सोन्याचं दिवस येवदेत आमच्या बोलीला!
(संगमेश्वरी बोली - वैभव चाळके)
संगमेश्वरी बोलीभाषेची वैशिष्ट्ये, तिच्या इतिहासाचा शोध आणि आधुनिक काळातील तिचे अस्तित्व जपण्याचे प्रयत्न यांचा सखोल आढावा. बोलीतील शब्दसंपदा, व्याकरण, म्हणी आणि लोककलांमधील जतन याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त लेख.
‘‘व अन्नानू! मुंबयसनं कदी आलाव? बरं हायस ना?’’
‘‘मी बराय. तू कुटं निगालास? बापूस बरा हाय ना?’’
‘‘केल्डी लय झालीत वो. झो जीव नको केलानी हाय. तात्या बरं हाय्त. वाय्च दम कोंड्तो अदीमदी.’’
‘‘वय झालं ना रं आता. आम्च्या दाजीसंगातचं तं.’’
‘‘त पन खरंच वो.’’
‘‘गोवलातला मावला कसा हाय रं?’’
‘‘बाबीमामा ना? बरा हाय. आला व्हत रैवारी!’’
हे असे लयदार संवाद ऐकत आम्ही मोठे झालो. पण मोठे होताना या भाषेकडून प्रमाणभाषेकडे कधी पोहोचलो आणि भाषेतील लय आणि तिचा गंध थोडा विसरत, थोडा सोबत घेऊन ‘पुस्तकी’ कधी बोलायला लागलो कळलेही नाही.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एका संमेलनात देवरुखच्या आनंद बोंद्रे यांनी संगमेश्वरी बोलीभाषेतील कार्यक्रम सादर केला तेव्हा प्रथम आपली बोली इतरांपेक्षा वेगळी आहे याची जाणीव झाली. त्यानंतर नकळतपणे या बोलीचा शोध सुरू झाला आणि मी नव्याने ती बोली शिकण्याचा प्रयत्न केला. आईकडून काही गाणी कॅसेटवर रेकॉर्ड करून घेतली.
संगमेश्वरी असे या बोलीभाषेचे नाव असले, तरी ती केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातच ती बोलली जात नाही. खेडपासून राजापूरपर्यंत ही बोली बोलली जाते. अर्थातच सामाजिक आणि आर्थिक स्तर, ग्रामीण आणि शहरी भाग यानुसार त्यात थोडाबहुत फरक आढळतो. गेल्या काही वर्षांत बोली सोडून प्रमाणभाषेकडे वळणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मूळ बोली बोलणाऱ्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. असे असले तरी अस्सल ग्रामीण भागात जे आपले जीवन जगत आहेत, त्या सर्वांच्या मुखी आजही हीच बोली दिसते. संतोष पवार, वैभव मांगले, प्रभाकर मोरे या कलावंतांनी ही बोली छोट्या पडद्यापर्यंत पोहोचवली आणि तिथून ती सगळ्या जगाला परिचित झाली. आपण अधिकाधिक ‘ग्लोबल’ होऊ लागल्यावर अधिकाधिक ‘लोकल’ होण्याची मनीषा जागृत झाली आणि वेगवेगळ्या बोलींतील लोक आपापल्या बोलींमधून सादरीकरणे करू लागले. ‘रील्स’ आणि व्हिडिओंद्वारे ती समाजमाध्यमांत पसरली.
या बोलीभाषेत साहित्याची फारशी निर्मिती झालेली नाही. मात्र येथील नमन, जाकडी, भारूड, भजने या लोककलांच्या माध्यमांतून ती अनेक वर्षे जतन झालेली दिसते. गुरुपरंपरेने आलेल्या चोपड्यांमध्ये या रचना पाहायला मिळतात. इथल्या नवनवीन कवनकारांनी आपल्या बोलीत कवने लिहून ती सादर केलेली आढळतात. पण त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संकलन सिद्ध झाल्याचे अद्याप कानावर आलेले नाही.
ललित लेखनात काही ठिकाणी या बोलीचा वापर झालेला दिसतो. लांजा तालुक्यातील भांबेड गावचे बबन धनावडे यांनी आपल्या काही कथांमधून आणि ललित लेखांमधून ही बोली वापरलेली आढळते. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावचे अशोक लोटणकर यांच्या काही ललित लेखांत या बोलीतील संवाद वाचल्याचे आठवतात. श्रीकांत शेट्ये हे रत्नागिरीच्या शिरगावचे लेखक ग्रामीण कथा लिहीत. त्यांच्या पात्रांच्या तोंडी ही बोली असलेली बऱ्याच वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. अलीकडे प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीत काही ठिकाणी संगमेश्वरी बोलीचा वापर केला आहे. त्या कादंबरीस साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. तेव्हा त्याचे अभिनंदन करताना मीही आवर्जून संगमेश्वरी बोलीत, ‘बावा, तू चालत ऱ्हा. चालनारा मॉप फुडं जातो, असं वाडवडलान सांगून ठेवलान हाय.’ असा त्याच बोलीतील संदेश त्याला पाठवला होता!
आपल्याकडील बोलीभाषांचे व्याकरण लिहिण्याचे प्रयत्न फारसे झालेले नाहीत. बोलींना व्याकरण असते. ते संगमेश्वरी बोलीलाही आहेच. या बोलीत करताव, घेताव, मारताव, लावताव, देताव, अशी रूपे आहेत आणि भूतकाळात घेतलान, मारलान, धरलान, लावलान, अशी रूपे आढळतात. या बोलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियाही पुल्लिंगी क्रियापदेच वापरतात. म्हणजे पुरुषांप्रमाणे त्या येतो, जातो, करतो, देतो असे म्हणतात. मी मुंबईच्या महाविद्यालयात गेल्यावर ‘मॅडम येतो म्हणाल्या,’ असे बोललो होते आणि वर्गात एकच हशा पिकला होता!
कोणत्याही भाषेची आपली स्वतःची शब्दसंपदा असते. माणसाच्या जीवनशैलीतील बदलांप्रमाणे काही शब्द मागे पडतात, तसे यातील काही शब्द त्या त्या वस्तू, प्रथा-परंपरा, जीवनशैलीच्या बदलाप्रमाणे मागे पडले आहेत. उदाहरणार्थ- सोरकी, बिन्गा यांसारखी मातीची भांडी आता कोणी फारशी वापरत नाही. शेती करणे कमी झाल्याने शेतीशी संबंधित काही शब्द नाहीसे झाले. वाडा म्हणजे गोठा, बलाट म्हणजे गोठ्याला बांधलेली लाकडाची भिंत हे शब्द आता नामशेष व्हायला लागले आहेत. घर बांधण्याच्या पद्धतींत बदल झाल्यामुळे पडवी, वटी हे शब्द फारसे उरले नाहीत. अंगण अद्याप असल्यामुळे खळे हा शब्द आहे. लय म्हणजे खूप, नाकडं म्हणजे लाकडं, गुदस्ता म्हणजे गेल्या वर्षी, पावटन म्हणजे पायरी, करवादने म्हणजे रागवणे, कुपान म्हणजे कुंपण, मागलं म्हणजे मागील, इस्तव म्हणजे विस्तव, इजला म्हणजे विझला, हे शब्द व रूपे वापरात आहेत. ‘मान नाय मान्ता नी बसायला गोन्ता’(मान नसेल, तर सोयीही मिळत नाहीत), ‘भोपली बाय पसारली नी माग्चं गून इसारली’(यश मिळवल्यावर आपले मूळ विसरणे), ‘अडली गाय फटके खाय’ (अडचणीत असल्यावर नुकसान सहन करावे लागते) अशा अनेक म्हणी या भाषेत आढळतात.
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर केलेल्या बोलीभाषांच्या सर्वेक्षणात संगमेश्वरी बोलीची बोलीभाषा म्हणून नोंद झाली आहे. पुण्याचे डेक्कन कॉलेज आणि राज्य मराठी विकास संस्था यांनी विविध भागांतील बोलींचा वेध घेणारा एक संयुक्त उपक्रम राबवला होता. त्यात संगमेश्वरी बोलीतील शब्दांचा संग्रह करण्यात आला आहे. ही सामग्री त्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. चिपळूण येथील अभ्यासक अरुण इंगवले यांनी गावखेड्यांमधून संगमेश्वरी बोलीभाषेतील १२००० अधिक शब्द, ७०० हून अधिक म्हणी आणि लोकगीते यांचे संकलन केले आहे. हा एक मोठा दस्तऐवज ठरावा.
सिंधुदुर्गात बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलीपेक्षा ही बोली वेगळी आहे. मालवणी व संगमेश्वरी यांच्यात व्याकरणाचा फरक आहेच, पण अनेक शब्दही वेगवेगळे आहेत. ‘वस्त्रहरण’सारख्या नाटकांमधून मालवणी जगभर पोहोचली. महेश केळुस्कर यांच्यासारख्या कवींनी ती सर्वदूर पोहोचवली.
जगभरातल्या विविध भाषा आणि बोली नामशेष होत असताना आपण पाहतो आहोत. त्यामुळे उत्तरोत्तर बोलीभाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होत जाणार. पण सुदैवाने अलीकडच्या काळात बोलींबाबत जागृती वाढल्यामुळे आणि तंत्रज्ञानाने समाजमाध्यमे उपलब्ध करून दिल्याने विविध बोलींचा वापर करून सादरीकरणे करणाऱ्याची संख्या वाढते आहे. त्यामुळे या माध्यमांच्या जगात बोली वाढत राहील, अशी आशा करायला जागा आहे.
तेव्हा एकासुरात म्हणू या-
‘पयलं नमान वंदू मी कोनाला
पयलं नमान शिरीगनेशाला
पयलं नम्मान पयलं नम्मान...
पयलं नम्मान पयलं नम्मान...
सोन्याचं दिवस येवदेत आमच्या बोलीला!’ (हा लेख 23-11-2025 रोजी सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झाला.)
