मनस्वी लेखक
आपल्या साहित्यनिर्मितीने केरळसह जगभरात मानसन्मान मिळविलेले मल्याळम भाषेतील ज्येष्ठ कथाकार ९२ वर्षीय टी. पद्मनाभन यांनी आजवर साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांना गवसणी घातली आहेच; पण त्यासोबत अनेक महत्त्वाचे पुरस्कार नाकारण्याचे धैर्यसुद्धा वेळोवेळी दाखवले आहे. लेखक हा मनस्वी असतो. त्याला आपला स्वायत्त अवकाश टिकवायचा असतो. याबाबतीत दक्ष असलेले पद्मनाभन् हेही त्यापैकीच. पण त्यामुळे सुरुवातीला ‘पुरस्कार नाकारणारा लेखक’ अशी त्यांची प्रतिमा झाली होती. अलीकडेच त्यांना केरळ सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘केरळ ज्योती अवॉर्ड’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले.
आजच्या जगात एकीकडे जग तंत्रज्ञानामुळे अगदी जवळ आले आहे, असे म्हटले जाते. परंतु माणसाला मात्र एक प्रकारचे एकाकीपण भेडसावते आहे. टी. पद्मनाभन यांच्या कथांमधून हा अंतर्विरोध कलात्मक रीतीने व्यक्त होतो. कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी वकिली सुरू केली होती; पण त्यांचा मूळ पिंड लेखकाचा होता. तो त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. लिहिण्याची हौस त्यांना आधीपासूनच होती. पुढे त्यांच्या लेखनकलेला आणखी बहर आला. त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले. कन्नूर या केरळातील एका छोट्या गावात पुथियिदथ कृष्णन नायर आणि देवकी (अम्मुकुट्टी) या दाम्पत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. ते काही महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. मद्रास लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. थालास्सेरी आणि कन्नूर या न्यायालयांमध्ये त्यांनी वकिली केली. याच काळात ते लेखक म्हणून घडत गेले. एफएसीटीचे अध्यक्ष एमकेके नायर या मोठ्या माणसाने पद्मनाभन यांना बोलावून घेतले. तेथे जाऊन त्यांनी विविध पदांवर काम केले. पुढे ते या कंपनीचे उपसरव्यवस्थापक झाले. १९८९मध्ये ते तेथून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी कल्लनमर्थोडी भार्गवी यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला आणि पद्मनाभन एकटे उरले. १९४८ मध्ये त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. आजवर त्यांनी शेकडो लघुकथा लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभवांवर ‘माझ्या गोष्टी- माझे जीवन’ नावाचे एक चरित्रात्मक पुस्तकसुद्धा लिहिले आहे. त्यांच्या कितीतरी कथा विविध भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत. केवळ देशी भाषा नव्हे; तर रशियन, फ्रेंच, इंग्लिश आदी भाषांमध्येसुद्धा त्यांच्या कथा भाषांतरित झाल्या आहेत आणि तिथल्या रसिकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. अत्यंत सरळ भाषेत लिहिलेल्या कथा हे त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे जाणकार सांगतात. प्रकाशम परथुन्ना ओरु पेनकुट्टी (तेजस्वी मुलगी, १९५५), ओरु कथाक्रिथु कुरिशिल (एका कथाकाराला सुळावर चढवले जात आहे, १९५६), माखन सिंघिन्ते मरनम (माखन सिंहचा मृत्यू, १९५८), काला भैरवन, गौरी (१९९३) आणि मरया (२०१७) या त्यांच्या प्रमुख साहित्यकृती आहेत. यातील ‘गौरी’ या त्यांच्या कथेवर १९८२ मध्ये दूरदर्शनने संगीतमय सादरीकरण केले होते. याच कथेवर पुढे त्याच वर्षी ‘कवियूर शिवप्रसाद’ नावाचा चित्रपटसुद्धा आला होता. माणसाचा एकटेपणा आणि हतबलता हे त्यांच्या अनेक कथांचे सूत्र असल्याचे समीक्षक सांगतात. पद्मनाभन यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात अनेक पुरस्कार नाकारले. १९९६ मध्ये त्यांनी केंद्राचा साहित्य अकादमी पुरस्कारही नाकारला होता. अर्थात काही पुरस्कार त्यांनी स्वीकारलेसुद्धा. पण शेवटी अस्सल कलावंत हा पुरस्कारांच्या पलीकडचा असतो.
- वैभव चाळके सकाळ -नाममुद्रा -6.11.23
No comments:
Post a Comment