भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी
नाट्यकर्मी वसंत सोमण यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार या वर्षी भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांना मुंबईत प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या दिवशीच चंदाताई कार्यक्रम सादर करणार होत्या. यापूर्वी आषाढी वारीच्या वेळी दूरचित्रावाणीवर त्यांच्या कार्यक्रमाची झलक पाहिली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाविषयी उत्सुकता होती. त्यामुळे वेळेपूर्वीच मी पु.ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये हजर झालो होतो.
अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. थोड्या वेळातच विठ्ठल उमपांचे आगमन झाले. लोकांनी माना उंचावल्या. तेवढ्यात चंदाताईचे आगमन झाले. लोकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजविल्या. थोड्याच वेळात सत्काराचा आणि पारितोषिकाचा कार्यक्रम सुरू झाला. विठ्ठल उमपांच्या हस्ते चंदाताईंचा सत्कार झाला. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या मनोगतात शाहीर विठ्ठल उमप म्हणाले, "चंदाताईंना पुरस्कार देणे हा माझाच सन्मान आहे असे मला वाटते. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी जसे शाळा, कॉलेज आणि इतर समाजकार्यासाठी काम केले तसेच चंदाताईंनीही आपल्या परीने काम केले आहे. आम्ही कलावंतांनी चंदाताईंचे हे काम पाहून काही तरी केले पाहिजे.' त्यानंतर त्यांनी चंदाताईंवर लिहिलेले, "जियो चंदाताई मैया तुम सबसे हो बढकर' हे गाणे आपल्या खड्या आवाजात म्हटले. मग म्हणाले, चंदाताई दरवषीं वारी करतात. त्यांना विठ्ठल भेटला की नाही माहीत नाही, पण हा काळा विठ्ठल त्यांना आज भेटला आहे. या विठ्ठलाच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला आहे!'
चंदाताई मारवाडी समाजाच्या आहेत. पण बालपण पंढरपुरात गेल्यामुळे मराठीपणाचे संस्कार त्यांच्यावर झाले. सभोवतालच्या वातावरणातील नेमके संस्कार उचलून त्यांनी आपली भाषा आणि वाणी समृद्ध केली. त्यांना जेव्हा "तुम्ही उच्चशिक्षित नाही तरी तुम्हाला हे सारे कसे जमले?' असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्या म्हणतात, "मी जगाचे पुस्तक वाचले. वारीचे पुस्तक वाचले!'
त्यांची निरीक्षणशक्ती अफाट आहे. त्या संतरचनांना आजच्या काळातल्या संदर्भाशी जोडून दाखवितात तेव्हा बुद्धिमान म्हणविणारेही अवाक् होताना दिसतात. चमत्कारांचा उदो उदो न करता वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्नशील असतात. सामाजिक बांधीलकी कशी जोपासावी ते अनेकांनी त्यांच्याकडून शिकायला हवे.
चंदाताई कार्यक्रमाला उभ्या राहिल्या. मागे चार साथीदार... पुढे उभा माईक... त्यासमोर प्रसन्न चेहऱ्याच्या आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या चंदाताई... नऊवारी... काळे केस... नीट विंचरून बांधलेले... कपाळावर कुंकू... हातात बांगड्या... खेळ सुरू झाला. आधी गण... श्रीगणेशाचे स्तवन... गातागाता त्या श्लोकातील अर्थ नेमका व्यक्त करणाऱ्या नृत्याच्या मोजक्या पण प्रभावी स्टेप... हालचाली आणि उच्चारात कमालीची सफाई... पहिल्या मिनिटाला चंदाताईंनी सभागृह जिंकले.
मग सुरू झाला मुख्य विषय... भारूड... पहिलेच भारूड त्यांनी घेतले ते "सावधान... सावधान... हो सावधान!' मग ते भारूड म्हणता म्हणता चंदाताईंनी सावधान राहून जीवन कसे जगावे, त्याचा सदुपयोग कसा करावा हे सांगता सांगता बालपणापासून वार्धक्यांपर्यंतच्या काळाचे वर्णन केले आणि मग दानाचे महत्त्व विशद केले. देहदान, नेत्रदान, त्वचादान आदींबाबत सांगता सांगता दानासाठी शरीररक्षण कसे महत्त्वाचे आहे ते सांगितले.
भारूडाच्या सादरीकरणाने तर प्रेक्षक खूश झाले होतेच, पण आता त्याच्या अमोलवाणीने आणि बुद्धिचातुर्यानेही मंत्रमुग्ध झाले. मला एकदम काही वर्षांपूर्वी पाहिलेले तिजनबाईंचे पांडवांनी गायन आठवले. त्या तिजनबाई जशा महाभारताचे दर्शन घडवितात तशाच चंदाताई तो तो प्रसंग साक्षात उभ्या करतात. मध्येच गोल फेरी मारतात आणि पूर्णविरामासाठी किंवा उद्गारासाठी उडी मारून त्या त्या शब्दाचे महत्त्व ठसवतात. त्यांच्या सगळ्याच हालचाली मंत्रमुग्ध करणाऱ्या.
मग एकेक भारूड परमार्थ आणि लौकिक अशा दोन्ही अंगांनी उलगडून दाखवतात. नवल मोठे जाणा, तिथे एक ढालगज निर्माण झाली, बये तुला बुरगुंडा होईल ग अशा एकाहून एक सरस भारूडे त्या तन्मयतेने सादर करतात. वेडीचे रूप घेऊन सादर केलेले "झाले रे वेडी देवा झाले रे वेडी' हे भारूड तर त्या सगळ्यावर कळसच चढवते.
"बुरगुंडा होईल'मध्ये कमरेवर बाळ आणि डोक्यावर बोचके आणि हातात काठी असा घेतलेला वेशही लक्षात राहतो. एका बाजूला दर्शनीय तर दुसऱ्या बाजूने तेवढाच श्रवणीय असा हा कार्यक्रम... डोळ्यांचे पारणे फेडून गेला.
-वैभव बळीराम चाळके
नवी पहाट घेऊन येणारी
भोळी, सुंदर, निर्भय श्रध्दा!
मराठी कवितेच्या क्षेत्रात जी मोजकी स्त्रीनामे आहेत. त्यात शांता शेळके हे एक अग्रभागी असणारे नाव आहे. शांता शेळके म्हटलं की त्यांची नितांत सुंदर गीतं आठवतात, पण सर्वप्रथम आठवतं ते त्याचं "असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे!' हे गाणं. आज शांताबाई आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी, त्यांच्या कविता आपल्यात आहेत. साहित्यिक केवढाही मोठा असला तरी जोवर, तो आपल्या अनुभूतीशी जोडला जात नाही तोवर तो आपला आवडता होत नाही. शांताबाईंच्या महानतेबद्दल कधीच शंका नव्हती. पण त्यांच्या माझ्यात आपलेपणाचा बंध निर्माण झाला तो अलीकडेच.
त्याचं असं झालं. एका रद्दीवाल्याकडे मला शांता शेळके यांचा "वर्षा' काव्यसंग्रह मिळाला. तो मी चाळला असता त्यातल्या एका कवितेने माझं लक्ष वेधलं.
गेली अनेक वर्षे मनात श्रध्दा आणि अंधश्रध्दा याचं द्वंद्व सुरू होतं. मी अनेकदा म्हणे, विसाव्या शतकाच्या आरंभी भ्रमनिरास झालेल्या बुध्दिवाद्यांसारखे आज आम्ही जगतो आहोत. बुध्दीची मर्यादा कळते आणि श्रध्देची तुळस उपटून फेकून दिलेली. आता श्वास कोंडतो-वाटतं-काय करायचं अशावेळी? कोण दाखवणार वाट? मग कधीतरी दूर एक दीप जळत असल्याची जाणीव झाली. ही आपली दिशा, हा आपला मार्ग! मनास थोडा विसावा लाभला. पण एक गोष्ट सतत खटकत राहिली. आपल्या अनुभवाशी साम्य असलेला अनुभव मराठी साहित्यांच्या एवढ्या वर्षांच्या इतिहासात कुणालाच आला नाही का? आणि आला तर तो आपल्यापर्यंत का पोहोचला नाही? आणि एक दिवस शांताबाईंची कविता समोर आली -
श्रध्दा जी जी पूजास्थाने मजलागी दाविते
बुध्दी त्यातील दोष नेमके शोधुनिया काढिते
श्रध्दा पाहे परमेश्वराचा घ्यावयास आसरा
बुध्दी शंकित होऊनी बोले "आहे का तो खरा!'
प्रीतीमध्ये विलीन व्हाया श्रध्दा हो आतूर
त्या प्रेयांतील व्यंगे लाविति बुध्दीला हुरहुर
श्रध्दा निर्भयपणे धावते ध्येयामागे यदा
बुध्दि तेधवा बसे न्याहळित अंतिम त्या आपदा
बुध्दि आपुले पायबंद नच शकेल घालू जिला
भोळी, सुंदर, निर्भय श्रध्दा मिळेल का ती मला?
शांताबाईंनी आपल्याला काय म्हणायचं ते स्पष्ट केलं. माझा शोध हाच होता. अकलेचं ओझं थोडं अधिक झालं की, "भोळी सुंदर निर्भय'श्रध्दा जवळपासही फिरकत नाही. अकलेच्या बेड्यांत आपण फसून जातो. अडचण आली म्हणजे आई ईश्वरापुढे हात जोडते आणि निर्धास्त होते. आम्हीही हात जोडतो पण शंकित मनानं. आमची ब्ल्यूट्यूथ ऑन होत नाही. त्यामुळे ना कोणताच डाटा सेंड होतो ना रिसिव्ह होतो. बुध्दीचा "इरर' त्याच्यात आणि आमच्यात "कनेक्टीव्हिटी'च प्रस्थापित करू देत नाही.
पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांकडे आम्ही आदराने पाहतो.पण स्वत: वारकरी होणं जमत नाही. "देव आहे हा विश्वास म्हणजे देव' मूर्तिपूजक कवितेत शांताबाई त्या मूर्तिपूजकाचं मनोगत लिहितात. तो म्हणतो-
वाटतो, वाटो तुम्हा निर्जीवही पाषाण हा
माझिया दृष्टीस ही देवीच भासे मंगला!
ईश्वराच्या चरणी नतमस्तक सारेच होतात. पण मनात श्रध्दा असली तर देव... नाहीतर पाषाण काळा! आमची धडपड त्या पाषणात देव दिसण्याची. मनात श्रध्दा निर्माण होण्याची! पण ही श्रध्दा फक्त भोळी आणि सुंदर नको ती निर्भय हवी. शांताबाईंनी श्रध्देचं शिल्प नेमकं कोरून काढलं आहे. म्हणूनच मला हवी ती ही हीच श्रध्दा असे आपण "युरेका युरेका' म्हणावे तसे म्हणू लागतो.
अंधाराच्या खोल गुहेत एक दीप दिसू लागला आहे. म्हणूनच "माझ्याच वाटेने चल' न म्हणणाऱ्या वडिलांप्रतीची कृतज्ञता आता दाटून येते. त्यांनी स्वत:चा स्वतंत्र मार्ग चोखाळू दिला. लावणीची ढोलकी वाजवता वाजवता अभंगाचा टाळ वाजवासा वाटू लागला.
"फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे' अशा प्रेमकविता लिहितात म्हणून प्रिय होऊन राहिलेल्या मंगेश पाडगावकरांचा हात धरून कबिरापर्यंत जाता आले. त्यांनीच एका ठिकाणी म्हटले आहे-
श्रध्दाच पांगळ्याच्या पायात त्राण आहे
श्रध्दाच आंधळ्याच्या डोळ्यात प्राण आहे
ज्याच्या उरी न श्रध्दा त्याला पहाट नाही
हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही!
या श्रध्देची पहाट होऊ लागते तेव्हा थोडी हुरहुर, थोडी भीती असायचीच! पण लवकरच ती भीती संपायला हवी. भोळी, सुंदर आणि निर्भय श्रध्दा निर्माण व्हायला हवी तर खरी पहाट येईल.
ये, पहाटे ये तुझे स्वागत असो! धन्यवाद शांताबाई!!!
-वैभव बळीराम चाळके