नव लाख तळपती... (12.11.23 सकाळ दीपपर्व पुरवणी पहिले पान)
(वैभव बळीराम चाळके)
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करता करता इतरांच्या जीवनात आपल्याला काही प्रकाश पाडता आला तर तो पाडावा, असा संदेश देणारा हा सण आहे. आपण त्यासाठी एखाद्या पणतीप्रमाणे का होईना, पण प्रयत्न करायला हवा. शेवटी अंधार भेदण्याचे काम महत्त्वाचे आहे. तोच दिवाळीचा संदेश आहे.
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. ‘तमसोऽमा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अंधाराकडून प्रकाशाकडे चला’ असा संदेश देणारा सण आहे. त्यामुळे दिव्याला आणि दिव्यांच्या प्रकाशाला या सणामध्ये फार मोठे महत्त्व आहे. संपूर्ण भारतवर्षात हा सण साजरा केला जातो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात हा अवाढव्य भूप्रदेश रात्री विविध प्रकारच्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एका कवितेत ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ अशी कल्पना मांडली आहे. ती आणखी विस्तारून आपल्याला आपली कल्पना भव्य करावी लागेल, इतके दिवे दिवाळीच्या रात्री या भूपट्ट्यावर उजळत असतात.
दिव्या दिव्या दीपत्कार... असे म्हणत आपण लहानाचे मोठे होतो आणि मग केव्हा तरी आपल्याला ज्ञानेश्वरीतील तेजस्वी सृष्टीचा परिचय होतो. दिवे आणि प्रकाश आपल्या जीवनाला असे व्यापून राहिलेले असतात.
दिवाळीत घर आणि परिसर दिव्यांनी उजळून टाकतो. त्यासाठी आपण पणत्या वापरतो, निरांजन वापरतो, समया वापरतो, आकाश कंदील वापरतो आणि अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर हरतऱ्हेचे इलेक्ट्रिक दिवेसुद्धा वापरत असतो. आपल्याकडे दिव्यांचे किती तरी प्रकार आढळतात. आमचे एक मित्र मकरंद करंदीकर गेल्या पन्नास वर्षांपासून नानाविध दिवे जमा करण्याचा छंद जोपासत आहेत. सर्वाधिक दिवे जमवण्याचा विक्रमच त्यांच्या नावावर आहे. त्यांच्याकडील दिव्यांचा संग्रह पाहणे ही एक पर्वणीच असते. अनेक वर्षे दीप आमावस्येला ते या दिव्यांचे प्रदर्शन भरवत असतात.
माती, दगड, तांबे, पितळ, लोखंड, चांदी, सोने अशा नानाविध वस्तूंमधून दिवे साकारले जातात. आपल्या मंदिराबाहेर या दीपमाळा असतात, त्या दगडातून साकारलेल्या असतात. आपल्या रोजच्या वापरात चिमणी, कंदील असे दिवे असत. आता बल्ब, ट्यूब, एलईडी आले. विविध कामांसाठी विविध दिव्यांचा वापर आपण करत आलो आहोत. ध्यान आणि त्राटकासाठी छोटा दिवा वापरणारे आपण युद्धासाठी मशाली घेऊन बाहेर पडत होतो. तेथून इलेक्ट्रिक दिव्यांपर्यंत आणि त्यांच्याही पुढे महाप्रचंड झोतांपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. प्रकाश अर्थात अग्नी हा संपूर्ण तेजस्वी असतो. ज्ञानेश्वरीमध्ये दीपकळी धाकुटी असा उल्लेख आलेला आहे. या दीपककळीपासून म्हणजे छोट्या पणतीपासून ते थेट सूर्यापर्यंत आपल्याला प्रकाशाची नानाविध रूपे माहिती आहेत. सूर्य अंधःकार नाहीसा करतो, तेच काम इवलीशी पणतीसुद्धा करत असते. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ’ हा श्लोक आपण अनेकदा म्हटलेला असेल; पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही, की या श्लोकात श्रीगणेशाचे तेज कोटी सूर्याइतके प्रखर आहे असे म्हटले आहे. आपल्याला त्या तितक्या तेजाची कल्पना करायची म्हटले तरी ते अशक्य... श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडवले, तेव्हा प्रथम त्याला ते पाहण्याची दृष्टी दिली असे म्हणतात. आपल्याला या इतक्या मोठ्या तेजाची कल्पना करायची तर आधी आपली कल्पनाशक्ती विस्तारून घ्यावी लागेल.
दिवाळी या प्रकाशोत्सवात इतरांच्या जीवनात आपल्याला काही प्रकाश सोडता आला तर सोडावा, असा संदेश देणारा हा सण आहे.
No comments:
Post a Comment