भाषा आणि जगणे इंग्रजीखाली चिरडून जाऊ नये यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यातली ही एक अत्यंत चांगली, लोकांना हमखास आवडणारी आणि भाषा टिकवून ठेवायला अधिक सोयीस्कर ठरणारी गोष्ट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कथा सांगू या. ऐकू या. त्यामुळे आपली संस्कृतीच केवळ टिकणार नाही तर तिच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातील. तिच्यात कथा पुन्हा पुन्हा घडत राहतील. आपल्यासाठी आणि आपल्या येणार्‍या पिढीसाठी ते फारच मोलाचे असेल.

No comments:

Post a Comment