Thursday, August 15, 2019

लडाख बुद्धिष्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांची खास मुलाखत

शांतिप्रिय लडाखला वेगळे झाल्याचा आनंद
70 वर्षांचे स्वप्न साकार झाले!
लडाख बुद्धिष्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांची खास मुलाखत
(वैभव बळीराम चाळके)
आपल्याला माहीत असलेला लडाख म्हणजे उंचच उंच ओसाड डोंगररांगा... भारतातलं पर्यटनाचं एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण म्हणजे लडाख! विशेषत: मोटर सायकलवरून ट्रेकिंग करण्याची हौस असणार्‍या लोकांचे ड्रिम डेस्टिनेशन म्हणजे लडाखच्या ओसाड पण नयनरम्य डोंगररांगा होत. अप्रतिम दृश्यांनी ओतप्रोत भरलेल्या या डोंगररांगांमध्ये दरवर्षी पर्यटक गर्दी करतात. आता जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष राज्याचा दर्जा म्हणजे कलम 370 हटवल्यामुळे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश असे विभाजन  केल्यामुळे लडाखमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांपेक्षा वेगळे असलेले हे लोक कायम त्या राज्यात उपेक्षित राहिले. म्हणून त्यांनी गेली अनेक दशके, स्वातंत्र्यापासूनच लडाखला केंद्रशासित प्रदेश करावे म्हणून मागणी लावून धरली होती. काश्मीरच्या विभाजनामुळे, जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन प्रदेश केंद्रशासित जाहीर केल्यामुळे या लढ्याची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लडाखच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. डोंगररांगात वसलेल्या या लोकांची जम्मू-काश्मीरने कायमच उपेक्षा केल्यामुळे आता केंद्राकडे जाऊन आपले जीवन अधिक लवकर, अधिक सुकर करता यईल, असे लडाखला वाटते आहे. लडाखला जम्मू काश्मीरपासून अलग करा, अशी मागणी करत 70 वर्षे लढा देणार्‍या लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांच्याशी आम्ही साधलेला हा संवाद...
लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आले, या घटनेकडे आपण कसे पाहता?
रिनचेन नामग्याल- आम्ही अत्यंत खूश आहोत. आम्हा सगळ्यांनाच मोठा आनंद झाला आहे. आम्ही या आनंदाचा उल्लेख दुसरे स्वातंत्र्य असा करीत आहोत. 70 वर्षे म्हणजे स्वातंत्र्यापासून आमची ही मागणी होती. आमचे हे स्वप्न होते. ते आज अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आमच्या प्रदेशातील सगळी जनताच आज खूप आनंदात आहे. आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आपण गेली अनेक वर्षे जम्मू आणि काश्मीरपासून अलग होण्यासाठी लढा उभारला होता. जम्मू-काश्मीरपासून अलग व्हावे, असे आपल्याला का वाटत होते?
रिनचेन नामग्याल- 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासूनच आमची ही मागणी आहे. 1947 सालीच आमच्या लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे एक पथक तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना जाऊन भेटले होते आणि तेव्हाच लडाखला केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी केली होती. त्या वेळीच, आम्हाला केंद्रशासित प्रदेश करणे शक्य नसल्यास हिमाचलप्रदेशला जोडून द्या, अशीही मागणी केली होती. म्हणजे आम्हाला जम्मू-काश्मीरसोबत राहायचे नव्हते. आम्हाला स्वतंत्र किंवा हिमाचलप्रदेशसोबत राहणे चालणार होते. याला अनेक कारणे आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील लोक आणि लडाखमधील लोक यांच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांचे राहणीमान आणि आमचे राहणीमान याच्यात कोणताही मेळ नाही. आमची भाषा त्यांच्या भाषेहून वेगळी आहे. तरीही एवढी वर्षे आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो. लडाखमधील लोक हे शांतिप्रिय लोक आहेत. काश्मीरमध्ये सततची अशांतता आढळते. त्याचा प्रभाव सतत आमच्यावर पडत होता. तो त्रास आम्हाला सहन करावा लागत होता. काश्मीर प्रदेशात कोणतीही घटना घडली की, त्याचा थेट परिणाम आमच्यावर होत होता. कॉलेजची तीन वर्षे पूर्ण करण्यासाठी आम्हाला काश्मीरमधील अस्थिरतेमुळे पाच-सहा वर्षे लागत होती. कारण काश्मीरमध्ये अस्थिरता आली की, कॉलेज बंद होत आणि मग त्याचा परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर होत होता. परीक्षा पुढे ढकलल्या जात होत्या. निकाल वेळेवर लागत नव्हते. असे अनेक प्रश्न काश्मीरमधील अस्थिरतेमुळे आम्हाला अडचणीत टाकत होते. काश्मीर हा मुस्लीमबहुल भाग आहे आणि लडाखमध्ये बुद्धिस्टांची संख्या अधिक आहे. जम्मू-काश्मीर राज्याने आम्हाला सततच दुय्यम वागणूक दिली. विविध विकास कामांसाठी पैशांच्या मंजुरीपासून अन्य अनेक बाबतीत आम्ही कायम डावलले गेलो. त्यामुळे आमच्यामध्ये वेगळे होण्याची भावना उत्तरोत्तर दृढ होत गेली. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि देशविघातक शक्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. लडाखमध्ये मात्र तसे आढळत नाही. लडाखमधील लोक हे राष्ट्रवादी आहेत. त्यांनी अनेक लढायांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. आमच्या अनेक संस्था, विशेषत: आमच्या युवा संस्था या कारगिलसारख्या अनेक युद्धाच्या वेळी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करीत होत्या. आपल्या जवानांसाठी अन्नपुरवठा करण्यापासून अन्य अनेक प्रकारची मदत करण्यास लडाखचे लोक कायमच आघाडीवर होते. महिला संघटनांनी हे काम नेहमीच हिरिरीने केले. त्यामुळे लडाख जम्मू-काश्मीरपासून तोडून वेगळा केंद्रशासित प्रदेश केला हे आमच्यासाठी खूप चांगले झाले आहे. आमचे एक सगळ्यात मोठे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.
आपली राजकीय आकांक्षा तर पूर्ण झाली, पण लडाखमध्ये आता आणखी कोणकोणत्या समस्या आहेत
रिनचेन नामग्याल- आमची स्थानिक भाषा बोथी(बोधी म्हणूनही ओळखतात.) ती या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे. हिमाचलप्रदेश, सिक्कीम डोंगररांगांपासून थेट अरुणाचल प्रदेशपर्यंत आमची ही भाषा बोलली जाते. त्यामुळे आमच्या या भाषेला केंद्रांच्या चौतीस भाषांच्या बरोबरीचे स्थान मिळावे, अशी आमची इच्छा आहे.
आपल्याला जम्मू काश्मीर विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही...
रिनचेन नामग्याल- जम्मू-काश्मीर राज्याचा 70 टक्के भूभाग लडाखमध्ये आहे. मात्र आमची लोकसंख्या केवळ तीन लाख इतकी आहे. म्हणजे एकूण राज्याचा विचार करता ती अगदीच नगण्य आहे. आम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये अल्पसंख्याक आहोत. जम्मू-काश्मीर विधानसभेत सर्व मिळून आमचे केवळ चार आमदार आहेत. केंद्रात एक खासदार आहे. लडाखमधील एकूण लोकसंख्येपैकी 56 टक्के लोक हे बुद्धिस्ट समाजाचे आहेत. या प्रदेशाकडे राज्याने सतत दुर्लक्ष केले हे मी आधी सांगितले आहेच. या सर्व कारणांमुळे आमच्याकडे लडाख वेगळा करण्याची मागणी कायमच करण्यात येत होती.
लडाख हा प्रदेश पर्यटन स्थळ म्हणून सर्वत्र परिचित आहे, पण याव्यतिरिक्त तुमच्याकडे कोणते उद्योग चालतात? लडाखची माणसे अर्थार्जनासाठी काय करतात?
रिनचेन नामग्याल- पर्यटन हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय आमच्याकडे लोक स्वतःपुरती शेती करतात. अनेक लोक सरकारी नोकर्‍यांमध्ये आहेत. आर्मीमध्ये भरती होणार्‍यांचे प्रमाण आमच्याकडे फारच मोठे आहेत. प्रत्येक घरात किमान एक माणूस सैन्यात असलेला आढळेल. सैन्यात ज्या घरातला माणूस नाही, असे घर लडाखमध्ये तुम्हाला क्वचितच आढळेल. त्यातूनच आमचा चरितार्थ चालतो.
सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा आपण जम्मू-काश्मीरपेक्षा वेगळे आहात त्याबद्दल काय सांगाल...
रिनचेन नामग्याल- आमच्याकडे मोठा सांस्कृतिक वारसा आहे. आमचे लोक अतिशय संवेदनशील आहेत. शांतिप्रिय आहेत. शेजारी जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता असताना आमच्याकडे मात्र कायमच शांतता असलेली आढळते. समाजामध्ये एकजिनसीपणा आढळतो. आतापर्यंत आमच्याकडे समाजात मोठे तेढ कधीच निर्माण झाले नाही. लडाखमध्ये लोकांनी काहीतरी आगळीक केली आहे असे तुम्हाला आढळणार नाही. लडाखच्या लोकांमध्ये भारताबद्दल प्रेम आहे. भारतीय आर्मीबद्दल आस्था आहे. जेव्हा जेव्हा भारतीय जवानांना गरज पडली, तेव्हा तेव्हा लडाखी लोक स्वयंस्फूर्तीने त्यांना मदत करत आले आहेत. प्रत्येक युद्धाच्यावेळी लडाखी लोक सैन्याच्या पाठीशी उभे
राहिले आहेत.
11-8-2019

Wednesday, August 7, 2019

मन मिटण्याचा दुःख..

मन मिटण्याचे दुःख...
कागदाची करामत या कार्यक्रमात ज्या विविध गोष्टी मी समाविष्ट केल्या आहेत, त्यातली एक गोष्ट म्हणजे मुलांना या जगात कोणीही ढ नसतो हे सांगणे.
आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत जो माणूस अभ्यासात हुशार, तो हुशार, असे एक धारणा असलेली दिसते. एक विनोद या अनुषंगाने मला आठवतो. एका विद्यार्थ्याने एकदा आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारला होता, सर, कमल अभ्यासात हुशार आहे आणि विमल ढ हे खरेच. पण परवा नदी ओलांडताना कमल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली, तेव्हा विमलने तिला पाठीवर मारून किनाऱ्यावर आणली. तरीही आपण सगळे कमलला हुशार म्हणतो. हे कधीतरी बदलेल का हो...
तुम्ही आता आपल्या वर्गातल्या मुलांकडे पाहाल तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, वर्गात पहिल्या पाचात असलेली सगळी मुले आयुष्यात यशस्वी झालेली नसतात आणि शेवटच्या पाचात असलेली सगळी मुले आयुष्यात अयशस्वी झालेली नसतात. कारण प्रत्येकाचे हुशारीचे एक क्षेत्र असते. माणूस हुशार असेल असे एक तरी क्षेत्र असते. एक माणूस सगळ्याच विषयात हुशार नसतो. तसेच वर्गात कोणीही सर्वात ढ नसतो. असलाच तर तो विशिष्ट विषयाच्या अभ्यासात ढ असतो. किंवा आपल्या एका शैक्षणिक पद्धतीत ढ असतो. म्हणून त्याला सगळ्या जीवनातून बाद करण्याची आपली जी व्यवस्था आहे, ती फारशी चांगली नाही. हेच मुलांना सांगण्यासाठी मी जिथे कुठे कार्यक्रम करतो, तिथे मुलांना प्रश्न विचारत असतो. आपल्या वर्गात सगळ्यात हुशार कोण आहे रे... कदाचित एखादा हात वरती येतो. मग मी दुसरा प्रश्न विचारतो, आपल्या सगळ्यात ढ कोण आहे रे...
मी आजवर जितके कार्यक्रम केले, त्या कार्यक्रमात कोणीही हात वरती केलेला नाही. कारण सगळ्यात ढ असा कोणीच नसतो. किंवा आपण आहोत असं कोणालाही वाटत नसतं.
याही कार्यक्रम कोणी हात वरती करणार नाही हे मला माहीत होते. मुले एकमेकांकडे पाहत होती. एकदुसऱ्याची नावे सुचवत होती.
पण एका क्षणी माझा आत्मविश्वास गळून पडला. एक मुलगी हात वरती करून, मी आहे, म्हणाली. मला क्षणभर काय बोलावं कळेना. असा अनुभव मला माझ्या कार्यक्रमात यापूर्वी कधीच आला नव्हता. मी तिच्या जवळ गेलो. तिला विचारलं, हे तुला कोणी सांगितलं... तर ढसाढसा रडत म्हणाली, आहेच मी... सगळ्यांनाच माहीत आहे...
मला तिचा केविलवाणा चेहरा पाहवेना. तिच्याशी काय बोलावं ते कळेना... पण मी एक दीर्घ श्वास घेतला. तिला म्हटलं, ऊठ, इकडे ये, जगात सगळ्यात ढ असे कोणीच नसते.
मग मी सगळ्या मुलांकडे पाहत म्हटलं, मी तुम्हाला सहज करता येणारा एक एन्व्होलोप शिकवणार आहे. कात्रीच्या वापराशिवाय, फेविकॉल, डिंक, गम यांच्याशिवाय बनवता येणारा... एखाद्या लग्नात गेलात तर प्रेझेंट देता येणारा... एखाद्याच्या वाढदिवसाला प्रझेंट म्हणून पैसे द्यायचे असतील तर ते घालून देता येतील अशा... एखाद्याला पत्र पाठवायचं असेल तर त्यासाठी वापरता येणारा...
पुढच्या पाच मिनिटांत मी मुलांना दाखवत तो एन्व्होलोप बनविला. त्या कन्येलाही बनवायला सांगितला. त्या मुलीने मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकली आणि केली होती. कारण आता ती ढ उरली नव्हती. ती सगळ्यांच्या समोर होती. आताची सेलिब्रिटी होती. तिचा आत्मविश्वास वाढला होता. म्हणूनच असेल कदाचित मी बनवलेल्या एन्व्होलोपपेक्षा तिने उत्तम एन्व्होलोप बनवला होता. तो सगळ्यांना दाखवत मी म्हणालो, मित्रांनो, हिला आतापर्यंत असं वाटत होतं की ती सगळ्यात ढ मुलगी आहे, पण मला सांगा इतका सुंदर एन्व्होलोप बनवणारी मुलगी ढ कशी असेल. हे पाहा, मी जो बनवला आहे त्याहून अधिक नीट तिने बनवलाय.
मग तिला म्हटलं, गैरसमज काढून टाक. तू ढ नाहीस.
कार्यक्रम संपल्यावर मी त्या मुलीला म्हटलं, राहतेस कोठे...
ती म्हणाली, इथेच. मागच्या रोडवर. फुटपाथला.
मी पुन्हा निशब्द... काही क्षण काय बोलावं खलेना... मी माझ्या जवळ असलेले काही कागद त्या मुलीला देत शाळेचा निरोप घेतला.

जगात सर्वात ढ कोणी नसतो, ह्या मतावर मी आजही कायम आहे. पण असं लखलखीत खरं बोलणारे लोकही आहेत, हेही आता मला अनुभवाने पटलं आहे.

आता कोणत्याही क्षणी त्या प्रसंगाची आठवण येते. मनात कालवाकालव होते. मग मन मिटून मी दुसऱ्या कामाला लागतो. मन मिटण्याचा दुःख केवढं मोठं आहे, ते असं थोडी शब्दांत सांगता येतं?