Thursday, December 22, 2016

३००० रुग्णांना जीवदान देणारा
‘बाइक ऍम्ब्युलन्स’वाला

व्हॉट्सऍप आता जुने झाले आहे. व्हॉट्सऍपवर येणारे फोटो आणि
व्हिडीओ पाहण्याची उत्सुकता संपून गेली आहे. त्यामुळे कदाचित
अनेक फोटो आणि व्हिडीओ मेसेज आपण न पाहताच डिलीट करून
मोकळे होतो. पण परवा सहज पाहावा म्हणून डाऊनलोड केलेला
व्हिडीओ अगदी वेगळा निघाला. त्या व्हिडीओतला हीरो होता पश्‍चिम
बंगालच्या चहा मळ्यात काम करणारा मजूर... करिमूल हक!

करिमूल हक हे नाव पश्‍चिम बंगालच्या
जलपैगुरी जिल्ह्यातील ढालबरी पंचक्रोशीत
मोठ्या आदराने घेतले जाते. हा विलक्षण
माणूस तेथे ऍम्ब्युलन्स दादा किंवा बाइक
ऍम्ब्युलन्सवाला म्हणून सुप्रसिद्ध आहे.
करिमूल या दुर्गम भागातील रुग्णांसाठी
स्वतःची बाइक ऍम्ब्युलन्ससारखी
वापरतात. त्यांचा दूरध्वनी क्रमांक
आजूबाजूच्या सर्व गावांना माहीत आहे.
दिवसाचे चोवीस तास त्यांचा मोबाइल
चालू असतो. कोणीही केव्हाही फोन
केला तरी करिमूल लागलीच आपली
बाइक ऍम्ब्युलन्स घेऊन सेवेला हजर
होतात. रात्री अपरात्रीही आणि दिवसा
कामावर असले तरी... खरे तर करिमूल हे
शेतमजूर... पण त्यांचे काम पाहून त्यांच्या
शेतमळ्याचे प्रमुख सुकुमार दास यांनी
त्यांच्या मॅनेजरला करिमूल यांना हवी
तेव्हा कामात सूट देण्याची मुभा देऊन
ठेवली आहे. करिमूल यांच्या ढालबरी
गावापासून सहा किलोमीटरवर एक
साधा दवाखाना आहे. पण तेथे फक्त
छोट्या आजारांवरच उपचार होतात.
दुसरे रुग्णालय आहे नदी पलीकडे.
तेथे जायला ४५ किमीचा वळसा
घालावा लागतो.
करिमूल यांचा मोबाइल क्रमांक
मिळताच त्यांच्याशी संपर्क साधला
असता ते म्हणाले, माझी आई
योग्य उपचाराअभावी मरण पावली.
तिच्यासाठी मी हे काम हाती घेतले
आहे. मी ही सेवा रुग्णांना मोफत
पुरवतो. माझ्याजवळ बाइक आहे आणि
सुदैवाने मी पेट्रोलचे पैसे भरू शकतो.
वस्तुस्थिती अशी आहे की, करिमूल
यांना मिळणार्‍या पगारातील निम्मा पगार
बाइकचा हफ्ता आणि पेट्रोलसाठी खर्च
होतो. अर्थातच घरच्यांचा त्यांना पाठिंबा
आहे म्हणून सारे व्यवस्थित चालू
आहे. त्यांना दोन मुली तर दोन मुलगे
आहेत. मुली विवाहित आहेत. बाइक
ऍम्ब्युलन्स म्हणजे करिमूल चक्क पेशंट
पाठीला बांधून नेत असतात. आता
त्यांच्या बाइकला पेशंटला झोपवता
येईल, अशी सोय करण्यात आली आहे.
पण या सिंगल बाइकवरून करिमूल
यांनी जवळपास ३००० लोकांचे
प्राण वाचवले आहेत. या बाइक
ऍम्ब्युलन्समुळे छोट्या रस्त्यावरून,
पायवाटेने पेशंट वेगाने आणता येतो,
साकवावरून नदी पार करता येते. हा या
ऍम्ब्युलन्सचा मोठा फायदा असल्याचे
करिमूल सांगतात.
करिमूल परिसरातील लोकांसाठी
देवदूत आहेत. अनेक जण त्यांना
भगवान मानतात. पण करिमूल
म्हणतात, मी गरीब सामान्य माणूस
आहे. माझ्या आईवरील प्रेमापोटी
हे सारे करतो आहे. तिला मृत्यूनंतर
स्वर्गात स्थान मिळावे, हीच माझी
आशा आहे.
करिमूलच्या या अनोख्या कार्याला
विनम्र सलाम!

Wednesday, December 21, 2016

मी शोधलेले सुलेखनासाठीचे नवे टूल


तिसरी चौथीच्या वयातच मला शास्त्रज्ञ लोकांची कमाल वाटू लागली होती. भोवतालातील कितीतरी वस्तूंबद्दल मला कौतुक होतं. आपणही शास्त्रज्ञ व्हायचं असं माझ्या बालसुलभ मनाला वाटत होतं. पुढे पाचवीत मूलद्रव्यांचा अभ्यास झाल्यावर वस्तू विस्कटून मूलद्रव्ये आणि मूलद्रव्ये जुऴवून वस्तू बनविण्याची कल्पना सुचली होती. माझा प्रवास योग्यच चालला होता. पण पुढे भाषेची आवड निर्माण झाली आणि शास्त्रज्ञ व्हायचं स्वप्न विरलं...
पण....
पण स्वप्न आतून धडका देत असतात. शास्त्रज्ञाच्या अंगी असलेली चिकाटी होतीच अंगी...त्यातूनच मी बहुदा छत्रीच्या तारा वाकवून त्यांचे घोंगडीसाठी पिन-थडस बनवत असे. त्यांना नक्षीदार बनवताना माझ्या कोवळ्या सुकुमार हाताना कितीतरी यातना झाल्या. पण त्यात सुख होते. ते घाव निर्मितीसाठी सोसलेले होते.
कितीतरी दिवस मी बादलीच्या जाड कडीला ठोकण्यात घालवले. मागच्या पिढीतील कोणीतरी बादलीच्या कडीची एक रिंग करून आणलेली होती. पण तिची दोन टोके जुळलेली नव्हती. ती जुळावीत यासाठी मी कितीतरी तास ती रिंग दगडावर ठोकली असेल. तिच्यातून ठोकताना येणारी कंपने मला शास्त्रज्ञ झाल्याचाच आनंद देत असत. ती टोके कधी जुळली नाहीत. तसे माझे शास्त्रज्ञ व्हायचे स्वप्नही जुळले नाही.
पुढे मुंबईत आलो. कोणीच आपले उरले नाही तेव्हा मित्रांकडे राहू लागलो. ते दोघे सख्खे भाऊ होते. दोघेही कलावंत. एक जेजेचा विद्यार्थी...एक उपजत कलावंत...टूल मेकिंग हा त्याचा आवडता छंद होता. ते त्यांच्या कामासाठी एकाहून एक भारी टूल तयार करीत. टूल म्हणजे आपल्या कामासाठी सुयोग्य साधन.
माझं हस्ताक्षर सुंदर होतंच, पुढे सुलेखनाची आवड निर्माण झाली. मिळेल त्या पेनाने मी सुलेखन करीत बसत असे. सुलेखनाचे पेन महाग. ते परवडत नसत. त्यात त्यांचे आकार दोन-चार-सहा असेच असत. तीन-पाच वगैरे आकार त्यात येतच नसत. म्हणून मी सुलेखनासाठी टूल शोधू लागलो. एक दिवस मला एक हायपोथिसिस सुचला. हायपोथिसिस म्हणजे असे असे होऊ शकेल अशी कल्पना...माझ्या लक्षात आले की आपण निब घासून हवी तेवढी करू शकलो तर कमी खर्चात आपले काम होईल. आपल्याला हव्या त्या आकाराच्या निब करता योतील. हव्या त्या आकाराची अक्षरे काढता येतील.
मग मी कामाला लागलो. झपाटल्यासारखा दिसेल त्या वस्तूवर निब घासू लागलो. कितीतरी प्रकारचे धातू...कितीतरी प्रकारची कापडे...कितीतरी प्रकारची लाकडे...मी निब घासत राहिलो. अपयशाच्या पायर्‍यांवर पायर्‍या रचल्या. यशाच्या दिशेन पुढे जात राहिलो. सहा महिने हा उद्योग सुरू होता.
एकदा गावी गेलो असता, तिथे हाच उद्योग सुरू केला. तिथल्या तर्‍हेतर्‍हेच्या दगडांवर निबा घासून पाहिल्या.
आणि युरेका...मला निब सहज घासून हवी तेवढी करणारा दगड सापडला! घरात चंदन उगाऴायची सहाण होती. ती कामास आली. माझा शोध पूर्ण झाला. सहाणेवर निब घासली की हवा तो आकर सहज मिळू लागला. मी बेहद खूश झालो. सहा महिन्यांच्या कष्टाला यश आले. मोगरा फुलला...मोगरा फुलला...
मी आता सुलेखन करीत नाही. इतर कामे आणि छंदांतून वेळच नाही. पण लहर आली की एखादा शब्द, एखादी काव्यपंक्ती लिहून काढतो. पण आज सुलेखनातील अनेक जण माझ्या परिचयाचे आहेत. त्या सर्वांसाठी हे मी शोधलेले टूल जाहीर करतोय. सर्वांनी वापरा...आपले वजन मिऴवा....
- वैभव बळीराम चाऴके
९७०२७२३६५२