Monday, September 25, 2023

कसदार लेखक सीताराम सावंत

 कसदार लेखक सीताराम सावंत


लेखक बदलत्या समाजमनाचा कानोसा घेत असतो आणि आपल्या साहित्यातून त्याची मांडणी करत असतो. मानवी जीवन अधिकाधिक सुखी व्हावे, यासाठी त्याच्या जीवनातील समस्यांचा वेध घेऊन भविष्याविषयी भाष्य करण्याची मोठी कामगिरी लेखक करीत असतो. लेखकाचे ते एक आद्यकर्तव्यच असते. अशा गंभीर वृत्तीने लेखन करणारे अलीकडच्या मोजक्या लेखकांपैकी सीताराम सावंत हे एक महत्त्वाचे नाव होय. बदलते ग्रामीण वास्तव आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अचूक टिपणाऱ्या आजच्या या आघाडीच्या लेखकास अलीकडेच भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा श्रेष्ठ गद्यलेखक ना. धों. महानोर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने हा लेखक आणि त्याचे लेखन सर्वदूर पोहोचण्यास नक्कीच मदत होईल.
सोलापूर जिल्ह्यात सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सीमाभागात असलेल्या इटकी गावात सीताराम सावंत यांचे बालपण गेले. तिथेच प्राथमिक शिक्षण झाल्यावर आटपाडी येथे जाऊन त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बी. ई. अर्थात अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. साधारण याच काळात आपल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून त्यांना एक गोष्ट सुचली आणि त्यांनी ती जमेल तशी लिहून काढली. तो काळ दैनिकांच्या जिल्हा पुरवण्यांमध्ये कथा छापून येण्याचा आणि कथास्पर्धांचा होता. त्यामुळे या पहिल्या कथेनंतर त्यांनी एका दिवाळी अंकाच्या स्पर्धेसाठी कथा पाठवली आणि तिला दुसरा क्रमांक मिळाला. नवलेखकासाठी ते मोठे प्रोत्साहनच होते. या स्पर्धेनंतर त्यांनी आणखी एक कथा लिहिली आणि मराठीचे जाणकार म्हणून एका शिक्षकाला दाखवली तर त्यांनी ‘हे कोठून कॉपी करून आणले आहे?’ असा प्रश्न केला. या प्रश्नामुळे दुखावलेल्या सावंत यांनी रागाच्या भरात आणखी कथा लिहिल्या. त्या काळात बेकायदा असूनही उघड उघड गर्भपात होत होते. त्या विषयावर त्यांनी लिहिलेली कथा सातारा आकाशवाणीला पाठवली. तिथे त्या कथेचे नाटिका रूपात सादरीकरण झाले आणि त्याचे मानधनही मिळाले. मग याच काळात म्हणजे २००४ च्या आसपास सावंत यांनी थेट ‘नामदार’ नावाची कादंबरीच लिहून टाकली. आता मागे वळून पाहताना ते म्हणतात… त्या सगळ्या लेखनात दर्जा नावाची गोष्ट नव्हती. उत्साहाने केलेले ते सर्व लेखन होते. साहित्यिकदृष्ट्या ते सारेच गौण स्वरूपाचे लेखन होते.
प्रा. शंकर बोऱ्हाडे आणि कवी संतोष पवार या जाणकारांच्या सहवासात आल्यावर सावंत साहित्याचा अधिक गांभीर्याने वाचन करू लागले. मराठीतल्या उत्तमोत्तम नियतकालिकांचे सभासद झाले. खऱ्या अर्थाने त्यांची साहित्यिक वाटचाल सुरू झाली. झपाट्याने वाचन करत त्यांनी मराठी साहित्याची परंपरा आणि समकाल समजून घेतला. त्याचे फलित म्हणजे त्यांची बदललेल्या ग्रामीण वास्तवाचा वेध घेणारी ‘देशोधडी’ ही कादंबरी वाचक आणि समीक्षकांच्याही पसंतीला उतरली. सावंत यांचे साहित्यक्षेत्रात एक गंभीर लेखक म्हणून नाव होऊ लागले. पोटापाण्यासाठी खेड्यातले लोक शहरात जाऊन राहू लागले आणि शहरातील गावगाडा त्यामुळे कसा बाधित झाला, याचे वर्णन या कादंबरीत आले आहे. त्यानंतर त्यांची ‘भुई भुई ठाव दे’ हा कथासंग्रह आला. शहरालगतच्या खेडेगावातील संस्कृती शहराच्या वाढीसोबत कशी लोप पावते, शहर आजूबाजूची गावे कसे गिळंकृत करत जाते, याचे वर्णन या कादंबरीमध्ये आहे. म्हणता म्हणता शेतकरी आणि शेतमजूर कसे गायब होत गेले, याचा संवेदनशील वृत्तांत त्यांनी या कादंबरीत मांडला आहे. या पुस्तकाने त्यांच्याकडून अपेक्षा आणखी वाढवल्या. साहित्यक्षेत्रात या पुस्तकाची चांगली चर्चा झाली.
राजन गवस, रंगनाथ पठारे, श्रीकांत देशमुख या समकालीन साहित्यिकांनी वेळोवेळी दिलेली दाद आणि परखडपणे केलेली टीका आपल्या साहित्यिक प्रवासाला उपकारक ठरली, असे सावंत मानत आले आहेत. विशेषतः श्रीकांत देशमुख यांनी जी रोखठोक मते मांडली ती आपल्याला चुका सुधारून पुढे जाण्यास कामी आल्याचे ते मानतात.
‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा त्यांचा एक महत्त्वाचा कथासंग्रह. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सीताराम सावंत यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले आहे. कन्येच्या विवाहात त्यांनी ‘काव्यार्थ’ नावाचा समकालीन कवींचा प्राथमिक कवितासंग्रह संपादन करून त्याचे वाटप केले. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दिलेल्या पुरस्कारामुळे आता दडपण आणि जबाबदारी वाढली आहे, असे सावंत सांगतात. सीताराम सावंत यांच्या रूपाने एक कसदार लेखक मराठीला लाभला आहे. 
(25.9.23 रोजी दैनिक सकाळमध्ये संपादकीय पानावर प्रकाशित)

No comments:

Post a Comment