सामान्यांचा असामान्य सोबती
...‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था
व्यक्ति को मैं नहीं जानता था
हताशा को जानता था
इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया
मैंने हाथ बढ़ाया
मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ
मुझे वह नहीं जानता था
मेरे हाथ बढ़ाने को जानता था
हम दोनों साथ चले
दोनों एक दूसरे को नहीं जानते थे
साथ चलने को जानते थे।’
विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होताच देशभरातील त्यांच्या रसिकांनी त्यांचे अभिनंदन करताना, त्यांची ही कविता आपल्या समाजमाध्यमांवर उद्धृत केली आहे. समाजातील शेवटच्या माणसाप्रति तुमच्या मनात किती कणव आहे यावरूनच कलावंताचे महानपण ठरत असते, असे म्हणतात. ज्ञानेश्वरांची रेड्यामुखी वेद वदवण्याची प्रतीकात्मक कथा, श्री. म. माटे यांचा ‘बन्सीधर! आता तू कुठे रे जाशील?’ हा प्रश्न ते भालचंद्र नेमाडे यांच्या पांडुरंग सांगवीकरपर्यंत आपली साहित्याची सगळी परंपरा आपल्याला हेच सांगत आली आहे. हिंदीतही तशी मोठी परंपरा दिसते. त्यातील आजचे आघाडीचे नाव म्हणजे विनोदकुमार शुक्ल हे होय. विनोदकुमार शुक्ल यांची लेखनशैली अत्यंत साधी, गहन आशय व्यक्त करणारी आहे. त्यांच्या साहित्याची ताकद त्याच्या साधेपणात आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीत आहे. त्यांनी ग्रामीण जीवन, मानवी भावनांचा संघर्ष आणि स्वप्नांची मोहकता यांचे सुंदर दर्शन घडवले आहे. हिंदी साहित्यात त्यांनी आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचे साहित्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
विनोदकुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे झाला. त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षणही तिथेच झाले. लहानपणीच त्यांना साहित्याची गोडी लागली. त्यांनी नागपूर विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत झाले. अत्यंत मितभाषी असलेले शुक्ल साध्या जीवनशैलीचे पालन करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सर्वच लेखनात साधेपणा असला तरी तो वरवरचा नाही. त्यामध्ये सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि गूढ आशय आहे. आपल्या लेखनाची सुरुवात त्यांनी काव्यलेखनाने केली. कवितांमधून साध्या, रोजच्या जीवनातील गोष्टींवर आपल्या असामान्य प्रतिभेचा प्रकाश टाकलेला पाहायला मिळतो. त्यांच्या कवितेतील भाषा सहज आणि प्रवाही आहे. सहज कळणारी आहे. शांत, साधी आणि तल्लख निरीक्षणशक्ती ही त्यांची वेगळी ओळख आहे. लगभग जयहिंद (१९७१), वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह (१९८१), सब कुछ होना बचा रहेगा (१९९२), अतिरिक्त नहीं (२०००), कविता से लंबी कविता (२००१), आकाश धरती को खटखटाता है (२००६), पचास कविताएँ (२०११), कभी के बाद अभी (२०१२), कवि ने कहा (२०१२), प्रतिनिधि कविताएँ (२०१३) हे त्यांचे कवितासंग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत.
विनोदकुमार शुक्ल यांच्या कादंबऱ्या हिंदी साहित्यात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्या साध्या ग्रामीण जीवनाशी निगडित असल्या तरी त्यामध्ये मानवी मनोव्यापारांचे नितांत सुंदर दर्शन घडते. नौकर की कमीज़ (१९७९), खिलेगा तो देखेंगे (१९९६), दीवार में एक खिड़की रहती थी (१९९७), हरी घास की छप्पर वाली झोपड़ी और बौना पहाड़ (२०११), यासि रासा त (२०१७) आणि एक चुप्पी जगह (२०१८) या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या आहेत. ‘नौकर की कमीज’ ही त्यांची पहिली आणि सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी. त्यात एका गरीब आणि साध्या नोकराच्या जीवनाचे दर्शन घडते. त्याची स्वप्ने, संघर्ष आणि त्याला मिळणारी वागणूक यांचे अत्यंत प्रभावी शब्दांत चित्रण केले आहे. यावर एक चित्रपटही आला होता. ‘खिलेगा तो देखेंगे’ या कादंबरीत एका ग्रामीण भागात शिकवणाऱ्या शिक्षकाच्या जीवनचित्रणाच्या निमित्ताने त्यांनी एकूण मानवी जीवनाचे विविध पैलू उलगडले आहेत. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ ही कादंबरी मानवी जीवनातील तात्पुरतेपणा आणि शाश्वतता यावर भाष्य करणारी आहे. विशेषतः जग भौतिकतेच्या मागे धावायला लागल्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील चिंतन महत्त्वाचे ठरते. विनोदकुमार शुक्ल यांनी लघुकथेच्या प्रांतातही यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांच्या लघुकथांमध्येही लेखनशैलीची विशेष झलक दिसते. त्यांच्या कथांत पात्रांपेक्षा परिस्थिती आणि मानसिक प्रवृत्ती यांना जास्त महत्त्व असते. पेड़ पर कमरा (१९८८), महाविद्यालय (१९९६), एक कहानी (२०२१) आणि घोड़ा और अन्य कहानियाँ (२०२१) हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘नींद की दूरी और अन्य कहानियाँ’, ‘महाविद्यालय’ हे त्यांचे कथासंग्रह विशेष गाजले.
त्यांची भाषा सरळ-सोपी आहे. कोणताही विलक्षण गुंतागुंतीचा अर्थ त्यांनी सोप्या भाषेत कुणालाही सहज कळेल अशा शब्दांत मांडला आहे. त्यांनी आपल्या साहित्यात सामान्य माणसांचे जीवन चित्रित केले. मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन घडवले. निसर्ग आणि मानवी जीवन यांचा त्याच्या साहित्यात सुंदर मिलाफ आढळतो. त्यांच्या साहित्यकृतींना अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना मानाचा व्यास सम्मान मिळाला. २०२३ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा या सामान्यांच्या असामान्य सोबत्याला ज्ञानपीठ मिळाल्याने इथल्या लाखो जणांना जगण्याची आणि हजारो कलावंतांना नवसर्जनासाठी नवी उमेद मिळेल.
(हा लेख सकाळ दैनिकात 24-3-2025 रोजी संपादकीय पानावर व्यक्तिनामा सदरात प्रकाशित झाला.)