Thursday, August 31, 2017

शपथ स्वच्छतेची

शपथ स्वच्छतेची

बालनाटिका

(सर्व जण गात गात मंचावर येतात...)
‘निर्मल’ सोसायटीचे आम्ही रहिवासी.
 आमच्या सोसायटीत स्वच्छतेची काशी!!
(मग हळूहळू सगळे जण भिंत करून उभे राहतात.)
(एक जण ऑफिसला चाललाय. एकदम शर्ट झाडत उभा राहतो आणि वर पाहत म्हणतो-)
भापकर- ए, डोळे फुटले काय रे? कसले घाणेरडे पाणी ओतलंस? कोण आहे तो!
किशोर - (वरून आवाज येतो) सॉरी... सॉरी हं... भापकर काका!
भापकर- किश्या, सॉरी काय? माकडा, शर्ट खराब झाला माझा. आता माझी नोकरी जाईल. मग माझं घर तुझा बाप चालवेल काय रे?
(तिसरा माणूस बाजूने जात असतो. तो हा संवाद ऐकतो आहे. तो विचारतो-)
कदम- अहो, पण त्या पाण्याचा आणि नोकरी जाण्याचा काय संबंध?
भापकर- या असे... या शहाणपतराव! सांगतो कसा ते. (मग वर पाहत) ...आणि माकडा तू तिथंच थांब. तुला पाहायचंय अजून... तर तुम्हाला नोकरीचा संबंध हवा होता ना? ऐका! आता माझ्या बॉसचा जावई आणि मुलगी येणार आहेत फिलिपाईन्सवरून... त्यांना आणायला जायचंय मला... ती बघा गेटवर भाड्याची कार उभी आहे. आता कसा जाऊ? आणि आणायला गेलो नाही की गेली नोकरी...
कदम- घरी जाऊन बदला ना कपडे. दोन मिनिटे तर लागतील...
अजय - काका, जा आटपा... पटपट बदलून या कपडे आणि निघा...
भापकर- ए, काकावाल्या... तुझा भाऊ ना तो. त्या मूर्खाला कळत नाही. आणि दोन मिनिटांत कपडे बदला... अरे तीन माळे चढायला दोन मिनिटे लागतील. तोवर तो गाडीवाला थांबला पाहिजे ना...
कदम- का नाही थांबणार?
भापकर- शेअरिंग कार आहे ती... ती तीनच मिनिटे थांबते. ती संपतील आता...
कोरे - अणावकर... अणावकर... (जोराने ओरडत येतो) कुठे आहेस रे?
अणावकर - का? काय झालं काय कोकलायला?
कोरे - संडासचा पाईप तुटलाय... खाली घाण पसरलय दिसत नाही का? कसले सेक्रेटरी तुम्ही?
अणावकर- सगळ्यांची घाण काय सेक्रेटरीने काढायची काय?
कोरे- सगळ्यांची नाही हो... तुमच्यामुळे झालेली आहे. तुमच्या चिरंजीवाने  काल पाईप तोडलाय.. आज सकाळपासून वाहतोय तो...
अणावकर- बोंबलू नका... तुमची सगळी घाण काढेन... सर्वांसमोर... सांगून ठेवतोय...
कोरे- काय घाण करतो हो आम्ही... सांगा ना?
अणावकर- तुमची मिसेस गॅलरीत केस विंचरते... ते अनेकदा आमच्या ताटापर्यंत पोहचतात. तुमची कन्या खाली मातीत किल्ले बनवत बसते... सगळ्या सोसायटीत धूळ होते... आणि तुमचे पप्पा... खोकून खोकून आवाजाचे आणि हवेचे प्रदूषण करीत असतात त्याचे काय? चांगला डॉक्टर बघत नाही तुम्ही... खोकतोय बिचारा म्हातारा...
कोरे- अणावकर, ही असली अस्वच्छता तर सगळी सोसायटीच करते. गेटवर तुमच्या विंगची मुलं उभी राहतात.  त्यांची भाषा ऐका... शिसारी येते.
अरुणा काकू - शीशी... काय काय बोलतात ही मुलं. - ऐकायला लाज वाटते. मी पोथी वाचत बसते तर दर दोन पाच मिनिटाला यांचे अभद्र शब्द कानावर येतात...
कोरे- तुम्ही तोंड खुपसू नका! तुम्ही जे काय उद्योग करता ना धर्माच्या नावाखाली ते म्हणजे पाप करून पापशालन करण्यासारखे आहे. दुपारी तंबाखूची मशेरी भाजता आणि रात्री धूप घालता! फायदा काय हो त्याचा?
अरुणा काकू- तुमच्या मुलांच्या तोंडच्या शिव्या माझी नातही उच्चारायला लागली आहे. परवा मुन्नीच्या नानाची टांग टांग... असे काही म्हणत होती...
सविता काकू - आणि काय हो, सत्यनारायणाच्या पूजेला डान्स करतात आपली मुलं... ती गाणी तरी काय, मुन्नी बदनाम हुई... शिलाच्या आयचा घो... दिल बत्तमीज...? मुलांच्या भाषेची आधी स्वच्छता केली पाहिजे.
अणावकर- त्या आधी तुमच्या हिशोब तपासनीस नवर्‍याने सोसायटीच्या हिशोबात घाण करून ठेवलय ती आधी स्वच्छ करायला पाहिजे...
सविता काकू- पोराच्या वह्या बघा... त्या आधी स्वच्छ करा... काय ते  अक्षर... घाण घाण नुसती!
अध्यक्ष - शांत व्हा! शांत व्हा! अरे अशी अस्वच्छता सर्वत्रच पसरली आहे. ती आपल्या नात्यातही उतरली आहे. लक्षात ठेवा. शरीर, घर, परिसर अस्वच्छ झाला की, शारीरिक रोग होतात आणि मन व नाती अस्वच्छ झाली की, मानसिक रोग होतात. तेव्हा आज यानिमित्ताने आपण सोसायटीतील सर्व जण शपथ घेऊया... स्वच्छतेची शपथ...
सर्व जण- ‘आम्ही निर्मल सोसायटीचे सर्व सदस्य मनापासून अशी शपथ घेतो की, आम्ही आमचे मन, शरीर, सोसायटी, आमचे आचार, विचार यांची स्वच्छता अबाधित राखू! या सर्व ठिकाणी अस्वच्छता होणार नाही, याची काळजी  घेऊ!’
एक मालवणी- हे देवा म्हाराजा... आम्ही सर्व जण आज तुला गार्‍हाणा घालतो  की, आमच्या तनामनात घरा-आवारात कसलीच घाण होणार नाही याची काळजी घे रे देवा म्हाराजा...
सर्व जण- होय म्हाराजा...
दुसरा मालवणी- मनात दुष्ट विचार, पोटात घाणेरडे पदार्थ आणि आवारात कचरा टाकण्याची आमची दुर्बुद्धी दूर कर रे देवा म्हाराजा!
सर्व जण- (एकत्र गातात-)
स्वच्छ तनमन, स्वच्छ परिसर
स्वच्छ भारत करू
सर्व मिळुनी करू स्वच्छता
स्वच्छ ध्यास हा धरू ॥
 (पडदा)
वैभव बळीराम चाळके
9702 723 652