चार दिवस पाऊस पडला नाही आणि जमिनीचा ओलावा संपला की
निर्मला झाडूचा झडलेला पिसारा हाती घेऊन आपल्या घरापासून गल्ली झाडायला सुरुवात
करी. तास-दीड तासाने ती गल्लीच्या त्या टोकापर्यंत पोचे. काम कसं अगदी नीट. निर्मलाने
झाडलेल्या जागेवर कस्पट दिसायचं नाही कुणाला. अवघा परिसर झाडून काढी.
श्रावणाचे दिवस असले म्हणजे या स्वच्छतेने अवघा परिसर उजळून
निघे. कधीकधी तिथेच मुलं गोट्यांचा डाव मांडत. एरवी गल्लीत चिखल आणि पालापाचोळा
इतका असे की त्यात शेकडो गोट्या हरवल्या तरी एक सापडू नये. पण एकदा निर्मलाचा हात
फिरला म्हणजे मुलांसाठी लख्ख मैदान तयार होई. ती एकटी न आवाज करता झाडलोट करत राही.
कुणी येताजाताना दिसलं की त्याच्यासोबत बोले. ती व्यक्ती निघून गेली की पुन्हा
आपल्या स्वच्छता मोहिमेत दंग होई. अख्खी गल्ली स्वच्छ करून झाली की तिथेच एखाद्या
दगडावर विसावत दम खाई. मग उठून दूरवरच्या दगडावर झाडूचा बुंधा आपटून सरळ करी. मग
आपलं कमरेला गुंडाळलेला जुनेर नीट करून घेई. एका टोकाने घाम पुसून घेई. ब्लाउज खाली
करून नीट बसवी आणि सत्तरी पार केलेली हाडांची काडं झालेली निर्मला सदाच्या घरात
शिरे. तिथेच पडवीत बसून सदाच्या बायकोला म्हणे, पाणी दे गो. संगू पाण्याचा तांब्या
घेऊन आली की निरमला तो हाती घेई आणि दोन दोन घोट घशात ओतून घेत पाणी पीत राही.
जेवलीस काय के काकू? संगी विचारी.
पावसाने उघडीप दिलान तर म्हटलं गल्ली
तरी झाडून घ्यावी तर एवढा वकत झाला बघ.
भाकरी खातेस.
नको. सकाळी टाकलेय भाकरी. सुकाटपण भाजून ठेवलंय, म्हणून
निर्मला उठे आणि आपल्या घराकडे निघे.
आता त्या स्वच्छ मार्गावरून चालताना तिला आपण आपल्या घरात
नव्हे तर राजप्रासादात जातो आहोत, असे वाटे. त्या स्वच्छ आरस्पानी वाटेवरून चालत
ती घरात पोहोचे आणि त्या खुराडेवजा पडवीत थाटलेल्या आपला प्रशस्त महालात हातावर
अर्धी भाकरी आणि त्यावर बळीच्या सुकटाचे दोन तुकडे घेऊन उरल्यासुरल्या दातांनी ते
आनंदाने खात राही. एक अलौकिक समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरे. जेवणाची दोन भांडी
खळखळून टाकी. गोणपाट घासून उशाखाली पाठ घेई आणि पडून राही.
वाढत्या वयाबरोबर झोप उडाली आहे. रात्री थोडा वेळ डोळा लागे.
एरवी ती टक्क जागी असे. दिवसा कसली झोप येणार? ती नुसतीच पडून राही. जरा उन्हं कळली की गोणपाटाला घडी मारून ठेवी आणि कपभक च्या बनवून घेई. मग
घराला कडी मारून बाहेर पडे.
घराच्या कोपऱ्यावर वळून निर्मला गल्लीत प्रवेश करती झाली तर
तिला गल्लीत गोऱ्या सांडलेल्या दिसल्या. आत्ता झाडझूड केले नाही तोवर ही असली घाण
केलेली पाहून तिच्या मस्तकाची शिर उठली. नेहमीच्या मनस्वी रागाने तिने शिव्यांचा
यज्ञ सुरू केला.
रांडा ना धड चालता येत नाही. कशाला जन्मास आल्यात माहीत
नाही. मी म्हातारी झाडलोट करते कंबर बांधून, तर दिसत नाही होय या हिरोइन्सनी.
चालताना डोळे थाऱ्यावर नाहीत रांडांचे. पलीकडच्या तात्यांच्याच पोरी इथून गेल्या असाव्यात
अशा अंदाजाने निर्मला शिव्या घालू लागते. डोळे नाहीत होय... गोट्या बसवलान परमेश्वरा...
निर्मलाचा सुरू झालेला तोंडाचा पट्टा आता तासभर थांबायचं नाव घेत नाही. लोक हे
सगळं ओळखून आपल्या कानाची बटन लावून घेतात. निर्मलाने त्या गोवऱ्या उचलून दूर
शेतात फेकून दिल्या. मग त्याच स्थितीत पुढे निघाली. आता अवघ्या गल्लीची तपासणी
केल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती. पाटलांच्या घराशेजारी धन्या मुळेचं आंब्याचं
झाड होतं. त्याची कोरम फांदी मोडून गल्लीत पडली होती. त्यामुळे मगाशी झाडून स्वच्छ
केलेल्या गल्ली घाण दिसत होती. ती पाहून निर्मलाचं डोकं आणखी तापलं. ह्या धन्याचं
घरानं बुडालं, पण हा आंबा राहिला आहे माझी हाडं खायला... गुदस्ता पाडव्याला अशीच
गल्ली साफ केली आणि त्यावर त्याची फांदी पडली. इमल्याचं पोर जरा वाचलं. मी ती फांदी
उचलली तर माझ्या कमरेत चमाकलं. दोन दिवस जाग्यावर काढले. पाडव्याचं नमनपण चुकलं.
या रान्डच्या आंब्यापाई.
जरा पुढे सरकली तर चॉकलेटचे दोन कागद आणि एक गोळ्यांची
प्लास्टिक पिशवी पडलेली दिसली. ती उचलून दूर फेकत म्हातारी करवादली, या पोरांना तर
नेऊन गाडली पाहिजेत. माझ्या जीवावर उठलेत. संगीच्या नातवाचा तर मी पायच मोडून
ठेवणार आहे. माझी मजा बघतो. तेरोज सारवलेल्या ओसरीवर मुतून गेला गुलाम. संगी रांड
बोलत पण नाही त्याला.
तेवढा सदाची लेक माईनं म्हातारीला हाक मारली, म्हातारे घरात
ये. काम हाय.
तुझा बाप म्हातारा, म्हणत निर्मला घरात आली. माईनं तिच्या
हातावर पेढा ठेवलं आणि म्हणाली, ताईला मुलगी झाली. आताच पाहुणे निरोप आणि पेढे
घेऊन आले.
होव दे होव दे बाय. बाळंतीन बरी हाय ना... तिनं आईला विचारलं. पण
माई बरी हाय म्हणाली.
ते न ऐकताच ती सांगू लागली, सकाळदरणं सगली गली साफ केली ती
पाहवेना रांडेच्यास्नी. हे हगुन न ठेवलंय
जिथं तिथं.
माई तिचं नाव ऐकताच आपल्या कामात बुडाली. तिथल्याच
मडक्यातलं पाणी घेऊन पहिली आणि निर्मला घराबाहेर पडली. तिचा शिवा वाहण्याचा आणि
कचरा उचलण्याचा यज्ञ अखंड सुरू झाला. गल्लीच्या टोकाला जाऊन ती संगीच्या घरी विसावली.
मग अंधार पडत आला तशी माघारी फिरली. येताना तिने संगीताचा
नातू, माईचा बारका भाऊ, पणजी बाईची सून आणि उभी नानी या सगळ्यांना उद्या रतवाला
जायचा बेत सांगितला. एकेकाला माहिती देती अंधार पडल्यावर घरात परतली.
रतवा म्हणजे ओढ्यातले इवलेइवले लाल मासे. श्रावण सुरू झाला
म्हणजे निर्मला तंगुसात गांडूळ ओवून ओढ्यावर रथवायला जाई. गांडूळ काढणे, ते तंगुसात
ओवणे, गांडुळांचा गळ पाण्यात टाकणे आणि त्याला रतू लागली की तिला अलगत टोपलीत
उचलून टाकणे, यात निर्मला मोठी माहीर होती. तिला या सगळ्या कामात मोठा रस वाटे.
दुसऱ्या दिवशी सगळी मुलंमुली आणि उभी नानी निर्मलासोबत वाला
गेले. उन्हं उतरायला लागेपर्यंत निर्मलाची अर्धी रोवली भरली. बाकीच्यांनी दहा, वीस,
तीस रतवा पकडल्या. घरी परतेपर्यंत आणि रतवा शिजेपर्यंत अंधार
दाटून आला. साधारण साडे सातच्या दरम्यान निर्मलाने समोरच्या घरातल्या अंजीला आवाज
दिला, अंजी, अगं अंजी... जरा बॅटरी दे. अंजी बॅटरी घेऊन आली आणि म्हणाली, आता कुठे
कोसळतेस...
निर्मला त्यावर काहीच बोलली नाही.
मग ती चुलीवरल्या रतवांच्या पातेल्यातील रतवांचे जवळ
ठेवलेली कुड्याच्या पानांत दहा-बारा वाटे केले. ते सगळे वाटे एका टोपात घेऊन ते
वाटायला निघाली.
ज्या ज्या घरातल्या कुणी रतवाला आलं नव्हतं त्या घरात एक एक
वाट नेऊन दिला.
काल तिने ज्यांना
शिव्या घातल्या होत्या त्या सगळ्यांच्या घरातही एकेक वाटा पोचला होता. एक वाटा
धन्या मोऱ्याच्या घराजवळ ठेवून दिला. तीन-चार रतवांचा एक एक वाटा, पण गल्लीतल्या
प्रत्येक घरात आज रतवा होत्या आणि घराघरातून निर्मला म्हातारीच्या दीर्घायुष्यासाठी
प्रार्थना केली गेली.
- वैभव बळीराम चाळके
No comments:
Post a Comment