Friday, December 21, 2018

गाडगेबाबा

 गाडगेबाबा

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अशी एक मोठी परंपरा महाराष्ट्रात होऊन गेली. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या संतपरंपरेच्या पायावर जे विशाल देवालय उभे राहिले, ज्याचा कळस तुकोबांनी उभारला, त्या महादेवालयाच्या कळसावर फडकणारी विवेकाची पताका म्हणजे संत गाडगे महाराजांचे जीवनकार्य होय. जगाच्या इतिहासात असा महात्मा झाला नाही. पुढे व्हावयाचा नाही. 20 डिसेंबर 1956 रोजी या संत पुरुषाने जगाचा निरोप घेतला. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचे हे कृतज्ञ स्मरण... नव्या पिढीला काही शिकवणारे... काही सांगणारे... विवेकाच्या दिशेने घेऊन जाणारे!
आधुनिक काळातील संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव नावाच्या गावात झाला. झिंगराजी व सखुबाई यांच्या पोटी 13 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. बाबांचे नाव डेबूजी असे ठेवण्यात आले. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचे पूर्ण नाव. झिंगराजी शेतकरी होते. शेती करून ते आपली उपजीविका करत. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांना आपल्या माहेरी म्हणजे दापुरे या गावी आणले. गाडगेबाबांचे मामा मोठे कर्तबगार पुरुष होते. त्यांच्याकडे राहूनच डेबूजी हळूहळू मोठा होऊ लागला. सकाळी लवकर उठून प्रथम गुरांचा गोठा साफ करावा, भाकर्‍या खाव्यात, दुपारच्या जेवणासाठी कांदा-भाकरी सोबत घ्यावी, गुरे चरून झाल्यावर त्यांना पाणी पाजून झाडांच्या सावलीत उभे करून जेवण करावे आणि एखाद्या वृक्षाखाली ‘राम कृष्ण हरी! जय जय राम कृष्ण हरी!’ भजन गात विश्रांती घ्यावी. रात्री गावात भजन चाले, तिकडे जाऊन भजनात बसावे, असा त्यांचा बालपणीचा दिनक्रम होता. बालपणातच त्यांचे मन माणुसकीने भरून आले. आंधळे, पांगळे, लंगडे, लुळे, कुष्ठरोगी यांच्याविषयी त्यांच्या मनात कळवळा निर्माण झाला. ते त्यांच्यासाठी जे जे शक्य ते ते करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या काळातील प्रथेनुसार डेबूजीचे लग्न करण्यात आले. पुढे सावकाराने मामांचे शेत लुबाडले. त्या धक्क्याने मामा वारले. मामाच्या माघारी सावकाराने डेबूजीस मारण्यासाठी गुंड पाठवले. पण डेबूजी अंगापिंडाने मजबूत होता. त्याने त्या गुंडांना पिटाळून लावले.
डेबूजीस एक कन्या झाली. एक पुत्ररत्न झाले.दुर्देवाने मुलगा बालपणीच मरण पावला. पुढे एका अज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देत 1 फेब्रुवारी 1905 या दिवशी पहाटे तीन वाजता डेबूजी घराबाहेर पडले आणि जगाच्या संसाराला लागले. सर्वस्वाचा त्याग करून डेबूजी काटेरी मार्गाने समाजहितासाठी चालू लागले. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या, कानाला अडकवलेली बांगडी आणि एका हातात काठी, दुसर्‍या हातात गाडगे घेऊन गाडगेबाबा गावोगाव फिरून स्वच्छता करू लागले. सायंकाळी कीर्तन करू लागले. गाडगेबाबांचा हा वैरागी अवतार अनेकांना विचित्र वाटे. लोक त्यांना वेडा समजत. भिकारी समजत. गाडगेबाबा गावोगाव जाऊन स्वच्छता करीत. सायंकाळी तिथल्याच एखाद्या नदीकाठी, एखाद्या वृक्षाखाली, कीर्तन करीत. कीर्तन करायला त्यांना मंदिर लागत नसे.
गावस्वच्छता आणि कीर्तन या कामासोबतच त्यांनी गावागावांत विहिरी, धर्मशाळा बांधायला सुरुवात केली. कीर्तनातून विषमतेवर, जातीभेदावर आघात करत बाबा समाजाला समतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांची कीर्तनाची पद्धत फारच परिणामकारक होती. अधूनमधून ते विनोद करीत, प्रश्न विचारून लोकांना कीर्तनात सहभागी करून घेत. कीर्तन हे एक समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अंधविश्वास, परंपरागत रूढी, धर्माच्या नावावर असलेले शोषण याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. सामाजिक सुधारणा व्हावी, दारूबंदी व्हावी, सावकारशाहीचे समूळ उच्चाटन व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी आपली सगळी हयात खर्च केली.
गाडगेबाबा कीर्तनातून मोठी प्रभावी मांडणी करीत. भुकेल्यांना जेवण द्या... तहानलेल्यांना पाणी द्या... बेकारांना काम द्या... उघड्यानागड्यांना वस्त्रे द्या... बेघर असलेल्यांना घरे द्या... रोग्यांना औषधोपचार द्या... गरीब मुलामुलींना शिक्षण द्या... पशुपक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या... हाच खरा धर्म आहे... हीच खरी ईश्वरसेवा आहे... असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका... व्यसनांच्या आहारी जाऊ नका... चोरी करू नका... सावकाराकडून कर्ज काढू नका... जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका... असे ते पोटतिडकीने सांगत. संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत, पण
स्वतःबद्दल मात्र ते म्हणत, मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही.
सामाजिक प्रबोधनासोबतच गाडगेबाबांनी नाशिक, देहू, आळंदी, पंढरपूर अशा धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली. नद्यांना घाट बांधले. गोरगरिब -अपंग यांच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. आज इतक्या वर्षानंतरसुद्धा हजारो गरजवंतांसाठी गाडगेबाबा आधार ठरलेले आहेत. हातात गाडगे घेतलेला हा माणूस आजही हजारो लोकांचा आधार आहे. सांस्कृतिक, विवेकवादी आणि प्रबोधनाचा विचार करणार्‍या कितीतरी पिढ्यांचा गाडगे महाराज हा मोठा सशक्त असा मानसिक आधार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबा यांची 1941 च्या जुलै महिन्यात भेट घेतली तेव्हाचा प्रसंग अनेकदा सांगितला जातो. गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती, ही माहिती कळताच कायदेमंत्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबांना भेटायचे ठरवले. गाडगेबाबा तेव्हा त्यांना म्हणाले, डॉक्टर, तुम्ही कशाला आले? तुमचे एक मिनिट महत्त्वाचे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार फार  मोठा आहे. या दोन महामानवांमधील सख्य हे असे होते.
आज पुण्यतिथीनिमित्त गाडगेमहाराज यांना आपण कृतज्ञ प्रणाम करू या.

Sunday, December 9, 2018

मुलांना कसे वाढवावे? कसे वाढवू नये?

 मुलांना कसे वाढवावे?  कसे वाढवू नये?
डॉ. शुभांगी पारकर यांनी केलेले मार्गदर्शन

लालबाग येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला नुकतीच पार पडली. राज्यभरातील व्याख्यानमाला श्रोत्यांअभावी ओस होत असताना या व्याख्यानमालेला लाभलेला प्रतिसाद आशादायक होता. व्याख्यानमालेच्या संयोजनासाठी, प्रतिसाद  आणि भव्यतेसाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे होते. विविध विषयातल्या तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने श्रोत्यांसाठी पर्वणीच होती. तुम्हाआम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याच्या ‘नव्या पिढीतील बालक-पालक’ अर्थात मुलांना कसे वाढवावे, या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ आणि शुभांगी पारकर यांनी दिलेले व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातील या काही गोष्टी सर्वांसमोर ठेवत आहोत.
डॉक्टर शुभांगी पारकर म्हणाल्या की, मानवी जगण्याची उत्क्रांती होत आहे. आपण आज आधुनिक जगात जगतो आहोत, म्हणजे अधिक काही सुंदर मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. आज माणसाचे वयोमान 80 वर्षांपर्यंत वाढले आहे. पूर्वी जे करता येत नव्हते ते करणे आज सहज शक्य झाले आहे. भारत हा आशियातला सर्वात सुंदर देश आहे. मात्र या आधुनिक काळात आपल्या जीवनशैलीला काय झाले, तेच कळेनासे झाले आहे. आपण जीवनशैलीच्या आजारांत पहिल्या क्रमांकावर पोहोचतो आहोत, हे आपल्यासाठी फारसे भूषणावह नाही. किंबहुना ते आपल्या देशासाठी वाईटच आहे. म्हणूनच आज आधुनिक काळात जगत असताना, आपण आपल्या आजारांबाबत विचार करताना, सिंहावलोकन केले पाहिजे. शारीरिक संवर्धनासोबतच मानसिक संवर्धन महत्त्वाचे आहे, हे आपण जाणले पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिकता महत्त्वाची आहे. गुणवत्ता वाढ होते, तेव्हाच खर्‍या अर्थाने आपण आधुनिक होतो. आनंदाने, समाधानाने जगू लागणे, मला हवे तसे, पण माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, असे जगता येणे म्हणजे आधुनिकता होय. व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगताना सामाजिक बंधनांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. माणसाचे जगणे हे एकमेकांसोबतचे
जगणे आहे.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय?
सचिन तेंडुलकर जेव्हा नर्व्हस नाईंटीमध्ये बाद होत होता, तेव्हा त्याने दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर, मानसिक कणखरतेच्या जोरावर त्या परिस्थितीतून बाहेर पडून पुढचा प्रवास केला. अशा प्रकारे वाईट स्थितीतून स्वतःला बाहेर काढता येणे, मानसिक कणखरता दाखविणे, दुर्दम्य आत्मविश्वास दाखवणे, म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. सगळेच धावत असतात. पण पी.टी. उषा एकच होते, कारण तिच्याजवळ आत्मविश्वासाची ऊर्जा असते. आपला आत्मसन्मान आपण महत्त्वाचा मानला पाहिजे. आपली इतर कोणाशी तरी तुलना करता कामा नये. दुसर्‍याकडे आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळेल ही अपेक्षा चांगली नव्हे. आपले बायबल, गीता हे धर्मग्रंथसुद्धा अधिकचे मिळवा असे सांगत नाहीत. म्हणून आजच्या पालकांनी आपल्या मुलांचा आत्मसन्मान जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. मुलांमध्ये आत्मसन्मानाची जाणीव ही त्यांच्या वयाच्या पहिल्या वर्षापासून असते, असे लक्षात आलेले आहे. आत्मसन्मान असणारा माणूस कधीच हरत नसतो.

आनंदी व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली
आपल्या मुलांना आपण नातेसंबंध, मित्रमंडळी यांचे महत्त्व आणि त्यांची आयुष्यातील अपरिहार्यता समजावून सांगितली पाहिजे. त्यातूनच आपले आयुष्य अधिक आनंदी होत असते, हे मुलांच्या मनावर बिंबविले पाहिजे. आनंदी असलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली होते, असे आता विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. आपल्या शरीरातील चयापचय, थायरॉईड या सगळ्याच व्यवस्था आपण आनंदी असल्यास अधिक चांगल्या कार्यरत होतात. परिणामी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण अधिक सशक्त आणि अधिक आनंदी आयुष्य जगू शकतो. मन समाधानी असेल तर त्या व्यक्तीला रक्तदाबाचा, मधुमेहाचा त्रास कमी होतो, असेही लक्षात आले आहे. आधुनिक पालकांनी घरात जर आनुवंशिकतेने वाढणारे आजार असतील तर नव्या पिढीला आताच डायटिंगची सवय लावली पाहिजे.

सर्जनशीलता प्रत्येकाच्या  ठायी
सर्जनशीलता प्रत्येक माणसाच्या ठायी असते. आई छान स्वयंपाक करते, सुंदर घर लावून ठेवते, तेव्हा त्यातही सर्जनशीलता असते. ही अशी सर्जनशीलता, अशी विधायकता, अशी कल्पकता आपण आपल्या मुलांना शिकविली पाहिजे.
आपल्या मुलांना आधुनिक पालकांनी दोन गोष्टी शिकवल्या पाहिजेत. पहिली म्हणजे जे पटते ते करा आणि दुसरी म्हणजे जे पटत नाही ते करू नका. जेव्हा पटतात त्या गोष्टी करता तेव्हा त्यातून आनंद मिळत असतो. पटत नाही अशा गोष्टी केलात की माणूस दु:खी होतो. यासाठी आपले आपण मित्र व्हायला हवे. स्वतःवर आपला विश्वास असायला हवा. ज्यामध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत.
मुले निरीक्षणातून शिकतात
मुले निरीक्षणातून शिकत असतात. पालकांकडे पाहून ते तसे वागण्याचा प्रयत्न करतात. आपण अनेकदा मुलांना खोटे बोलू नका असे सांगतो. मात्र स्वतः वागताना गरज पडली म्हणून, परिस्थिती तशी होती म्हणून, अशी कारणे देऊन का होईना; पण खोटे बोलतो. मग मुलांच्या असे लक्षात येते की खोटे बोलू नये, असे सांगायचे असते, पण प्रत्यक्षात मात्र खोटे बोलण्याची गरज पडते तेव्हा खोटे बोलायचे असते.
दुसरी गोष्ट म्हणजे खोटे बोलू नका, चोरी करू नका असे आपण सांगतो. का करू नका? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अनेकदा देता येत नाही. अशा वेळी आपण मुलांना त्याचे कारण सांगितले पाहिजे. म्हणजे जी गोष्ट आपल्या बाबतीत घडल्यामुळे आपल्याला वाईट वाटेल, आपले नुकसान होईल, तीच गोष्ट दुसर्‍याबाबत करता कामा नये. कारण त्याचेही नुकसान झाले की त्यालाही वाईट वाटणार असते. अशा प्रकारे अगदी सोप्या शब्दांत आपण त्यांना त्याची उत्तरे देऊ शकतो.

स्पर्धेमुळे जीवघेणा ताण
पुढच्या पिढीचे आयुष्य अधिक अवघड, अधिक खडतर आहे. जीवनातील स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे जीवघेणा ताण येतो आहे. या सगळ्यांसाठी आपण आपल्या मुलांना तयार केले पाहिजे. आपला सामाजिक परीघ मोठा झाला पाहिजे. आपल्या विश्वात आपल्याला रमता यायला पाहिजे. जीवन कष्टमय असले तरी ते आनंदी असू शकते, हे आपण त्यांना शिकविले पाहिजे. मुलांमध्ये आपण लवचिकता आणायला हवी. म्हणजे एखाद्या वेळेला परिस्थिती बिकट असेल तरी त्यांना त्या परिस्थितीशी जुळवून घेता यायला हवे. काही असो अथवा काही नसो; तरी आपले मन शांत कसे राहील हे आपण पाहिले पाहिजे. बाह्य गोष्टीमुळे आपल्या मनाची शांती भंग पावणार नाही ही क्षमता आपल्यात वाढवली पाहिजे.

प्रौगंडावस्थेत मानसिक आजार
प्रौगंडावस्था ही एक अवघड अवस्था आहे.प्रौगंडावस्थेतील मुले ही त्रिशंकू अवस्थेत जगत असतात. ती ना लहान असतात ना मोठी असतात. या काळात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. तेव्हा परिस्थितीशी जमवून घेण्यात पालकांनी मुलांना मदत करायला हवी. पालकांची भूमिका या काळात मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा पालक मुलांना अमुक गोष्ट मिळवली तर माझा खरा मुलगा अशा काही चित्रविचित्र अटी घालतात. त्यातून मुलांचे नैतिक खच्चीकरण होत असते. याच काळात मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण मोठे असल्याचे लक्षात आलेले आहे. याच काळात मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये दरी निर्माण होते. विसंवाद निर्माण होतो. म्हणून आईवडिलांनी या काळात असलेल्या मुलांशी सुसंवाद निर्माण करायला हवा. व्यक्ती म्हणून मुलाची याच काळात घडण होत असते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

यशाची व्याख्या
आपली यशाची व्याख्या आपण तपासून पाहिली पाहिजे. अनेकदा गाड्या, बंगले असणे किंवा डॉक्टर इंजिनीयर होणे अशी  आपण यशाची व्याख्या करतो; ती काही यशाची योग्य व्याख्या नव्हे.चटणी भाकरी खाऊन समाजसेवा करणारा माणूस हा अधिक यशस्वी माणूस असू शकतो. यश हे समाधानात असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. डिग्र्या न मिळवलेले, गाडी बंगले नसलेले अनेक लोक आपल्या आयुष्यात यशस्वी झालेले लोक आहेत. हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे आणि आपल्या मुलांना समजून सांगितले पाहिजे. मुलांना प्रेमाने वाढवावे की कठोरतेने वाढवावे हे आपण ठरविले पाहिजे. प्रसंगी शिस्त हवी, ठामपणा हवा, पण सतत कठोर बोलण्याने मुले घडण्याऐवजी बिघडण्याची शक्यता असते.
मुलांना निराश होऊ द्या
अलीकडे आपण मुलांचे अधिक लाड करतो. त्यांना यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. पण त्यांना अपयशाच्या बाजूला फिरकूही देत नाही. खरे तर मुले अपयशाला लवकर सामोरे जातील तेवढे चांगले असते. त्यातूनच त्यांची सहनशीलता वाढते, ते नकार पचवायला शिकतात, निराशेवर मात करता येते; कशी करायची हे ते शिकतात. म्हणून मुलांना निराश होऊ द्या, त्यातून त्यांना बाहेर येऊ द्या. त्यातूनच त्यांची खरी प्रगती होत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी त्यांच्या आशा-आकांक्षा मुलांवर लादू नयेत. त्यांचे स्वप्न मुलांवर लादू नयेत. मुले स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहेत, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांना त्यांचा मार्ग निवडण्याची मुभा दिली पाहिजे. त्यांना पडू दिले पाहिजे. निराश होऊ दिले पाहिजे. त्यातूनच त्यांना ऊर्जा मिळते आणि फिनिक्स पक्षासारखे ते उडायला शिकतात.
आपण चांगले वागतो म्हणून प्रत्येकाने आपल्याशी चांगलेच वागले पाहिजे, अशी अनेकदा अपेक्षा असते. तसे होणार नसते. जग तुमच्याशी चांगले वागायला बांधील नाही हे मुलांना समजून सांगितले पाहिजे. आपण भले करतो तो आपला चांगुलपणा, आपला निर्णय आहे. दुसर्‍याचा तसाच असेल असे नाही, हे वास्तव मुलांना सांगितले पाहिजे.

जीवनशैली रोबोटिक
 आजकाल मुलांना इंटरनेटवरील गेमचे व्यसन लागलेले दिसते. मुलांची जीवनशैली रोबोटिक झाली आहे. माझ्या पाहण्यात सतरा वर्षांचा एक असा मुलगा आला, ज्याने आपली आई नऊ दिवस आयसीयूमध्ये असताना तिला रुग्णालयात येऊन भेटण्याची तसदी घेतली नाही. तो त्या काळात फक्त गेम खेळत घरी थांबला होता. मुलांना मोबाईल, इंटरनेट देऊ नका असे नव्हे, त्या त्या सुविधांचे फायदे आहेत. मात्र मुले त्यांच्या आहारी जात नाहीत ना, याबाबत पालकांचे लक्ष असायलाच हवे. आजकाल मुले अशा प्रकारच्या गेमच्या आहारी जात आहेत. त्यांना त्याचे व्यसन लागत आहे. त्याच वेळी अतिशय वाईट अशा अमलीपदार्थांचे व्यसनसुद्धा मुलांना लागत आहे. म्हणून पालकांनी दक्ष राहिले पाहिजे. मुलांच्या मेंदूला रोज काही ना काही खाऊ लागतो. म्हणून त्यांना चांगली व्यसने लावली पाहिजेत. अभ्यासाचे व्यसन लावले पाहिजे, मैदानी खेळाचे व्यसन लावले पाहिजे. त्यातून त्यांची वाढ होते, त्यांना ऊर्जा मिळते.
सेल्समनसारखे वागू नये
मुलांशी वागताना एखाद्या सेल्समनसारखे पालकांनी वागू नये. तू अमुक केलेस तर अमुक देईन, अमुक केलेस तर तमुक देईन, अशी देण्याची भाषा मुलांसोबत करता कामा नये. मुलांना माणुसकीचे धडे लहानपणीच दिले पाहिजेत. तसेच एखादे वर्तन मुलांकडून झाले तर त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या मुलाने पक्ष्याला, प्राण्याला पाणी नेऊन दिले, आजोबांना मदत केली, दुसर्‍या मुलाला मदत केली तर त्या मुलाला बक्षीस देऊन त्याच्या या वृत्तीचा गौरव केला पाहिजे. त्यातून मुले माणुसकी शिकत असतात.

मुलांचा सन्मान
मुलांसमोर पालकांनी एक आदर्श ठेवला पाहिजे. मुले त्या आदर्शाकडे बघूनच वाढत असतात, याचे भान पालकांनी ठेवलेच पाहिजे. मुलांच्या समोर आईवडिलांनी भांडू नये; त्यांच्यातील मतभेद मुलांच्या लक्षात येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. मुलांचा सन्मान सांभाळणेही तितकेच गरजेचे असते. लखनवी भाषेत पालक मुलांना आप म्हणतात म्हणजे त्यांचा आदरार्थी उल्लेख करतात. आपण अनेकदा ठोंब्या अशी नकारात्मक भाषा वापरतो. त्यातून त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागत असते. याचा परिणाम मनावर होऊन आत्मविश्वास कमी होतो. मुले लहान असली तरी त्यांना आदराची गरज असते.

अभ्यासाची चिंता
आज टीव्ही, मोबाईल या साधनांमुळे घरातले बोलणेच बंद झाले आहे. घरातल्या माणसांमधला संवाद संपला आहे. त्यातून मुलं स्वयंकेंद्रित व्हायला लागली आहेत. मुलांना शिस्त हवीच, पण त्यांना प्रेमही हवे असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. चिंता ही अशी गोष्ट आहे की एका मर्यादेपर्यंत ती माणसाला कार्यप्रवण करते. ती माणसाला आवश्यक असते; मात्र ती जर प्रमाणापेक्षा अधिक वाढली तर माणसाचे खच्चीकरण होते. त्याची काम करण्याची प्रेरणा संपते.तेव्हा याचे भान आपण ठेवले पाहिजे. अभ्यासाची चिंता मुलांना एका मर्यादेपर्यंत असायलाच हवी मात्र त्या मर्यादेपलीकडे ते जाऊ नये. फार ताण दिला तर त्यांची प्रगती ही अधोगतीमध्ये बदलत असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

मोबाईलला लॉक
अलीकडे मुलांच्या मोबाईलला लॉक असतो. जर मूल मोबाइलवर काय करते हे पालकांना दाखवत नसेल; त्यांच्यापासून लपवून ठेवत असेल तर कदाचित ते मूल व्यसनाधीन होण्याची ती नांदी असू शकते हेही पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
 मुले वाढविणे ही सहज गोष्ट नाही. ती पूर्वीपेक्षा आता अवघड झाली आहे. मात्र या सगळ्यांची चिंता करून प्रश्न सुटणार नाही. तर आपण अधिक सहजपणे अधिक प्रेमाने, मुलांशी संवाद वाढवून, त्यासाठी स्वतः थोडे कष्ट घेऊन वागले पाहिजे. तरच आपली मुले छान आयुष्य जगू शकतील आणि पर्यायाने आपले आयुष्यही सुंदर होऊन जाईल.