लोकल... माझे आई!
"चॉकी आण! फ्रुटी आण! आयस्क्रीम आण!' म्हणत बाळाने टाटा केलं. त्याला हात हलवून बाय बाय करत मी पटापट जिणे उतरलो. वॉचमननं नेहमीप्रमाणे हात दाखवून सलाम केला. मी सुहास्यवदनानं त्याचा स्वीकार करत गेटबाहेर पडलो. गेटसमोर पावसाचं पाणी साचलं होतं. ते सहज ओलांडत रिक्षात जाऊन बसलो. स्टेशनपर्यंत जाणाऱ्या या शेअर रिक्षात कधी कधी रिक्षा भरेपर्यंत रखडायला होतं. पण आज माझ्याआधीच एक बाई छोट्या मुलीला घेऊन बसल्या होत्या. मी बसल्यावर ताबडतोब आणखी दोघे जण आले आणि रिक्षा सुरू झाली. मुलगी आणि आईच्या गप्पा सुरू होत्या.
"आपण कुठे चाललो?'
"मामाकडे'
"कशाला?'
"मजा करायला!'
"तू थांबणार घरी...'
"मी कशी थांबणार? मी ऑफिसला जाणार. तू दादाबरोबर मजा कर हं!'
"तू कधी येणार?'
"संध्याकाळी... तुला चॉकलेट घेऊन येईन हं!' केविलवाण्या आईचा आनंदी स्वर.
स्टेशन आलं तसे आम्ही उतरलो. स्टेशनात घुसताना पॉलीशवाला मुकाट बसलेला दिसला. हे पावसाळ्याचे दिवस त्याच्यासाठी नको वाटणारे असणार. एका बाजूला पेपरवाला बसला होता. पाऊस सुरू झाल्यापासून तो इथे रेल्वेच्या छपराच्या आधाराला आला आहे. मी त्याच्याकडून पेपर घेतला. त्याच्या स्टॉलवर 25-30 पेपर. त्याच त्याच बातम्या आपापल्या कढईत शिजवून वाढून ठेवलेल्या. आवडेल ती प्लेट उचला. स्वस्तात मस्त सौदा. दोन-अडीच रुपयांत 25, 40, 50 पानं.
पेपर घेऊन जिना चढत असतानाच गाडी आली. पायांनी एकाएकी वेग घेतला. जरा जास्तच धावलो. त्यामुळे गाडीत बसल्यावर दम लागला. बॅग मांडीवर घेऊन उसासत राहिलो. तेवढ्यातच समोरच्याने बॅगेवरचा पेपर न विचारताच खेचून घेतला. हे फुकटे वाचक! मिळेल तिथे हात मारणारे! माझं एक निरीक्षण आहे की ज्यांना आपली आवड कळली आहे ते पेपर विकत घेतात आणि आपल्या आवडीचं तेवढं वाचतात. बाकी पेपर उद्या नव्हे तर आजच रद्दी असतो त्यांच्यासाठी! पण हे फुकटे वाचक मात्र मोठे रसिक असतात. ते फुकट मिळालेला पेपर अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात.
दोन मिनिटे स्वस्त बसल्यावर मी समोरच्याकडे माझा पेपर मागितला. त्याने पेपर आणि पुरवणी अलग करून विचारलं, कुठला देऊ? जणू काही तो त्याचाच पेपर होता आणि मी याचक म्हणून मागणी करतोय.
मी सभ्य संकोचाने मुख्य पेपर घेतला. वाचू लागलो. पेपर चाळून झाल्यावर मी तो बॅगेत टाकला. मला उठायचे आहे असे समजून त्याने पुरवणी देऊ केली. तीही न वाचताच मी बॅगेत ठेवून दिली आणि बॅगेतून पुस्तक काढून वाचू लागलो.
साहित्य अकादमीने प्रकाशित केलेली ही नामदेवाची गाथा वाचताना नामदेवाला भावकवी का म्हणतात, त्याचा प्रत्यय येतो आहे.
चार स्थानके गेली नाहीत तोवर गाडीत ही गर्दी झाली. मला पुस्तक मिटून ठेवावं लागलं. मग मी माणसं निरखत राहिलो. रविवारच्या मेजवाणीसाठी शनिवारी बॉयलर कोंबड्या घेऊन येणाऱ्या गाडीसारखी डब्याची अवस्था! प्रत्येकाचे न दिसणारे पंख फडफडताहेत. तिथे तर एकदाच जीव जातो. ही माणसं तर रोज थोडी थोडी कापली जातात. मला तो विचार आवडला नाही. म्हणून मग मी त्या जागी दुसरा विचार आणला- कशी असतील या सगळ्यांची घरं?
मग कल्पनेच्या राज्यात कितीतरी वेळ मी गुंग होतो. तेवढ्यात तंद्री भंगली. आणि म्हणून मग शेजारच्या माणसांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. एक जण म्हणाला, "पोरीला चांगलं स्थळ मिळालं तर चारएक लाख खर्च करायला तयार आहे मी. एकुलती एक मुलगी आहे. ती जाताना समाधानाने गेली की आपलं काम झालं.'
मला एकदम सकाळी चॉकी आण म्हणणारं माझं बाळ, मग रिक्षात आईला तू कधी येणार विचारणारी मुलगी आठवली.
वाटलं, अरे आपण सारे ट्रेनला लटकत दिवस काढतोय असं म्हणतो ते तितकंस खरं नाही. आपण तर आपल्या बाळांनाच लटकतो आहोत. तेच तर आधार झालेत आपले. संध्याकाळी ड्युटी संपण्याआधी मनाला घराचे वेध लागतात आणि आपण गर्दीच्या लोकललाच लटकत प्रवास सुरू करतो, ते केवळ त्यांच्याचसाठी नव्हे काय?
मुंबईत नवा असताना मला वाटे-ही लटकणारी माणसं पडत कशी नाहीत? आता लक्षात आलं. लटकणाऱ्यांच्या काळजाला लटकणारी इवली बाळं पाहून लोकल त्यांना संभाळून घेत असते. लोकलं... माझे आई तुला साष्टांग नमस्कार!
- वैभव चाळके
No comments:
Post a Comment