Tuesday, November 19, 2019

काही लेख

रात्री टाईमपास नको... (409)



महाविद्यालयात मुलांना शिकविताना मी मुद्दामच अभ्यासक्रमाबाहेरच्या काही गोष्टी मुलांना शिकवीत असतो. गुरुकुल पद्धतीचा हा वारसा मला माझ्या गुरुजनांकडून मला मिळालेला आहे अभ्यासक्रमातली एखादी गोष्ट राहून गेली तरी चालेल, पण मुलांना जीवनात उपयोगी पडतील अशा, आपल्याला माहिती असलेल्या शक्य तेवढ्या गोष्टी त्यांना सांगाव्यात, असा हा सर्वांगीण शिक्षणाचा वारसा मी माझ्यापरीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतो.

गेल्या वर्षी एकदा वर्गात मुलांना विचारले, तुमच्यापैकी किती जण टीव्हीवरच्या मालिका पाहतात? वर्गातल्या निम्म्या मुलांनी हात वरती केले. मी प्रत्येक जण साधारण किती मालिका पाहतो, हे विचारल्यावर एका कन्येनं ती एकसलग पाच मालिका पाहात असल्याचं तिनं सांगितलं. मी तिला उद्यापासून कोणती तरी एकच मालिका पाहण्याची अट घातली आणि मग वर्षभर ती टीव्ही पाहण्यात किती वेळ वाया घालवते, याची चौकशी करीत राहिलो.

स्मार्टफोन हातात आल्यापासून फक्त तरुण पिढीचाच नव्हे तर सर्वच वयोगटातील लोकांचा रात्रीचा कितीतरी वेळ मोबाईलवर टाईमपास करण्यात जातो, ही गोष्ट लक्षात आल्यावर मी माझ्या विद्यार्थ्यांना रात्री टाइमपास करायचा नाही, अशी अट स्वतःलाच घालण्याचा सल्ला दिला.

त्याचे कारणही मी त्यांना सविस्तर समजावून सांगितले. ते त्यांना क्षणात समजले. पटलेही. ते तुम्हालाही पटेल याची मला खात्री आहे.

मित्रांनो, रात्र वाईट... अंधार वाईट... तो वाईट गोष्टींना निमंत्रण देतो... असेच संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केलेले आहेत. स्मार्टफोनच्या निमित्ताने आपण सारे हे नव्याने अनुभवतो आहोत. म्हणजे पाहा, तुम्ही रात्री दहा वाजता मोबाईलवर एखादी वेबसिरीज किंवा एखादा मोठा सिनेमा पाहिला घेतलात किंवा युट्युब किंवा तत्सम वेबसाईटवर व्हिडिओ पाहत राहिलात, तर तासांमागून तास खर्च झाले तरी तुम्हाला त्याचे भान राहत नाही, असे तुमच्या लक्षात येईल. रात्री दहाला सुरु केलेली वेबसिरीज पहाटे चार पाच वाजेपर्यंत पाहणार्‍या तरुण मुलांची संख्या, आपल्या देशातसुद्धा लाखाच्या घरात असेल. निव्वळ टाईमपास म्हणून रात्री दोन-चार तास सहज खर्च करणार्‍या नागरिकांची संख्या काही कोटीच्या घरात असेल, हे सांगण्यासाठी सर्व्हे करण्याची आवश्यकता नाही.

गंमत आहे पाहा, समजा तुम्ही दिवसा पाच तास एखादी वेबसिरीज पाहत राहिलात किंवा दिवसाचे पाच तास तुम्ही युट्युबवर किंवा तत्सम वेबसाईटवर व्हिडिओ पाहण्यात घालवलात किंवा एखादा ऑनलाईन गेम खेळण्यात घालविलात, एवढेच काय, पत्ते कुटण्यात, क्रिकेट खेळण्यात कॅरम खेळण्यात किंवा टीव्ही पाहण्यात जरी तुम्ही पाच तास खर्च केलात, तरी तुम्हाला त्याबद्दल अपराधीपणाची भावना वाटत.े रात्री मात्र खर्च केलेला वेळ आपल्याला अपराधाची भावना देत नाही. दिवस आणि रात्र यांच्यात हा एक मोठाच फरक आहे, जो आपल्या सहज लक्षात येत नाही.

माझ्या विद्यार्थ्यांना दिलेला हा सल्ला, म्हणूनच आज मी आपणास, सर्व मित्रांना, ज्येष्ठांना आणि चिमुकल्यांनासुद्धा देतो आहे- रात्री टाईमपास करू नका.

हा एक सल्ला मानलात तर तुमचे कितीतरी मानवी तास तुम्ही वाचवू शकाल. आपले वाचणारे लाखो-करोडो मानवी तास आपल्या ही समाजाची, राष्ट्राची संपत्ती आहे, हे लक्षात घेतलात, म्हणजे हा सल्ला केवढा मोलाचा आहे, हे तुमच्या सहज लक्षात येईल.





सँडविच करायला शिका (421)




काही काही माणसांची शिकवण्याची हातोटी एकदम विलक्षण असते. झेनकथा ज्यांना माहीत असतील त्यांना अनुभव देऊन शिकविण्याची हातोटी माहीत असेलच.  अलीकडे रोजच्या खाण्यातील सँडविच या पदार्थाच्या माध्यामातून शिकवण देणारा एक किस्सा कळाला. मोठा अफलातून किस्सा आहे हा. आपण आचरणात आणावा आमि आपल्या मित्रांनाही आचरणात आणायला सांगावा असा.

सँडविच हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही वेळी खाता येणारा असा पदार्थ आहे. पुन्हा आरोग्यासाठी उत्तम. सहज करता येणारा. ज्यांना आपल्या स्वतःसाठी जेवण करता येत नाही त्यांनी किमान सँडविच करणे शिकून घेतले पाहिजे. सँडविच करणे अत्यंत सोपे आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम असते.

स्लाईस ब्रेडचा तुकडा घेतला, त्यावर तुम्हाला हवे ते पदार्थ एकावर एक ठेवले. पुन्हा दुसरा एक स्लाईस ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर ठेवला. चटणी घाला व सॉस घातला की सँडविच तयार होते. सँडविच प्रत्येकाला करता यायला हवे. म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. अर्थात हे सँडविच करा हे सांगण्याचा माझा हेतू नाही. मला त्या पुढे जाऊन काहीतरी वेगळेच सांगायचे आहे. अर्थात हे सारे माझ्या पदरचे नाही, पण मला भावलेले, मला विचारमंथनाला प्रवृत्त करणारे आहे. इतरांनाही हे सांगायला हवं, असं सतत वाटायला लावणारं आहे.

मी अनेकदा युट्युबवर अनेकांची मोटिव्हेेशनल भाषणे ऐकत असतो. असेच एकदा मला एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्यातील सँडविचचा उल्लेख मला खूपच आवडला. त्यात उत्तम बोलण्याचे मार्ग सुचविणार्‍या वक्त्याने त्यात छान मार्गदर्शन केले आहे. कोणाचीही उगाचच निंदा करू नका, चार चौघांत तर नक्कीच करू नका. गरज असल्यास त्या माणसाला एका बाजूला घेऊन त्याबद्दल त्याला माहिती द्या. तसे केल्याने तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याबाबत त्या माणसाच्या मनात शत्रुत्व निर्माण होते असे याचे म्हणणे आहे.

जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायची असेल तर सँडविच करायला शिका. तुम्हाला एखाद्याची जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट चांगली नाही असे वाटते. ती त्याला सांगण्यापूर्वी चांगल्या गोष्टींच्या मध्ये घालून सांगा. म्हणजे आधी त्याच्या बोलण्यातील, त्याच्या विचारातील चांगली गोष्ट सांगा, मग त्याला चुकीची गोष्ट सांगा आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगून तुमच्या बोलण्याचा समारोप करा. या प्रकारे जर तुम्ही सँडविचमध्ये घालून एखाद्याला त्याची चूक दाखवून दिलात तर ती चूक ऐकणारालाही सुधारावी वाटते. सुधारण्याची शक्यता वाढते. शिवाय तुमच्यासोबत शत्रुत्व निर्माण होत नाही

ही गोष्ट अगदीच छोटी आहे, हेही मला माहीत आहे. पण छोटी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. जसे की सँडविच हे जेवण नव्हे, तो संपूर्ण आहार नव्हे, पण तरीही भुकेच्या वेळेला अन्य काही मिळत नसताना सँडविच हा एक अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे. तसेच हा छोटा विचार अत्यंत कामाचा आहे. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात तो अवलंबून पाहा. अनेकदा आपण माणसांना आपण उगाच दुखावत असतो. अनेकदा चांगला सल्ला दिला असताना माणसं दुखावली जातात. या संडवीच पद्धतीमुळे तुमचे मानवी संबंध सुधारतील. मित्र वाढतील. आयुष्य अधिक आनंदी आणि अधिक सुखी होईल.









विश्‍वासावर जग चालतं...(437)




आजकाल कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही, असे आपण वरचेवर म्हणत असतो. तरी विश्वास नावाचं मूल्य कितीतरी महत्त्वाचं आहे हे आपण जाणतोच. फसवणुकीच्या कितीतरी बातम्या आपण रोजच्या रोज वाचतअसतो. अशा वेळी मी तुम्हाला विश्‍वासावर जग चालते म्हटले तर तुम्हा मला वेड्यात काढाल. पण थांबा...

दोन छोट्या गोष्टी सांगितल्या म्हणजे मी काय सांगतो तेे सहज लक्षात येईल. एकदा एक विमान हवेत असताना त्यात बिघाड होतो आणि विमान वेगाने खाली येऊ लागते. तेव्हा सगळेच प्रवासी भयभित होतात. एक छोटी कन्या फक्त निर्भय असते. एक माणूस काळजीनं तिला विचारतो, तुला भीती वाटत नाही का... ती म्हणते, बिलकुल वाटत नाही. कारण या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत आणि मला विश्वास आहे की, ते हे विमान कोसळून देणार नाहीत.

दुसरी गोष्ट आहे सीमेवर लढत असलेल्या दोन सैनिकांची. बलवीर आणि दलवीर अशी त्यांची नावे. बलवीर जखमी होऊन पडला. दलवीर आपल्या सहकार्‍यांसह बलवीरपासून काहीशे फूट अंतरावर होता. बलवीर शेवटच्या घटका मोजत होता. पण त्याला वाटत होतं की, दलवीर आपल्याला भेटायला येईल.

दलवीरला सहकारी सांगत होते नको जाऊ, आता तो तसाही वाचणार नाही. पण सुसाट वेगाने येणार्‍या गोळ्या चुकवत दलवीर काही क्षणात त्या ठिकाणी पोहचला. बलवीरने त्याच्याकडे कृतार्थ नजरेनं पाहिलं आणि कायमचे डोळे मिटले. दलवीर येणार हा विश्वास सार्थ झाल्याने त्या शेवटच्या क्षणी बलबीरला जो आनंद झाला त्याला उपमा नाही. आणि आपण आपल्या मित्राच्या विश्वासाला पात्र ठरलो याचा आनंद दलवीरला आयुष्यभर ताकद देत राहिला.

मित्रांनो, विश्वासाची गोष्ट अशी आहे. आपण कितीही कुणाचा कुणावर विश्वास राहिला नाही असं म्हणत असलो तरी आपलं सगळं जीवन हे परस्परांच्या विश्वासावर अवलंबलेलं आहे.

थोडा विचार करून पाहा... तुमच्याही हे सहज लक्षात येईल.

आपण ज्या गाडीने प्रवास करतो, त्या गाडीच्या ड्रायव्हरला आपण ओळखत नसतो, पण तो ड्रायव्हर गाडी नीट चालवेल याचा आपल्याला विश्वास असतो. आपण ज्या रस्त्याने चालत असतो त्या रस्त्याने हजारो वाहने जात असतात. त्यातला एकही ड्रायव्हर आपल्या अंगावर गाडी घालून आपल्याला चिरडून ठार मारणार नाही, हा विश्वास आपल्या मनात असतो, म्हणूनच आपण रस्त्यानं निर्धास्तपणे चालू शकतो. कोणत्या तरी इलेक्ट्रिशनने लावलेल्या पंख्याखाली आपण निर्धास्तपणे हवा घेऊ शकतो, कारण त्याच्या कामावर आपण विश्वास टाकलेला असतो. कोणत्याही हॉटेलमध्ये आपण जेव्हा जेवण घेतो तेव्हा तिथल्या आचार्‍याने या अन्नात विष कालवलेलं नाही यावर आपला ठाम विश्वास असतो, नाही का... आपल्या एकूण जगण्यालाच विश्वासाचं अतिष्ठान लागतं.

जसं हे दुसर्‍यांच्या विश्वासावरचं आहे, तसंच अगदी आपल्या स्वतःवरच्या विश्वासाचं आहे. लोक मोठमोठे पराक्रम करतात ते त्यांच्यात शक्ती असते,  बुद्धी असते, म्हणूनच नव्ह,े तर असा काही पराक्रम आपण करू शकतो, असा विश्वास त्यांच्यापाशी असतो, म्हणूनच ते ती गोष्ट करू शकतात. प्रतिस्पर्ध्यावर मात करता येईल हा विश्वास असल्याशिवाय कोणताही खेळाडू मुळात मैदानावर उतरतच नाही. आपल्या जीवनाच्या मैदानावर आपण आयुष्य नावाची खेळ करीत असतो. तेव्हा आपल्याला जगता येईल, आपल्याला आनंदाने जगता येईल,  उत्तम जगता येईल, हा विश्वास आपल्यापाशी असायला हवा.

सावधानता हवीच, पण तरीही इतरांवर विश्वास ठेवायला. जग विश्वासावर चालतं.





गोष्टीची गरज (436)



गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. आपलं बालपण आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यातच गेलं. या गोष्टींमधून आपल्या बालमनावर संस्कार झाले. रात्री झोपण्यापूर्वी आजीच्या कुशीत जावं... आजी गोष्ट सांग ना, म्हणून तिला आग्रह करावा आणि मग आजीने रोज नवी गोष्ट सांगावी असे ते दिवस होते. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मुलांच्या जगण्यातली गोष्ट हरवली.

आटपाट नगर होतं... किंवा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या... किंवा कोणे एके काळी असं घडलं... असं म्हणून सुरू होणारी गोष्ट... त्यात आमची पिढी रमली आणि रमतगमत मोठी झाली. आज मात्र गोष्ट आपल्या आयुष्यातून हद्दपार झाली की काय, असं वाटावं अशी स्थिती आहे

यू-ट्युबसारख्या माध्यमातून खरेतर आता आपल्याला हव्या तेवढ्या गोष्टी ऐकायला आणि ऐकवायला मिळू शकतात. तिला ओलाव्याचा अभाव असला तरी तिथे ती उपलब्ध आहे. पण ‘गोष्ट’ ही महत्त्वाची गोष्ट आहे हेच कदाचित आपण अलीकडच्या काळात विसरून गेलो आहोत.

मुलांसाठी काम करीत असताना  ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखादी गोष्ट सांगू लागलो की, मुलं आणखी सांगा म्हणतात. मला ते शक्य नसतं, पण वाईट वाटत राहतं की, ही मुलं गोष्टीची उपाशी आहेत. म्हणूनच गेली काही वर्षे ‘आम्हालाही मुलांसाठी काही करायचं आहे’, असे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो, जवळच्या शाळेत जा आणि मुलांना गोष्टी सांगा.

गोष्ट ऐकायला फक्त मुलांनाच आवडते असं नाही, मोठ्या माणसांनाही गोष्टी आवडतात. म्हणूनच तर कथा-कादंबर्‍याचा वाचकवर्ग मोठा आहे. कथाकथनाचे कार्यक्रमही होत असतात. आपल्याकडे त्याची मोठी परंपरा आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘कथा-कट्टा’ एक नावाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला. कथाकट्टा हा एक असा उपक्रम आहे, जो भाषा वाचवू पाहतो आहे. या लोकांना आपल्या सगळ्या प्रादेशिक भाषा जिवंत राहाव्यात, असं वाटतं. आणि भाषांचं रक्षण करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी कथाकथनाला सुरुवात केली आहे. जागोजागी जाऊन हे लोक लोकांना गोष्टी सांगतात. त्यातलाच एक कथाकथनाचा कार्यक्रम मला ऐकायला मिळाला. त्यांच्यातली एक कथाकथनकर्ती म्हणाली, भाषा जतन करण्याचा हा एक उत्तम मार्ग म्हणून आम्ही हा उपक्रम चालवतो आहोत.

खरं तर आपणही आपल्या भाषेसाठी आणि आपल्या लोकांसाठी असे कथाकथनाचे छोटे-मोठे प्रयोग करू शकतो. आपल्याकडे कथालेखनाची मोठी परंपरा आहे. आजही अनेक सशक्त कथाकार कथा लिहीत आहेत. त्यातल्या कथा घेऊन त्यांचे अभिवाचन केलं तर लोकांना ते नक्कीच आवडेल. आपल्या महाविद्यालयांनी, विविध सांस्कृतिक संस्थांनी... एवढेच काय आपल्या सोसायट्यांनीही असा एखादा वाचकांचा गट करून कथा सांगायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सांगणारे आले की ऐकणार येतीलच. मग त्या कथेच्या निमित्तानं आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं जगणं टिकून राहील. प्रवाही होईल. संवर्धित होईल. आपल्या भाषा आणि जगणे इंग्रजी-हिंदीच्या रेट्यखाली चिरडून जाऊ नये यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यातली ही एक अत्यंत चांगली, लोकांना हमखास आवडणारी आणि भाषा टिकवून ठेवायला अधिक सोयीस्कर ठरणारी गोष्ट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कथा सांगू या. ऐकू या. त्यामुळे आपली संस्कृतीच केवळ टिकणार नाही तर तिच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातील. तिच्यात कथा पुन्हा पुन्हा घडत राहतील. आपल्यासाठी आणि आपल्या येणार्‍या पिढीसाठी ते फारच मोलाचे असेल.

Monday, November 18, 2019

काही लेख

तुमचा मुलगा खेळतो काय? (17.11.2019)

आता चाळीशीत असलेल्या पिढीला बालपणाच्या ज्या आठवणी आठवतात, त्यातली एक आठवण सगळ्यांनाच आठवत असते. मैदानावर क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लगोरी, लंगडी, हुतुतू असा कोणता तरी खेळ रंगात आला आहे आणि आपली आई आपल्याला ओरडून-ओरडून घरी बोलावते आहे. आपल्या मनात अजूनही खेळत राहण्याची इच्छा आहे आणि आई मात्र अरे पुरे झाले, तासनतास नुसते खेळत राहणार आहेस का, असे म्हणते आहे. आता मात्र घराघरात गेलात तर अरे पुरे झाले, किती तास खेळणार आहेस, हेच वाक्य आईच्या तोंडून पुन्हा-पुन्हा उच्चारले जात असल्याचे ऐकायला येईल. फरक एवढाच आहे की, आता हे वाक्य आई घरातच उच्चारते. घरातच मोबाईलवर तासन्-तास बसून खेळणार्‍या मुलाला उद्देशून. परवा एक आई मुलाला दम देऊन घराबाहेर खेळायला पाठवताना पाहिली आणि एकदम एक विलक्षण गोष्ट लक्षात आली. मैदानावरून घरात न येणारी आमची पिढी आता इतिहासजमा झाली आहे आणि स्मार्टफोनच्या नादामुळे मैदानावरच न जाणारी एक नवी पिढी जन्माला आली आहे. वयाची तिशी पार करेपर्यंत मागच्या पिढीची पोटे खपाटीला गेलेली असत आणि आज सात-आठ-नऊ वर्षांच्या मुलांच्या पोटाला घड्या पडलेल्या दिसतात. त्या या बदललेल्या जीवनशैलीमुळे होय.
व्यायामाचे महत्त्व, शारीरिक हालचालीचे महत्त्व मागच्या पिढीला समजावून सांगावे लागले नाही. नव्या पिढीतील मुलांना मात्र, ‘अरे! किमान हला की रे’, असे सांगण्याची वेळ आली आहे. विशेषतः शहरांमध्ये जी गुबगुबीत बाळे आणि मुले दिसत आहेत. आरोग्यासाठी हे हितकर नाही. लहान मुलांनी व्यायाम करण्याची अपेक्षा नाही. त्यांचे शरीर लवचिक व्हावे आणि शरीरावर मेद साचू नये यासाठी त्यांनी खेळणे अपेक्षित आहे. मैदानी खेळांमधून आपसूकच जितका व्यायाम होतो, तेवढा मुलांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे मुले काटक आणि बळकट बनतात. मैदानावरील खेळ माणसाच्या शरीराला जसे ताजेपणा देतात तसेच माणसाचे मनसुद्धा ताजेतवाने करतात. मैदानी खेळामुळे मनोधैर्य वाढीस लागते,  चिकाटी निर्माण होते, खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि हे गुण मग पुढील आयुष्यात उपयोगी पडतात. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना आणि नेतृत्वगुण यांना वाव मिळतो. त्यांचा विकास होतो. पुढील आयुष्यात त्याचा मोठा उपयोग होत असतो.
फार पूर्वीपासून मानव खेळ खेळत आलेला आहे. शिकार, कुस्ती, कवड्या, सोंगट्या, फासे, धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, मुष्टियुद्ध असे नाना प्रकारचे खेळ जगाच्या पाठीवर माणूस वर्षानुवर्षे खेळत आलेला आहे. अलीकडच्या काळात एकूण जगाचे सपाटीकरण झाले आहे. त्यात आपण आपल्या कितीतरी गोष्टी हरवून बसलो आहोत. आज जगभरात स्मार्टफोनमुळे मोबाईल गेमचे प्रमाण इतके वाढले आहे की, मोबाईल गेमने जवळपास सगळ्या देशातले देशी खेळ संपवायला आणले आहेत की काय, असे वाटावे अशी स्थिती आहे.
आधुनिक शिक्षणशास्त्रात खेळाचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. खेळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात विशेष तासिका असतात. मात्र असे असले तरी आपल्याकडे खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. त्यामुळे या तासांमध्ये उर्वरित अभ्यासक्रम भरून काढण्याकडे बहुतांश शाळांचा कल असतो. त्यात अलीकडेच शहरांमध्ये अनेक शाळांना मैदानेच नाहीत. त्यामुळे मैदानी खेळापासून मुले दुर्दैवाने दूर राहतात. अनेक सोसायट्यांनासुद्धा मैदाने नाहीत. त्यामुळे सोसायट्यांच्या आवारात मैदानी खेळ खेळणे शक्य होत नाही. अनेक ठिकाणी मैदाने आहेत, पण दुर्दैवाने ती गाड्या पार्क करण्यासाठी वापरली जातात. परिणामी आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध होत नाहीत. विविध पातळ्यांवर खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. चांगल्या खेळाडूंना शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. मात्र असे असतानाही एकूण समाजात मैदानी खेळाचे प्रमाण जितके असायला हवे तितके नाही.
आपल्याकडे क्रिकेटचे मोठे वेड आहे. मात्र हे वेड असलेले निम्म्याहून अधिक लोक कधीही क्रिकेट खेळत नाहीत. त्यांचे क्रिकेटवेड हे क्रिकेटचे सामने टीव्हीवर पाहणे आणि क्रिकेटविषयी बातम्या वाचणे इतक्यापुरतेच मर्यादित असते. दुसर्‍याचा खेळ पाहत राहण्यात फक्त मनोरंजन होऊ शकते. त्यातून शरीर आणि मनाला फार मोठा फायदा होत नसतो. क्रिकेट पाहणे हे मनोरंजनाचे साधन आहे. मात्र अलीकडे अनेकांच्या बाबतीत ते मनोरंजन राहण्यापेक्षा व्यसनच झालेले दिसते. क्रिकेटचे सामने सुरू झाले म्हणजे अनेक जण कामाला दांड्या मारून ते पाहात राहतात हे आपण अनेकदा पाहिलेले आहे. याचाच परिणाम मुलांवर होत असतो.
एकूणच मैदानी खेळांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कालसुसंगत नाही. आपल्याला खेळांची केवढी आवश्यकता आहे हे आपण जाणले नाही. आपला मुलगा खेळतो काय, हे आपण पाहत नाही. त्यांनी खेळावे म्हणून आपण काही प्रयत्न करतोय, असे दिसत नाही. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे माणसाच्या मनावर प्रचंड ताण असतो. आपल्या मुलांना या नव्या युगात जगायला शिकवायचे असेल तर त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर केले पाहिजे. मैदानी खेळ हे मानसिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. आजकाल आपल्या आहारातही फार मोठे बदल झाले आहेत. आपली नवी पिढी जंकफुडच्या आहारी गेलेली दिसते. एकदा तुम्ही मैदानी खेळ खेळायला लागलात, म्हणजे तुम्ही नकळतपणे आहाराविषयी दक्ष व्हायला लागता. आजही मैदानी खेळ खेळणार्‍या कोणत्याही खेळाडूकडे गेलात तर त्यांच्या आहारात जंकफूडचे प्रमाण फारच कमी असल्याचे तुमच्या सहज लक्षात येईल. पौष्टिक आहार शरीराला गरजेचा असतो ही बाब खेळाडूंच्या मनावर नकळतपणे बिंबवली जात असते. जंकफुडमुळे होणारे अनेक आजार खेळाडूंपासून चार हात लांब राहतात हे वेगळे सांगायला नको.
मैदानी खेळांच्या याच विविध फायद्यांमुळे आपला मुलगा खेळतो काय? असा प्रश्न विचारावासा वाटतोपण त्याचे उत्तर नाही, असे असेल तर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.



‘सँडवीच’पद्धतीमुळे संबंध सुधारतील (16.11.2019)

काही काही माणसांची शिकवण्याची हातोटी एकदम विलक्षण असते. झेनकथा ज्यांना माहीत असतील त्यांना झेनगुरूंची अनुभव देऊन शिकविण्याची हातोटी माहीत असेलच. एकाहून एक अफलातून झेनकथा आपल्याला अचंबित करून सोडतात. अलीकडे रोजच्या खाण्यातील सँडविच या पदार्थाच्या उदाहरणातून एक महत्त्वाची शिकवण देणारा एक किस्सा कळला. मोठा अफलातून किस्सा आहे हा. आपण आचरणात आणावा आणि आपल्या मित्रांनाही आचरणात आणायला सांगावा असा.
सँडविच हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही वेळी खाता येणारा असा पदार्थ आहे. पुन्हा आरोग्यासाठी उत्तम. सहज करता येणारा. ज्यांना आपल्या स्वतःसाठी जेवण करता येत नाही, त्यांनी किमान सँडविच करणे शिकून घेतले पाहिजे. सँडविच करणे अत्यंत सोपे आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम. स्लाईस ब्रेडचा तुकडा घेतला, त्यावर तुम्हाला हवे ते पदार्थ एकावर एक ठेवले. पुन्हा दुसरा एक स्लाईस ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर ठेवला. चटणी घाला व सॉस घातला की सँडविच तयार होते. सँडविच प्रत्येकाला करता यायला हवे. म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. अर्थात हे सँडविच करा, हे सांगण्याचा इथे हेतू नाही. मला त्या पुढे जाऊन काहीतरी वेगळेच सांगायचे आहे. अर्थात हे सारे आमच्या पदरचे नाही, पण आम्हाला भावलेले,  विचारमंथनाला प्रवृत्त करणारे आहे. इतरांनाही हे सांगायला हवे, असे सतत वाटायला लावणारे आहे.
आम्ही अनेकदा युट्युबवर अनेकांची मोटिव्हेेशनल भाषणे ऐकत असतो. असेच एकदा आम्हाला एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्यातील सँडविचचा उल्लेख आम्हाला खूपच आवडला. त्यात उत्तम बोलण्याचे मार्ग सुचविणार्‍या वक्त्याने त्यात छान मार्गदर्शन केले आहे. कोणाचीही उगाचच निंदा करू नका, चार चौघांत तर नक्कीच करू नका. गरज असल्यास त्या माणसाला एका बाजूला घेऊन त्याबद्दल त्याला माहिती द्या. तसे केल्याने तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याबाबत त्या माणसाच्या मनात शत्रुत्व निर्माण होते असे याचे म्हणणे आहे.
जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायची असेल तर सँडविच करायला शिका. तुम्हाला एखाद्याची जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट चांगली नाही, असे वाटते, ती त्याला सांगण्यापूर्वी चांगल्या गोष्टींच्या मध्ये घालून सांगा. म्हणजे आधी त्याच्या बोलण्यातील, त्याच्या विचारातील चांगली गोष्ट सांगा, मग त्याला चुकीची गोष्ट सांगा आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगून तुमच्या बोलण्याचा समारोप करा. या प्रकारे जर तुम्ही सँडविचमध्ये घालून एखाद्याला त्याची चूक दाखवून दिलीत तर ती चूक ऐकणार्‍यालाही सुधारावीशी वाटते. सुधारण्याची शक्यता वाढते. शिवाय तुमच्यासोबत शत्रुत्व निर्माण होत नाही
ही गोष्ट अगदीच छोटी आहे, हेही आम्हाला माहीत आहे. पण छोटी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. जसे की सँडविच हे जेवण नव्हे, तो संपूर्ण आहार नव्हे, पण तरीही भुकेच्या वेळेला अन्य काही मिळत नसताना सँडविच हा एक अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे. तसेच हा छोटा विचार अत्यंत कामाचा आहे. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात तो अवलंबून पाहा.
काही वेळेला स्पष्ट बोलावे लागते. शाळेत मुलांना रागावणे, कर्मचार्‍यांशी रागाने बोलणे हे ते काम साध्य करण्यासाठी आवश्यक तरी असते. पण अनेकदा नातेवाईक, मित्र आणि शेजारी यांच्याशी बोलताना आपण उगाचच अयोग्य भाषा वापरतो. मग माणसे तुटतात. अनेकदा आपण माणसांना उगाचच दुखावत असतो, तर अनेकदा चांगला सल्ला दिला असताना माणसं दुखावली जातात. या सँडवीच पद्धतीमुळे तुमचे मानवी संबंध सुधारतील. मित्र वाढतील. आयुष्य अधिक आनंदी आणि अधिक सुखी होईल.



प्राकृत मराठीमधील पहिला ग्रंथ (15.112019)

मराठी भाषेचा उगम प्राकृत मराठीमधून झाला. त्या प्राकृत मराठीमध्ये लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे ‘गाथासप्‍तशती’ होय. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या चारशे वर्षांच्या काळात सातवाहन राजवट होऊन गेली. त्या राजांपैकी हाल सातवाहन राजाने ‘गाथासप्‍तशती’ हा ग्रंथ सिद्ध केला. राजा हाल सातवाहनाने आपल्या राज्यातील कवींना काव्यरचना करण्याचे आव्हान करून त्यांनी केलेल्या रचना संकलित केल्या. स्वत: काही रचना केल्या आणि त्यातून ‘गाथासप्‍तशती’ हा ग्रंथ सिद्ध झाला. ‘गाणे’ ह्या अर्थी असणार्‍या ‘गै’ ह्या धातूपासून ‘गाथा’ हा शब्द तयार झाला. गाथा हे वृत्त संस्कृतमधील ‘आर्या’ ह्या वृत्तासारखे आहे. गाथावृत्तामुळे ह्या ग्रंथाला ‘गाथासप्‍तशती’ हे नाव पडले. प्रत्येक गीताला गाथा असे म्हटले जाते. सप्‍तशती म्हणजे सातशे श्‍लोक. प्राकृत भाषेतील आद्यग्रंथ म्हणून या ग्रंथात उल्‍लेख केला जातो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या राज्याची राजधानी तेव्हा प्रतिष्ठान नावाने ओळखली जात होती. आजचे पैठण तेच त्यावेळचे
प्रतिष्ठान होय.
सातवाहन राजाने आपल्या राज्याचा विस्तार उत्तरेपर्यंत केला असल्याने त्याच्या गाथासप्‍तशतीचा उल्‍लेख उत्तर भारतातील अनेक ग्रंथांमध्ये सापडतो. संस्कृत कवी बाणभट्ट व राजशेखर यांनी त्यांच्या काव्यग्रंथात ‘गाथासप्‍तशती’चा उल्‍लेख केलेला आहे. या ग्रंथावर सुमारे 18 टीका आहेत. त्यामध्ये कुलनाथ, गंगाधर, पीतांबर, प्रेमराज, भुवनपाल, साधारण देव यांच्या टीका महत्त्वाच्या असून बहुतेक टीकाकारांनी गाथांचे अर्थ शृंगारिक दृष्टिनेच लावले आहेत. या ग्रंथाचे अनुकरण करून प्राकृतमध्ये वज्जालग्ग, गाथासाहस्त्री, संस्कृतमध्ये आर्यासप्‍तशती आणि हिंदीमध्ये बिहारी सतसई अशा रचना झाल्या आहेत.
पाश्‍चात्य जर्मन पंडित वेबर यांच्यापर्यंत ‘गाथासप्‍तशती’ची महती पोहोचली होती. भारतीयांना या गाथा-संकलकाची पहिली ओळख आल्ब्रेख्त फिड्रिख वेबर ह्या थोर जर्मन पंडिताने इ.स. 1881 मध्ये करून दिली. त्यानेच ह्या ‘गाथासप्‍तशती’ची (गाहा सत्तसई) पहिली संपादित प्रत तयार केली.
राजा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा निवडल्या असल्याचा उल्‍लेख ‘गाथासप्‍तशती’मध्ये केला आहे. तो या गाथांचा केवळ संग्राहक-संपादकच नाही तर तो काही गाथांचा कर्ताही आहे. ‘गाथासप्‍तशती’मध्ये दोन-दोन ओळींच्या सातशे गाथा संकलित केलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील त्या काळचे समाजजीवन, कृषिजीवन, ग्रामीण जीवन आणि माणसामाणसांतील भावनांचा आविष्कार या गाथांमध्ये झालेला दिसतो. हाल सातवाहनाने या ग्रंथाचे संकलन आणि संपादन केलेले असल्याने काही अभ्यासक हाल राजाला महाराष्ट्रातील पहिला संपादक म्हणूनसुद्धा गौरवितात.
‘गाथासप्‍तशती’ या काव्यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा परिसर चित्रीत झालेला आहे. मराठवाडा, विदर्भ, गोदावरीचे दोन्ही तीर या परिसरातील समाजजीवन, परंपरा, भाषा, रीतिरिवाज, ग्रामीण संस्कृती आणि मराठी मातीचा गंध या गाथांमध्ये आढळतो. त्या काळच्या समृद्ध ग्रामजीवनाचे चित्रण या गाथांमधून येते. साळी, तूर, कापूस, ताग, हळद इत्यादी पिके, आंबे, जांभूळ, काकडी ही फळे झाडे, पशुपक्षी शिवाय गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा या नद्यांचे उल्‍लेखही ‘गाथासप्‍तशती’मधील अनेक ग्रंथांमध्ये आढळतात.
‘गाथासप्‍तशती’मध्ये ज्या सातशे गाथा आहेत त्या दोन ओळींच्या स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण रचना आहेत. मानवी भावना, मानवी व्यवहार आणि नैसर्गिक दृश्यांचे सुंदर आणि सौंदयपूर्ण चित्रण या गाथांमध्ये केलेले आढळते. स्त्री-पुरुष यांच्यामधील विलासपूर्ण व्यवहार, प्रणय यांचाही विलोभनीय आविष्कार ग्रंथात मोकळेपणाने केलेला आढळतो. विविध व्रते आढळतात. होळीसारख्या उत्सवांचे उल्‍लेख आढळतात.
आज उपलब्ध असलेल्या ‘गाथासप्‍तशती’चे सहा पाठभेद असल्याचे सांगतात. यातल्या काही कथांमध्ये हजार गाथा आहेत, तर त्यातील 430 गाथा या सगळ्या पाठभेदांमध्ये असल्याचे एका अभ्यासकाने म्हटले आहे. काही अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, हाल सातवाहनाने सुंदर सुभाषितांचा एक कोश निर्माण केला, त्यातच पुढे सातशे गाथांचा समावेश झाला आणि त्याचे नाव ‘गाथासप्‍तशती’ असे झाले.
तत्कालीन समाजात आढळणार्‍या स्त्रियांविषयी यातल्या अनेक गाथा आहेत. अनेक गाथा या शृंगाररसप्रधान आहेत. स्त्रीची साध्वी, पतिव्रता, चंचला, कुलटा अशी विविध रूपे या गाथांमधून वर्णन केलेली आहेत.
मराठीतील एक नामवंत कवी राजा बढे यांनी ‘शेफालिका’ नावाने या ग्रंथाचा मराठीत पद्यानुवाद केला आहे. याच पुस्तकात प्रा. अरविंद मंगरूळकर यांनी गद्यानुवाद केला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.


हसायला विसरू नका! (12.11.2019)


‘हसतो तो माणूस’ अशी एक माणसाची व्याख्या आहे. माणूस आनंद झाला म्हणजे हसतो. तो विनोद वाचून हसतो. नाटक-सिनेमा पाहून हसतो. टीव्हीवर कार्यक्रम पाहून हसतो आणि एकमेकांशी बोलताना गंमत करून हसतो. कोणी ओळखीचा दिसला तरी हसतो, कोणी ओळखीचा नसेल तर ओळख काढायला म्हणून हसतो. हसण्यात आनंद आहे. सुख आहे. मन ताजेतवाने करण्याची शक्ती आहे. आजारांपासून बचाव करण्याची शक्तीही या हसण्याच्या आनंदात आहे.
माणसाने विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली, पण आनंदाने जगायचे कसे, याचे उत्तर मात्र विज्ञानतंत्रज्ञानाला देता आलेले नाही. विज्ञानाने सुखसाधने तयार केली, पण सुख निर्माण कसे करायचे हे मात्र विज्ञानाला कळलेले नाही. माणसाने सुख शोधल पाहिजे. त्यासाठी आला क्षण जगून घेऊन हसले पाहिजे. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमध्येे 156 देशांची क्रमवारी लावली आहे. कोणता देश किती आनंदी आहे यावर ही क्रमवारी ठरते. या क्रमवारीत यंदा भारत 7 अंक मागे गेला असून यंदा 140 व्या क्रमांकावर आहे.
अनेक गोष्टीमध्ये पहिल्या पाचदहामध्ये असणारा देश आनंदाच्या क्रमवारीत पहिल्या शंभरातसुद्धा असू नये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्थळकालपरिस्थिती यास कारणीभूत  आहे हे खरेच. पण महान प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या देशात आनंदाने कसे जगावे हेच आता आपल्या माणसांना सांगायची वेळ आली आहे, हे दुर्दैव होय. देशांचा हा आनंदाचा क्रम त्या देशातील नागरिक किती आनंद घेऊ शकतात, यावर अवलंबून असतो. अंतिमता माणसाचे जगणे किती आनंदी आहे हेच महत्त्वाचे, नाही का?
काही काही माणसे सदैव दुर्मुखलेली असतात. ती तशी का असतात कळत नाही. दुःख आणि संकटे तर प्रत्येकाच्याच जीवनात असतात. ती जीवनाची अपरिहार्यता आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, सुख जवापाडे दुःख पर्वताएवढे. तेव्हा जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक असणार हे तर आहेच. पण म्हणून सदासर्वदा चेहरा पाडून बसून
कसे चालेल?
यासंदर्भात काही वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते. एक भिकारी एका साधूकडे भीक मागत असतो. साधू म्हणतो, प्रथम तू मला काहीतरी दे. मग मी तुला काहीतरी देईन. त्यावर आश्चर्यचकित झालेला भिकारी म्हणतो, साधुमहाराज, माझी थट्टा करता काय? माझ्याकडे आहे काय तुम्हाला द्यायला? त्यावर तो तेजस्वी साधू उत्तर देतो, ईश्वराने तुला हसण्याचे सामर्थ्य दिले आहे आणि ते आजही तुझ्यापाशी आहे.
खरे तर भीक मागणार्‍या माणसाकडून गोड हसण्याची अपेक्षा करता येणार नाही किंवा चेहरा पाडल्याशिवाय भीक मिळणार नाही हेही खरे, पण त्या सवयीने भिकारी आपल्याला हसता येते हेच विसरून जातो. हे फक्त भिकार्‍याचेच होते असे नाही. चांगल्या चांगल्या घरातली कमावती माणसेही असे वागू लागतात. माणसाने दुसर्‍यासाठी हसले पाहिजे आणि स्वतःसाठीही हसले पाहिजे.  हसणे ही फक्त माणसाला लाभलेली देणगी आहे. तेच माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. पण आपण तेच विसरून चाललो आहोत. ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे संतांनी लिहून ठेवले आहे. हास्य हे मन प्रसन्न करण्याचे सर्वोत्तम टॉनिक आहे. अनोळखी माणसालाही तुम्ही एक स्मितहास्य करून दाखवलं तर तो त्या क्षणापुरता का होईना तुमचा होऊन राहतो. मग आपली माणसं अधिक जवळ येतील यात शंका आहे का?
हास्याचे नाना प्रकार आहेत. त्यातलं निर्मळ हास्य हेच सर्वोत्तम हास्य होय. विकट हास्य, कुत्सित  हास्य अशा काही हास्यापासून मात्र आपण स्वतःला सदैव दूर ठेवले पाहिजे. लक्षात ठेवा माणसाने हसले पाहिजे. नाहीतर माणसाचं हसू होतं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे किंवा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे किंवा हसते हसते जीना सिखो अशी वचने ऐकणार्‍या आपल्या समाजाला हसायचे कसे हे सांगायला लागू नये. आपल्या आध्यात्मिक परंपरा आणि त्यातला पुनर्जन्म विचार  हा माणसाच्या सुखासाठी जन्माला आलेला आहे, नाही का? म्हणून आम्हा म्हणतो, माणसा,
हसायला विसरू नको!