ही आहे आटपाट शहरातली
सहजीवन सोसायटी. हे शहर एकविसाव्या शतकातला शहर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न
असलेली ही सोसायटी... म्हणजे सोसायटीच्या गेटवर तुम्ही उभे राहिलात की तुमच्यासाठी
स्वयंचलित दरवाजा उघडला जातो. तो उघडत असताना सीसीटीव्हीने तुमच्या आगमनाची खबर
ऑफिसातील सुरक्षा कक्षात बसलेल्या सुरक्षारक्षकाच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर धडकते
आणि एक फोटोही काढला जातो. तो विजिटर फाईलमध्ये सेव्ह केला जातो. तुम्ही आलात...
डावीकडे तुम्हाला फ्रेश होण्यासाठी अतिशय स्वच्छ असे बेसीन, त्यावर तुम्हाला टॉवेल
अशा सुविधा दिसतील. उजव्या बाजूला मैदान, त्याच्याशेजारी बाग आणि या दोन्ही गोष्टी
आवश्यक त्या सामनाने संपन्न... शेजारी पंख्याची सुविधा आहे.... आणि एक खास
वातानुकूलित कक्षहा उभारला आहे.
तुम्ही पहिल्यांदाच पाहाल तेव्हा या
सोसायटीच्या अगदी प्रेमात पडाल, पण पुन्हा पुन्हा पाहत राहाल तर तुमच्या असे
लक्षात येईल की, सुविधा आहेत, पण त्याचा वापर कोण करते... म्हणजे वापर होतोच पण
वैयक्तिक वापर…
नको... हे फारच वरवरचं सांगणे झाले...
मी तुम्हाला थोडं खोलात जाऊन सांगतो…
आता एवढ्या मोठ्या सोसायटीतल्या
प्रत्येकाची गोष्ट सांगणे काही शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला त्यातल्या काही
मोजक्याच गोष्टी सांगतो.
ई विंग मधल्या देवांग कुलकर्णीच्या
घरात या... हे आजोबा सैन्यातून निवृत्त झालेले आहेत. अगदी परवा पंच्याहत्तरी साजरी
करेपर्यंत कडक शिस्तीने जगत होते. आजी होती तोवर छान चालले होते. आजी गेली आणि
देवांग काकांचा कडकपणाही संपला. आता ते 24 तास टीव्हीसमोर बसतात. इंटरनेटवर बसून
कुठल्याकुठल्या युद्धाच्या क्लिप पाहत राहतात. त्यांना दोन मुले आहेत. पण दोन्ही
अमेरिकेत... मोठा त्यांच्याशी बोलत नाही... छोटा कधीतरी व्हिडिओ कॉल करतो... आणि
बोलतो. हळूहळू देवांग काका थकत चालले आहेत. अलीकडे त्यांना चक्करसुद्धा येते.
म्हणून ते खाली जाणे टाळतात. दिवसदिवस घरातच असतात. टीव्ही हाच त्यांचा आता
जीवनसाथी आहे…
नाडकर्णी काकूंच्या घरात येणार... चला...
702 बी विंग हा
नाडकर्णी काकूंचा पत्ता. त्यांचा एकुलता एक मुलगा मतिमंद आहे. गेली दोन वर्षे तो
जागेला खिळून आहे. काकूंचे वय आता सत्तरच्या आसपास असेल आणि चिरंजिवांचे 45- 50. चिरंजीव काहीही
बोलत नाहीत. घरात लावलेल्या मोठ्या टीव्ही स्क्रीनवर गेम खेळत राहतात. तो एकच गेम
गेली चार-पाच वर्षे खेळून चिरंजीवाला कंटाळा आलेला नाही. नाडकरणी काकू गरज पडली की
दूरच्या नातेवाईकांपैकी कोणालातरी बोलावून घेतात. तेवढाच वेळ यांचे घर घर होते.
बाकी घरात कोणी राहते आहे यावर विश्वास बसू नये अशी शांतता…
चला आपण ए विंग ला सुद्धा जाऊन येऊ.
इथे गोपीनाथ पवार राहतात. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित आहेत. पहिला आयटीमध्ये
इंजिनीयर म्हणून चांगला नावलौकिक कमवून आहे. अलीकडेच त्याचा सरकारने सत्कार केला
होता. दुसरा मुलगा चित्रपटसृष्टीत एका मोठ्या मीडिया हाऊससोबत काम करतो. त्यानेही
तिथे चांगले नाव कमविले आहे. एका टेलिव्हिजन चॅनेलच्या सल्लागार मंडळात त्याचा
समावेश आहे. अत्यंत सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ पवार यांच्या घरात
गोपीनाथ पवार त्यांची पत्नी व दोन मुले राहतात. पण दुर्दैवाची गोष्ट सांगू...
गोपीनाथ पवारांना मायनर हार्ट अटॅक आला, त्या दिवशी घरी त्यांची बायको किंवा
दोन्ही मुले हजर नव्हती. परिणामी गोपीनाथ पवार स्वतः जाऊन ऍडमिट झाले.
सी विंग ला अकराव्या माळ्यावर शर्मा
फॅमिली राहते. त्यांची दोन मुले शाळेत जातात. मिस्टर शर्मा ऑईल कंपनीत मॅनेजर आहेत
आणि मिसेस शर्मा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रिन्सिपल आहेत. ही फॅमिली
अनेकदा एकमेकाशी हसत-खेळत जाता येताना दिसते. त्यामुळे बेस्ट फॅमिली ऑफ सोसायटी हा
अवॉर्ड त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे. अडचण एकच आहे दोघेही कामावर जातात
म्हणून त्यांना आपली मुले डे केअर सेंटर मध्ये ठेवावी लागतात. चांगले डे केअर
सेंटर दूर असल्याने त्यांनी मुलांना घेऊन जायला एका माणसाची नेमणूक केली आहे.
मात्र त्या माणसाचीच शर्मा दाम्पत्याच्या मनात भीती बसून राहिली आहे.
बी विंग पाचव्या माळ्यावर फर्नांडिस
एकटा राहतो. त्याच्याकडे त्याचे काही मित्र येतात. काही वेळेला मैत्रिणी आल्याचेही
सुरक्षारक्षकाने सोसायटीच्या अध्यक्षांना सांगितले आहे. फर्नांडिस ही काहीतरी
विचित्र गोष्ट असल्याचे सोसायटीच्या अध्यक्षांचे मत झाले आहे.
सोसायटीतल्या सव्वादोनशे फ्लॅटमध्ये
सव्वादोन हजार कथा आहेत. त्या सगळ्या सांगत बसत नाही. शेवटची एकच गोष्ट सांगतो.
मागच्या महिन्यात या सहजीवन सोसायटीत रामलाल यादव नावाच्या एका निवृत्त पोलिस
अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. बंद फ्लॅटमध्ये हा यादव कधीतरी मरुन पडला होता. शेजाऱ्यांना
वास आला म्हणून चौकशी केली गेली तेव्हा प्रेत मरून कुजले असल्याचे लक्षात आले.
हे असे झाले तर करायचे... काय अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये यावर काही उपाय
आहे का... हे शोधण्याचे काम सोसायटीने एका कन्सल्टंट कंपनीला तीन लाख रुपयांचा
करार करून सोपविले आहे.
-वैभव
बळीराम चाळके
९७०२ ७२३ ६५२
No comments:
Post a Comment