Wednesday, April 24, 2019

कथा- कांता



गाडी लागल्यालागल्या मी माझ्या आधीच बुक केलेल्या सीटवर येऊन बसलो होतो. आई-बाबा सोडायला आले होते. त्यांना टाटा केला. जा म्हणालो. आणि शेजारी कोण येणार याचा विचार करत होतो. तेवढ्यात एक पन्नाशीचे खात्यापित्या घरचे साहेब आणि त्यांची मुलगी असे दोघे जण माझ्या सीटपाशी आले. मी बसलो होतो तो बाक दोन जागांचा होता. एका रिकाम्या जागेवर आपली बॅग ठेवत तो खात्यापित्या घरच्या इसम सोबतच्या मुलीला म्हणाला, कांता मी इथे बसतो, तू तिकडे बस जा.
कांता मागे गेली. तो इसम आपली सीटवर ठेवलेली बॅग खाली ठेवून धाडकन बसला. मला अर्थातच त्याचा राग आला. ती फुलासारखी गोड मुलगी बाजूला बसली असती तर त्याच्यासारखा आनंद नव्हता दुसरा. पण आता रडण्यात अर्थ नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं, कुठल्या गावचे तुम्ही...
तेरेवाडी देवाडी
यशवंत सागर यांना ओळखता तुम्ही...
हो. भाऊच लागतो माझा.
तुमचं नाव काय... गाव कुठलं...
माझं नाव विष्णू भोसले. मी वेत गावचा आहे. यशवंत सागर माझे मामा लागतात.
म्हणजे तू नंदाचा मुलगा काय...
होय...
आई कशी आहे....
आमचा संवाद साधारण 15 मिनिटे सुरू होता. एसटी मुंबईच्या दिशेने धावत होती. पंधरा मिनिटानंतर ते मामा म्हणाले, मी मागे बसतो. कांताला पुढे पाठवतो. मागे झटके बसत असतील तिला.

पाठवा, मी म्हणालो.
आता मघासारखा दृष्टिकोन नव्हता. अर्थात तरीही कांता शेजारी येईल याचा सात्विक आनंद होताच. मामा गेले आणि कांताला घेऊन आले. माझी ओळख करून देत म्हणाले, हा यशवंत काकाचा भाचा. गप्पा मारत मी बसा. मी बसतो मागे.
मामा गेले. कांता माझ्या शेजारी बसली. मला एकदम छान वाटलं. छान वाटायचं वय होतं माझं.
हाय... कांता हात पुढे करत कांता म्हणाली.
मी तिचा हात हातात घेत म्हटलं, हाय.
कांता हसली.
विष्णू नाव माझं. बस मस्तपैकी.
मग आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. मी मुंबईत एमडी कॉलेजात बीएच्या शेवटच्या वर्षाला शिकतो आहे. बॉक्सिंगमध्ये इंरकालेजिएट कॉम्पिटिशनमध्ये पारितोषिके मिळवली आहेत. पुढे एम करून प्राध्यापकी करायचा विचार आहे, वगैरे मी तिला सांगितलं. ती पोद्दारला सेकंड ईयर बीकॉमला आहे. डान्समध्ये तिला विशेष रस आहे, वगैरे माहिती तिने मला दिली.

मी गावात शाळा करून मग शहरात गेलेलो. घरची परिस्थिती बेताची. त्या तुलनेत कांता बऱ्या घरची. मुंबईत लहानाची मोठी झालेली. त्यामुळे एमडी कॉलेज आणि पोद्दार कॉलेजमध्ये जेवढा फरक असायला हवा तेवढा आम्हा दोघांत होता. कांता फॉरवर्ड होती, मी मागासलेले होतो. तरी संकोची. खोट्या प्रतिष्ठेची जास्त काळजी घेणारा.

गाडी संगमेश्वर सोडून नॅशनल हायवेला आली, तशा लाईट बंद केल्या गेल्या. चांदणी रात्र होती. त्यामुळे गाडीत चांदण्याचा दुधाळ काळा प्रकाश पसरला होता. का कुणास ठाऊक कांता चेहरा आता अस्पष्ट दिसायला लागल्याने अधिक छान दिसत होता. कदाचित मगाशी निरखून पाहताना येणारा संकोच आता अंधारात बुडून गेला असणार. कांताही खुलेपणाने गप्पा मारत होती.
आमच्या गप्पा रंगल्या होत्या, तेवढ्या खडखडाट झाला. गाडी थांबली. लाईट लागल्या. सर्व प्रवासी जागे झाले. कंडक्टर पुढे आले. ड्रायव्हर म्हणाला, खाली उतर. प्रॉब्लेम दिसतोय. ते खाली उतरले. प्रवासी उतरले. पण प्रवासी लवकरच कंटाळून गाडीत येऊन पुन्हा डोळे झाकून राहिले. ड्रायव्हर-कंडक्टर काहीतरी कटकट आवाज करीत गाडी दुरुस्त करीत होते.
कांता म्हणाली, ही पर्स मांडीवर घे. मी झोपते त्यावर. लाईट चालू होत्या. त्यामुळे काय करावं कळेना. मी एक कटाक्ष टाकला. मामा आ करून झोपले होते. मी मागे पाहिलं ते तिने पाहिलं आणि म्हणाली, पप्पा नाही काही म्हणणार, रे तशीच आहे. तुला आक्षेप असला तर सांग. मी नाही झोपत.
तसं नव्हे... मी संकोचाने म्हणालो.
मग घे...  म्हणत तिने पर्स माझ्या मांडीवर ठेवली आणि ती त्यावर डोकं टेकून झोपी गेली.
गाडी चालू झाली. पुन्हा गाडीत चांदणं खेळू चांगलं खेळू लागले.

पण माझी मनस्थिती आता पालटली होती. मगापासून कांताविषयी मनात नको ते विचारीत होते, ते आता विरून गेले, ती विश्वासानं मांडीवर झोपली तर आपण तिचा विश्वासघात करू नये, असं वाटलं. मी आतापर्यंत सहजपणेच वागलो होतो. पण आता त्याच सभ्यपणाला सुसंस्कृततेची... आपुलकीची... प्रेमाची झालर येऊ लागली. मी कांताच्या कपाळावर भुरभुरणारे केस हळूवार मागे सारत राहिलो. मग हळुवार हाताने तिला थोपटून निजवलं. आता कांता ही दुसरी मुलगी नव्हतीच मुळी. ती माझी नातलग... माझी मैत्रीण... माझ्या घरातली झाली होती. काळजात येऊन राहिली होती. गाडी हलली तरी कांताची झोपमोड होऊ नये म्हणून मी आटापिटा करून तिचा तोल सावरत होतो. आयुष्यात इतका प्रेमळ... इतका सभ्य आणि इतका आनंदी मी कधीच झालो नव्हतो.

गाडी जेवणाला म्हणून थांबली, तेव्हा कांता उठली, उठल्यावर थँक्स म्हणाली, तिच्या चेहऱ्यावरून कृतज्ञता आणि आपलेपणा ओसंडून वाहत होता.
मी म्हटलं, थँक्स. माझ्यावरच्या विश्वासबद्दल...
थँक यू... कांता अत्यंत ओल्या स्वरात म्हणाली.

कांता मला त्यादिवशी एकदाच भेटली होती. पण परवा यशवंत मामाने कांताच्या मृत्यूची बातमी सांगितल्यावर मी हादरून गेलो. जेवणही गोड लागत नाहीये आणि हे असं का होतंय हे कुणाला सांगताही येत नाहीए...

-      वैभव बळीराम चाळके
9702 723 652

No comments:

Post a Comment