Thursday, December 16, 2010

आपण माणसात जमा नाही
राजन गवस यांच्या कथा

राजन गवस हे ऐंशीनंतरच्या कथाविश्वातले एक प्रमुख कथाकार आहेत. त्यांचा नावलौकिक कानावर होता. पण त्यांचा संग्रह आणून वाचायचा राहिला होता. एका ज्येष्ठ मैत्रिणीनं त्यांचा "आपण माणसात जमा नाही' हा संग्रह वाचला आणि तिने मला शिफारस केली. तिच्या शिफारशीमुळे मी नियोजित वाचन मागे ठेवून "आपण माणसात जमा नाही' वाचायला घेतला.
पहिलीच कथा वाचली आणि आनंदानं वेडा झालो. त्या कथेतली जैतुनबी मनात घर करून राहिली. कथेचं नाव आहे "पाझर'. पण कथा वाचून डोळ्याला अश्रूंचे झरे फुटले. जैतुनबीनं खेड्यात राहणाऱ्या आईची आणि उद्धव शेळके यांच्या "कौतिक'ची आठवण करून दिली. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मागे ठेवलेलं गाव मनात पुन्हा जागं झालं. पुढच्या कथा वाचण्याअगोदरच मी न राहवून लेखकाचा फोन फिरवला. दोनच मिनिटे पण मनात होतं ते बोलून दाखवलं. मग पुन्हा संग्रहात घुसलो. संग्रहातील एकेक कथा वाचत जाताना लेखकाची मनातली प्रतिमा आणखी उंचावत गेली.
टीव्हीवरच्या एका बातमीमुळे गावातल्या मुलाण्याला तरणी मुले मारतात. तो मुसलमान हा त्याचा गुन्हा म्हणून. पण गावातली वडीलधारी माणसे जेव्हा त्या तरुणांना झापतात तेव्हा मात्र ते सगळे नरमतात, अशी ती बाबल आणि जैतुनबीची कथा आहे. त्या कथेत गाव म्हणजे काय? याचं नेमकं उत्तर मांडतामांडता लेखकाने विषमतेने फाटलेल्या तरी विविधतेने नटलेल्या एकसंघ राष्ट्राच्या एकात्मिकतेमागची सूत्रेच साररूपाने मांडली आहेत. त्या कथेचा हा शेवट पाहा.
"चुकत्यात, हाणा रांडंच्यांस्नी! हाडं मोडून ठेवा म्हणजे आसं काय सुचायचं न्हाई. टीवी बघत्यात टीव्ही.' फडकरी बाबूदानं आवाज टाकला. तसं गोंदा पाटलाने सगळ्यांना गप्प केलं. मग पुढं होत सगळ्यांकडं बघत म्हणाला, "गड्यांनू, तुमाला दक्कल नसंल, बाबलच्या खापर पणज्याला आपल्या गावच्या लोकांनी जाऊन, "आमच्या गावात मुलाणी न्हाई तू ये बाबा आमच्या गावात म्हणून बलावून आणलतं. आबा पाटलाच्या सब्दाखातर तो गडी तिथलं घरदार सोडून आला. बाबलचं घर हाय की न्हाई, ते घर गावानं त्येला बांधून दिलं. का, तर मुलाणी गावाला पायजे म्हणून. तवापास्नं ह्ये घर गावात ऱ्हायलंय. या बाबलचा बा आजारी पडला, गावानं पैसं घालून दवाखाना केला. न्हाई वाचला. जैतुनबी पोरं घेऊन चालली. आमी पाय धरलं तिचं, तवा हे घर ऱ्हायलंय. बाबलनंबी गावाचा मान राकलाय. त्येला आसा डोस्क्यात राक घालून पळवून लावू नगा. त्ये आपलंच लेकरू हाय, गोंदा पाटील मागं होऊन पोरांना म्हणाला, "तुमची चुकी तुमी मान्य केलीय. आता जैतुनबीच्या पायावर डोकं ठिऊन माफी मागा. तरच तुमची सुटका.'
पोरं धडपडून उठली. कोपऱ्यात बसलेल्या जैतुनबीकडं वळली, तर तिच्या गळ्यातला आवंढा एकाएकी बाहेर पडला. तिला समजावता समजावता अख्ख्या गावाच्या डोळ्यांना पाझर फुटला.
"आपण माणसात जमा नाही' ही शीर्षक कथा तर बदललेल्या परिस्थितीतील आमच्या पिढीची शोकांतिका आहे. लेखक कोकणनजीकच्या प्रदेशात राहत असल्याने असेल कोकणी चाकरमान्यांची ही शोकांतिका त्याला मांडावी वाटली असेल. कदाचित हा त्यांच्या गावाचा अनुभव असेल, पण कोकणवासीय चाकरमान्यांना तर तो दरदिवसाआड घ्यावा लागला आहे.
आपल्या भाषेत शिव्याचं स्वत:च असं एक खास स्थान आहे. त्यामुळे आपल्या साहित्यात त्या ओघानंच येतात. अलीकडे पिपली लाईव्ह सिनेमाला फक्त या शिव्यांच्या कारणाने "अॆ' प्रमाणपत्र स्वीकारावं लागलं होतं. त्याची बातमी तुम्ही वाचली असालच. राजन गवस यांनी सांगितलेल्या कथा गावातल्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्याच्या आहेत. त्यांच्या भाषेत शिव्या आहेत. नव्हे त्यांच्या अभिव्यक्तीची ताकदच त्या शिव्या आहे. त्यामुळे अनेक संवादात सहजपणे शिव्यात येतात.
पण अपरिहार्य, अर्थ अधिक नेमका करणारी शिवी येते ती दुसऱ्या कथेच्या शेवटी. शिवी घालायचीच झाली तर ती नेमकी कुठे घालावी (जीवनात आणि साहित्यातही) त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हा शेवट. नाही मी तो तुम्हाला सांगणार नाही. तो तुम्ही मुळातून वाचा. अख्खी कथा वाचल्याशिवाय त्या शिवीची जागा का महत्त्वाची हे कळणार नाही.
या सगळ्याच कथा सुंदर आहेत. "तळ'मधील कल्लव्वा विसरू म्हणालात तरी विसणार नाही. चौंडकं, रिवणावायली मुंगी, भंडारभोग हे त्यांचे इतर संग्रहही उपलब्ध आहेत. ज्यांचा गावाशी संबंध आला आहे त्यांना ते अधिक समजून घेण्यासाठी आणि त्यांना गाव माहीत नाही त्यांना ते माहीत व्हावं यासाठी तर राजन गवस यांची कथा वाचायलाच हवी. पण त्यापुढे जाऊन माणसाचं जगणं ही काय चीज आहे हे समजून घेण्यासाठी राजन गवस वाचायलाच हवेत. अनुभव जितका अधिक वैयक्तिक तितका तो अधिक वैश्विक होतो असं म्हणतात. त्याचं हे लेखन म्हणजे उत्तम उदाहरण आहे. राजन गवस यांनी गद्य कविताच लिहून काढल्या आहेत.
- वैभव चाळके

राजन गवास कथा