Monday, March 7, 2022

आट्यापाट्या

 



आट्यापाट्या: चांदणरातीचा खेळ

(होळी विशेष)

वातावरणात गारवा अद्याप बाकी असतो. आता तो माघारी परतण्याच्या बेतात असतो. अशा वेळी होळीचा सण येतो. देशभर हा सण होळी आणि धूलवड असे दोन दिवस साजरा केला जातो. कोकणात मात्र होळी अर्थात शिमगा हा साधारण महिनाभर चालणारा सण आहे. होलिकादहनाचा कार्यक्रमसुद्धा सलग नऊ ते दहा दिवस सुरू असतो.

फाल्गुन पंचमीला सुरू झालेला होलिकादहनाचा कार्यक्रम सलग दहा दिवस पौर्णिमेपर्यंत चालतो. या दहा दिवसांत चांदण्या रात्रीत कोकणात आट्यापाट्या हा खेळ रंगतो. आट्यापाट्या हा⁰ अस्सल देशी खेळ आहे. एका संतरचनेमध्ये 'आट्यापाट्या आणि लगोऱ्या गोट्या डाव मांडीला' असा उल्लेख आहे. आट्यापाट्याचा इतिहास किमान इतका तरी जुना आहे.

पहिल्या होळीच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास शाळेतून परतलेले बालगोपाळ शेवरीचे झाड शोधायला निघतात. एक चांगले बारा पंधरा फूट उंचीचे झाड मिळाले की ते तोडून त्याचा शेंडा नीट बांधून, खोडावरचे काटे काढून, आणून होळीच्या माळावर उभे केले जाते. मग भाजावलीसाठी (शेताची मशागत) तोडलेल्या झाडांच्या फांद्यांच्या कवलाचे भारे आणून होळीभोवती रचले जातात. होळी घेऊन येताना आपटबार काढण्यासाठी प्रत्येक जण छानसे दिंडे (वनस्पती) घेऊन येतो. होळी उभी राहिली तिच्याभोवती कवल व गवत लावून झाले की घराघरातून घमेली भरून राख आणून ठेवली जाते.

रात्री जेवण आटपून सगळे जण होळी पेटवायला हजर होतात. होळी पेटवून होळीत दिंडे भाजून त्याचे बार - आवाज- काढले जातात आणि मग आट्यापाट्या आखायला सुरुवात होते. उभ्या आडव्या रेषांनी आट्यापाट्याचे मैदान तयार केले जाते. प्रत्येक आडव्या रेषेच्या दोन्ही टोकांना दगड ठेवले जातात आणि मग आट्यापाट्याचा खेळ सुरू होतो. धुंगाडी टाळी देतो आणि खेळाला सुरुवात होते. एकेका रेषेवर खेळाडू अडविला जातो. कधी धुगाडी आणि रेषेवरचा खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूची कोंडी करतात. ही कोंडी फुटली नाही तर ती कुजली म्हणून हिणवले जाते. आता कोणत्याही पट्टीवर एक खेळाडू बाद झाला तर सगळा संघ बाद होतो आणि एक खेळाडू शेवटच्या पट्टीच्या पार जाऊन पुन्हा पहिल्या पट्टीपर्यंत न मरता परतू शकला तर तो 'पाणी पाजले रे' अशी हाक देऊन आपला विजय जाहीर करतो.

नवरात्रीमध्ये गरबा-दांडिया खेळायला पहिल्या काही दिवसात गर्दी कमी असते आणि उत्तरोत्तर वाढत जाते, तसाच प्रकार इथेही घडतो. चंद्र कलेकलेने वाढत असतो. चांदण्याचा प्रकाश आसमंतावर पसरून राहिलेला असतो. हे चांदणे जसजसे वाढते, तसतसा आट्यापाट्याचा उत्साह वाढतो. खेळाडू वाढू लागतात. मैदान वाढवले जाते. उत्साह टिपेला पोहोचतो. होळीसाठी आणायच्या शेवरीच्या झाडाची उंचीसुद्धा दर दिवशी काही फुटांनी वाढत राहते. शिमगा सण असा कलेकलेने मोठा होत राहतो.

शेवटच्या दिवशी सर्वात मोठी होळी अर्थात होम केला जातो. या दिवशी पंचवीस-तीस-चाळीस फुटांचे शेवरीचे झाड तोडून वाजत-गाजत आणले जाते. या होळीच्या आगमनासाठी गावातील अबालवृद्ध गर्दी करतात. अगोदरच्या छोट्या होळ्यांच्या तुलनेत या मोठ्या होळीभोवती अधिक मोठ्या प्रमाणावर सुके कवळ आणि गवत लावले जाते. या होमाची विधिवत पूजा करून मग त्याला अग्नी दिला जातो. या होमामध्ये घराघरातून नारळ अर्पण केले जातात. होम पेटत असतानाच हे भाजलेले नारळ काढून खाण्यात एक आगळी मौज असते.

या शेवटच्या दिवशी खेळाला सर्वाधिक रंग चढतो. मध्यरात्रीपर्यंत खेळ रंगत जातो. दहा दिवस खेळाकडे ढुंकूनही न पाहणारे वयस्कर लोकसुद्धा या दिवशी जुन्या आठवणींना उजाळा देत खेळात सामील होतात. हा खेळ पाहणे हासुद्धा एक आनंदाचा भाग असतो. आपला मुलगा, आपला भाऊ, आपला नवरा किंवा आपले वडील आट्यापाट्या खेळताहेत, हे मोठ्या कौतुकाने पाहिले जाते. मैदानाभोवती गावातल्या स्त्रियासुद्धा रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकाच्या भूमिकेत खेळाडूंना प्रोत्साहित करीत राहतात.

दुसऱ्या दिवशी धुळवड केली जाते आणि शिमग्याला सुरुवात होते. सोंगे, कोळ्याचा नाच, खेळे, भारूड, नमन, पालखी असे शिमग्याचे नाना रंग मग भरू लागतात... आट्यापाट्या खेळून अंगात उत्साह संचारलेले लोक मग शिमग्याच्या सणात आनंदाची दिवाळी करतात!
- वैभव चाळके
000