संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन
नव्या आसूडाची निर्मिती हेच संमेलनाचे प्रयोजन!
जागतिकीकरणात हरवलेला चेहरा शोधायला हवा!!
स्वातंत्र्यवीर सावरकरनगरी, ठाणे, ता.25- ज्या ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात बसून महात्मा ज्योतिबा फुले यांनी "शेतकऱ्यांचा आसूड' लिहिला आणि इंग्रज सरकारला महापूर, महामारी, महायुद्धात फक्त शेतकरीच का मरतो? असा प्रश्न विचारला त्या ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या या संमेलनाने नव्या आसूडाची निर्मिती करावी, तेच या संमेलनाचे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आज येथे केले. कोठे महात्मा फुल्यांच्या प्रश्नाचे उत्तर 140 वर्षांत आपण मिळवू शकलो नाही ते शोधण्याचे काम साहित्याने केले पाहिजे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसाचा चेहरा हरवतो आहे, तो चेहरा शोधून देण्याचे काम साहित्यिकांनी करायला हवे असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
आज सकाळी या संमेलनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन झाले. मावळत्या अध्यक्षांच्या छोटेखानी भाषणानंतर संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी माणसाचे जगणे आणि साहित्य याचा नेमका आलेख काढत साहित्य आणि माणसाचे जगणे यात अंतर पडत चालले असल्याचे विधान केले. हे अंतर संपवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काळाची चाहूल ओळखणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
जागतिकीकरणामुळे जीवनाला प्रचंड वेग आला आहे. आयुष्याचं नाव स्पर्धा झालं आहे. त्यात वस्तूंपुढे माणूस छोटा झाले आहे. पण हे सारं दुर्देवाने आपल्या साहित्यात प्रतिबिंबीत होत नाही. जागतिकीकरणाचे आकलन करून घेण्यास आपल्याला उशीर झाला आहे. या नव्या जगासाठी नव्या तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्याची आज आवश्यकता आहे. सौंदर्य आणि जीवन यातील जीवन महत्त्वाचे, मी जीवनालाच प्राधान्य देतो. आदिवासी लोक भिंतींवर सुंदर चित्रे काढतात, पण ते चित्रासाठी भिंत बांधीत नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे.
उत्तम कांबळे भाषणाला उभे राहिले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तेव्हा ते म्हणाले, तुमचा आवाज ऐकला. माझ्या जन्मभूमीतला आवाज ऐकला आणि आनंद झाला. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न बरीच वर्षे लोंबकळत राहिला तो आपण आता सोडवून टाकला पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या परंपरेला अभिवादन करून उत्तम कांबळे यांनी आज भाषणाला सुरुवात केली. उत्तरोत्तर भाषण अधिक रंगत गेले.
पृथ्वी शेष फण्यावर उभी आहे असे सांगितले जात होते. मग ती राबणाऱ्याच्या तळहातावर असल्याचे सांगितले जाऊ लागले. आता ती संगणकाच्या पडद्यावर आली आहे, याचे भान आपण ठेवायला हवे. राजकारणाचा मी द्वेष करीत नाही आणि त्याच्याशी अतिरेकी गळेबाजीही करीत नाही. राजकारणाचा द्वेष केल्यानेच आपल्याकडे राजकीय महाकादंबरी निर्माण झाली नाही. महानाट्य निर्माण झाले नाही. आपण मी म्हणतो तेच प्रमाण, ही कृती सोडून दिली पाहिजे. मराठीच्या विविध बोली परिघावर ताटकळत न्याय मागत आहेत. आज आजूबाजूला वैचारीक लढे दिसत नाहीत. मी लढ्यांना साद घालतो आहे. वैचारीक दुष्काळ आपल्याला परवडणार नाही. जी भाषा जीवनाची होत नाही, तिच्यासाठी चर्चा कराव्या लागतात. भाषा व संस्कृती शासन निर्माण करीत नाही. तर त्यांना गतीशील करण्याचे काम शासनाचे आहे. अशी ठाम विधाने करीत साहित्याचाही आपण गांभीर्याने विचार करायला हवा असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
ठाण्यात या निमित्ताने साहित्यांची मांदियाळी जमली आहे. दुपारनंतरही विविध परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिला दिवस साजरा झाला. या संमेलनात विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे, आमदार एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर आणि महापौर अशोक वैती आदी राजकीय नेते सामील झाले होते.
No comments:
Post a Comment