भारतीय कवयित्री
‘मैं जब तक आई बाहर एकांत से अपने... बदल चुका था रंग दुनिया का’ असे म्हणणाऱ्या कवयित्री गगन गिल साहित्य अकादमीच्या मानकरी ठरल्या आहेत. केवळ पाच कवितासंग्रहांनी हिंदी साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या, गेली साडेतीन दशके सातत्याने लिहिणाऱ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गिल यांची भारतीय कवयित्री अशी ओळख निर्माण झाली आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे कोणत्याही साहित्यिकाने केलेल्या कामगिरीवर केलेले राष्ट्रीय पातळीवरचे शिक्कामोर्तब असते. अलीकडेच मराठीतील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षा ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाच उत्तरेकडील गगन गिल या ज्येष्ठ कवयित्रीसही ‘मैं जब तक आई बहार’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने काव्यलेखन आणि गद्यलेखन करणाऱ्या गगन गिल यांचे साहित्य सर्वदूर पोहोचले आहेच; मात्र या पुरस्कारामुळे त्याचा परीघ आता आणखी विस्तारेल आणि भारतीय माणूस, त्यातही स्त्रीचा वेध घेऊ पाहणारा विचार अधिक मोठ्या समाजापर्यंत पोहोचण्यास त्याची नक्कीच मदत होणार आहे. वडिलांनी सांगितलेल्या कहाण्यांचा त्यांच्या आयुष्यावर कायमच प्रभाव पडला. वडिलांनी जर त्या कहाण्या सांगितल्या नसत्या तर मी गगन गिल झाले नसते, असे त्यांनी एकदा म्हटले आहे. आपल्या भावना नेमक्या शब्दांत पकडणे हे कवितेपुढील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे त्या सांगतात.
नवी दिल्लीत राहणाऱ्या गिल यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५९मध्ये नवी दिल्लीत झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. गेली अनेक वर्षे त्या सातत्याने लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याबरोबर अलीकडील काही वर्षे त्या इंग्रजीतील नामवंत वर्तमानपत्रात लिटरली एडिटर म्हणून कार्यरत आहेत. १९९०मध्ये लोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमात त्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय १९९२-९३मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना पत्रकारितेसाठी फेलोशिपसुद्धा मिळाली होती. त्यांच्या नावावर पाच कवितासंग्रह अहेत. देश-विदेशांतील कवितेचे रसिक आणि अभ्यासक यांनी त्यांच्या कवितांची नेहमीच प्रशंसा केली आहे. याशिवाय अमेरिका, इंग्लंड आणि जर्मन या विद्यापीठांमध्ये त्यांच्या कविता शिकवल्या गेल्या आहेत. २००२च्या जुलैमध्ये त्यांनी युनायटेड किंगडममधील मॅंचेस्टर लायब्ररीमध्ये कॉमनवेल्थमधील लेखकांसाठी लेखन कार्यशाळांची मालिकाच घेतली होती. त्यानंतर २००४ मध्ये पेनसिल्व्हेनिया आणि बर्कले विद्यापीठाने एकत्र येऊन त्यांच्या लेखनावर एक विशेष वर्कशॉप आयोजित केले होते. २००५मध्ये लंडन विद्यापीठाच्या पोएट्री ट्रान्सलेशन सेंटरमध्ये त्यांच्या कवितांचे अन्य पाच आंतरराष्ट्रीय कवींच्या कवितांसह भाषांतर झाले आहे.
एक दिन लौटेगी लडकी (१९८९), अंधेरे में बुद्ध (१९९६), यह आकांक्षा समय नहीं (१९९८), थपक थपक दिल थपक थपक (२००३) हे त्यांचे अन्य काव्यसंग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. याशिवाय त्यांनी गद्यलेखनही केले आहे. रामकुमार, दिल्ली में उनिंदे, आवक हे त्यांचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी विविध लेखक-कवींचे साहित्य भाषांतरितही केले आहे. बेगन्यू हरबर्ट, हरभजन सिंग, सीताकांत महापात्रा आणि श्रीकांत वर्मा आदी लेखकांच्या साहित्यकृती भाषांतरित करण्याचे मोलाचे कामही त्यांनी केले आहे.
भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळामधून त्यांनी चीन, फ्रान्स, इंग्लंड, मॉरिशस, जर्मनी, मेक्सिको, ऑस्ट्रिया, इटली, तुर्की, बुलगेरिया, कम्बोडिया, इंडोनेशिया या देशांमध्ये जाऊन आपल्या रचना सादर केल्या आहेत. त्यांच्या लेखन कामगिरीसाठी त्यांना आजवर विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. १९८४मध्ये भारत भूषण अग्रवाल पुरस्कार, १९८९मध्ये संस्कृती सन्मान, २०००मध्ये केदार सन्मान, २००८मध्ये हिंदी अकादमी साहित्यकार सन्मान, २०१०मध्ये द्विजदेव सन्मान आदींनी त्यांना गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक निर्मल वर्मा यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी नेहमीच बोलले-लिहिले गेले आहे. तो अनेकांच्या उत्सुकतेचा एक भाग आहे. साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यावरही अनेकांना त्या अनोख्या मैत्रीची आठवण झाली आणि गिलही त्यावर अगदी मोकळेपणाने बोलल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कवितेचा विशेषतः भारतीय कवयित्रींचा जेव्हा जेव्हा विचार होईल तेव्हा तेव्हा गगन गिल हे त्यातील एक महत्त्वाचे नाव असेल. आगामी काव्यसंग्रह ही ओळख अधिक ठळक करतील, यात शंका नाही!