Sunday, October 26, 2025

उंदीरमामा की जय!



उंदीरमामा की जय!
--
‘प्रारंभी विनंती करू गणपती...’ असे म्हणत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याची आपली अनेक वर्षांची परंपरा आहे. या आद्यदैवत असलेल्या श्री गणेशाचे वाहन म्हणजे उंदीर. आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात त्याने भावनिक महत्त्व प्राप्त केले आहे. गेल्या काही वर्षांत त्याने वैज्ञानिक क्षेत्रातही मोठी प्रगती केलेली दिसते. माणसावर करायचे कोणतेही नवे प्रयोग प्रथम उंदरावर करून पाहिले जातात हे आपण शिकलेलो आहोत. उदाहरणार्थ माणसावर एखाद्या औषधाचा काय परिणाम होईल, हे तपासण्यापूर्वी उंदराच्या शरीरावर त्याचा प्रयोग केला जातो. अलीकडे काही शास्त्रज्ञांनी उंदराच्या नाकात हवेचा वेग आणि विविध वास ओळखण्याची विलक्षण क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. या संशोधनाचा उपयोग माणसाच्या जीवनाला उपकार ठरेल, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
आम्हा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्यांसाठी उंदीर हा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. त्यामुळे उंदीर दिसला की तो जिथे गेला तिथे त्याला शोधून मारावा किंवा पळवून लावावा, असे लहानपणापासूनच आम्हाला सांगितले गेलेले. उंदीर, घुशी आणि चिचुंद्री असे प्रकार पाहतच आम्ही मोठे झालो. पुढे पांढरा उंदीर असतो, असे ऐकायला आणि पाहायलाही मिळाले. जगभरात उंदराचे ५० प्रकार असल्याचे सांगतात. उंदीर सर्वभक्षी आहे. म्हणजे धान्यापासून अंडी-मांसापर्यंत बरेच काही अन्न म्हणून खात असतात. शिवाय सतत वाढणारे दात काबूत आणि शाबूत ठेवण्यासाठी मिळेल ती कडक वस्तू कुरतडत राहणे हे त्याचे जीवनकर्तव्यच आहे. प्रजननाबाबत उंदराने मोठीच आघाडी घेतलेली दिसते. उंदीर मादी वर्षातून पाच ते सहा वेळा पिल्ले देते आणि प्रत्येक वेळी डझनभर पिल्ले जन्माला घालते. त्यामुळे उंदीर अनेकांची दमछाक करतात. शेतकऱ्यांच्या घरात, शेतात धान्याची नासधूस करतात. शहरात घरातील अन्नपदार्थ, फर्निचर, वायर कुरतडून वात आणतात. त्यामुळे मासे पकडण्याच्या जगात जशा शेकडो क्लृप्त्या माणसाने शोधल्या आहेत तसेच शेकडो उपाय उंदरांना मारण्यासाठी केले जातात. सापळे लावणे, विषप्रयोग करणे, चिकट कागद ठेवणे हे असे उपाय वर्षानुवर्षे सुरू आहेत. शहरांमध्ये उंदरांची संख्या वाढली, की महापालिका ते मारण्यासाठी कर्मचारी नेमते. त्यामुळे आपल्या आर्थिक क्षेत्रातील उलाढालीलाही उंदराने हातभार लावलेला दिसतो.
आपल्या संशोधकांनी उंदरांच्या नाकात वाऱ्याचा वेग आणि वास ओळखण्याची मोठी क्षमता असल्याचे सिद्ध केल्याने ते आता वेगवेगळ्या कामास येणार आहे. उंदराची ऐकण्याची क्षमता ही विलक्षण आहे, हे आपल्याला कधीचेच माहीत आहे. म्हणून तर प्रत्येक गणेश मंदिरात मोठा पितळी उंदीर बसवलेला असतो आणि भाविक त्याच्या कानात त्यांना जे हवे ते मिळवण्यासाठी अतिशय हळुवार आवाजात विनवत असतात. आपल्याकडे अधूनमधून निसर्ग, तौक्ते अशा तऱ्हेतऱ्हेच्या नावांची मोठी वादळे येत असतात. अशा वेळी आता आपल्याला आपल्या खिडक्यांवर उंदीर बसवून ठेवता येतील आणि ते आपल्या मोबाईलला कनेक्ट केले म्हणजे वारे किती जवळ आले आहे, हे लक्षात येऊन आपण आपली दारे-खिडक्या वेळीच बंद करून सुरक्षित बसू शकू!
वाऱ्याचा वेग आणि वास ओळखण्याच्या या क्षमतेमुळे शत्रू राष्ट्रांनी वाऱ्यावर विष पेरून दिले तर ते आपल्याकडे पोहोचण्यापूर्वीच सीमेवर उंदीर फौज उभी करून आपल्याला ते वेळीच ओळखता येईल का, याचाही शोध आपल्याला आता घ्यावा लागेल. तसे झाले तर वरून ड्रोन आणि खाली उंदीर सेना अशी एक वेगळीच लढाई भविष्यात दिसू शकते.
अर्थात उंदरांच्या या क्षमतांचा जर आपल्याला सुयोग्य वापर करायचा असेल, तर त्यासाठी उंदीर काही काळ मोकळे असणे गरजेचे आहे. सतत वाढणारे दात घासून कमी करण्यात त्यांचा बराचसा वेळ खर्च होतो आणि आपली प्रजनन क्षमता संपूर्ण कामी आणण्यातही ते पुष्कळ काळ व्यग्र असतात. त्यामुळे आपल्या विविध कामांसाठी मोठी संख्या असली तरी उंदीर कमी पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाप्रमाणे उद्या उंदरांचे निर्बीजीकरण करून त्यांचा काही वेळ आपल्याला वापरता येईल का, याच्यावर विचार करण्यासाठी एखादी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची समिती कदाचित नेमावी लागेल.
विज्ञान अचाट गोष्टी साध्य करते आहे. त्यामुळे या उंदराच्या नाकातील वासाच्या क्षमतेचा वापर करून आपण आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थ नीट घमघमत आहेत ना, याची खात्री करून घेऊ शकू. उद्या कदाचित मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये हे काम उंदरांकडेच स्वाधीन केले जाऊ शकते. फक्त क्वचित प्रसंगी हा ‘सुगंध इन्स्पेक्टर’ पदार्थात पडून आपल्या ताटात आला तर उदार मनाने त्याची आणि रेस्टॉरंट मालकाची चूक आपण पदरात घालायला हवी.
गणपतीसमोर आरत्यानंतर गणरायाचा जयजयकार करून झाल्यावर आणि मंत्रपुष्पांजली म्हटल्यावर कोणीतरी ‘गणपती बाप्पा की जय... उंदीरमामा की जय’ असे हमखास म्हणत असतो. तेव्हा हे ‘उंदीरमामा की जय’ कोठून आले, असा एक भाबडा प्रश्न अनेकदा पडत असे. आता मात्र उंदीर असा उपयोगात यायला लागल्यावर आपल्याला उंदीरमामाचा जयजयकारसुद्धा कृतज्ञतेची भावना दाटून येऊन करता येईल.
एक ‘चांदोमामा’ आणि दुसरा ‘उंदीरमामा’ हे आपल्या पुराणापासून विज्ञानापर्यंत आपल्याला फिरवून आणत आहेत. मामा आपल्याला नेहमीच प्रिय असतो. चांदोमामाने चांद्रयानातून आपल्याला ‘कधीतरी या राहायला’ असे निमंत्रण दिलेले आहे. त्यामुळे तो आता आणखीच प्रिय झाला आहे. नव्यानव्या शोधांमुळे आता उंदीरमामाही प्रिय होऊन राहील. तेव्हा सर्व मिळून म्हणू या, उंदीरमामा की जय!

(संपादित अंश सकाळमध्ये 24-10-25 रोजी संपदाकीय पानावर प्रकाशित)

No comments:

Post a Comment