मी नववीत शिकत होतो. बाबा पोलिसातून निवृत्त होऊन गावी आला होता. गावची जत्रा जवळ आली तशी बकरू आणायची लगबग सुरू झाली. आमचे मोठे चुलते अण्णा आणि आम्ही दरवर्षी एक बकरू घ्यायचो. पण यंदा बाबा म्हणाला, मी माझं वेगळं
बकरू घेणार.
अण्णानं मग दोन पिल्लं मागवली. चार आठ दिवस खाऊपिऊ घालून जत्रेच्या आदल्या रात्री बकरू कापायचं हा पिढ्यांपिढ्यांचा रिवाज. त्या पिल्लांमागे आम्ही मुले दरवर्षी आवडीने फिरत राहायचो. जत्रा आली की, पाव्हणे रावळे घरी येत. त्यात मोठी मौज असे. जत्रेचा तो कालावधी इतका भारी असे की दरवर्षी आम्ही जत्रेची वाट
पाहत असायचो.
अण्णानं मागवलेली पिल्लं आली आणि बाबानं त्यातल्या एका पिल्लाचा ताबा घेतला. तो सकाळ-संध्याकाळ त्या पिल्लाला घेऊन शेतावर न्यायला लागला. पार अंधारून आलं तरी तो परतेना झाला. जत्रेच्या आधीची रात्र झाली. मागच्या अंगणात अण्णानं आपल बकरू कापायला घेतलं. मदतीला मधू आला होता. त्यानं अण्णाचं बकरू कापतानाच मला फर्मान सोडलं., रं पोरा, तुझं बी घेऊन ये’
मी बाबाला शोधत गेलो. बाबा आला. त्याने ते अण्णाचं बकरू कापताना पाहिले. अण्णा म्हणाला, जा रं! घेऊन ये मधु पुढची
बकरी हायत.
बाबा गेला. जो आमच्या पडवीत बांधलेलं बकरं घेऊन येईल असं वाटलं होतं. पण अण्णाचं बकरू तोडून साफ करून झालं तरी बाबा आलाच नाही.
अण्णाच्या सांगण्यावरून मी बाबाला हाक दिली. तो तिकडूनचं म्हणाला, नाय कापायचं माझं बकरू.. तुम्ही आवरा.
त्यांचे ते शब्द ऐकून एकच गडबड उडाली. अण्णा म्हणाला, डोकं फिरलं की काय?
आई बाहेर येऊन म्हणाली, डोकं फिरलं व्हय. उद्या पोर आणि नातेवाईक काय तुझ्या बकर्याच्या तोंडाकडं बघून जत्रा करतीलं व्हय!
‘अण्णा उठा. तुम्हीच घेऊन या’
आईनं अण्णाला फर्मान सोडलं.
अण्णा उठला. बकरू आणायला गेला. तसा बाबा तरातरा चालत माडीवर गेला.
आम्ही इकडे ते बकरू कापून, तोडून, साफ करून शिजायला घातलं. अवघं घर गंधानं भरून गेलं. रात्री सगळे जेवणाला बसलो तरी बाबा माडीवरून उतरला नव्हता.
आई बोलवायला गेली, बाबा नाही.
आम्ही टम्म जेवलो.
बाबा त्या रात्री जेवला की नाही माहित नाही. पण त्या दिवसापासून बाबा शाकाहारी झाला.
No comments:
Post a Comment