Tuesday, July 4, 2017

 विस् मरण 


पृथ्वी आपल्या भ्रमणकक्षेतून सुटणार आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत करणारी जगबुडी होणार ही बातमी आल्यापासून आता 15 तास होऊन गेले आहेत. अवघ्या जगात काल सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हलकल्लोळ शमून सर्वत्र मरणकळा पसरली आहे. स्मशानशांततेने जगावर पांघरूण ओढलंय. वातावरणात नुसताच मरणगंध पसरलाय. माणूस माणूस उरलेला नाही. विड्राअल सिमटम्सही संपून गेले आहेत.
जगबुडीच्या बातमीचा परिणाम झालेला नाही तो फक्त मानवेतर सृष्टीवर... माणूस मात्र पार कोलमडलाय. भिकारी आणि लफंगे काल रात्रीपासून सताड उघडी पडलेली दुकाने लुटून खूश झाले होते, तेही काय अजब चाललंय सारं, म्हणून धास्तावून निपचीत पडले आहेत.
मंदिरे, चर्च, मशिदीत माणसं प्रार्थना करून थकून पडली आहेत. एकेकाचा चेहरा पाहू नये, इतका भकास दिसतो आहे. बाजारपेठा माणसांशिवाय उघड्या पडल्या आहेत. रुग्णालयात डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, स्टाफ नाही. रुग्ण नुसतेच पडलेत. रस्त्यांवर वाहने नाहीत. रेल्वेे, रिक्षा, टॅक्सी स्थानके ओस पडली आहेत. विमानतळांवर विमाने उतरून पडली आहेत. शाळा, कॉलेजांच्या इमारती मढ्यासारख्या उभ्या आहेत. माणसं असून नसल्यासारखी सगळी पृथ्वी...
पस्तिशीतला शान आपल्या घराच्या हॉलमध्ये अस्वस्थ बसून फोन लावतोय. रिंग वाजते, पण फोन कोणीच उचलत नाही. तो पुन्हा-पुन्हा फोन लावतो. मग आतल्या खोलीत चक्कर टाकून येतो. पुन्हा फोन लावतो. मग टीव्ही लावतो. टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या... चॅनेल बदलतो. एक-दोन-तीन... नवव्या चॅनेलवर एक वृत्तनिवेदिका दिसू लागते. “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष मेरी सुलेमान बाटलीवाला यांनी जगभरातील शास्त्रज्ञांना व्हाइट हाऊसमध्ये पाचारण केले आहे. ते काही तासांत पोहचतील. एक यान अंतराळात सोडले जाणार असून त्यातून कोणत्या वस्तू व कोणता संदेश अंतराळात पाठवायचा यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. लोक हो, जगातील सर्व प्रसारसेवा ठप्प झाल्या असून न्यूज नेटवर्क ही आमची एकमेव सेवा सध्या आपल्या सेवेत आहे. स्टीफन हॉकिंग यांनी लवकरच माणसाच्या वस्तीसाठी गृह शोधावा लागेल असे 2017 साली भाकीत केले होते. ते एवढ्या लवकर आठवावे लागेल असे कोणासही वाटले नव्हते. लोक हो, आपण सारेच जण जाणार आहोत. उद्या पाच वाजेपर्यंत किंवा आपला संपर्क असेपर्यंत आम्ही आपल्याला सेवा देऊ.”
शान अस्वस्थ... फोन फिरवतोय... रिंग वाजतेय... प्रतिसाद नाही. आतल्या खोलीतून मोठी किंकाळी ऐकू येते. तो आतल्या खोलीत जातो...
त्यांची पत्नी अ‍ॅना बाळंतवेणांनी धास्तावलेय... धपापतेय... हा डोक्यावर हात थोपटून तिला धीर देतो...
ती पुन्हा एकदा उसळी देऊन ओरडते. तो आता खाली पाहतो, तर बाळ जन्मास आले आहे. तो ते बाळ उचलतो आणि तिच्या छातीवर ठेवतो.
ती बाळाकडे पाहते. ते लालबुंद चेहर्‍याचे... इवल्याइवल्या नाक-कान, डोळ्यांचे इवले बाळ पाहून ती अपार समाधानाने हसू लागते... नवर्‍याच्या चेहर्‍यावर आनंद उमटू पाहतो... उमटत नाही... तो तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आधार देतो... जगभर माणसे मरणकळेने काळी पडली आहेत. हसते आहे ती बाळाच्या आगमनाने आणि प्रसूतिवेदनेतून सुटल्यामुळे मृत्यूच्या गडद छायेचे विस्मरण झालेली एकटी अ‍ॅना!

- वैभव बळीराम चाळके