Sunday, November 10, 2024

कवितेतील प्रकाशोत्सव - वैभव चाळके

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळीत सर्वत्र दिवे लावून आपण आनंद साजरा करीत असतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे जणू दिवाळीचे सूत्रच आहे. यानिमित्ताने मनाला भुरळ घालणारा हा मराठी कवितांमधील प्रकाशोत्सव... ‘देवा तुझे किती, सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, देव देतो’ या कवितेने आमच्या बालमनात कवितेचा पहिला सुंदर प्रकाश पडला. त्यानंतर ‘सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर... आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार...’ असे म्हणायचो, तेव्हा घरासमोरील डोंगरावरून आलेला सूर्याचा लख्ख प्रकाश संपूर्ण जगावर फाकलेला असायचा. पुढे कधीतरी ‘दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार’ वगैरे ऐकायला मिळाले. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ’ हे बालपणापासून म्हणतोच आहे; पण त्यातला सूर्यकोटिसमप्रभ शब्द कळायला फार दिवस जावे लागले आणि त्याचा अर्थ अजून कळतोच आहे. पुढे केव्हा तरी कवी अनिल यांच्या कवितेतील ‘सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, की झड घालून प्राण द्यावा पतंगाने, असे कुठेच तेज नाही!’ वाचायला मिळाली. कुसुमाग्रजांनी ‘स्वप्नांची समाप्ती’ या कवितेत ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’ असे लिहिले आहे. यातला अलीकडचा चांदण्याचा प्रकाश शुभ्र कोवळा आणि पलीकडचा सूर्याचा प्रकाश तप्त कोवळा आहे. मंगेश पाडगावकरांनी ‘काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली’ असे जे लिहून ठेवले आहे. त्या वेलींवरचा प्रकाश हा कोवळा प्रकाश... कोवळा शुभ्र प्रकाश आहे. कुसुमाग्रजांनी ‘प्रकाश प्रभू’ कवितेत म्हटले आहे - ‘घट तेजाचे भवती ओतित, असंख्य रविराजाचे प्रेषित, महाद्वार पूर्वेचे खोलुन, क्षितिजावर येती’...

विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांनी मराठी साहित्यात एकाहून एक सुंदर काव्यलेणी कोरून ठेवली आहेत. बालकवींच्या ‘अरुण’ कवितेमध्ये त्यांनी प्रकाशाची जी रूपे टिपली आहेत, त्यांना अन्य तोड नाही. ‘पूर्व समुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाची, कुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची?’ अशा सुरुवातीची ही कविता प्रकाशाची कितीतरी रूपे मांडते. या कवितेत बालकवी म्हणतात, क्षितिजाची कड उज्ज्वल दीप्तीने सारवली आहे. सृष्टीसतीने गळ्यात रंगीत मेघांचे अनुपम असे लेणे घातले आहे. हे दागिने सोन्याचे आहेत... रक्तवर्णाचे आहेत... पिवळे आहेत आणि मिश्रित रंगाचे आहेत. कुणाच्या तरी उदरातून सोन्याची गंगा वाहते आहे. कोणीतरी विशुद्ध कर्पूररस आपल्या अंगास लावला आहे. अरुण म्हणजे सूर्य जणू आपल्या नभपटलावर चित्र रंगवतो आहे, असेही ते पुढे म्हणतात. त्यापुढे जाऊन त्यांनी एक अत्यंत बहारदार अशी कल्पना केली आहे... दिवस-यामिनी म्हणजे दिवस आणि रात्र या सूर्योदयाच्या समयी परस्परांचे चुंबन घेत असल्याने त्यांच्या अनुरागाच्या म्हणजे प्रेमाच्या या लाल-गुलाबी छटा गगनात खुलल्या आहेत. सूर्योदय झाला, की रात्रीचे चांदणे दूर होते आणि लाल छटा पसरू लागते. बालकवी म्हणतात, जणू आपल्या मोत्यांची माळ कोणीतरी चोरून नेली आहे म्हणून नभश्री (म्हणजे आकाश) रुसली आहे आणि तिच्या गालावर ही लाल छटा आली आहे... पुढे या लखलखीत सूर्यप्रकाशाला बालकवींनी ‘सोन्याची द्वारका’ अशीही उपमा दिली आहे. दिव्याचे झोत अरुण वसुधेच्या हृदयात ओततो आहे, अशी कल्पनाही या कवितेच्या अंतिम खंडात बालकवींनी केलेली दिसते.
आपल्या ‘संध्यारजनी’ या कवितेत बालकवींनी रात्रीच्या प्रकाशाची वर्णने केली आहेत...
‘उदयगिरीवर नवतेजाची शांत पताका ही!
की गंगेच्या शुभ्र जलाचा झोत वरी येई? ’
‘शुक्रोदय’ कवितेत रात्रीच्या प्रकाश आकाशाकडे पाहू बालकवींनी ‘तेजाची फुटली पेठ... दिव्यत्वाची लयलूट’ असे म्हटले आहे, तर ‘अनंत’ कवितेत... ‘अनंत तारा, नक्षत्रे ही अनंत या गगनात... अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशीसूर्य अनंत’ असे म्हटले आहे. इथे चित्ताला शांती देणारा विश्वाच्या अफाटतेचे दर्शन घडवणारा विलक्षण ज्ञानप्रकाश आहे.
बालकवींच्या या ‘अरुण’ कवितेने प्रभावित होऊन राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांनी या नावाच्या दोन कविता लिहिल्या आहेत. सूर्योदयाबाबत ते पहिल्या कवितेत म्हणतात... ‘की रजनीच्या उदरी दिसतो गर्भचि दिवसाचा’, तर दुसऱ्या कवितेत मात्र याच रंगांना अगदी वेगळ्या उपमा
दिल्या आहेत.
आपल्या भूपाळ्यांमध्येसुद्धा सूर्योदयाची अत्यंत विलोभनीय दृश्ये आहेत. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या एका भूपाळीत म्हटले आहे, ‘तुझ्या कांतिसम सूर्यपताका पूर्वदिशी फडकती अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती.’ दिवाळीच्या गाण्यात तर ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’च आहे. हा प्रकाशोत्सव पुन्हा धुंडाळताना... ‘सप्तरंगांत न्हाऊन आली... आली माझ्या घरी ही दिवाळी!’ अशी रंगीत अवस्था होऊन जाते.