असत्याचे प्रयोग
- वैभव चाळके
पूर्वी एकदा विनोदातील कारुण्य पाहून अस्मादिकांचा जीव अगदी हळवा होऊ लागला होता. मग त्यांनी ‘हल्ली विनोद वाचताना डोळे भरून येतात...’ असा लेख लिहिला. आता मात्र अगदी त्याच्या उलट झाले आहे. गंभीर गोष्ट पाहिली म्हणजे अस्मादिकांना हसू यायला लागते. आता हा बेरोजगारीचा चार्ट पाहिला... खरे तर हा चार्ट पाहिला म्हणजे ढसाढसा रडायला हवे... पण अस्मादिकांना मात्र आता हसू आवरेना झाले आहे.
असत्याचेही प्रकार असतात. काही धडधडी असत्ये असतात. वाचणाऱ्याला-ऐकणाऱ्याला ती असत्ये आहेत हे वाचताक्षणी, ऐकताक्षणी लक्षात येते. दुसरा प्रकार आहे अर्धसत्याचा. म्हणजे इथे ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतलेली असते. जे सत्य आहे तेवढे सांगायचे आणि त्यामागे मोठे धडधडीत असत्य लपवायचे, असा हा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे आकडेवारीने सत्याचे रूप पालटून दाखवणे. हा तिसरा प्रकार मोठा भयानक आहे. मोठमोठ्या सत्ता मोठमोठ्या विद्वानांना हाताशी धरून या तिसऱ्या प्रकारचे असत्य लोकांच्या माथी मारत असतात आणि आपला कार्यभाग साधतात.
धडधडीत असत्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. ‘अभ्यास झाला’, ‘मी पहिल्यापासून मेहनती’, ‘आपल्याला नाही बाबा खोटे बोलता येत’ ही सगळी धडधडीत असत्ये आपणच जन्माला घातलेली आहेत, हे काय सांगायला हवे. (‘तुझ्यावर जीव ओवाळून टाकीन’ हे केवढे सुंदर असत्य आहे नाही, का?)
दुसरे अर्धअसत्य असते. महाभारतातील एक युद्धप्रसंग सुप्रसिद्ध आहे. पांडव आणि कौरव यांचे युद्ध टिपेला पोहोचलेले असते. कौरव विजयी होतात की काय अशी स्थिती निर्माण झालेली असते. अश्वत्थामा निकराने लढत असतो. आता तो लवकरच पांडवांवर विजय मिळवणार अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना नेहमी सत्य बोलणाऱ्या धर्मराजालाच खोटे बोलायला सांगितले जाते. तो खोटे बोलणार नाही असे सांगतो, तेव्हा हा दुसरा मार्ग वापरायला सांगितले जातो- वापरायचे ठरते. धर्मराज मोठ्याने आवाज देतो, ‘अश्वत्थामा मेला....!’ पुढे तो ‘नरो वा कुंजरो वा’ असे म्हणतो. म्हणजे माणूस अश्वत्थामा मेला किंवा अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला ते माहीत नाही. हे दुसऱ्या प्रकारचे सत्य होय. हे वरकरणी सत्य असते; पण आपल्या पोटात फार मोठे असत्य लपवत असते. तिसरे असत्य म्हणजे आकडेवरीने सत्याचा भास निर्णाण करणारे असत्य... कलियुगात या तिसऱ्या असत्याला मोठे ‘अच्छे दिन’ आले आहेत.
आता समोर असलेल्या बेरोजगार देशांच्या तक्त्यात भारत जगात सोळाव्या क्रमांकावर आहे. आपल्यापेक्षा शेजारी गरीब असला की आपले दिवस बरे जातात, त्या न्यायाने या यादीने दिलासा दिला. अन्यथा नाक्यानाक्यांवर बेरोजगारांच्या फौजा मोबाईल युद्धे खेळण्यात दंग झालेल्या आपण रोज पाहतो आहोत. परवा एक जण म्हणाला, मोबाईलमुळे एक झाले... शिकलेली मुले बिझी राहत आहेत. (कशात ते विचारू नका, असेही तो म्हणाला... पण ‘नरो वा कुंजरो वा’च्या पट्टीत) बालकृष्ण शेषनागावर उभा असावा तसा माझा देश मला उपरोक्त देशांच्या माथ्यावर उभा असलेला दिसू लागला. गंमत म्हणजे इटली आपल्यासोबत एकाच स्थानावर आहे. युवराज 'बेकार' असल्याने दोन्हीकडे एकच आकडा असावा काय, असा प्रश्न पडून गेला.
भारतात ७.८ टक्के बेरोजगारी असल्याचे हा तक्ता सांगतो. अर्थशास्त्रात अर्धबेकारी, सुप्त बेकारी असे प्रकार आहेत, त्याबद्दल यात माहिती मिळत नाही. मी याबद्दल आमच्या विद्याधर काकांना विचारले, तर म्हणाले, रेशन मिळाल्याने अनेक जण खूश आहेत, त्याबद्दलही माहिती नाही त्यात. मला हे पक्के पटले. पण हसूही आले. काका काही सांगितले की ‘मोदी बचाव’ भूमिकेत घुसतात. मागे एकदा वल्लभभाईंच्या सर्वांत उंच पुतळ्याची देशाला गरज होती काय, अशी चर्चा सुरू असताना काका म्हणाले, सगळ्या गोष्टी गरजेसाठी करायचा नसतात. (देशात करोडो तरुण बेकार असताना काकांना जी गरजेपेक्षा अधिक पेन्शन मिळते, ती गरज नसताना मिळते आहे, असे आम्हा सगळ्यांचेच मत असल्याचे आम्ही त्यांना अद्याप सांगितलेले नाही.)
नायजेरियामध्ये जगात सर्वाधिक बेकारी असल्याचे हा चार्ट दाखवतो. 33.3 टक्के इतकी बेकारी या देशात आहे. आपल्याकडे मुंबईच्या परिघावर गेली काही वर्षे नायजेरियन लोक मोठ्या प्रमाणावर दिसत आले आहेत. त्या बेकारीचा हा परिणाम असल्याचे हा तक्ता पाहिल्यावर लक्षात आले. मात्र आडदांड शरीरयष्टीच्या या लोकांपैकी एकालाही मेहनतीचे काम करताना कधी पाहिले नाही. पुढे ऑनलाईन फसवणुकीला आपण त्यांना जबाबदार धरायला लागलो होतो. मात्र ‘जमतारा’ चित्रपट आल्यावर ते सारे महान कार्य आपलेच देशबांधव करत असल्याची माहिती पुढे आली. प्रशिक्षक तिकडून मागवले होते का याची कल्पना नाही.
स्पेन आणि ग्रीस या दोन देशांत आपल्यापेक्षा अधिक बेकारी असल्याचे पाहून जीव सुखावला. आजवर या देशांची नुसती नावे घेतली तरी छाती दडपत असे. आता जर मला कोणी या देशातला नागरिक भेटला तर मी त्याला या एका मुद्द्यावर तरी शरम वाटायला लावू शकतो, याचा मला अत्यंत आनंद झाला. (उभ्या आयुष्यात मी कधी स्पेन आणि ग्रीसचा माणूस पाहिलेला नाही. पुढे तसा योग येण्याचाही संभव कमी असला तरी असली वाक्ये मनाला आणि लेखनाला उभारी देतात, हे लक्षात घ्यावे या ठिकाणी.)
गेले वर्षभराहून अधिक काळ युद्धाला तोंड देणाऱ्या युक्रेनमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर बेकारी आहे. अखंड युद्ध सुरू असल्याने देशात प्रचंड काम उपलब्ध झाले आहे; मात्र मोबदला मिळत नसल्याने बेकारी वाढली असावी, असे मला वाटून गेले. रोजगार हमी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे; मात्र सरकारकडे पैसे नाहीत आणि रोजगार हमीत बेकारी दूर करण्याची क्षमता नसल्याचे त्यांना रोजगार हमी योजनेच्या जन्मप्रदेशातच आढळल्याचे कोणीतरी सांगितल्याचे कळते.
शेअर मार्केटच्या तक्त्यांइतकेच हे तक्ते ‘खरे’ आणि ‘उप-योगा’चे असतात, एवढे नोंदवून सावध करतो.
No comments:
Post a Comment