अन्वय
एखादा शब्द ऐकला की चटकन समजत नाही. अन्वय शब्दाचं तसंच आहे. निदान मला तरी त्याचा तसाच अनुभव आला. कॉलेजात असतानाच मला वाटते मला त्याचा अर्थ सर्वप्रथम समजला. तोवर तो नुसता कानावर जात होता. अन्वय म्हणजे परस्पर संबंध. दोघांतील नातं. नव्या मराठीत "कनेक्शन'! तर प्रथम जेव्हा हा अर्थ कळला, तेव्हा मला एकदम उभयान्वयी अव्यय या व्याकरणातील शब्दांची आठवण झाली. कारण तिथेच अन्वय हा शब्द कानावर पडलेला पण अर्थातच तो सुटा नव्हे तर उभयांच्या मधून डोकावत पाहिल्यासारखा. दोन शब्दांना, वाक्यांना जोडणारे अव्यय ते उभयान्वयी अन्वय हे शाळेतच शिकलो होतो. पण अन्वयचा अर्थ लागताच उभयान्वयीची संधी सोडवता आली. उभय आणि अन्वय बरोबर उभयान्वयी हे लक्षात आले.
अन्वय लावणे ही आपण सतत करीत असलेली गोष्ट आहे. एखादी घटना घडली की आपण तिचा इतर गोष्टींशी अन्वय लावत असतो. एखादा विचार पटवून देण्यासाठी आपण एखाद्या घटनेशी, उदाहरणाशी त्याचा अन्वय लावून दाखवतो. म्हणजे ती गोष्ट अधिक नेमकी कळते.
एकदा एका चर्चेच्या कार्यक्रमात सुशांत देवळकर नावाचा आमचा एक मित्र "संत नामदेवांचे वेगळेपण' या विषयावर बोलत असताना, आनंद गाडगीळ हा दुसरा मित्र म्हणाला, पण नामदेव पंजाबपर्यंत गेले तेव्हा त्यांना भाषेची अडचण आली नसेल? आनंदचा प्रश्न छान होता. तो आम्हा अनेकांना पटला. पण प्रमोद बापट नावाचे आमचे एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, मी एक गोष्ट सांगतो ऐक. एक गुराखी मुलगा दूर रानात आपली गुरं चरायला नेत असे. एकदा त्याची गाय व्यायली. छोट्या वासराला एवढ्या दूर चालत नेणे शक्य नाही. म्हणून त्या गुराखी मुलाने त्याला खांद्यावर टाकून घरी आणले. दुसऱ्या दिवशी तसेच खांद्यावरून चारायला नेले आणि खांद्यावरून परत आणले. त्या गोष्टीची त्या वासराला जणू सवयच झाली. म्हणता म्हणता ते वासरू मोठे झाले. पण खांद्यावरून जाणे येणे सुरूच. एवढा मोठा बैल आपण खांद्यावरून वाहतोय हे त्या गुराख्याच्या लक्षात आले नाही. कारण रोज तो फक्त काही ग्रॅमच वाढत होता ना! नामदेवांनी पंजाबपर्यंत पायी प्रवास केला तेव्हा भाषीक बदल इतक्या कमी वेगाने झाला असेल ही त्यांना तो कळलाच नसावा.
गोष्ट ऐकल्यावर आनंद म्हणाला, व्वा! व्वा! आम्ही तर एकदम एक्स्प्रेसने पंजाबात पोहोचलो आणि आता यांची भाषा कशी कळणार याचा विचार करत राहिलो.
आम्हा इतरांच्यात आणि प्रमोद बापट यांच्या जो फरक त्या वेळी होता तो अन्वयाचाच होता. हा अन्वय ज्याला साधला त्याला कसं सगळं सहजसोपं होऊन जातं.
आपण एखाद्या घटनेचा काय अन्वय लावतो यावर अनेकदा आपले सुख आणि दु:ख अवलंबून असते.
असं म्हणतात की एकदा गंगापात्रातून एक ब्राह्मण न्हाऊन देवळाकडे चालला होता. तेवढ्यात एक कावळा त्याच्या अंगावर शिटून गेला. ब्राह्मणाला प्रचंड राग आला. त्याने त्या कावळ्याला शाप दिला. तो पुन्हा जाऊन गंगेत स्नान करून आला. पण त्याला आपण शुध्द आणि स्वच्छ झालो आहोत असे वाटेनाच.
एक मोठा ऑफिसर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला चालला होता. तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गाडीतून उतरत असताना त्याच्या शर्टावर कबुतराने घाण केले. पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर कबुतराची विष्टा चटकन लक्ष वेधून घेत होती. पण ऑफिसर मुख्यमंत्री दालनात तसाच गेला. नमस्कार चमत्कार झाल्यावर तो म्हणाला, तुमच्या दारात कबुराने हा प्रसाद दिला, पण म्हटलं, एक बरं आहे की गायी-म्हशी आकाशात उडत नाहीत.
या दोन्ही गोष्टींवरून आपण एकच घटना वेगवेगळे परिणाम कसे साधते ते पाहू शकतो, असे होते कारण लावला गेलेला अन्वय. जो जसा अन्वय लावेल तसा त्याचा परिणाम होतो.
परवा हिंदी भजनांचा संग्रह वाचत बसलो होतो. त्यात एका भजनात देव कोठे आहे हे सांगताना फुलांच्या उमलण्यात, बालकांच्या हास्यात अशी वर्णने केली होती. त्यात एक वर्णन होतं-ज्ञानवान के आत्मरमण में! ते मला खूप आवडलं. आपली अध्यात्माची परंपरा ही आधी आत्मरमण आणि मग निरुपण अशी आहे. निरुपण कोले नाही केले तरी चालते. पण ईश्वरचिंतन, आत्मरमण हे अपरिहार्यपणे होणारी गोष्ट आहे. मला वाटते हे आत्मरमण म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून तो अन्वय शोध आहे. जीवन आणि पारलौकिक जीवन, देव आणि आपण, शरीर आणि आत्मा, आत्मा आणि परमात्मा या सगळ्यांचा परस्पर अन्वय लावत राहणे, त्यातून एकूण जीवनाचा अन्वय लावणे म्हणजेच आत्मरमण होय. ही आत्मरमणता म्हणजे जणू ईश्वरभेटच होय. या अर्थाने पाहिले की अन्वय लावणे हेच आपले जीवनसाध्य होऊन बसते. अलकेमिस्टच्या भाषेत सांगायचं तर शुभशकुनांची ओळख-शुभशकुनांचा अन्वय!
-वैभव बळीराम चाळके