Monday, January 24, 2011

तीन लेख

ज्वाला आणि फुले
आता माझ्यासमोर हे दोन कवितासंग्रह आहेत. पहिला आहे यशवंत मनोहर यांचा "उत्थानगुंफा' आणि दुसरा आहे प्रशांत असनारे यांचा "मीच माझा मोर'! 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालनातून मी जे मोजके संग्रह घेऊन आलो त्यातले हे दोन संग्रह मी सध्या वाचतो आहे. पहिला आहे कोल्हापुरी रस्स्यावर आलेल्या कटासारखा झणझणीत आणि दुसरा चांगल्या तापवलेल्या दुधावरच्या सायीसारखा! मी मनमुराद चाखतो आहे या दोन्ही चवी आलटून पालटून!
यशवंत मनोहर लिहितात-
"मला मान्य आहे फक्त आता,
माझ्यापुढची अटळ युद्धभूमी,
तिथे प्रथमच जमीनदोस्त होणारी,
तुमची संस्कृती,
तुमचा परमात्मा,
तुमचे अध्यात्म,
तुमची मंंदिरे,
ही तुमची समग्र शस्त्रागारे,
आणि त्यांचे लाडके मायबाप तुम्ही.'
आणि प्रशांत असनारे लिहितात-
झाली तयारी पूर्ण?
तुझा चाकू कुठाय?
हा असा बोथट का?
नीट धार करून घे-
तुझं पिस्तुल व्यवस्थित आहे ना?
साफ केलं?
ठीक आहे,
मग आता लोड करून ठेव.
तुझा हा वस्तरा असा का?
जुना वाटतोय,
नवीन घे
उगाच रिस्क नको!
आणि...
... आणि हे काय?
एवढी जय्यत तयारी सुरू असताना
हा कोण मूर्ख
माऊथऑर्गन वाजवतोय?
असू दे! असू दे!
तोही खिशात असू दे
कुणी सांगावं-
कदाचित तोच उपयोगी पडेल!
पाऊस हा कवींचा आवडता विषय आहे. नव्हे पाऊस हा कवितेचा अपरिहार्य विषय आहे. हे दोन कवी पावसाविषयी काय म्हणतात पाहा- यशवंत मनोहर लिहितात-
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे
कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली. माथी हरपली.
नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही.
प्रशांत असनारे लिहितात-
आताशा मोर केव्हाही नाचतात
मागे एकदा असंच झालं होतं
बरेच दिवस पाऊस आलाच नाही.
अचानक आला तेव्हा
मोर चक्क झोपले होते!
अचानक आलेला पाऊस पाहून
ते उठले,
नाचू लागले.
पण त्यांची जड पावलं ठेक्यात पडलीच नाहीत.
पिसाऱ्यांची पिसं तर
एकमेकांत अडकलेली
तेव्हापासून मोरांनी ठरवलंय
मूड आला की नाचून घ्यायचं-
पावसाचा काय भरवसा?
प्रतीक म्हणून झाडांचा वापर प्रत्येक चांगला कवींने कोणत्या ना कोणत्या कवितेत केलेला आढळतोच. या दोन कवींनी घडविलेली ही झाडांची प्रतीके पाहा.
यशवंत मनोहर लिहितात-
पोळल्या झाडांनी। एक व्हावे झणी
दंडेलीला अग्नी। द्यावयाला।।
प्रशांत असनारे लिहितात-
गुरुजींनी सणसणीत छडी मारली
त्याच्या गोऱ्यापान हातावर
तेव्हा न कळवळता तो पुढे म्हणाला,
गुरुजी, हे पहा,
तुम्ही मारलेल्या छडीचा हा हिरवा वळ
अगदी कसा दिसतोयः
झाडाला नुकत्याच फुटलेल्या कोवळ्यापिवळ्या पानासारखा!
या दोन्ही कवींच्या कविता मला तेवढ्याच भावल्या. यातलं डावंउजवं कुणी करू नये. कारण काळजात जाळ पेटतो तेव्हाच नव्या माणसांच्या जन्माची क्रांती होते आणि काळ वाईट असतो तेव्हा हेच काळीज कवेत घेऊन माणसाचं रक्षण करतं. ज्वाला आणि फुले या दोन्ही गोष्टी या काळजाच्याच. म्हणूनच त्या कवितेचा विषय होतात. भूक लागली म्हणजे भाकरी हवी. त्या भाकरीसाठी जाळ हवा. पण पोट भरलं म्हणजे फुलाची ओढ लागते. भूकलेल्याला भाकरीशिवाय आणि भरलेल्याला फुलाशिवाय जगणंच अवघड होऊन जातं.
म्हणूनच तर ज्ञानदेवाने आत्मतेजाचा मोगरा फुलविला आणि तुकोबाने आत्मतेजाचा वणवा पेटवला.
आज ही त्यांचीच दोन बाळं आपल्या तेजाने तेच काम करीत आहेत. आम्हा रसिकजनांना दुसरं का हवं असतं? याहून निराळं?
- वैभव चाळके.


असीम धैर्याने
तिने अन्यायाला विरोध केला!
मुख्तार माई ही पाकिस्तानातील मीरवाडा या खेडेगावातील एक शेतकरी स्त्री. तलाक झालेली. तिला वाचता येत नव्हतं. सराईकी ही एकच भाषा ती बोलू शके. शिक्षणाची आवड मात्र होती. म्हणूनच ती आजूबाजूच्या मुलांना कुराण शिकवी. तेही तिला वाचता येत नसे. ते तिला पाठ होते. ती तसे मुलांना शिकवत असे. पण एक दिवस तिच्या भावाने शेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप ठेवून गावपंचायतीने त्या बदल्यात मुख्तार माईवर बलात्कार करण्याची सजा सुनावली.
मुख्तार माई दलित कुटुंबातील होती. शेजारी राहणाऱ्या मस्तोई या उच्च समाजातील लोकांकडून या समाजाला नेहमीच अत्याचार सहन करावे लागत. मुख्तार माईंवर पंचायतीच्या सांगण्यावरून बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिने आत्महत्या करावी अशीच सर्वांची अपेक्षा होती. मुख्तारनेही तसाच विचार केला होता. पण एका क्षणी तिला आपण आपल्यावरील अत्याचाराचा बदला घ्यावा वाटला आणि ती लढायला सज्ज झाली.
पोलिसांनी पुन्हा पुन्हा खोटी कबुली द्यायला सांगूनही तिने न्यायालयासमोर खरी गोष्ट सांगितली. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एका खेड्यातील एका अशिक्षित बाईने केलेले हे साहसी कृत्य मग जगभरातील वृत्तपत्रातील हेडलाईन ठरले. जगभरातील मानव हक्कवाले तिच्या मदतीला आले. तिची कायद्याची लढाई सुरू झाली.पोलीस संरक्षण मिळाले. खालच्या कोर्टात तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांपैकी काही जणांवर आरोप सिध्द होऊन त्यांना सजा झाली. काही जण सुटले.खटला पुढच्या कोर्टात सुरू झाला. तिथे फक्त एकाला जन्मठेपेची सजा झाली. बाकीचे सुटले. मुख्तार माई आता हुशार झाली होती. तिने थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत धाव घेतली. मग सुरक्षिततेच्या कारणांखाली त्या तिघांना आणि काही जणांना अटक करण्यात आले. आणखी वरच्या न्यायालयात खटला सुरू झाला. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाल्यावर सरकारने तिला पाच लाखांची मदत दिली. त्यातून मुख्तार माईने मुलींसाठी शाळा काढली. आपल्याप्रमाणे अन्य कुणावर असा प्रसंग येऊ नये यासाठी शिक्षणप्रसार व्हायला पाहिजे. मुली शिकल्या तरच त्यांच्यावरचे अन्याय कमी होतील आणि झाले तर त्या त्यास विरोध करण्यास सक्षम होतील. हे ओळखून मुख्तार माईने मुलींसाठी शाळा काढली. स्वत: शिकलेली नसल्यामुळे अनंत अडचणी सोसाव्या लागल्या तशा इतरांना लागू नयेत म्हणून तिने हे नवे आव्हान स्वीकारले.
बलात्कार झाला की त्या स्त्रीने आत्महत्या करावी, असा जिथे संकेत आहे तिथे मुख्तार माई मोठ्या हिमतीने लढली. एका असामान्य अशा न्यायाधीशांसमोर ही केस सर्वप्रथम आली. त्याने दाखविलेल्या न्यायबुध्दीने मुख्तार माईला मार्ग दिसला आणि एक लोकविलक्षण खटला उभा राहिला. पाकिस्तानातील अन्यायग्रस्त महिलांना समजून घेणारी एक माई अर्थात मोठी बहीण मिळाली. मुलींच्या शिक्षणासाठी एक शाळा उभी राहिली.
मुख्तार माईने जगभर जाऊन व्याख्याने दिली. भूकंपग्रस्तांसाठी निधी जमविला. देशोदेशीच्या संस्थांनी तिचा सत्कार केला. ती जणू अन्यायाविरुध्द लढण्याची जगभरातील महिलांची प्रेरणा ठरली. तिने "इन द नेम ऑफ ऑनर' नावाचे आत्मचरित्रही लिहिले आहे. तिच्यावर एक सिनेमाही आला आहे. आपल्या आत्मचरित्रात मुख्तार माईने ही सगळी गोष्ट सविस्तर लिहिली आहे.
- वैभव बळीराम चाळके



अमाप देणं देणाऱ्या ओठांवरच्या ओळी
"गाण्याने श्रम वाटतात हलके हेही नसे थोडके'असे कवींचे कवी केशवसुत यांनी म्हटले आहे. याचा अर्थ गाण्याने अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात आणि त्याच वेळी गाणे गायल्याने श्रम हलके वाटतात. श्रम हलके वाटायला लागणे हीही एक महत्त्वाचीच गोष्ट आहे.
केशवसुतांनी सांगण्यापूर्वी गाण्यातली ही जादू मला चांगली अवगत होती. म्हणजे केशवसुतांनी फार पूर्वी सांगून ठेवलेले असले तरी ते आम्हाला कळले नव्हते. ते कळण्यापूर्वीच आम्ही गाण्याने श्रम हलके करीत होतो.
कोकणातल्या दुर्गम खेड्यात मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे जातं ओढताना, भात कापताना, ओझं उचलताना आम्ही सारे गाण्याचाच आधार घेत होतो.
मला आठवतं शाळेत असतांना कविता आणि व्याकरणातील अलंकर, वृत्तांची उदाहरण म्हणून असलेल्या काव्यपंक्ती मला तोंडपाठ होत्या. तासभराचा पायी प्रवास करताना, अभ्यास करून कंटाळल्यावर मी त्या सर्व कविता एकामागून एक म्हणत असे-
छानी माझी सोनुकली ती
कुणाकडे गं पाहत होती
कोण बरे त्या संधेतून
हळूच पाहते डोकावून
तो रवी का गोजिरवाणा
आवडला आमुच्या राणींना
हासहासली या वचनांनी
साधी, भोळी ती फुलराणी...
या फुलराणी कवितेतल्या ओळींपासून
पोर खाटेवरी मृत्यूच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात
सेविकेचा आधार एक हात
किंवा
आम्हाला वगळा गतप्रभ झणि होतील तारांगणे
आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे
पर्यंत आणि
पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण आम्हा पुसायचे नाही
पासून
तळ्याकाठी गाती लाटा
लाटामध्ये उभे झाड
झाडावर धिवराची
हाले चोच लाल जाड
पर्यंत किती तरी काव्यपंक्ती मी तेव्हा म्हणत असे. आज त्यांच्यात आणखी भर पडली आहे. कोणत्याही कामात असताना अशा ओळी माझ्या तोंडी असतात. हिंदी सिनेमा संगीताचे सुवर्णयुग आम्ही अनुभवलं नाही. भावगीताची जादूही आमच्यापासून कोसो मैल दूर राहिली. पण पाठ्यपुस्तकातल्या या कवितांनी आणि आरत्या, ओव्या, नमन, जाकड्या, टिपऱ्या, फुगड्या, भजनादी कार्यक्रमांतून गायल्या गेलेल्या गाण्यांनी श्रम हलके करता करता आमच्या जीवनाला नवे आयाम दिले. शास्त्रीय संगीतातल्या चिजा आजही आम्हाला कळत नाहीत. पण लोकसंगीताचा केवढा तरी गावरान मेवा आमच्या कानात साठवलेला आहे.
"तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख' हा अभंग धावत्या गतीने आणि विलंबित गतीने अशा दोन प्रकारे आमच्या कानांत अखंड गुंजत असतो. "अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा। दोन्ही थडा भरली चंद्रभागा।।' किंवा शंभर टाळांसोबत घुमणारा "विठोबा तुझा मला छंद। तुझा मला छद। कपाळी केशरी गंध।।' हे गजर आणि "सोंबा या देवा तू माझा सारथी देवाची आरती ओवाळू ये ओवाळू ये।।' सारखी आरती यांनी आमचं भावविश्व केवढं समृध्द केलं आहे.
चंद्रकुळ माझे माहेर माहेर। घाटी डोंगर माझे सासर सासर।। किंवा आंबा पिकतो रस गळतो। कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो। अशी स्त्रीगीते यांनी आम्हाला अमाप देणं दिलं आहे.
उत्तरोत्तर स्मरणसाखळीला नवनवी गाणी जोडली जात आहेत. श्रम तर हलके वाटतातच, पण त्यापलीकडे मोजता न येणारं, सांगता न येणारं बरंच काही देत आहेत.
अलीकडेच शाळेत जाण्यास उत्सुक असलेल्या माझ्या बाळाला शिकवता शिकवता "पुशी कॅट पुशी कॅट' ही इंग्रजी कविताही मला पाठ झाली आहे. ती इंग्रजीत म्हणताना बाळाला मजा येते तशी मला येत नाही. मी "प्यार का मारा' असतो ना तसा मी "मराठी का मारा' आहे. म्हणून मी त्या कवितेचं मराठी भाषांतर करून घेतलंय-
पुशी कॅट, पुशी कॅट
होतीस ग कुठे?
गेले होते लंडनला
राणीच्या भेटे!
पुशी कॅट पुशी कॅट
तिथे काय केले?
खुर्चीखालच्या उंदरालाच
घाबरून गेले!
बाळाला कविता म्हणून दाखवून झाल्या की मीही कविता गुणगुणत असतो आणि खुर्चीखालच्या उंदरांना घाबरण्यात समस्त मांजरांची जिंदगीची बरबाद होतेय हे पाहून हळहळतो. (उंदरांनो, या मांजरांनी नखं काढली तर तुमची खैर नाही हे मात्र विसरू नका.) गाण्याने श्रम हलके वाटण्यापलीकडे जे मिळतं असं मी म्हणतो ना ते हेच!
मग गाताय ना माझ्याबरोबर?
-वैभव बळीराम चाळके

Saturday, January 1, 2011

जागतिकीकरणात हरवलेला चेहरा शोधायला हवा!!

संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन
नव्या आसूडाची निर्मिती हेच संमेलनाचे प्रयोजन!
जागतिकीकरणात हरवलेला चेहरा शोधायला हवा!!
स्वातंत्र्यवीर सावरकरनगरी, ठाणे, ता.25- ज्या ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात बसून महात्मा ज्योतिबा फुले यांनी "शेतकऱ्यांचा आसूड' लिहिला आणि इंग्रज सरकारला महापूर, महामारी, महायुद्धात फक्त शेतकरीच का मरतो? असा प्रश्न विचारला त्या ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या या संमेलनाने नव्या आसूडाची निर्मिती करावी, तेच या संमेलनाचे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आज येथे केले. कोठे महात्मा फुल्यांच्या प्रश्नाचे उत्तर 140 वर्षांत आपण मिळवू शकलो नाही ते शोधण्याचे काम साहित्याने केले पाहिजे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसाचा चेहरा हरवतो आहे, तो चेहरा शोधून देण्याचे काम साहित्यिकांनी करायला हवे असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
आज सकाळी या संमेलनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्‌घाटन झाले. मावळत्या अध्यक्षांच्या छोटेखानी भाषणानंतर संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी माणसाचे जगणे आणि साहित्य याचा नेमका आलेख काढत साहित्य आणि माणसाचे जगणे यात अंतर पडत चालले असल्याचे विधान केले. हे अंतर संपवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काळाची चाहूल ओळखणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
जागतिकीकरणामुळे जीवनाला प्रचंड वेग आला आहे. आयुष्याचं नाव स्पर्धा झालं आहे. त्यात वस्तूंपुढे माणूस छोटा झाले आहे. पण हे सारं दुर्देवाने आपल्या साहित्यात प्रतिबिंबीत होत नाही. जागतिकीकरणाचे आकलन करून घेण्यास आपल्याला उशीर झाला आहे. या नव्या जगासाठी नव्या तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्याची आज आवश्यकता आहे. सौंदर्य आणि जीवन यातील जीवन महत्त्वाचे, मी जीवनालाच प्राधान्य देतो. आदिवासी लोक भिंतींवर सुंदर चित्रे काढतात, पण ते चित्रासाठी भिंत बांधीत नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे.
उत्तम कांबळे भाषणाला उभे राहिले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तेव्हा ते म्हणाले, तुमचा आवाज ऐकला. माझ्या जन्मभूमीतला आवाज ऐकला आणि आनंद झाला. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न बरीच वर्षे लोंबकळत राहिला तो आपण आता सोडवून टाकला पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या परंपरेला अभिवादन करून उत्तम कांबळे यांनी आज भाषणाला सुरुवात केली. उत्तरोत्तर भाषण अधिक रंगत गेले.
पृथ्वी शेष फण्यावर उभी आहे असे सांगितले जात होते. मग ती राबणाऱ्याच्या तळहातावर असल्याचे सांगितले जाऊ लागले. आता ती संगणकाच्या पडद्यावर आली आहे, याचे भान आपण ठेवायला हवे. राजकारणाचा मी द्वेष करीत नाही आणि त्याच्याशी अतिरेकी गळेबाजीही करीत नाही. राजकारणाचा द्वेष केल्यानेच आपल्याकडे राजकीय महाकादंबरी निर्माण झाली नाही. महानाट्य निर्माण झाले नाही. आपण मी म्हणतो तेच प्रमाण, ही कृती सोडून दिली पाहिजे. मराठीच्या विविध बोली परिघावर ताटकळत न्याय मागत आहेत. आज आजूबाजूला वैचारीक लढे दिसत नाहीत. मी लढ्यांना साद घालतो आहे. वैचारीक दुष्काळ आपल्याला परवडणार नाही. जी भाषा जीवनाची होत नाही, तिच्यासाठी चर्चा कराव्या लागतात. भाषा व संस्कृती शासन निर्माण करीत नाही. तर त्यांना गतीशील करण्याचे काम शासनाचे आहे. अशी ठाम विधाने करीत साहित्याचाही आपण गांभीर्याने विचार करायला हवा असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
ठाण्यात या निमित्ताने साहित्यांची मांदियाळी जमली आहे. दुपारनंतरही विविध परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिला दिवस साजरा झाला. या संमेलनात विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे, आमदार एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर आणि महापौर अशोक वैती आदी राजकीय नेते सामील झाले होते.