आतले आणि बाहेरचे...
कवी विंदा करंदीकर अर्थात गो. वि. करंदीकर यांनी 'आतले आणि बाहेरचे' या शीर्षकाचा एक ललित निबंध लिहिला आहे. एखाद्या व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या माणसांना आतले लोक त्यांच्यावर अन्याय करतात, त्यांना आत येऊ देत नाहीत, असे वाटत असते. मात्र या बाहेरच्या पैकी ज्याला आत जाता येते तो आत गेल्यावर आपली भूमिका बदलतो आणि आतला होतो. बाहेरच्यांना बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्नशील होतो. अशा आशयाचा तो निबंध आहे.
माणूस व्यवस्थेच्या बाहेर असताना वेगळा आणि आत असताना वेगळा वागतो, हे या निबंधात सांगितले आहे. पाठ्यपुस्तकात हा निबंध समाविष्ट होता. त्यामुळे कोट्यवधी लोकांना तो चांगलाच माहीत आहे. आतले आणि बाहेरचे म्हटले की सर्वप्रथम करंदीकरांचा हा लघुनिबंध आठवतो. त्यांनी जे सांगितलेले आहे ते सार्वत्रिक आहे. आपल्याला तसे अनुभव येतात आणि करंदीकरांचे मोठेपण पुन्हा पुन्हा प्रत्ययाला येते.
असे असताना पुन्हा आज या निबंधाचा विषय आतले आणि बाहेरचे असाच का निवडला असेल बरे, असा प्रश्न वाचकाला पडणे अगदी स्वाभाविक आहे. करंदीकरांच्याच भाषेचा उपयोग करून सांगायचे तर अशी परंपरा पाठीशी असल्याशिवाय नवता निर्माण होत नसते.
या जुन्यात शीर्षकाला एक नवीन अर्थ प्राप्त झालेला आहे किंवा एक नवीन अर्थ उमगला आहे. म्हणूनच आज हा विषय पुन्हा एकदा निबंधाचा विषय झाला आहे.
मित्रांनो, सध्या आपण अत्यंत बिकट परिस्थितीतून जातो आहोत. आपल्याला आपल्याच जगण्याच्या व्याख्या नव्याने मांडण्याची वेळ आलेली आहे. आर्थिक आघाडीवर आपण सारेच अडचणीत आलेलो आहोत. गेल्या सहा महिन्यांत लोकांमध्ये सर्वाधिक चिंतेचा विषय ही आर्थिक घसरण हा आहे, हे आपण सारे जाणतोच. मात्र एक गोष्ट कदाचित आपल्या लक्षात आली नसेल, या काळात सुस्थिस्तीत असणारे लोक म्हणजे ज्यांना आपण सेटल आहेत असे म्हणतो ते लोक अधिक चिंताग्रस्त झाल्याचे आपण पाहिले. याउलट आठ-दहा दिवस पायपीट करत आपल्या गावाला पोहोचलेला मजूर लाख अडचणींवर मात करीत गावागावांत सुखाने नांदतो आहे, असे चित्र तुम्हाला दिसेल. अर्थात तो अत्यंत आनंदी आहे, त्याच्या समोर समस्या नाहीत, असे नव्हे. मात्र ज्यांना आपण सुस्थितीतील लोक समजतो, त्यांच्यापेक्षा हा माणूस अधिक आनंदी आहे, असे चित्र ढोबळमानाने मांडता येईल आणि ते सर्वांना मान्य होईल.
हे असे का झाले?
मित्रांनो, आपले प्रत्येकाचे असे एक आतले विश्व असते. आपण सारे या आतल्या विश्वात आणि आपल्या बाहेरच्या विश्वात स्वतःला "ऍडजेस्ट' करत जगत असतो. या काळात आपले बाहेरचे विश्व उद्ध्वस्त झाले. अडचणीत आले. विस्कळीत झाले. हे आपण पाहिले, मात्र या काळात ज्यांनी आपले आतले विश्व विस्कटू दिले नाही. उद्ध्वस्त होऊ दिले नाही. तेच लोक आज थोडे आनंदी, थोडे समाधान, थोडे समतोल असलेले दिसतात. या बाहेरच्या विश्वाला बघत, या बाहेरच्या विश्वाचा वेध घेत चालत आले आणि ज्यांनी आपल्या आतल्या विश्वाकडे काहीसे दुर्लक्ष केले, किंबहुना कधीतरी हा बाहेरचा वेग, हे बाहेरचे जग कोलमडून पडू शकते, याची शक्यताच मनाला स्पर्शू न दिल्यामुळे चुकीच्या पायावर जीवन उभे केले, त्यांचे अंतरविश्वसुद्धा उन्मळून पडले. तेच अधिक चिंतेत आहेत. गोष्ट कळायला थोडी अवघड आहे. परिस्थितीच तशी अवघड आहे. मात्र हा सूक्ष्म असा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. या काळाकडून हे शिकले पाहिजे. आपले आतले विश्व आणि बाहेरचे विश्व याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे, बाहेरच्या विश्वावर आपले नियंत्रण नाही, पण आतल्या विश्वावर आपलेच नियंत्रण आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. प्रगतीच्या काळात याकडे दुर्लक्ष होते. ते तसे अनेकांचे झाले.
मजूर, गोरगरीब, कामगार यांची बाहेरच्या विश्वातली प्रगतीच न झाल्यामुळे त्यांच्या आतल्या विश्वावर त्याचे मोठे परिणाम झाले नव्हते आणि म्हणूनच त्यांचे आतले विश्व जसे होते तसे राहिले. त्याला फारसा धक्का लागला नाही आणि त्याचेच परिणाम त्यांना या काळात अनुभवायला आले, हे आपण समजून घ्यायला हवे.
गेल्या काही वर्षांमध्ये जगाला बाजाराने ग्रासले आहे. माणसाच्या नकळत तो या बाजाराचा आहारी गेला आहे आणि तसेच जात असताना त्याला त्याचे सुखद अनुभव मिळत गेले. मात्र या सुखाच्या पायवाटेखाली अंथरलेला गालिचा आपला नाही, याची जाणीवच तो या सुखाच्या अनुभूतीत विसरून गेला आणि त्यामुळे अशा गालिचावर अनवाणी पायांनी मजेने चालू लागला. आपल्या स्वकष्टार्जित चपलासुद्धा गरजेच्या नाहीत म्हणून फेकून दिल्या.
बाजाराने आपला गालिचा काढून घेतल्यावर आता चपलांशिवाय चालताना या बाजारशरण माणसाचे मोठे हाल सुरू झाले आहेत.
- वैभव बळीराम चाळके
9702 723 652