Thursday, December 28, 2023

तरुणांसाठी तुकाराम...................... आकाशवाणीसाठी लिहिलेले लेख

 तरुणांसाठी तुकाराम


संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायासह सारे जण जगद्गुरू असे संबोधत आले आहेत. गुरू म्हणजे आपल्या आकलनापलीकडच्या गोष्टी सुलभ करून आपल्या जीवनाला नवा मार्ग देणारा मार्गदर्शक होय. त्याच्या म्हणण्यावर आपण निःसंशय विसंबून राहू शकतो. तुकोबांची शेकडो वचने लाखो जणांना कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, हे सांगत आली आहेत. अगदी सुरुवातीच्या काळापासून पाठ्यपुस्तकातून आपल्याला तुकोबांच्या अभंगांचा परिचय होतो. मात्र त्यानंतरचा उमेदीचा काळ आपण तुकोबांना आध्यात्मिक संत म्हणून काहीसे बाजूला ठेवतो. मग वय उताराला लागलं की, पुन्हा एकदा तुकोबांच्या गाथेकडे वळतो. हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण तारुण्याच्या काळात आपल्याला पडणाऱ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे तुकोबाच्या गाथेत आढळतात, असं म्हटलं तर ते अनेकांना खरं वाटणार नाही. पण त्याचा अनुभव घेतला तर हे विधान निःसंशय सत्य आहे, हे लक्षात येईल. आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरतील, असे अभंग गाथेत सापडतात का, असा शोध घेऊन एखादे पुस्तकच लिहिता येईल.
तुकारामांच्या एका अभंगात ते म्हणतात,
शेत आले सुगी... सांभाळावे चारी कोन... पीक आले परी... केले पाहिजे जतन...
शेत सुगी आली की चारी बाजूनं सांभाळावं लागतं. आलेलं पीक जतन करून जोपासून ते वेळीच घरात आणावं लागतं. तसं केलं नाही तर शेतकऱ्याच्या साऱ्याच मेहनतीवर पाणी फिरतं, असे सांगणाऱ्या या ओळी आहेत. त्यांचा काव्यर्थ, जे जे पीक हाती आलं आहे, ते ते सांभाळून त्याचा उपभोग घेतला पाहिजे, असं सांगतो. तारुण्यात अंगात शक्ती येते. या शक्तीचा उपयोग भल्यासाठी, चांगल्यासाठी करायला हवा; अन्यथा हे शक्तिरूपी पीक म्हणजे तारुण्यातली ताकद भलत्याच कामाला लागण्याची शक्यता असते. म्हणून तरुणांनी या काळात संयमानं, हुशारीनं, चतुराईनं वागून आपल्या जीवनाचे भलं कसं होईल, हे पाहायला हवं, असा संदेश या ओळी देत असतात. तो समजून घेण्याची कुवत कदाचित तरुणांमध्ये नसेल तर ते समजून सांगण्याची जबाबदारी ज्येष्ठ पिढीनं घ्यायला हवी. सुगीच्या पिकावर जशी जनावरं आणि पक्षी येतात आणि नुकसान करतात, तशी मोहरूपी जनावरं तारुण्य नासवायला टपून बसलेली असतात.
तुकारामांचे आणखी एक सुंदर वचन आहे,
करविली तैसी... केली कटकट... वाकडे की नीट... देव जाणे...
तुकाराम महाराज म्हणतात, मी मला जसं जमलं तसं देवाचं भजन केलं आहे, ते योग्य की अयोग्य ते देव जाणतो. ते मला माहीत नाही. मी मात्र हे मनापासून केलं आहे. तरुणांनी आपल्या हाती घेतलेलं काम आपल्या परीनं चोख करायला हवं. अनुभव आणि ज्ञानाच्या मर्यादा असल्यामुळे कदाचित ते काम सुयोग्य आणि ज्याला आपण शतप्रतिशत योग्य म्हणतो, तसं होईलच असं नाही; पण तसं एखादं काम होत नाही म्हणून ते न करताच सोडून देणे, हे तारुण्याला शोभणारं नाही. तारुण्यात आपल्या परीनं जीव ओतून तऱ्हेतऱ्हेची कामं करत राहिले पाहिजे. त्यातूनच नवं काही करण्याची ऊर्मी पुन्हा पुन्हा निर्माण होत राहते. त्यातून कधीतरी नवं काहीतरी साध्य होऊ शकतं. गीतेत भगवंत म्हणतात, हाती घेतलेल्या कर्मात दोष आहे म्हणून ते त्यागू नये. सर्वच कामात प्रारंभी दोष असतात. तुकाराम हेच सांगतात.
त्यागाचं, कष्टाचं महत्त्वही तुकाराम अचूक सांगतात...
एका बिजा केला नास... मग भोगिले कणीस...
अलीकडे मुले पास्टफूड आणि अवेळीच्या खाण्यामुळे आपल्या आरोग्यशीच खेळत असतात. अशांना तुकारामांचे पुढील वचन वारंवार ऐकवलं पाहिजे...
काही नित्यनेमाविण... अन्न खाय तोचि श्वान
अशी कितीतरी वचनं आहेत. शोधा म्हणजे सापडतील.

...
तिसऱ्या असत्यापासून सावधान!

असत्याचेही प्रकार असतात. काही धडधडी असत्ये असतात. वाचणाऱ्याला-ऐकणाऱ्याला ती असत्ये आहेत हे वाचताक्षणी, ऐकताक्षणी लक्षात येतं. दुसरा प्रकार आहे अर्धसत्याचा. म्हणजे इथे ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतलेली असते. जे सत्य आहे तेवढं सांगायचं आणि त्यामागे मोठं धडधडीत असत्य लपवायचं, असा हा प्रकार आहे.
धडधडीत असत्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. ‘अभ्यास झाला’,  ‘मी पहिल्यापासून मेहनती’,  ‘आपल्याला नाही बाबा खोटं बोलता येत’ अशी  धडधडीत असत्ये आपण अनेकदा जन्माला घातलेली आहेत, हे काय सांगायला हवं.
दुसरं असतं अर्धअसत्य. ते सत्य म्हणून खपवलं जातं. पुढे जाऊन असं म्हणता येईल की, ते खपवण्यासाठीच जन्माला घातलं जातं. महाभारतातील एक युद्धप्रसंग सुप्रसिद्ध आहे. पांडव आणि कौरव यांचं युद्ध टिपेला पोहोचलेलं असतं. कौरव विजयी होतात की काय अशी स्थिती निर्माण झालेली असते. अश्वत्थामा निकरानं लढत असतो. आता तो लवकरच पांडवांवर विजय मिळवणार अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना नेहमी सत्य बोलणाऱ्या धर्मराजालाच खोटं बोलायला सांगितलं जातं. तो खोटं बोलणार नाही. असं सांगतो, तेव्हा हा दुसरा मार्ग वापरायचं ठरतं. धर्मराज मोठ्यानं आवाज देतो, ‘अश्वत्थामा मेला....!’ पुढे तो ‘नरो वा कुंजरो वा’ असं म्हणतो. म्हणजे माणूस अश्वत्थामा मेला किंवा अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला ते माहीत नाही. हे अर्धअसत्य होय. हे वरकरणी सत्य असतं; पण आपल्या पोटात फार मोठं असत्य लपवत असतं.
तिसरे असत्य म्हणजे आकडेवरीनं सत्याचा भास निर्माण करणारं असत्य... कलियुगात या तिसऱ्या असत्याला चांगले दिवस आले आहेत.
या तिसऱ्या असत्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे.
ह असत्या आपल्या वाटेत अनेकदा येत असतं.
तऱ्हेतऱ्हेच्या आॅफर घऊन येणारे लोक हे तिसरं असत्य बाळगून असतात. ते त्यांचं हत्यारच असतं. या हत्यारानं ते रोज कुणा ना कुणाला जखमी करत असतात. अनेकांना कायमचं अधू- अपंग करून टाकतात.
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं एक काव्यात्म वाक्य आहे. त्या चालीवर प्रत्यक्षाहून तक्ता संुदर अशी या असत्याची गत असते.
शेअर मार्केमध्ये गुमतवणूक करा सांगणारे.... पैसे दुप्पट-तिप्पट करू सांगणाऱ्या कंपन्या... आपला माल तुमच्या गळी उतरवताना तुम्हाला सोयीचे तक्ते दाखवणारे अनेक जण या तिसऱ्या असत्याचा अधार घेत असतात.
म्हणून कोणीही तक्त दाखवू लागले की सावध झालं पाहिजे. फिल्टर लावून काढलेल्या छायाचित्रापेक्षा प्रत्यक्ष व्यक्ती वेगळी असते, तसाच हा प्रकार असतो. म्हणून कोणीही तक्ता दाखवला की त्या विषयावरचे अनेक तक्ते पाहून खात्री करा... सहज मिळालेल्या तक्त्यावर विसंबून पावलं उचलाल, तर घात ठरलेलाच आहे, हे लक्षात घ्या.   
अगदीच ढोबळ उदाहरण द्यायचं तर शेअर बाजाराचा निर्देशांक सतत वाढतच असतो. त्याचे कोट्यवधी तक्ते दाखवता येतील, पण या सततच्या वाढीत तो अधूनमधून झुकून शहण्यांना नमस्कार करतो आणि कधीकधी शहण्यांसह साऱ्यांनाच सोबत घेऊन धारातीर्थी पडतो, हे कटू सत्य हे तक्ते दाखवत नसतात. म्हणून मग आपला गैरसमज होतो.

...
शुद्ध हवेसाठी...

हवेचा स्तर दरवर्षी खालवतो आहे. दिवाळीपूर्वी मुंबईच्या हवेतील प्रदूषणानं उच्चांकी पातळी गाठली होती. त्यामुळे अनेकांना श्वसनाच्या विकारानं ग्रासलं. खडबडून जागा झालेल्या प्रशासनानं मग नानाविध उपाययोजना हाती घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून हवेचा स्तर सुधारला. मात्र उच्च न्यायालयानं दिवाळीत फटाक्यांवर कालमर्यादा आणली असताना नागरिकांनी जोरदार फटाकेबाजी करत पुन्हा हवेचं वाटोळं केलं.
अलीकडच्या काळात नानाविध कारणांनी आपलं वातावरण बिघडतं आहे. शहरांमध्ये हिरवळीचा अभाव, मोठ्या प्रमाणात होत असलेली बांधकामं, कारखान्यांतून होणारं प्रदूषण यामुळे जगणं असह्य झालं आहे. खराब हवेत कसं जगावं, हा एक नवाच प्रश्न दिवसेंदिवस उग्र होऊ लागला आहे.
पुराण काळापासून मध्ययुगीन संतपरंपरेपर्यंत आपल्याकडील जाणत्या लोकांनी निसर्गाशी साहचर्य ठेवत जगण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे; पण या पारंपरिक शहाणपणाकडे दुर्लक्ष करून आणि विकासाच्या अतिरेकी कल्पनांना बळी पडून आपण प्रथम निसर्गाचं नुकसान केलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपलंच आरोग्य धोक्यात घातलं आहे. आदर्श जीवनाची भारतीय कल्पना ही पाश्चात्यांच्या कल्पनेहून निराळी आहे, हेच विसरून गेल्यामुळे आपल्यासमोर आता पाश्चात्यासारखेच प्रश्न उभे राहू लागले आहेत. मोठी विद्वत परंपरा लाभलेल्या आपल्या देशाचं हे मोठंच दुर्दैव होय.

वेद-पुराणांपासून आपल्याकडे निसर्गपूजा मांडलेली दिसते. कृषी संस्कृतीत निसर्ग सहजीवन ही अपरिहार्य अशी गोष्ट होती. आजही गाव-खेड्यांतल्या कोणत्याही शेतकऱ्यासोबत एक दिवस घालवला तरी माणूस निसर्गाशी केवढा जोडलेला आहे आणि निसर्गाकडून घेता घेता तो त्याला देण्याची भूमिका कशी सहज वटवत आला आहे, हे लक्षात येईल. आपल्या पाठ्यपुस्तकांतून आपल्यावर हा संस्कार झालेला आहेच. पाठ्यपुस्तकातल्या तुम्हाला आठवणाऱ्या कोणत्याही कविता आणि कोणतेही गद्यवेचे आठवू लागलात, तर तुम्हाला त्यातील निम्म्याहून अधिक हे निसर्ग आणि मानव याच्या साहचर्याचे दर्शन घडवणारे असल्याचं लक्षात येईल. असं असताना आपण निसर्गद्वेष्टे कसे झालो, हा खरे तर संशोधनाचाच विषय आहे. कदाचित खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात अर्थकारणानं आपल्या जगण्याचा ताबा घेतल्यामुळे हे सारं झालं असावं, असं म्हणायला वाव आहे. अर्थात यावर जाणत्याने अधिक प्रकाश टाकायला हवा. एक गोष्ट मात्र खरी आहे, या नव्या बदलांना शरण जाताना आपलंही काही चुकलं आहे. आपण सजगता दाखवली असती किंवा सजगता दाखवणाऱ्या चार दोन एकाकी शिलेदारांना पाठिंबा दिला असता तर आज कदाचित श्वास कोंडण्याची वेळ आपल्यावर आली नसती.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणणारे आपण ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असा जीवनमंत्र घेऊन जगणारे आपण इथवर कसे येऊन ठेपलो याचं आपण चिंतन करायला हवं... आणि नव्या पिढीसाठी हवेत थोडा ऑक्सिजन शिल्लक राहील म्हणून आता तरी आपापल्या परीनं धडपड करायला हवी. अन्यथा कोविड काळात ऑक्सिजन विकत घेऊन जगण्याची वेळ आली आणि तो न मिळाल्यानं काहींना जीव गमावा लागला तशी वेळ उद्या कदाचित आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येऊ शकते. तसं व्हायला नको असेल तर आतच आपण सावध झालं पाहिजे.

हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे मोठमोठे घटक कदाचित आपल्या हाती नसतील. अनेक गोष्टी आपल्या आपल्या कुवतीच्या पलीकडच्या असतील...  तरीही काही गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. एक छोटं पाऊल नक्कीच पुढे टाकू शकतो... फटाक्यांचा मोह तर आपण नक्कीच सोडून शकू... शिवाय सव्वाशे-दीडशे कोटी लोकसंख्येपैकी शंभर कोटी लोकांनी दोन झाडं लावायची ठरवली तरीही दोनशे कोटी झाडं भारतभूमीवर तरारून उभी राहू शकतात. सावध व्हा! श्वास गुदमरण्यापूर्वी सावध व्हा! इतरांना सावध करा... स्वच्छ हवा हा आपला हक्क आहे!


प्रश्न संपलेत! का?
व्याख्यानानिमित्त मी विविध महाविद्यालयांत आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जात असतो. दीड-दोन तासांचं दीर्घ व्याख्यान संपल्यानंतर मी हमखास 'कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा' असं विचारत असतो. व्याख्यानातून सुटून गेलेला एखादा मुद्दा अधिक स्पष्ट करावा, एखाद्याच्या मनात शंका असेल तर तिचं निरसन करावं आणि त्याचसोबत आपल्याला आव्हान देणारा एखादा प्रश्नही श्रोतृवर्गामधून मिळवावा आणि आपल्या अभ्यासाला नवी दिशा मिळावी, हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. पण अनेकदा असा अनुभव येतो की, प्रश्नोत्तरासाठी राखून ठेवलेल्या दहा मिनिटांपैकी पहिली दोन-तीन मिनिटं उलटली की सर्वांचे प्रश्न संपलेले असतात. मग प्रश्न विचारण्यासाठी श्रोत्यांना उद्युक्त करावं लागतं. पुन्हा पुन्हा आवाहन करावं लागतं.
हे असं का होतं याचा विचार केला, तर दोन-तीन कारणं प्रामुख्यानं आढळतात.
एक म्हणजे आपल्याला शाळा-कॉलेजांपासून प्रश्न न विचारण्यासाठीच घडवलं जातं. वर्गात एखाद्या विद्यार्थी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असेल, तर त्याला शांत केलं जातं. खूप प्रश्न विचारल्यास दरडावलं जातं, हे आपलं पाहत आलेलो आहोत. त्यामुळे शक्यतो प्रश्न विचारू नयेत, अशी आपली वृत्ती आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारायचे असतील तर विचार करावा लागतो. आपल्याकडे अनेक लोक ऐकून सोडून द्या, अशा वृत्तीचे असतात. डोक्याला त्रास करून घेऊ नये  असं त्यांचे मत असतं. या लोकांना आपण सोडून दिलं तरी, काही लोक मात्र प्रश्न निर्माण झाले तरी विचारत नाहीत, ते मनात दडवून टाकतात, ते विचारण्याची हिंमत त्यांच्यात नसते, बोलत असताना आपलं काही चुकलं तर काय करावं, आपला अपमान होईल का, अशा शंका त्यांच्या मनात येत असतात. या गटासाठी अनेकदा वक्त्याचा जीव तुटत असतो.
कोणत्याही क्षेत्रात काम करणारा वक्ता हा त्या क्षेत्रातला काही एक अभ्यास केलेला मनुष्य असतो. तो एखाद्या विषयावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकतो. म्हणजे तो विशिष्ट विषय तुम्हाला नेमका कळवा यासाठी प्रयत्न करीत असतो. एखाद्या गोष्टीवर नेमका प्रकाश पाडला गेला नसेल तर प्रश्नोत्तराच्या निमित्तानं तो पुन्हा त्या विषयावर अधिक विवेचन करू शकतो आणि अंधकारात राहिलेला एखादा कोपरा पुन्हा उजळू शकतो. आपल्या मनात जेव्हा एखादा प्रश्न उभा राहतो, तेव्हा हा एक कोपरा अंधारातच राहिला आहे, अशी ती जाणीव होत असते. तोही उजळून द्या, अशी आपण त्या वाक्याला विनंती करायची असते. वक्त्यापाशी जर त्या कोपऱ्यातल्या लाईटचे बटन असेल तर तो क्षणार्धात तो कोपरा उजळून देतो. कधीतरी असं होऊ शकतं की आपल्या मनातल्या कोपऱ्यात साचलेला अंधार वक्त्याला दूर करता आला नाही. पण असं क्वचित होतं. पण समजा असं झालंच तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर असा एक अंधारा कोपरा आपल्या व्याख्यानानंतर शिल्लक आहे त्याची जाणीव होऊन वक्ता त्या दृष्टीने विचार करू लागतो.... अभ्यास करू लागतो आणि भविष्यात त्याच्यासमोर येणाऱ्या अशा प्रश्नाच्या वेळी तो त्या शंकेचेसुद्धा निरसन करू शकतो. प्रश्न विचारल्यामुळे अशा प्रकारे तुमचा फायदा होत असतो, तुमच्या ज्ञानात भर पडता पडताच वक्त्याच्या ज्ञानातसुद्धा भर पडत असते. म्हणून कोणताही चांगला वक्ता श्रोत्यांकडून चांगल्या प्रश्नांची अपेक्षा करीत असतो. तेव्हा यापुढे कोणतीही व्याख्यानंतर तुम्हाला पडलेला प्रश्न विचारायला कचरू नका. क्वचित प्रसंगी तुम्हाला प्रश्नांची सुयोग्य मांडणी करता येणार नाही. ती सरावानंच करता येते आणि प्रश्न विचारण्याचा सराव म्हणजेच प्रश्न विचारणे आहे, हे लक्षात घेतलंत म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे हे सगळं लक्षात येईल. आजपासून पुढे जेव्हा केव्हा मी किंवा माझ्यासारख्या कोणताही वक्त्यानं तुम्हाला तर प्रश्न विचाराची संधी दिली, तर आपल्या मनातले प्रश्न दडपून टाकू नका. ते मोकळ्या मनाने उपस्थित करा.

(आकाशवाणीवर १३,१४,१५,१६ जानेवारी २०२३ ला प्रकाशित झालेले लेख)

मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर

 मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर

वैभव चाळके


उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. २८ डिसेंबर हा भाऊसाहेबांचा जन्मदिवस. त्यानिमित्त...


मराठी कवितेच्या महामार्गात काही नितांत सुंदर वळणे आहेत. रॉय किणीकरांच्या रुबाया आणि भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी ही त्यातील दोन महत्त्वाची उदाहरणे. रसिकतेचा सोपान चढत असताना भाऊसाहेबांची शायरी ‘भेटली’ म्हणजे जीव अगदी हरखून जातो. महाविद्यालयात शिकत असताना मुंबई महानगरात कुठे कुठे होणाऱ्या काव्यमैफलींना हजेरी लावण्याच्या काळात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापटांपासून संदीप खरे यांच्यापर्यंत नानाविध कवींची सादरीकरणे ऐकायला मिळाली. अशाच एका मैफलीनंतर रात्री परतताना एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, ‘‘तू भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी वाचली आहेस का? नसली वाचलीस तर नक्की वाच. तुला आवडेल.’’ तो सल्ला शिरोधार्य मानून दुसऱ्या दिवशी ग्रंथालयातून भाऊसाहेब पाटणकरांचा संग्रह आणला आणि वाचून काढला. तेव्हा चढलेली नशा आज २५ वर्षे होऊन गेली तरी उतरलेली नाही... ती कधी उतरेल, असे वाटत नाही!


भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठीत लिहिलेली शायरी हे मराठी साहित्यातील एक सुंदर लेणे आहे. मराठी गजलेपेक्षा ही शायरी वेगळी आहे. सुरेश भटांनी ज्याप्रमाणे मराठी गजल लिहिली, तशी मराठी शायरी लिहिण्याचे काम भाऊसाहेब पाटणकर यांनी केले. येथे मराठी हा भाषावाचक शब्द नसून तो संस्कृतीवाचक, गुणवाचक शब्द आहे. ‘मठोमती मुंबाजींना कीर्तने करू द्या... विठू काय बेमानांना पावणारा नाही’ असे सुरेश भट म्हणतात, तेव्हा गजलेतील तो शेर केवळ मराठीत आहे, म्हणून मराठी नाही. तो मराठी संस्कृतीतून निर्माण झालेला वाक्प्रचार घेऊन येतो. म्हणून सुरेश भटांची गजल ही अस्सल मराठी गजल आहे. अगदी त्याचप्रमाणे उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. काही हिंदी चित्रपट आणि काही गाणी जशी आपण पुन्हा पुन्हा ऐकली तरी आपल्याला त्यांचा कंटाळा येत नाही किंबहुना पुन्हा पुन्हा नवा आनंद देण्याचे काम त्या कलाकृती करतात, त्याच गुणवत्तेची ही शायरी आहे. यातली भाषा इतकी सोपी... इतकी प्रासादिक आहे की, कोणत्याही सामान्य वाचकाला या शायरीतील अर्थ सहज उलगडतो... भावतो... आणि दाद द्यायला भाग पाडतो.


इष्काच्या गोष्टी

एरवी शायरीतील प्रेमिक म्हणजे पुन्हा पुन्हा प्रेयसीच्या पायाशी बसून प्रेमाची आळवणी करणारा असतो. भाऊसाहेबांचा प्रेमिक मात्र आपला सन्मान सांभाळून प्रेम करणारा आणि तशीच वेळ आली तर त्या सन्मानासाठी प्रेम उधळून लावणारा आहे. त्यांनीच म्हटले आहे,

‘हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये

पाऊल ना टाकू तिथे बाग ती अमुची नव्हे

भ्रमरा परी सौंदर्य वेडे, आहो जरी ऐसे अम्ही

इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही’

मराठी माणूस मोडून पडेल; पण वाकणार नाही, असे त्याचे जे वैशिष्ट्य सांगतात, ते इथे बेमालूमपणे सहज काव्यात उतरले आहे.

...

कल्पनेच्या  उंच भराऱ्या

कल्पनाविलास हा भाऊसाहेबांच्या काव्याचा अगदी खास गुण आहे. त्यांच्या अनेक रचनांमध्ये तोंडात बोट घालायला लावणाऱ्या कल्पनांचा खजिना आपल्याला सापडतो. जीवन व्यवहार आणि जीवन तत्त्वज्ञान हे त्यांचे चिंतनाचे विषय आहेत. ‘जीवन’ या रचनेत जीवनाच्या कठोर वास्तवाबद्दल त्यांनी म्हटले आहे...

‘सारे मला विसरोत, त्याचे वाईट ना वाटे मला

वाटते वाईट, त्यांना विसरता ये ना मला

वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो,

दोस्तहो, दुसऱ्या क्षणी मी वेदांत सारा विसरलो’

साने गुरुजी यांनी त्यांच्या एका कवितेत ‘फक्त माझे अश्रू नको येऊ देवा, हाचि ठेव ठेवा जन्मभरी’ असे म्हटले आहे. भाऊसाहेबांनी म्हटले आहे...

‘काय माझ्या आसवांनी काय मज नाही दिले

ते दिले जे ईश्वराने योग्यासही नाही दिले’

आपल्या इथल्या जीवनाबद्दल ते इतके समाधानी आहेत की, त्यांना या जीवनापुढे स्वर्गही फिका वाटतो आणि मग त्यांच्यातील मिश्कील शायरसुद्धा याविषयी टिप्पणी करतो...

‘आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही

एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही 

तोही असो आमच्यासवे आणिला ज्याला इथे

भगवान अरे तो देह मी टाकून गेलो इथे’

...

शायरीतील विनोद


भाऊसाहेबांनी त्यांच्या शायरीतून विनोदाची अशी पखरण केली आहे की, आपण प्रसन्न होऊन जातो. रोजच्या व्यवहारातील छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांनी विनोद निर्माण केला आहेच; पण थेट मृत्यूशीही पंगा घेतलेला दिसतो.

‘चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे

आमच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे

नसतो तसा नाराज मी

आहे परी नशिबात आपल्याच हाती लावणे’

किंवा

‘पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली

धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे

सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे’

किंवा

‘मृत्युची माझ्या वदंता सर्वत्र जेव्हा पसरली

घबराट इतकी नर्कलोकी केव्हाच नव्हती पसरली

प्रार्थति देवास, म्हणती सारे आम्हाला वाचवा

वाचवा अम्हास आणि पावित्र इथले वाचवा’

किंवा

‘तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खूश मी

आज पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी’

किंवा

‘भास्करा, येते दया मजला तुझी आधीमधी

पाहिली आहेस का तू, रात्र प्रणयाची कधी’

आणि मग सूर्य त्यावर शाहिराला उत्तर देतो...

‘आम्हासही या शायराची कीव येऊ लागते

याच्या म्हणे प्रणयास याला रात्र येऊ यावी लागते’

ना म्हणू की इष्क त्याला आहे जराही समजला

इष्कातही दिवसास की जो रात्र नाही समजला’

...

ईश्वराशी संवाद


संत तुकारामांनी 'सुख जवापाडे आणि दुःख पर्वताएवढे' असे सांगून ठेवले आहे. भाऊसाहेबांनी तेच शायरीत कसे सांगितले आहे पाहा...

‘भगवंत तुला जर हाय ऐसे नाव असते लाभले

आम्हासही कोटी जपाचे पुण्य असते लाभले.

पाहुनी हा जपयज्ञ तुजला संतोष असता वाटला

आम्हासही रडण्यात नुसता मोक्ष असता लाभला’

ज्ञानेश्वरांची चराचरांत ईश्वर असल्याची कल्पना मनात आणा आणि मग भाऊसाहेबांच्या या चार ओळी ऐका.

‘तुमचा आहे अंश भगवान मीही कुणी दुसरा नव्हे

लोळण्या पायी तुझ्या तुमचा कोणी कुत्रा नव्हे

हे खरे की आज माझे प्रारब्ध आहे वेगळे

ना तरी आपणास भगवंत काय होते वेगळे’

‘यदा यदाही धर्मस्य’ हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. भाऊसाहेबांनी ते तिरकस पद्धतीने मांडले आहे. ते म्हणतात...

‘निर्धारण्या दृष्टास तुजला त्रास घ्यावा लागला

देह घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला’

याशिवाय जीवनाला गाडीची उपमा देऊन त्यांनी मांडलेले शेर मुळातून वाचण्यासारखे आहेत. इष्क, शृंगार किंवा प्रेम याबद्दलच्या त्यांच्या रचना तेव्हाही लोकप्रिय झाल्या आणि आजही कवितेच्या रसिकांमध्ये लोकप्रिय होऊन राहिलेल्या आहेत. भाऊसाहेबांची प्रेम करण्याची एक स्वतःची रीत आहे आणि ती कुणाही रसिकाला मोहात पाडणारी आहे.

‘दोस्तहो, हा इष्क काही ऐसा करावा लागतो

ऐसे नवे नुसताच येथे जीव द्यावा लागतो

वाटते नागीन ज्याला खेळण्यासाठी साक्षात हवी

त्याने करावा इष्क येथे छाती हवी मस्ती हवी

ना म्हणून इश्कातले या सौंदर्य त्याला समजले

झाल्यावरी बरबाद ज्याला बरबाद झालो समजले’

...

लाखमोली संपदा

जिंदादिल, दोस्तहो, मराठी मुशायरा, मराठी शायरी आणि मैफिल ही त्यांची शायरीची पुस्तके प्रकाशित झाली. देशभर नानाविध ठिकाणी त्यांनी मैफली सादर केल्या. एक निष्णात वकील, सहा वाघांना लोळविणारे नेमबाज शिकारी आणि त्याच एकाग्रतेने रसिकाच्या वर्मा आपल्या शेरोशायरीतून नेम धरणारे भाऊसाहेब पाटणकर हे मराठी काव्याला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे.

सरते शेवटी त्यांना त्यांच्याच शैलीत अभिवादन...

वाचली ही शायरी, गुणगुणलोही लाखदा

ही मराठीच्या घरातील लाखमोली संपदा

...

(काही अंश दैनिक सकाळमध्ये २८ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित)