मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर
वैभव चाळके
उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. २८ डिसेंबर हा भाऊसाहेबांचा जन्मदिवस. त्यानिमित्त...
मराठी कवितेच्या महामार्गात काही नितांत सुंदर वळणे आहेत. रॉय किणीकरांच्या रुबाया आणि भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी ही त्यातील दोन महत्त्वाची उदाहरणे. रसिकतेचा सोपान चढत असताना भाऊसाहेबांची शायरी ‘भेटली’ म्हणजे जीव अगदी हरखून जातो. महाविद्यालयात शिकत असताना मुंबई महानगरात कुठे कुठे होणाऱ्या काव्यमैफलींना हजेरी लावण्याच्या काळात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापटांपासून संदीप खरे यांच्यापर्यंत नानाविध कवींची सादरीकरणे ऐकायला मिळाली. अशाच एका मैफलीनंतर रात्री परतताना एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, ‘‘तू भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी वाचली आहेस का? नसली वाचलीस तर नक्की वाच. तुला आवडेल.’’ तो सल्ला शिरोधार्य मानून दुसऱ्या दिवशी ग्रंथालयातून भाऊसाहेब पाटणकरांचा संग्रह आणला आणि वाचून काढला. तेव्हा चढलेली नशा आज २५ वर्षे होऊन गेली तरी उतरलेली नाही... ती कधी उतरेल, असे वाटत नाही!
भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठीत लिहिलेली शायरी हे मराठी साहित्यातील एक सुंदर लेणे आहे. मराठी गजलेपेक्षा ही शायरी वेगळी आहे. सुरेश भटांनी ज्याप्रमाणे मराठी गजल लिहिली, तशी मराठी शायरी लिहिण्याचे काम भाऊसाहेब पाटणकर यांनी केले. येथे मराठी हा भाषावाचक शब्द नसून तो संस्कृतीवाचक, गुणवाचक शब्द आहे. ‘मठोमती मुंबाजींना कीर्तने करू द्या... विठू काय बेमानांना पावणारा नाही’ असे सुरेश भट म्हणतात, तेव्हा गजलेतील तो शेर केवळ मराठीत आहे, म्हणून मराठी नाही. तो मराठी संस्कृतीतून निर्माण झालेला वाक्प्रचार घेऊन येतो. म्हणून सुरेश भटांची गजल ही अस्सल मराठी गजल आहे. अगदी त्याचप्रमाणे उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. काही हिंदी चित्रपट आणि काही गाणी जशी आपण पुन्हा पुन्हा ऐकली तरी आपल्याला त्यांचा कंटाळा येत नाही किंबहुना पुन्हा पुन्हा नवा आनंद देण्याचे काम त्या कलाकृती करतात, त्याच गुणवत्तेची ही शायरी आहे. यातली भाषा इतकी सोपी... इतकी प्रासादिक आहे की, कोणत्याही सामान्य वाचकाला या शायरीतील अर्थ सहज उलगडतो... भावतो... आणि दाद द्यायला भाग पाडतो.
इष्काच्या गोष्टी
एरवी शायरीतील प्रेमिक म्हणजे पुन्हा पुन्हा प्रेयसीच्या पायाशी बसून प्रेमाची आळवणी करणारा असतो. भाऊसाहेबांचा प्रेमिक मात्र आपला सन्मान सांभाळून प्रेम करणारा आणि तशीच वेळ आली तर त्या सन्मानासाठी प्रेम उधळून लावणारा आहे. त्यांनीच म्हटले आहे,
‘हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये
पाऊल ना टाकू तिथे बाग ती अमुची नव्हे
भ्रमरा परी सौंदर्य वेडे, आहो जरी ऐसे अम्ही
इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही’
मराठी माणूस मोडून पडेल; पण वाकणार नाही, असे त्याचे जे वैशिष्ट्य सांगतात, ते इथे बेमालूमपणे सहज काव्यात उतरले आहे.
...
कल्पनेच्या उंच भराऱ्या
कल्पनाविलास हा भाऊसाहेबांच्या काव्याचा अगदी खास गुण आहे. त्यांच्या अनेक रचनांमध्ये तोंडात बोट घालायला लावणाऱ्या कल्पनांचा खजिना आपल्याला सापडतो. जीवन व्यवहार आणि जीवन तत्त्वज्ञान हे त्यांचे चिंतनाचे विषय आहेत. ‘जीवन’ या रचनेत जीवनाच्या कठोर वास्तवाबद्दल त्यांनी म्हटले आहे...
‘सारे मला विसरोत, त्याचे वाईट ना वाटे मला
वाटते वाईट, त्यांना विसरता ये ना मला
वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो,
दोस्तहो, दुसऱ्या क्षणी मी वेदांत सारा विसरलो’
साने गुरुजी यांनी त्यांच्या एका कवितेत ‘फक्त माझे अश्रू नको येऊ देवा, हाचि ठेव ठेवा जन्मभरी’ असे म्हटले आहे. भाऊसाहेबांनी म्हटले आहे...
‘काय माझ्या आसवांनी काय मज नाही दिले
ते दिले जे ईश्वराने योग्यासही नाही दिले’
आपल्या इथल्या जीवनाबद्दल ते इतके समाधानी आहेत की, त्यांना या जीवनापुढे स्वर्गही फिका वाटतो आणि मग त्यांच्यातील मिश्कील शायरसुद्धा याविषयी टिप्पणी करतो...
‘आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही
तोही असो आमच्यासवे आणिला ज्याला इथे
भगवान अरे तो देह मी टाकून गेलो इथे’
...
शायरीतील विनोद
भाऊसाहेबांनी त्यांच्या शायरीतून विनोदाची अशी पखरण केली आहे की, आपण प्रसन्न होऊन जातो. रोजच्या व्यवहारातील छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांनी विनोद निर्माण केला आहेच; पण थेट मृत्यूशीही पंगा घेतलेला दिसतो.
‘चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे
आमच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे
नसतो तसा नाराज मी
आहे परी नशिबात आपल्याच हाती लावणे’
किंवा
‘पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली
धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली
धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे
सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे’
किंवा
‘मृत्युची माझ्या वदंता सर्वत्र जेव्हा पसरली
घबराट इतकी नर्कलोकी केव्हाच नव्हती पसरली
प्रार्थति देवास, म्हणती सारे आम्हाला वाचवा
वाचवा अम्हास आणि पावित्र इथले वाचवा’
किंवा
‘तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खूश मी
आज पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी’
किंवा
‘भास्करा, येते दया मजला तुझी आधीमधी
पाहिली आहेस का तू, रात्र प्रणयाची कधी’
आणि मग सूर्य त्यावर शाहिराला उत्तर देतो...
‘आम्हासही या शायराची कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र येऊ यावी लागते’
ना म्हणू की इष्क त्याला आहे जराही समजला
इष्कातही दिवसास की जो रात्र नाही समजला’
...
ईश्वराशी संवाद
संत तुकारामांनी 'सुख जवापाडे आणि दुःख पर्वताएवढे' असे सांगून ठेवले आहे. भाऊसाहेबांनी तेच शायरीत कसे सांगितले आहे पाहा...
‘भगवंत तुला जर हाय ऐसे नाव असते लाभले
आम्हासही कोटी जपाचे पुण्य असते लाभले.
पाहुनी हा जपयज्ञ तुजला संतोष असता वाटला
आम्हासही रडण्यात नुसता मोक्ष असता लाभला’
ज्ञानेश्वरांची चराचरांत ईश्वर असल्याची कल्पना मनात आणा आणि मग भाऊसाहेबांच्या या चार ओळी ऐका.
‘तुमचा आहे अंश भगवान मीही कुणी दुसरा नव्हे
लोळण्या पायी तुझ्या तुमचा कोणी कुत्रा नव्हे
हे खरे की आज माझे प्रारब्ध आहे वेगळे
ना तरी आपणास भगवंत काय होते वेगळे’
‘यदा यदाही धर्मस्य’ हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. भाऊसाहेबांनी ते तिरकस पद्धतीने मांडले आहे. ते म्हणतात...
‘निर्धारण्या दृष्टास तुजला त्रास घ्यावा लागला
देह घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला’
याशिवाय जीवनाला गाडीची उपमा देऊन त्यांनी मांडलेले शेर मुळातून वाचण्यासारखे आहेत. इष्क, शृंगार किंवा प्रेम याबद्दलच्या त्यांच्या रचना तेव्हाही लोकप्रिय झाल्या आणि आजही कवितेच्या रसिकांमध्ये लोकप्रिय होऊन राहिलेल्या आहेत. भाऊसाहेबांची प्रेम करण्याची एक स्वतःची रीत आहे आणि ती कुणाही रसिकाला मोहात पाडणारी आहे.
‘दोस्तहो, हा इष्क काही ऐसा करावा लागतो
ऐसे नवे नुसताच येथे जीव द्यावा लागतो
वाटते नागीन ज्याला खेळण्यासाठी साक्षात हवी
त्याने करावा इष्क येथे छाती हवी मस्ती हवी
ना म्हणून इश्कातले या सौंदर्य त्याला समजले
झाल्यावरी बरबाद ज्याला बरबाद झालो समजले’
...
लाखमोली संपदा
जिंदादिल, दोस्तहो, मराठी मुशायरा, मराठी शायरी आणि मैफिल ही त्यांची शायरीची पुस्तके प्रकाशित झाली. देशभर नानाविध ठिकाणी त्यांनी मैफली सादर केल्या. एक निष्णात वकील, सहा वाघांना लोळविणारे नेमबाज शिकारी आणि त्याच एकाग्रतेने रसिकाच्या वर्मा आपल्या शेरोशायरीतून नेम धरणारे भाऊसाहेब पाटणकर हे मराठी काव्याला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे.
सरते शेवटी त्यांना त्यांच्याच शैलीत अभिवादन...
वाचली ही शायरी, गुणगुणलोही लाखदा
ही मराठीच्या घरातील लाखमोली संपदा
...
(काही अंश दैनिक सकाळमध्ये २८ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित)
No comments:
Post a Comment