Sunday, February 24, 2019

इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी मराठीचे शुद्धलेखन

इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी
मराठीचे शुद्धलेखन

वैभव बळीराम चाळके
9702 723 652
( नवाकाळ मध्ये २४ फेब २०१९ रोजी प्रकाशित  )

इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढते आहे. मराठी माध्यमातील शाळा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत. मराठी भाषादिनाच्या निमित्ताने इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलांना मराठी शुद्धलेखन गरजेचे आहे का? तसेच मुलांचे मराठी नेमके व्हावे यासाठी काय करता येईला? याचा वेध घेणण्याचा हा अल्पसा प्रयत्न...

शुद्धलेखनाची आवश्यकता काय?
सर्वप्रथम शुद्धलेखनाची आवश्यकता काय हे पाहिले पाहिजे. कोणतीही भाषा ही संवादाचे काम करीत असते. शुद्धलेखन हे संवाद नेमका होण्यासाठी गरजेचे असते. शिवाय शुद्धलेखनाच्या आग्रहामुळे आणि क्षमतेमुळे विचारात स्पष्टता आणि खोलपणा येतो. आज इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या अनेक मुलांना आपले विचार नेमके मांडता येत नाहीत, याचे कारण रोजची व्यवहाराची भाषा नीट येत नसणे हे आहे. मराठी मातृभाषा असलेल्या मुलांना दहावीपर्यंत मराठी विषय असला तरी मराठी नेमके लिहिता येत नाही, बोलता येत नाही. भाषाविषयीचा आपला दृष्टिकोन याला कारणीभूत आहे.

भाषेचेच नव्हे, भाषकांचे नुकसान
खरेतर आपल्या मुलांचे शिक्षण मातृभाषेतून म्हणजे मराठीतून व्हायला हवे. अनेक कारणांनी ते शक्य नाही. पण अशा वेळी मुलांना उत्तम मराठी यायलाच हवे हा आग्रह आपण धरला पाहिजे. तो तसा न धरल्यास मराठी भाषेचेच नव्हे तर आपल्या मुलांचे, आपले, एकूण मराठी भाषकांचे नुकसान होणार आहे. ज्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या कुसुमाग्रजांनी म्हटले आहे- ‘भाषा मरता, देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे...’ आपल्या मुलांच्या मनातील हा संस्कृतीचा दिवा विझू लागल्याचे स्पष्ट दिसते आहे. भाषेचे तेल घातल्याशिवाय हा दिवा तेवत राहू शकत नाही. संस्कृतीचा दिवा विझला की मग मुले मातीपासून तुटतात... माणसांपासून तुटतात...

मुलांसाठी शुद्धलेखन
साधारण पंचवीस वर्षे मराठी भाषेत गद्य-पद्य लेखन करताना, मराठी साहित्य विषय घेऊन पदवी मिळविताना, पत्रकारितेत पंधरा वर्षे नित्य लिहीत असताना, आयटी विरुद्ध मराठी, मित्र मराठी शाळांचे, युनिकोडचा प्रचार-प्रसार आधी चळवळींमधून सक्रिय सहभाग नोंदविताना आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकविताना केलेल्या निरीक्षणातून शुद्धलेखनाची समाजाची आवश्यकता लक्षात आली. त्यातून जमा झालेल्या अनुभवाच्या मंथनातून पत्रकारितेचे विद्यार्थी, साहित्याचे विद्यार्थी, भाषा विषयाचे शिक्षक, लेखक यांच्यासाठी ‘शुद्धलेखनाच्या दिशेने’ ही कार्यशाळा सुरू केली. ही कार्यशाळा घेत असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कराल का, अशी विचारणा व्हायला लागली. त्या दृष्टीने काही दिवस अभ्यास केल्यावर ‘मुलांसाठी शुद्धलेखन’ ही कार्यशाळा आकारास आणली. त्यापुढे जाऊन आता इंग्रजी माध्यमातील मुलांच्या मराठी शुद्धलेखनासाठी काय करता येईल, अशी विचारणा काही दक्ष पालकांनी केल्यावर त्या दृष्टीने विचार करून कार्यशाळेची बांधणी सुरू झाली.

अडचणी कोणत्या?
आपल्या मराठी मुलांचे मराठी शुद्ध आणि नेमके व्हावे यासाठी काय काय करता येईल, याची चाचपणी केली असता, अगदीच प्राथमिक गोष्टी करण्याची आवश्यकता लक्षात आली. इंग्रजी माध्यमात मराठी भाषा ही दुय्यम विषय असल्याकारणाने असेल किंवा आपल्याच अनाग्रही वृत्तीमुळे असेल मराठीकडे बहुदा साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्याचे वाईट परिणाम व्यवहारात दिसत असूनही त्याकडे मराठी माणूस काणाडोळा करतो आहे. एक तर मराठी माध्यमांच्या शाळांमध्येसुद्धा शुद्धलेखन म्हणजे एखादा मजकूर कॉपी करणे इतकाच अर्थ घेतला जातो. शुद्धलेखनाचे नियम शिकवले जात नाहीत. आपल्या अनेक शिक्षकांना शुद्धलेखन येत नाही. (कारण त्यांनाही ते कोणी शिकवलेले नाही.) अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमातील मुलांच्या मराठी शुद्धलेखनाची स्थिती अत्यंत खडतर असणे आश्चर्याचे नव्हे. म्हणून आपण त्यासाठी थोडे जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आपली मातृभाषा नेमकी जाणून घेणे आणि ती नेमकी लिहायला शिकणे किती गरजेचे आहे, हे प्रथम समजून घेतले पाहिजे. मुलांना काना, मात्रा, उकार, वेलांटी, र्‍हस्व, दीर्घ हे शुद्धलेखनातले प्राथमिक शब्दच नीट माहीत नसतात. त्यामुळे असतो चे आसतो, नाही चे नही, हे चे है अशा चुका मुलांच्या लेखनात मोठ्या प्रमाणावर आढळतात. र्‍हस्व- दीर्घ ही तर फार पुढची गोष्ट झाली. पासून, कडून, कडे, नुसार ही अव्यये अगोदर येणार्‍या शब्दाला जोडून लिहायची असतात, ते त्यांना येत नाही. हिंदीच्या प्रभावामुळे ते वेगळे लिहिले जातात. अनुस्वार कोठे द्यायचे याबाबत संभ्रम आढळतो. रफार नेमका देता येत नाही. जोडाक्षरे लिहिताना भंबेरी उडते. आपली वर्णमाला मराठी माध्यमातही नेमकी शिकवली जात नाही. इंग्रजी माध्यमातील मुलांना ती नेमकी माहीत असणे केवळ दुरापास्त गोष्ट आहे.

उपाय कोणते?
यावर उपाय म्हणून काय करता येईल याचा आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. शिक्षक आणि पालकांनी मुलांना उत्तम मराठी आले पाहिजे याची प्रथम मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे. त्या दृष्टीने सहज शक्य आहे ती पावले तरी उचलली पाहिजेत. मुलांना रोज किमान चार-सहा ओळी मोठ्याने वाचायला लावल्या पाहिजेत. लिहायला लावल्या पाहिजेत. रोज काही मजकूर वाचून दाखवणे एवढे केले तरी भाषेचा
 रंग-ढंग, स्वभाव, चाल कळायला मदत होईल. म्हणी, वाक्प्रचार समजावून सांगितले पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या पातळीवर या गोष्टी करायला हव्यात. मराठी, इंग्रजी सर्वच माध्यमातील मराठीच्या शिक्षकांनी मराठीचे शुद्धलेखन समजून घ्यायला हवे.
खरेतर माणसाला मातृभाषेतून शिक्षण मिळायला हवे. मात्र तशी परिस्थिती येईपर्यंत निदान त्याची मातृभाषा त्याला नेमकी लिहिता यावी यासाठीची ही कार्यशाळा अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. मराठी इंग्रजी माध्यमातील मुलांना शुद्ध आणि नेमके लिहायला शिकवणारी ही कार्यशाळा शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि सोसायट्यांमधूनही करता येऊ शकेल. मराठी लेखनाची आवश्यकता आणि त्यातील नेमकेपणाची गरज एकदा मनावर ठसली आणि शुद्धलेखनाच्या दिशेने जणवण्याचा मार्ग सापडला की मग ती गोष्ट आत्मसात करणे सोपे होऊ शकते.

No comments:

Post a Comment