आदिपूजेचा मान मिळालेले दैवत म्हणजे श्री गजानन... सोळा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती तो श्री गणेश... त्याचा भाद्रपदी होणारा सोहळा म्हणजे केवळ आनंद पर्वणी... अवघ्या महाराष्ट्राला एक नवा तजेला ... एक नवी उमेद देणारा हा सोहळा... त्याची लक्षावधी रुपे... त्याचा साती खंडात वाजणारा डंका... जगाच्या पाठीवर असा दुसरा सोहळा नसावा. पण...
हा पण...
बुद्धी दे... शक्ति दे... आरोग्य दे... धन दे... अशा मागण्या करताना आम्हाला तारतम्यही दे असे म्हणायला लावतो. हे तारतम्य नाही लाभले तर आपण आपला लाखमोलाचा आनंद आणि तेवढ्याच लाख मोलाचा सोहळा हरवून बसायचो. किंवा त्याची तेजोमय प्रभाच निष्प्रभ करून ठेवायचो.
बाजाराला नकार
सगळ्या जगावर बाजाराने गारूड केले आहे. त्याचा परिणाम आपल्या सणांवरही दिसतो. सणांसाठी बाजार सजणे वेगळे आणि सणांचा बाजार होणे वेगळे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपले सण हे नात्याच्या जपणुकीसाठी... समाजातील सद्भावना वाढीसाठी... समाजाच्या उन्नतीसाठी आहेत. त्याऐवजी बाजार मांडून समाजाला अधिकच बाजारकेंद्री करण्याचे पातक आपल्या हातून घडत नाही ना याचे भान आपण ठेवले पाहिजे. बाजाराला जाहिरातीची गरज असते. ती जाहिरात आपल्या सणांमध्ये का घुसली? याचा विचार आपण का नाही केला?
व्हीआयपी आणि सेलेब्रिटी
आपल्या गणेशोत्सवात व्हीआयपी आणि सेलेब्रिटी आले पाहिजेत हा अट्टाहास आपण का करू लागलो आहोत? सेलेब्रिटीशिवाय आपला उत्सवच पूर्ण होत नाही का? आमदार, खासदार, नगरसेवकांना आपण गणेशोत्सवात कशासाठी बोलवतो? त्यांनी मंडळाला देणगी द्यावी म्हणून? मंडळापुढच्या रस्त्यावर खड्डे... तेथे सिग्नल नाही... स्पीडब्रेकर नाही... ते काम करायचे- करून घ्यायचे काम प्रतिनिधींचे आहे, पण आपण मंडळाला देणगी मागू लागलो नि ती डीजेवर उधळू लागलो तर सगळ्या समस्या तशाच राहणार, हे आपण जाणायला नको का?
कलांचे ओंगळवाणे प्रदर्शन
गणेशोत्सवासारख्या सणांवेळी नृत्ये केलीच पाहिजेत. गणेश ही देवता कलांची देवता आहे. पण बीभत्सपणा, अश्लीलता त्यांना या प्रसंगी आपण थारा देता कामा नये. अनेकदा आपण अशा कलांना या दिवसांत प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. दहीहंडीच्या मंचावर अलीकडे जी नृत्य झाली ती संताप आणणारी होती. ही कोणती भक्ती आहे? मद्यपान करून विसर्जन मिरवणुकीत असला बीभत्सपणा करणार्यांना आपण आवरले पाहिजे. लोककलांत अश्लिलता डोकावू लागली तर ती वेळीच रोखली पाहिजे.कलगीतुर्याच्या नावाखाली जाखडी नृत्य आणि भजनांतही अश्लील गीते सादर होताना दिसतात. ते आपण थांबविले पाहिजे.
भक्त विनम्र हवा
एखाद्या गणेशोत्सवाची कीर्ती वाढली की मग त्या गणेशोत्सवाच्या मंडळातील कार्यकर्त्यांचा अभिमान वाढीस लागतो. तो अभिमान मग गर्वाची जागा घेतो. त्यातून मग भाविकांना दुय्यम लेखायला सुरुवात होते. पोलिसांना दादागिरी करून दाखवली जाते. बाबांनो, तुम्ही भक्त आहात ना? भक्त विनम्र हवा. तुम्ही बाप्पाची सेवा करता ना? अशी करतात सेवा? या अशा एक दोन कार्यकर्त्यांमुळे मंडळातील रात्रंदिवस राबणार्या कार्यकर्त्यांनाही नावे ठेवली जातात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या लोकांचे प्रबोधन करणे हे आपलेच काम आहे, हे लक्षात घ्या आणि अशा कार्यकर्त्यांना आवरा.
तुम्ही तर संस्कृती वाहक
गणेशोत्सवातील कार्यकर्ते आणि या उत्सवात सहभागी होणारे भाविक हे आपल्या संस्कृतीचे वाहक आहेत. त्यांना त्याची जाणीव असली पाहिजे. तुम्हीच समाजात आपली परंपरा, संस्कृती घेऊन जात असता. नव्या पिढीला तिचे दर्शन घडवीत असता. तेव्हा तुम्ही जर बेजबाबदार झालात तर संस्कृती वहनाचे कामच दूषित होऊन जाईल. तुमच्या खांद्यावरच या संस्कृतीची पालखी आहे. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा परिचय करून देण्याचे काम करताना म्हणूनच अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.
हेवेदावे विसरा
छोट्या-मोठ्या अनेक मंडळांत हेवेदावे दिसतात. गट-तट दिसतात. सण-उत्सव हे एकत्र येण्याचे, एक दिलाने काम करण्याचे निमित्त असते. आपण सार्यांनी हेवेदावे विसरून काम केले पाहिजे. एकत्र येऊन गुण्यागोविंदाने, प्रेमान,े स्नेहभावाने वागले पाहिजे. पण अनेकदा आपण अशा हेव्यादाव्यांना खतपाणी घालताना दिसतो. हे काही बरे नाही.
तारतम्य दे...
कोकणात देवापुढे गार्हाणे घालायची पद्धत आहे. आज आपण सर्व गणेशभक्तांनी मिळून देवाधिदेव गणेशाला एक गार्हाणे घालूया. हे देवाधिदेवा... होय महाराजा... आम्हाला बुद्धी दे... होय महाराजा... आम्हाला शांती दे...होय महाराजा... आम्हाला धन दे... होय महाराजा... आम्हाला आरोग्य दे...होय महाराजा... आणि उत्सव साजरा करताना तारतम्य दे रे महाराजा... होय महाराजा...
No comments:
Post a Comment