Monday, September 7, 2020

साखरपा बाजार


साखरपा बाजारपेठ

साखरप्याच्या बाजाराचे बालपणावर मायाजाळ
त्या दिवसांच्या आठवणींनी कातर होते संध्याकाळ// ध्रु//

मासळिच्या बाजारामधली घमघमणारी सुकट सुखी
कबनुरकरच्या वखारीतली त्यावर घालू लाल फकी
कोल्हापुरची भाजी, डेरी, सलूनमधली तशि धमाल //1//

सावकार अन् गांधी यांची भव्य दुकाने गर्दीही
मंजुनाथची मिसळ आगळी खारे जाइल सर्दीही
तिखट तिखट मग म्हणत खायचो होउन आम्ही लालेलाल //2//

नरहरिच्या मंदिरात कोणी विश्रांतीला छान बसे
रहाटावरी पाणी तेथे हवे तेवढे पीत असे
केतकर पोंक्षे थरवळ शेट्ये डंब्याकडचा अस्ली माल //3//

कन्या शाळा गिरिजा मंदिर पोस्ट नि शिंदे  रानभरे
परमिट रुम कासार विजा मारूती अन्  माडीवाले
जुन्या स्टँडवर अंकुशराव नि रेशन दुकान उघडा माळ //4//

गणेश मंदिर खंडकर टेलर पाथ्रेचे पॅटीस अहा
स्टॅण्डवरी शेट्यांचे कॅण्टिन तिथे प्यायचो गरम चहा
स्वस्तातिल डॉक्टर देशपांडे दहा रुपयातच सर्व कमाल//5//

चव्हाट्यावरी बॉम्बे टेलर पुढे विद्येचा होय विकास
नाना शेट्ये वटवृक्षाचा तिथेच होता खुला निवास
अडल्यानडल्याचा नानांनी नेहमीच केला सांभाळ//6//

मांडवकर ओसवाल शिंदे जाधव सारे आठवती
नंदूदाच्या दुकानातल्या मनात जपल्या लख्ख स्मृती
रविवारी तर मजाच नुसती खाऊ खाऊ मस्त धमाल//7//

पोटासाठी गाव सोडले तसाच हा सुटला बाजार
सुटले सगळे मित्र-जिव्हाळे आठवणी पण लाख-हजार
त्या बाजारापुढे फिके रे मुंबईतले ए वन मॉल//8//

- सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके
साखरपा, खंडवाडी.
 संपर्क- 9702 723 652.

No comments:

Post a Comment