मन मिटण्याचे दुःख...
कागदाची करामत या कार्यक्रमात ज्या विविध
गोष्टी मी समाविष्ट केल्या आहेत, त्यातली एक गोष्ट म्हणजे मुलांना या जगात कोणीही ढ नसतो हे
सांगणे.
आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत जो माणूस
अभ्यासात हुशार, तो हुशार, असे एक धारणा असलेली दिसते. एक विनोद या
अनुषंगाने मला आठवतो. एका विद्यार्थ्याने एकदा आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारला
होता, सर, कमल अभ्यासात हुशार आहे आणि विमल ढ हे खरेच. पण परवा नदी ओलांडताना कमल
पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली, तेव्हा विमलने तिला पाठीवर मारून किनाऱ्यावर आणली.
तरीही आपण सगळे कमलला हुशार म्हणतो. हे कधीतरी बदलेल का हो...
तुम्ही आता आपल्या वर्गातल्या मुलांकडे पाहाल
तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, वर्गात पहिल्या पाचात असलेली सगळी मुले
आयुष्यात यशस्वी झालेली नसतात आणि शेवटच्या पाचात असलेली सगळी मुले आयुष्यात अयशस्वी
झालेली नसतात. कारण प्रत्येकाचे हुशारीचे एक क्षेत्र असते. माणूस हुशार असेल असे
एक तरी क्षेत्र असते. एक माणूस सगळ्याच विषयात हुशार नसतो. तसेच वर्गात कोणीही सर्वात
ढ नसतो. असलाच तर तो विशिष्ट विषयाच्या अभ्यासात ढ असतो. किंवा आपल्या एका शैक्षणिक
पद्धतीत ढ असतो. म्हणून त्याला सगळ्या जीवनातून बाद करण्याची आपली जी व्यवस्था आहे,
ती फारशी चांगली नाही. हेच मुलांना सांगण्यासाठी मी जिथे कुठे कार्यक्रम करतो,
तिथे मुलांना प्रश्न विचारत असतो. आपल्या वर्गात सगळ्यात हुशार कोण आहे रे...
कदाचित एखादा हात वरती येतो. मग मी दुसरा प्रश्न विचारतो, आपल्या सगळ्यात ढ कोण
आहे रे...
मी आजवर जितके कार्यक्रम केले, त्या
कार्यक्रमात कोणीही हात वरती केलेला नाही. कारण सगळ्यात ढ असा कोणीच नसतो. किंवा
आपण आहोत असं कोणालाही वाटत नसतं.
याही कार्यक्रम कोणी हात वरती करणार नाही
हे मला माहीत होते. मुले एकमेकांकडे पाहत होती. एकदुसऱ्याची नावे सुचवत होती.
पण एका क्षणी माझा आत्मविश्वास गळून पडला. एक
मुलगी हात वरती करून, मी आहे, म्हणाली. मला क्षणभर काय बोलावं कळेना. असा अनुभव मला
माझ्या कार्यक्रमात यापूर्वी कधीच आला नव्हता. मी तिच्या जवळ गेलो. तिला विचारलं,
हे तुला कोणी सांगितलं... तर ढसाढसा रडत म्हणाली, आहेच मी... सगळ्यांनाच माहीत आहे...
मला तिचा केविलवाणा चेहरा पाहवेना. तिच्याशी
काय बोलावं ते कळेना... पण मी एक दीर्घ श्वास घेतला. तिला म्हटलं, ऊठ, इकडे ये,
जगात सगळ्यात ढ असे कोणीच नसते.
मग मी सगळ्या मुलांकडे पाहत म्हटलं, मी
तुम्हाला सहज करता येणारा एक एन्व्होलोप शिकवणार आहे. कात्रीच्या वापराशिवाय,
फेविकॉल, डिंक, गम यांच्याशिवाय बनवता येणारा... एखाद्या लग्नात गेलात तर प्रेझेंट
देता येणारा... एखाद्याच्या वाढदिवसाला प्रझेंट म्हणून पैसे द्यायचे असतील तर ते
घालून देता येतील अशा... एखाद्याला पत्र पाठवायचं असेल तर त्यासाठी वापरता येणारा...
पुढच्या पाच मिनिटांत मी मुलांना दाखवत तो एन्व्होलोप
बनविला. त्या कन्येलाही बनवायला सांगितला. त्या मुलीने मी सांगितलेली प्रत्येक
गोष्ट बारकाईने ऐकली आणि केली होती. कारण आता ती ढ उरली नव्हती. ती सगळ्यांच्या
समोर होती. आताची सेलिब्रिटी होती. तिचा आत्मविश्वास वाढला होता. म्हणूनच असेल
कदाचित मी बनवलेल्या एन्व्होलोपपेक्षा तिने उत्तम एन्व्होलोप बनवला होता. तो
सगळ्यांना दाखवत मी म्हणालो, मित्रांनो, हिला आतापर्यंत असं वाटत होतं की ती
सगळ्यात ढ मुलगी आहे, पण मला सांगा इतका सुंदर एन्व्होलोप बनवणारी मुलगी ढ कशी
असेल. हे पाहा, मी जो बनवला आहे त्याहून अधिक नीट तिने बनवलाय.
मग तिला म्हटलं, गैरसमज काढून टाक. तू ढ नाहीस.
कार्यक्रम संपल्यावर मी त्या मुलीला म्हटलं, राहतेस कोठे...
कार्यक्रम संपल्यावर मी त्या मुलीला म्हटलं, राहतेस कोठे...
ती म्हणाली, इथेच. मागच्या रोडवर.
फुटपाथला.
मी पुन्हा निशब्द... काही क्षण काय बोलावं खलेना...
मी माझ्या जवळ असलेले काही कागद त्या मुलीला देत शाळेचा निरोप घेतला.
जगात सर्वात ढ कोणी नसतो, ह्या मतावर मी
आजही कायम आहे. पण असं लखलखीत खरं बोलणारे लोकही आहेत, हेही आता मला अनुभवाने पटलं
आहे.
आता कोणत्याही क्षणी त्या प्रसंगाची आठवण
येते. मनात कालवाकालव होते. मग मन मिटून मी दुसऱ्या कामाला लागतो. मन मिटण्याचा
दुःख केवढं मोठं आहे, ते असं थोडी शब्दांत सांगता येतं?
छान लेख...
ReplyDelete