Sunday, October 4, 2009

या, आपले माझ्या या ब्लॉगवर स्वागत आहे. आपण या ब्लॉगवर माझ्या कविता वाचू शकाल. मी मूळचा कोकणातला! आज कामानिमित्त मुंबईत राहत आहे. तरीही गावची ओढ आहेच. तिथल्या मातीवरच माझा पिंड पोसला आहे. म्हणूनच या कवितांतून तुम्हाला त्या मातीचा गंध येईल.
(या कवितांचे सर्व हक्क राखून ठेवले आहेत.)

आता पाऊस येईल!


आता पाऊस येईल आता पाऊस येईल!

त्याचा सांगावा घेऊन आले गार गार वारे
त्याच्या स्पर्शाच्या स्मृतीने अंग शहारले सारे

धरणीच्या उरातले स्वप्न साकार होईल!

हुहूतूच्या खेळासाठी मेघमुले जमतील
वीज त्यांना नभांगणी हद्द आखून देईल

क्षणोक्षणी बघ त्यांचा खेळ रंगत जाईल!

आभाळाच्या उरातला सल जाईल झडून
मिलनाच्या आनंदाने तोही घेईह रडून

त्याच्या डोळ्यातले पाणी घळाघळा ओघळेल!

सूर्यबाप रागावला तिचे धपापते ऊर
मेघ देतील आडोसा नदीओढ्यांनाही पूर

तिच्या मुखावर आता हिर्वे हसू उमलेल!

- सुवर्णसुत

1 comment:

  1. Parat kavitett vaibhav disu laaglaa.. Chhaan aahet Kavita..

    Abhay Samant

    ReplyDelete