Friday, August 20, 2010

कबीर

कबीर म्हणे

माती सांगे कुंभाराला तुडवशील मज किती
दिवस एक येईल असा की तुलाच तुडविल माती


देव, गुरू दोन्ही सामोरे, कोणाचे धरू पाय
देव दाविला म्हणून आधी गुरुच्या चरणी जाय


सुखात ज्यांची स्मृती न येते दुःखात येते याद
कबिर म्हणे की कुणी तयाची ऐकावी रे साद


निद्रेमध्ये रात घालवी, खाण्यातच दिस जाई
सोन्यासम जिविनास तयाने कवडी मोल न येई



सप्त सागराची कर शाई, लेखणि कर वनराई
धरतीचा जरि कागद करशी हरिगुण मावत नाही


धीर धरी रे मना धिराने सर्व साधती सोयी
माळ्याने जरि जीव सोडला ऋतुविण बहर न येई


साधू गाठीशी नच ठेवी पोटी चिमटा घेई
ईश पुढे अन् ईशच मागे, तो मागे हा देई


साधू सुपासमान असावा फोले उडवुन देई
विवेकवाऱ्याच्या मदतीने निके तेवढे ठेवी



मी असता तो नव्हता आता तो आहे मी नाही
अंधाराचे फिटले जाळे, दीप पाहिला मीही



स्नान लाखदा करशी त्याने नच होते मनशुध्दी
पाण्यामध्ये असतो मासा धुतला तरि दुर्गंधी

No comments:

Post a Comment