Tuesday, October 20, 2020

बांगड्या बघा या...

बांगड्या बघा या...


तो काळ शतकाच्या उंबरठ्यावरचा होता. मी रुईया महाविद्यालयात शिकत होतो. कांजूरला माझ्या एका मैत्रिणीकडे अधूनमधून जात असे. आई-वडिलांशिवाय मुंबईत राहत असल्यामुळे मुलुंडला राहणाऱ्या बहिणीकडे आणि कांजूरला राहणाऱ्या या मैत्रिणीकडे गेलो म्हणजे मला आपल्या घरात गेल्याचा आनंद होत असे. त्या काळातल्या वाळवंटी जीवनातील ती ओयासिस होती असे म्हटलात तरी चालेल. मैत्रिणीच्या घरी तिची आजी, आई, बाबा आणि छोटा भाऊ असे पाच जण राहत. छोटा स्वप्निल तेव्हा साधारण दहा वर्षांचा होता असेल. त्या काळात खिशात फारसे पैसे नसत. त्यामुळे मी त्या छोट्या स्वप्निलसाठी पाच रुपयांची त-हेत-हेची दहा चॉकलेट घेऊन जात असे.


मी घरात नव्या पिढीतला मोठा मुलगा होतो आणि आणि माझ्या मागे अनेक भावंडे होती. त्यामुळे मुलांप्रति मला त्या कोवळ्या वयात वयातसुद्धा प्रचंड प्रेम होते. फक्त या घरातल्या छोट्यासाठी नव्हे, तर मी ज्या ज्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे जात असे, त्या घरातील चिमुकल्यांसाठी मी अशीच छान छान चॉकलेट घेऊन जात असे.


लहान मुलांना तुम्ही किती रुपयाचा खाऊ देता याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्यांना हवा असतो नानाविध प्रकारचा आणि भरपूर खाऊ. त्यामुळे अगदी दोन-पाच रुपयांचा विचारपूर्वक निवडलेला असा खाऊ किंवा असेच स्वस्तातले एखादे खेळणे मी घेऊन गेलो की त्यांना आभाळभर आनंद होत असे.


या मैत्रिणीच्या भावाचेही तसेच होते. मी घरी गेलो आणि तो नेमका शाळेत असला तर मग मी त्याच्यासाठी घेतलेली ती चॉकलेट्स फ्रिजच्या पायामध्ये ठेवून देत असे. तो शाळेतून आला की त्याला,  वैभवदादा येऊन गेला, असं घरी कोणीतरी सांगितलं की, तो धावत जाऊन फ्रिजच्या पायामध्ये चॉकलेट आहेत का शोधत असे. ती तिथे ती हमखास असत.


पुढे काही वर्षांनी तो मोठा झाला आणि त्याच्या घरात मोठ्या बहिणीचा छोटा मुलगा आला. माझे त्या घरचे जाणे कमी झाले असले, आता पूर्वीपेक्षा  अधिक दिवसांनी  जाणे होत असे, तरी सातत्य होते. आता त्या छोट्या मुलालासुद्धा तशीच सवय लागून राहिली होती. या काही वर्षात माझ्या परिस्थितीत सुधारणा झाली होती आणि माझे चॉकलेटचे बजेट दुप्पट झाले होते.

आता मी दादाचा मामा झालो होतो.


प्रश्न चॉकलेट देण्याचा नाही. त्यामागच्या आनंदाचा आहे. एक गोष्ट आणखी सांगितली पाहिजे. एकदा दादरच्या छबिलदास गल्लीत एक सतरा-अठरा वर्षांची मुलगी अचानक माझ्या पुढ्यात येऊन थांबली आणि म्हणाली, वैभवमामा, ओळखलं?

मी अर्थातच तिला ओळखलं नव्हतं. तिला तसे सांगितल्यावर ती म्हणाली, अरे, मी सोनी!

पण सोनी नावाच्या अनेक मुली असतात. त्यामुळे मी तरीही तिला ओळखू शकलो नाही. तर ती पटकन म्हणाली, अरे मी मी किशोरीची भाची.

... आणि लखकन मला त्या चिमुकल्या सोनीची आठवण झाली. ही तीच मुलगी होती जिला मी अशीच पाच रुपयांची दहा चॉकलेट घेऊन जात असे.


हे सारे आज आठवण्याचे कारण म्हणजे आज तो छोट्या मुलगा- स्वप्निल- खूप महिन्यानंतर भेटला. तो आता तीस वर्षांचा झाला आहे. एका खासगी कंपनीत नोकरी करू लागला आहे. आम्ही भेटलो. गप्पा मारल्या. निघताना त्याने माझ्या हातात ही$$$ एवढी मोठी कॅडबरी दिली आणि म्हणाला, हे तुमच्या छोट्याला घेऊन जा...


त्याने दिलेले ते चॉकलेट हातात घेताच मला अमाप आनंद झाला. त्याला म्हटलं,

आज एक वर्तुळ पूर्ण झालं...


आपण सारे अशी अनेकानेक वर्तुळे पूर्ण करण्याची स्वप्न बघत असतो. सगळे विश्व एक मंडलाकार आहे आणि अशा मंडलाकारानीच आपले आयुष्य समृद्ध केलेले आहे, हे ज्यांना माहीत आहे, त्यांना वर्तुळ पूर्ण होण्यामधली धन्यता समजू शकेल.


मला या क्षणी बा. भ. बोरकर यांची कविता आठवते...


बांगड्या बघा या

बांगड्या बघा या

श्रावण लावण्यराज

लागला फुलाया...


- वैभव बळीराम चाळके

9702 723 652

■■■