इवलेसे रोप
--वैभव बळीराम चाळके
--
अल्पाक्षरत्व अर्थात कमीत कमी शब्दांत अधिकाधिक अर्थ सांगणे, परिणाम साधणे, आनंद देणे... हे कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. कविता इतर साहित्य प्रकाराहून भिन्न ठरते त्यात तिचा हा एक महत्त्वाचा गुण असतो. साहित्यात त्यालाच व्यवच्छेदक लक्षण म्हणतात.
कविता अल्पाक्षरी असते आणि तरी ती खूप काही सांगते अन् सुचवते. कारण कवितेत प्रतिमा, प्रतीके, अलंकार, सूचकता अशा गुणांचा अंतर्भाव असतो. शिवाय तो एकजीव असून उत्स्फूर्त आविष्कारातून जन्मास आलेला असतो. मराठी साहित्यापुरते बोलायचे म्हटले तरी आपल्याला अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. मराठीच्या हजारभर वर्षांच्या काव्यलेखनाच्या उपलब्ध इतिहासात पद्य रचना, दीर्घ कविता आणि स्फूट कविता विपुल प्रमाणात लिहिली गेली आहे.
संतकाव्यातील कितीतरी रचना अजरामर होऊन राहिल्या आहेत. अनेक कवितांमधील विशेषतः अभंगांतील केवळ एकेक ओळ सुभाषिताचे रूप घेऊन शेकडो वर्षे समाजमनात गुंजन करीत आली आहे. अशा शेकडो काव्यपंक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा उद्धृत केलेल्या आढळतात.
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पुढील ओळी आपण हजारो वेळा एकमेकांना सांगितलेल्या आहेत-
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके।
मेळवीन।।
या पंक्ती अजरामर होऊन राहिल्या आहेत. मराठी अमृताहून गोड आहे, हे ज्ञानेश्वरांनी इतक्या समर्थपणे मांडले आहे, की मराठीविषयी बोलताना या पंक्तींना दुसरा पर्याय नाही.
मोगरा फुलला मोगरा फुलला।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला।।
‘मोगरा फुलला’ ही त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा तर मराठीतील एक ‘न भूतो न भविष्यती’ अशी आहे. दृश्य, स्पर्श, गंध, नाद अशा विविध संवेदनांना सुख देणारी आणि नित्यनूतन अर्थ धारण करणारी ही प्रतिमा ही मराठी साहित्याला मिळालेली आगळी देणगीच आहे, असे म्हणावे लागेल.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील कितीतरी पंक्ती सुभाषित झाल्या आहेत. सुभाषित म्हणजे इवलासा अक्षरबंध... जो अर्थआभाळ कवेत घेतो.
जे का रंजले गांजले।
त्यांसि म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा।
देव तेथेचि जाणावा।।
यात साधूसंतांची ओळख कशी नेमकी सांगितली आहे. आता हे माहिती झाले म्हणजे भोंदू कोण हे सहज लक्षात येऊ शकते.
सुख जवापाडे।
दुःख पर्वता एवढे।।
हे कठोर वास्तव इवल्याशा ओळीत आणि परिचित उपमेतून मांडल्याने सर्वांना पटले, रुचले, सांगावे-सांगत राहावे वाटले.
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास।
कठीण वज्रास भेदू ऐसे।।
असे म्हणून त्यांनी माणसाने कसे असावे, हे सांगितले आहे.
लहानपण देगा देवा।
मुंगी साखरेचा रवा।।
मध्ये विनयशीलता, अहंहीनता अंगी असली की लाभ होतो, हे सोप्या उदाहरणातून पटवून दिले गेले आहे.
नाही निर्मळ जीवन।
काय करील साबण।।
हा थेट सवालच आहे.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।
उदास विचारे वेच करी।।
हे वचन अकाली उद्भवणारे खर्च करताना केवढा आधार ठरते.
साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी।
तयासी शेवटी कडबा रे।।
हे कटू वास्तवही रोजच्या जगण्यात येणाऱ्या असह्य उपेक्षेच्या दिवसांत सांत्वन करते नाही का?
आणि हे सारे मांडणारे संत तुकाराम तरीही,
आनंदाचे डोही आनंदतरंग।
आनंदचि अंग आनंदाचे।।
असे म्हणून जड जीवनाला चैत्यन्याशी जोडून देतात. म्हणूनच म्हणतो, कविता हे इवलेसे रोप आहे. ते अर्थआभाळाला गवसणी घालत जाते.
(सकाळच्या दीपपर्व दिवाळी अंकात 2025 प्रसिद्ध)
