Monday, November 27, 2023



वंचितांचा शिक्षणदूत नीलेश निमकर


इं  ग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्राबल्य वाढते आहे. नव्या पिढीला परदेशात जाण्यासाठी घडवणे हेच जणू शिक्षणाचे उद्दिष्ट आहे की काय, असे वाटू लागले आहे. असे असताना ग्रामीण भागातील वंचितांसाठी, दुर्गम भागातील आदिवासी, वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी धडपडणाऱ्या नीलेश निमकर यांचे काम नजरेत भरते. या कामात आलेल्या अनुभवांच्या आधारे आपले शिक्षणचिंतन मांडणारे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘शिकता- शिकवता’. या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाचा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला आहे. उद्याचा भारत उभारण्यासाठी खरे काम व्हायला हवे, ते शिक्षणक्षेत्रात. म्हणूनच अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घ्यायला हवी. 

नीलेश निमकर हे ‘क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट’ अर्थात ‘क्वेस्ट’ या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत. शिक्षण क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या निमकर यांना बालशिक्षणात विशेष रस आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि शिक्षकांचे प्रशिक्षण या क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान आहे. अभ्यासक्रम विकासाच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मोठमोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे. आता कामासाठी पालघर तालुक्यातील वाडा येथे स्थानिक आहेत. त्यांचे शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झाले; मात्र चित्रकलेच्या आवडीतून ते आदिवासी पाड्यांवर गेले आणि अनुताई वाघ यांच्या कामाचा त्यांना परिचय झाला. तेथे रमेश पानसे यांच्या ‘ग्राममंगल’मध्ये त्यांनी आपल्या या क्षेत्रातील कामगिरीची सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले. त्या अनुभवांतून पुढे त्यांनी ‘क्वेस्ट’ संस्थेची २००७ मध्ये स्थापना केली आणि तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नावीन्यपूर्ण पद्धती आणि आगळेवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी भाषा, गणित, विज्ञान हे विषय शिकवण्याच्या पद्धतींवर त्यांनी विशेष काम केले. त्यासाठी विविध अभ्यासक्रम तयार केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या संस्थेने चालवलेल्या अभ्यासक्रमाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्र सरकारच्या ‘आकार’ या बालशिक्षण अभ्यासक्रमाच्या रचनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘लिटरसी रिसर्च इन इंडियन लँग्वेज’ या टाटा ट्रस्ट आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या उपक्रमासाठी निमकर यांच्या संस्थेने भाषा संशोधनाचा संपूर्ण भार उचलला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यावर मुलांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते नेमके किती आणि कसे झाले आहे आणि ते भरून काढण्यासाठी शिक्षकांनी काय करायला हवे, या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला. ‘शिकता शिकवता’ या पुस्तकापूर्वी त्यांनी लहान मुलांसाठी चित्रमय पुस्तके लिहिली आहेत. आता त्यांनी ग्रामीण, आदिवासी भागात शिक्षणाचे काम करताना आलेल्या विविध अनुभवांचे संकलन ‘शिकता शिकविता’मधून वाचकांसमोर ठेवले आहेत. ग्रामीण, आदिवासी मुलांना शिकवताना ते स्वतः कसे शिकत गेले याचे वर्णनही या पुस्तकात आले आहे. त्यांच्या लोकविलक्षण कामगिरीची दखल घेत २०११ मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. महाराष्ट्रात यापूर्वीही शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग झाले आहेत. तीच परंपरा निमकर पुढे नेत आहेत. ‘क्वेस्ट’च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अडीच लाख मुले आणि तब्बल आठ हजार शिक्षकांना शिक्षण, प्रशिक्षण दिले गेले आहे. ‘शिकता शिकवताना’च्या निमित्ताने उपेक्षित क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव नव्या पिढीसमोर उपलब्ध झाले आहेत. त्यातून अनेकांना प्रेरणा घेता येईल.

(सकाळ, २७ नोव्हेंबर २०२३)

No comments:

Post a Comment