लघुत्तम, पण अप्रतिम कथा!
प्रथमच जेव्हा झेनकथा वाचनात आल्या तेव्हा केवढा तरी आनंद झाला होता. पाच-दहा ओळींची कथा एकदम विलक्षण अनुभूती देते. कधी आपण आश्चर्याने आवाक हाेतो. कधी अरे हे आपल्याला कसं कळलं नाही असं वाटतं. कधी वाटतं - कित्ती कित्ती सुंदर! कधी तर साक्षात्काराचाच अनुभव मिळतो.
आजच्या फास्टफूडच्या जमान्यात तर या झेनकथांना आणखीनच महत्त्व आहे. पाच मिनिटांत एक कथा वाचून होते. कधी एकाच मिनिटात संपते. अनुभव मात्र विलक्षण देते.
साहित्यात आधीच लघुकथेला फार प्रतिष्ठा नाही. त्यामुळे लघुत्तम कथेला ती सहज मिळणे अवघडच! पण म्हणून लघुत्तम कथांचे महत्त्व काही कमी होत नाही. ती ज्याला भावली त्याच्यासाठी ती प्रिय होऊन राहिली. वि.स.खांडेकरांच्या रूपककथा अशाच छोट्या आकाराच्या पण केवढा तरी आशय कवेत घेणाऱ्या आहेत.
अलीकडेच एक अनुवादित पुस्तक हाताशी लागलं. ते केवळ अप्रतिम आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे. "लघुत्तम कथाचा गुलदस्ता' या कथा मुळात हिंदीत आहेत. डॉ. योगेंद्रनाथ शुक्ल हे त्या कथांचे लेखक आहेत. डॉ.अनिल गजभिये यांनी त्या कथा मराठीत अनुवाद केल्या आहेत. मधुरा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात एकूण 112 लघुत्तम कथा आहेत.
शितावरून भाताची परीक्षा केली जाते, याच तत्त्वानुसार आपणही या कथांच्या दर्जाचा अंदाज बांधू शकाल. त्यासाठीच आज या पुस्तकातील एक उत्तम कथा देतो. या कथेचे नाव आहे "कपाट'! लेखक लिहितो-
"का हो दादा, लाडूचा भाव काय? पन्नास किलो हवेत!'
"मास्तर साहेब, पन्नास रुपये किलोप्रमाणे विकून राहिलो. पण तुमच्यासाठी पंचेचाळीस रुपये.'
"अहो दादा! स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या मुलांना वाटायचे आहेत. राष्ट्रीय पर्व आहे. ठीक भाव सांगा.'
"राष्ट्रीय पर्व आहे म्हणालात म्हणून तुम्हाला पस्तीस रुपयेप्रमाणे देईन. यापेक्षा कमी शक्य नाही.'
"ठीक आहे. हे तीनशे रुपये ऍडव्हान्स घ्या. पण बिल पन्नासच्या भावाचं द्या.'
"जी! समजलं मला. बिल आणि लाडू अगदी वेळेवर तयार करून ठेवू.'
"सातशे पन्नास रुपये पुष्कळ झाले!' मास्तरसाहेब हा विचार करत आनंदाने घरी परतले.
सामाजिक ऱ्हासाचे वर्णन करणारी कोणतीही मोठी कथा जशी काळीज विदीर्ण करून जाते तशीच ही एवढीशी कथा काळजाचे तुकडे तुकडे करते. या लघुत्तम कथांचे हेच मोठे बलस्थान आहे. या कथा लिहिणारे आणि त्या मराठीतून आपल्यापर्यंत पोहोचविणारे असे जे दोन डॉक्टर आहेत, त्यांना आपण या कामासाठी धन्यवाद द्यायला हवेत!
-वैभव चाळके
सुरेश भटांचा वारस! चंद्रशेखर सानेकर
सुरेश भटांचं बोट धरून अनेक मराठी कवींनी गझलच्या क्षेत्रात मुसाफिरी केली. पण भटांचा वारस कोण? असा प्रश्न विचारला गेला तर चंद्रशेखर सानेकर हेच नाव अनेकांच्या मुखी सर्वप्रथम येईल. (सुरेश भटांचा चिरंजीव चित्तरंजन उत्तम गझला लिहितो. पण ही राजगादी नसल्यामुळे तसा दावा स्वतः चित्तरंजन करणार नाहीत आणि त्याचे रसिकही तसं म्हणणार नाहीत.) आज लिहित्या गझलकारांत अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार आहेत. त्यांच्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या तुलनेत चंद्रशेखर थोडे मागेपुढे असतीलही. पण त्यांच्या आतला आवाज खंबीर, तीव्र आणि धारदार आहे. त्याचा आपला असा पोत आहे. "एका उन्हाची कैफियत' हा संग्रह वाचतानाच या गझलकाराची ताकद लक्षात येते. "एका शहराच्या खुंटीवर' हा दुसरा संग्रह त्यांच्या महानतेवर शिक्कामोर्तब करतो.
गझलेच्या आकृतीबंधात लिहिलेल्या सर्वच रचनांना आपण गझल म्हणतो. पण त्या सगळ्या गझलांत खरेखुरे शेर क्वचितच हाती लागतात. जेथे असे एकदोन खरे शेर हाती लागतात, तेथे गझल रसिक थांबतो. ती गझल त्याला आपली वाटते. ती तो उराशी कवटाळतो. पण असे प्रसंग फार क्वचित अनुभवायला मिळतात. चंद्रशेखर सानेकरांचं मोठेपण हे की असे खरेखुरे शेर त्यांच्या दोन्ही संग्रहांत अपेक्षेपेक्षा जास्त वेळा भेटतात. त्यांनी सूचकतेने केलेले भाष्य हे एक सूत्र घेतले तरी किती केवढे शेर हाती लागतात.
"एका शहराच्या खुंटीवर' मध्ये ते लिहितात-
गरिबी, श्रीमंती, बेकारी, स्वप्ने, अश्रू, आशा, हासू
एका शहराच्या खुंटीवर सारे काही लटकत होते
हे आपल्या मुंबईचे समग्र दर्शन आहे. पहिल्या ओळीतल्या प्रत्येक शब्दात एकेक अर्थशहर वसलं आहे आणि दुसऱ्या ओळीत हे सारंच लटकत असल्याचं सांगून नवीन नेहमीपेक्षा वेगळा विचार मांडला आहे.
दुसऱ्या एका ठिकाणी सानेकर लिहितात-
आत शिरत जे होते त्यांनी हाल उभ्यांचे फारच केले
आणि उभे जे होते ते तर बसलेल्यांना चेपत होते
वरवर पाहता हे ट्रेनमधले दृश्य वाटेल. पण त्यापलीकडे जाऊन कवीला जे सुचवायचं आहे ते महत्त्वाचं आहे. "आतले' आणि "बाहेरचे' यांच्यातला ही सनातन संघर्ष आहे.
"एका उन्हाची कैफियत'मध्ये एक शेर आहे-
बोलली नाहीस काही... एकटी झुरलीस तू
आणि मी समजून सारे बोलण्याचे टाळले
या शेरातली "ती' कोण आहे? मला "ती' कधी मुंबई वाटली. कधी "आम आदमींनी' बनलेली जनता!
"एका शहराच्या खुंटीवर' मधला पुढील शेर वाचल्यावर मी आनंदाने वेडापिसा झालो. मनोमन सानेकरांना सलाम केला. ते लिहितात-
गरिबांच्या घराघराला ती घरघर लावत आहे
या शहराच्या मध्यावर आहे जी एक हवेली!
यातला "मध्य' भौगोलिक मध्य नव्हे तर "अर्थमध्य' आहे हे लक्षात घेतलं तर किती किती जणांच्या मुस्काटात कवीनं सणसणीत चपराक लावली आहे ते सहज लक्षात येईल.
मुंबईतल्या बेघर चाकरमान्यांची व्यथाही त्यांनी अचूक पकडली आहे-
पाहिजे होती जराशी ऊब मायेच्या घराची
पण घराच्या कल्पनेने जन्मभर मी भीत होतो!
"गालावर खळी डोळ्यांत धुंदी' असं रोमॅंण्टिक लिहिणारे सानेकर गझलेत कसे "शेर' होतात त्याची ही काही उदाहरणं! असली शेकडो स्थळं सहज सापडतात त्यांच्या गझलांत. म्हणून त्यांना सुरेश भटांचा वारस म्हणायचं!
- वैभव चाळके
मखमली फुलं!
केशवसुतांनी मजुराला कवितेचा नायक बनवला त्याच्या खूप आधी इथल्या स्त्रियांनी आपल्या सुखदु:खाची गोष्ट शब्दात गुंफून जात्याच्या गतीवर खेळवली आहे. आपलं माहेर, आपलं सासर, आपली सासू, नणंद, दीर, नवरा, भाऊ, आई, बाप, बाळ या सगळ्यांनी मिळून बनणारं आपलं आयुष्य स्त्रियांनी जात्यापाशी बसून शब्दांत गुंफलं आहे. त्यात कठोर वास्तवदर्शन आहे आणि भावूक स्वप्नविश्वही!
आमच्या लहानपणी आई भल्या पहाटे किंवा रात्री उशिरा जात्यावर दळायला बसायची. जात्याचा एकही फेर तिने ओवीशिवाय ओढलेला नाही. आम्ही कधी तरी तिच्या मांडीवर डोकं ठेकून तिची गाणी ऐकायचो मग एखाद्या गाण्यात ती आमचंच नाव गुंफायची. गाण्यात आपलं नाव आलं की अंगावर फुलं फुलायची.
केवढं आमप सुख होतं ते! कधीतरी गाता गाता आईचा स्वर भरून यायचा. डोळे वाहू लागायचे. जात्याच्या गतीवर स्वार होऊन आई गाऊ लागली की तिला भानच राहायचं नाही. जात्याचा वेग वाढत जायचा. जात्याभोवती हिमालयाचे नग उभे राहायचे. गाता गाता आई आपलं सगळं दु:ख जात्यात भरडून काढायची.
गावोगावच्या बायांच्या मुखातल्या या ओव्यांना आपलं असं सौंदर्य आहेच. पण त्यांचा सर्वाधिक मोठा गुण म्हणजे त्या भावकवितेच्या अगोदरच्या भावकविता आहेत आणि आधुनिक कवितेच्या अगोदरच्या आधुनिक कविता! आपल्या दु:खाचं गाणं करावं, आपल्या सुखाचं गाणं करावं, आपल्या पतीला, आपल्या बाळाला आपल्या गाण्याचं केंद्र बनवावं हे या अडाणी समजल्या जाणाऱ्या बायांना शिकलेल्या शहाण्या लोकांच्या अगोदर कळलं होतं. अभिव्यक्तीची गरज आधी त्यांनी ओळखली होती. हेच या गाण्याचं व्यवच्छेदक लक्षण होय.
लोकगीताच्या अभ्यासिका म्हणून मोठे काम करून ठेवलेल्या सरोजिनी बाबर यांनी स्वत: आपल्या आजीच्या मुखातून प्रकटलेल्या ओव्यांचा विलक्षण अनुभव घेतला होता. त्या ओव्यांचा आपल्या मनावर केवढा सुंदर परिणाम झाला याचा अनुभव सरोजिनी बाबर यांरी आपल्या "झोळणा' काव्यसंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सांगितला आहे. मला तो खूप भावला. त्या लिहितात. "माझ्या आजीचा "गळा' फार देखणा. चार बायकांत दाखवण्याजोगा. पोटभरून गीतं ती एका बैठकीत म्हणायची न् भलं दांडगं जातंदेखील ती गीतं गात हरण पळावं तसं पळवायची. जात्याची शीग पार भरून जास्तोंवर ती दळायची. अशा वेळी मी तिच्या मांडीवर निजून तिची गीतं ऐकायची. मला त्या गीतांचा मोह पडायचा. त्यातल्या त्यात माझ्यावरून गायिल्या जाणाऱ्या गीतांच्या श्रवणानं तर मी भुलून जायची! कारण माझ्या न्याहरीच्या वेळी पंक्तीला सूर्यदेवाला आवतण जायचं न् लाल शेंदराच्या खापा दिसाव्यात त्या डामडौलानं तो पण यायचा!....माझ्या वेणीला बांधलेल्या रेशमी गोंड्याचं आणि डोईवरल्या राकडी केवड्याचं तर कोण कौतुक व्हायचं! तंगभार साखळ्या घालून आणि झिनकारी मासोळ्या घालून मी चालायला लाभले की तालेवाराची लेक आली म्हणून आवई व्हायची. पालख पाळण्यात निजलेल्या माझ्या सारखीच्या खेळांत चंद्र-सूर्याचा चांदवा यायचा आणि गौळणींच्या उतरंडी मांडताना कृष्णदेवाच्या लग्नाचा थाट निघायचा. त्यात मी करवली व्हायचे, हत्तीवरून किंवा पालखीतून मिरवायचे, रातोरात गावोगावचे कारागीर बनवून माझी बाळलेणी तयार व्हायची न् सोन्याच्या सुपलीतून माझं दळणं पाखडणं व्हायचं. चांदीच्या डेऱ्यात माझ्या हातची रवी घुमायची न् लोण्याचे गोळे खात माझी भाकरी खाऊन व्हायची. रोजच्या नानापरीच्या "खिरापती'नी माझा हादगा खेळला जायचा. न् मी साडेतीनशे मोती गुंफलेले झुबे कानांत डोलवीत वतनाचे कागद वाचायची!.... असल्या शेकडो भाव-भावनांनी तटवून ती गीतं धष्ठपुष्ठ व्हायची!
या प्रस्तावनेला बाईंनी नाव दिलं आहे- "मखमली फुलं!' खरेच त्या सगळ्या ओव्या म्हणजे मखमली फुलेच आहेत. त्यांचा अनोखा रंग, अनोखा स्पर्श आणि अनोखा गंध ज्यांनी अनुभवला ते धन्य झाले. ज्यांना तो अनुभवता आला नाही त्यांना अजूनही संधी आहे. आजही एखाद्या आडगावात गेलात तर एखादं जातं गरगरताना दिसेल आणि त्या जात्याच्या गतीवर ही मखमल उमलत असलेली दिसेल. शोधा म्हणजे सापडेल!
-वैभव चाळके
पहिला पाऊस
भजी आणि चहा
"पावसात भिजू नका!', "तळलेले पदार्थ खाऊ नका! विशेषतः भज्यांचा मोह टाळा', असे सल्ले सगळे जण देत असतात. त्या सल्ल्यांचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध असला तरी रसिकतेशी काडीमात्र संबंध नसतो. म्हणूनच पहिला दांडगा पाऊस पडला की, रसिक भज्यांच्या गाड्यांवर आणि चहाच्या टपऱ्यांवरही गर्दी करतात...
"निदान पहिल्या पावसात तरी भजी खाणे माफ केले पाहिजे!' किंवा "वर्षातून फक्त एकदाच पहिल्या पावसात भजी खातो मी!' असली विधाने रस्तोरस्ती ऐकावयास मिळतात. आणि म्हणूनच आभाळ घनदाट भरून आलं की भजीवाल्यांच्या अंगावर मूठभर मांस चढतं. ते सकाळी जरा लवकरच उठून कांद्यांवर तुटून पडतात. पहिल्या पावसात काय काय करावं याची यादी फार मोठी आहे. आणि गंमत म्हणजे ती थेट सभ्यतेची सीमा ओलांडून असभ्यतेच्या वावरात वावरायला जाणारी आहे. अर्थात त्या सगळ्याची सुरुवात कांदाभजीपासून होते. पावसाची ही जादू आहे. वर्षभर ज्या गाडीवाल्याकडील भज्यांना आपण नावे ठेवतो त्याच गाडीवरचे भजी पावसात चांगले का लागतात हे न उलगडणारं कोडं आहे. आपल्या भज्यांच्या गाडीकडे ढुंकून न बघणारा शेठ पहिला पाऊस पडल्यावर दहा प्लेट भजीची ऑर्डर का देतो, हा भजीवाल्याला पडणारा प्रश्नही वर्षोनुवर्षे अनुत्तरीतच आहे.
मुलांच्या आहाराबाबत दक्ष असणारे पालकही आपल्या मुलाला पहिल्या पावसात भज्याचं महत्त्व सांगू लागतात. हे काही आपलं भजीप्रेम लपविल्याचं लक्षण नव्हे तर तो एक संस्कारच आहे जणू! हे खाऊ नको, ते खाऊ नको, म्हणणारी "मॉम'ही "खारे, तेवढ्याने काही होत नाही!' म्हणण्यावर येते ती केवळ संस्कृती संवर्धनाच्या उदात्त हेतूनेच होय.
कोणताही ऋतू बदलला की आमच्या पोटाची तक्रार असते. चार आठ दिवस ते हटूनच बसते. त्याला तो बदल नको असतो. मग ते त्याला जसे हवे तसे वागते. आम्हीही मग त्याचे कोडकौतुक करतो. त्याला आंजारतो-गोंजारतो. पण भजी खायची वेळ आली की नो एक्सक्यूज! आम्ही खाणारच! तुला काय करायचं ते कर! गंमत म्हणजे एरवी साध्यासाध्या पालेभाज्याही तक्रार केल्याशिवाय न पचविणारे आमचे पोट दरवर्षी भजी मात्र मोठ्या प्रेमाने पचवत आले आहे. तर असे स्वर्गसुख देणारे कांदाभजी आणि त्यावर वाफाळणारा, टपरीवरचा चहा! अहाहा! कोण ते सुख! चहा भजींचा अनुभव की रतिअप्सरांचा स्वर्गसहवास, काय हवे? असं विचारलं तर जगातले समस्त रसिक चहा आणि भजी हाच पर्याय निवडतील.
(या विधानानंतर ज्यांचा ज्यांचा आश्चर्याने "आ' वासला असेल त्या सगळ्यांना मी मोठ्या मनाने माफ करून टाकले आहे.)
तर भज्यांवर रिचवायचा वाफाळणारा चहा ही काय चीज आहे, हे ज्याला कळलं त्याला या जगात सुख नेमकं कशात आहे ते वेगळं सांगावं लागत नाही. या अनोख्या सुखाची एकदा चव चाखली, की दरवर्षी आपण पहिल्या दांडग्या पावसाची वाट पाहू लागतो.
पहिल्या पावसाच्या अनुभूतीचं शिखर कोणतं ते ज्याचं त्यानं ठरवावं, पण त्याचा पाया मात्र भजी रिचवून त्यावर चहा स्वहा केल्यावरच मजबूत होतो हे न नाकारता येणारं सत्य आहे.
नुकताच या "सत्याचा प्रयोग' करून पाहिल्यानेच लेखणीला हा अनोखा बहर आला आहे!
तेव्हा तुम्हीही या प्रयोगासाठी निघा! तेवढ्याचसाठी हा वाफाळणारा ब्रेक! पुन्हा भेटू!!
- वैभव चाळके
सुखदु:खांची "रंगहोळी'
अनिल धाकू कांबळी यांच्या रसदार कविता
दादरच्या सार्वजनिक वाचनालयात एकदा "रंगहोळी' नावाचा एक संग्रह योगायोगाने हातात आला. चाळून पाहवा म्हणून काही पाने उलटली. तर अवीट गोडीच्या छंदांत लिहिलेल्या हळुवार ओळींंनी मोह घातला. मी लागलीच ते पुस्तक घरी घेऊन आलो. घरच्या वाटेवरच त्यातल्या दोन ओळी हृदयात रुजून- फुलून- फळून आल्या. आज त्या घटनेला पाचसात वर्षे होऊन गेली असतील, पण कवी अनिल धाकू कांबळी आणि त्यांचा तो रंगहोळी नावाचा संग्रह आठवला की सर्वप्रथम त्याच ओळी आठवतात-
माणूस जपावा आत, खोल हृदयात, फुलासम मित्रा
घे डुबकून काव्य जळात, जळत वणव्यात जिवाची जत्रा!
कधी हाताशी चांगलं पुस्तक नसेल तर मी अशी आवडलेली पुस्तके पुन्हा पुन्हा घेऊन येतो आणि पुन्हा पुन्हा वाचत राहतो. प्रत्येक वाचनात किमान एक नवा अर्थ हाताशी लागतो. किमान एक कल्पना पूर्वबंधने तोडून विस्तारलेली पाहायला मिळते. परवा रंगहोळी पुन्हा घेऊन आलो. पुन्हा एकदा झपाटल्यागत त्यातल्या कविता वाचल्या. गुणगुणलो. काहींच्या भोवती फेर धरून नाचलो.
आज कविता मुक्तछंदाच्या नावाखाली आपलं आखीवरेखीव सौंदर्य हरवून बसली असताना या कोरीव लेण्यांची मोहिनी न पडेल तर नवल! शिवाय या कवीची छंदांवरची पकड एतकी सुंदर आहे की, या कवितांना छंदांच्या कोंदणांत बसवावं लागलंच नाही. त्या कविता त्या त्या छंदातच जन्मास आल्या आहेत. रचनेची ही सहजता खरेच वाखणण्याजोगी आहे.
रंगहोळी कविता संग्रहात पूर्वरंग, रंगमध्य आणि उत्तररंग असे तीन भाग आहेत. आपण आज त्यातल्या एकाच भागापुरते बोलुया. "नाच रे' मध्ये कवी पावसाचे वर्णन करतो-
मेध फुटत
थेंब तुटत
रान भिजत
चालले
शब्द करत
रंग भरत
मोर फुलत चालले
दुसऱ्या एका कवितेत कवीने पावसाच्या रौद्र रूपाचे वर्णन केले आहे-
दिशांतून डंका अघोरी विजेचा! पिसाटापरी ही हवा वादळी
खुनी पावसाचा कडाडून हल्ला! धरेची त्वचा पूर्ण रक्ताळली
असे रौद्ररूप पाहिलेल्या कवीला पावसाचे हळुवार रूपही चांगलेच परिचयाचे आहे. या हळव्या पावसाबद्दल कवी लिहितो -
आज मृगाचा मृदंग- पाऊस
मृद्गंधाचा सुगंध- पाऊस
"घन कोसळला' ही पावसाचे रौद्ररूप दाखविणारी कविता. त्या कवितेत कवी लिहितो -
घन कोसळला, घन कोसळला
कोवळ्या दिसांचा गर्भ कुशीतून ओघळला
ही अवघी कविताच अर्थाच्या विविध अंगांना सामावून घेत घनाचे कोसळणे अधिकाधिक रौद्र-भयाण करीत जाते.
श्रावणाविषयी सर्वांनी गोडगुलाबी लिहून ठेवलं आहे, पण या कवीने श्रावणात महापूराचा अनुभव मांडला आहे. तो म्हणतो -
प्रलय माजला इकडे राणी
गाऊं नको तू श्रावणगाणी
कवीने केलेली निसर्गवर्णने तर केवळ लाजवाब आहेत. "मधुमास'मध्ये वाटेविषयी लिहिलं आहे - वाटुली गवत दाटुली छपत चालली दूरच्या गावा तर "गिरीच्या तळी'मध्ये लिहिलं आहे- लाटांच्या वलयांत मंद झुलते आभाळ बिंबातले आणि वडाचे वर्णन करताना कवी लिहितो -
ऋतुस्नात नार वाळविते उन्हात केशसंभार
तैसेच मोकळा सोडी वड पारब्यांचा भार
आणि ज्या कडव्यांनी कवीला महानतेच्या पक्तींत बसवलं आहे. त्या या ओळी वाचा -
दिनभर गवसेना गाय रानात व्याली
चिखल चिखल झाली चिंब पाणंद न्हाली
हळुहळु हळु चाले गाय हुंकार देई
तटतट तट पान्हा... दूध सांडून जाई
भरभर जळ वाढे पूर ओढ्यास आला
धडपडत गुराखी सावरी वासराला
ढळत ढळत भोळी सांज दारात आली
नकळत कवितेचे दान देऊन गेली
असे हे सुंदर कवितांचे पुस्तक सावंतवाडीच्या वैजयंती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉ. राजेंद्र चव्हाणांनी काढलेले मुखपृष्ठ दाद द्यावे असे आहे.
-वैभव चाळके
हृदयाची परडी करून वेचावी अशी
द. भा. धामणस्करांची कविता
अलंकारांनी स्त्रीचे सौंदर्य खुलते, तसेच भाषिक अलंकारांनी भाषेचेही सौंदर्य खुलून येते. भाषेेचे शब्दालंकार व अर्थालंकार असे दोन प्रमुख अलंकार असून त्यात उपप्रकार आहेत. आपण शाळेत असताना व्याकरणात ते सारे अलंकार शिकलेले असतो. अभ्यासापलीकडे जाऊन ज्याला त्यांचा आस्वाद घेता येतो, त्याच्या ओठावर त्या त्या अलंकारांची उदाहरणे आयुष्यभर फुलत राहतात. चेतनागुणोक्ती हा मला भावलेला अलंकार. निसर्गातल्या मानवेत्तर वस्तूवर मानवी भावभावनांचा आरोप करणे म्हणजे ती वस्तू मानवाप्रमाणे वागत असल्याची कल्पना करणे म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकार होय. मला शाळेत असताना या अलंकाराची दोन उदाहरणे शिकविली होती. एक - कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन ओझे! आणि दुसरी बालकवींची फुलराणी कविता! त्यातल्या ओळी होत्या-
छानी माझी सोनुकली ती।
कुणाकडे ग पाहत होती
कोण बरे त्या संध्येतून ।
हळुच पाहतो डोकावून
तो रविकर का गोजिरवाणा।
आवडला आमच्या राणींना
लाजलाजली या वचनांनी ।
साधी भोळी ती फुलराणी
या ओळी तेव्हापासून आजपर्यंत साधारण दिवसातून एकदा तरी मी गुणगुणत असतो. त्या ओळींनी तेव्हा जी भुरळ घातली ती अद्याप उतरलेली नाही.
चेतनागुणोक्तीची ही भली मोठी प्रस्तावना लिहायचं कारण आहे द. भा. धामणस्करांचा "प्राक्तनाचे संदर्भ' हा कवितासंग्रह. काही वर्षांपूर्वी मी प्रथम हा संग्रह वाचला तेव्हाच तो माझा आवडता होऊन राहिला. मग कधीतरी मी तो विकत आणला. वाचला. पुन्हा पुन्हा वाचला. या वेळी वाचताना त्यांच्या या संग्रहातील चेतनागुणोक्ती अलंकाराने लक्ष वेधून घेतले. मला वाटते अलीकडच्या काळात चेतनागुणोक्तीचा इतका सुंदर आविष्कार इतर कुठे क्वचितच पाहावयास मिळेल.
किती सांगू एवढी उदाहरणे संग्रहात आढळतात.
वृक्षतळी पडलेली ही फुले...
त्यांनी मातीशी
पुनर्जन्मासाठी धरणे धरले आहे.
दुसऱ्या एका कवितेत धामणस्कर लिहितात- "पाने मिटून झाडे निश्चल प्रार्थनेत उभी होती.' आणखी एका कवितेत लिहितात - माळावरचे एकटे करडठे झाड रात्री उठून नवे अंकुर तुडवून टाकते... कविता म्हणून या अलंकाराने केवढे नेमके काम साधले आहे इथे ते पाहा. केवळ अप्रतिम! व्वा! म्हणायलाही भान उरू नये इतके! "जास्वंदी' नावाच्या कवितेत ते लिहितात - जास्वंदी नेहमीच रक्ताची भाषा बोलते म्हणून तगरीला मनापासून हसू येते! पुढे एके ठिकाणी ते लिहितात - "हट्टी मुलासारखी रुसलेली हिवाळ्यातील हिरवीगार शेते'. "फुलून आले झाड'मध्ये म्हटलं आहे - ओंजळीत फांद्यांच्या हलके कोसळले ब्रह्मांड...'
"गळणारी फुले' नावाच्या कवितेतल्या ओळी आहेत - वाट पाहून पाहून थकलेले फूल वाऱ्याचा हात धरून निघून जाते. धामणस्करांचा हा संग्रह आणि त्यांची एकूण कविताच रसिकाला अनोखा आनंद देते. चेतनागुणोक्ती हा एक अलंकार त्यांच्या भाषेची समृद्धी दाखविण्यासाठी नमुना म्हणून विचारात घेतला तरी ही एवढी अस्सल उदाहरणे सापडतात. त्यावरून धामणस्करांच्या एकूण कवितेचा अंदाज यायला हरकत नाही. तेव्हा लवकरात लवकर आमच्या या हिरव्यागार मैफलीत आपणही रुजून या. आम्ही आपल्या स्वागताला उभे आहोत.
जाता जाता धामणस्करांनी लिहिलेल्या कवितांतील चेतनागुणोक्ती अलंकाराच्या या "मास्टर पीसचाही अनुभव घ्या. उरल्या सुरल्या लोखंडाचेही त्याने सोने होऊन जाईल -
पाने गळून गेलेली फांदी
खिडकीच्या ग्रिल्सवर पंजा टेकते,
ग्रिल्सचे आखीव आकृती बंध
विस्कटून सहज होतात....
आता ग्रिल्सना पानेफुले आली
की फांदीलाही येतील....
- वैभव चाळके
दुष्यंतकुमार आणि सुरेश भट
साध्या माणसांचा एल्गार!
गझलचा विषय निघाला की मराठीतल्या सुरेश भटांचा जसा उल्लेख अपरिहार्यपणे येतो, हिंदीतल्या दुष्यंतकुमारांचाही येतो. गझल मुशायऱ्यात दुष्यंतकुमारांचा शेर वाचल्याशिवाय निवेदन पूर्ण होत नाही. इतकं त्यांचं काम मोठं आणि महत्त्वपूर्ण आहे.
मराठी गझल वाचनाच्या कार्यक्रमाचं निवेदन करताना कवी आणि निवेदक अरुण म्हात्रे दुष्यंतकुमारांचे काही शेर नेहमी सांगत असतात-
मैंै जिसे ओढता बिछाता हूँ
वो गजल आपको सुनाता हूँ
एक जंगल है तेरी आँखो में
मैं जहॉं राह भूल जाता हूँ
तू किसी रेल-सी गुजरती है
मैं किसी पूल-सा थरथराता हूँ
निर्जीव पुलाचं थरथरणं केवढं काव्यमय करून ठेवलंय कवीने! आपल्या नकळत आपण "व्वा!' अशी दाद देतो. मग एखाद्या कवीची प्रेमकविता सुरू होते. हा अनुभव मी दोन-तीन वेळा तरी घेतला असेन.
काही दिवसांपूर्वी दुष्यंतकुमारांचं "साये में धूप' नावाचं गझलच पुस्तक आणलं. त्यातल्या एकाहून एक सरस गझल वाचताना मजा आली. अरुण म्हात्रे ज्या गझलचे शेर ऐकवतात ती संपूर्ण गझल या संग्रहात आहे. म्हात्रे सांगतात ते वरील पहिले तीन शेर पण चौथा शेर वरील तीन शेरांहून अगदी वेगळा आहे-
हर तरफ ऐतराज होता है
मैं अगर रोशनी मैं आता हूँ।
हा शेर वाचल्यावर वाटलं- अरे, इतक्या जवळ येत होतो आपण आणि नेमके इथून मागे फिरत होतो. आज जर हा संग्रह हाती घेतला नसता तर केवढ्या श्रीमंतीला मुकलो असतो आपण!
दुष्यंतकुमारांचं भटांशी नातं आहे ते असं रंजल्या-गांजल्यांच्या मुखातील आवाज बुलंद करण्याच्या वृत्तीचं! सुरेश भटांनी लिहिलंय-
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही!
सुरेश भटांनी स्वातंत्र्योत्तर काळातील देश पाहून लिहिलंय-
उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
दुष्यंतकुमारांनी लिहिलं आहे-
अंधेरे में कुछ जिंदगी होम कर दी,
उजाले में अब ये हवन कर रहा हूँ।
सामान्य माणसाचं काय होतं आहे त्याचा आवाज काय म्हणतो आहे हे या शायरांनी गझलेला - पर्यायाने या जगाला सांगितलं.
अहोरात्र कष्ट करणाऱ्या आणि तरीही अभावात जगणाऱ्या माणसाचा आवाज बुलंद करणारे हे महामानव... त्यांनी आपल्या जगण्याचं नवं - खरं आकलन करून दिलं. कुणी कुणाचे कितीदा अश्रू पुसले हे महत्त्वाचं नाही. दुसऱ्याच्या डोळ्यांत अश्रू पाहून आपले डोळे पाणावले का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
हे पाणावणं... हीच माणूसपणाची सर्वश्रेष्ठ खूण आहे. आपले साने गुरुजी लिहितात-
फक्त माझे अश्रू
नको नेऊ देवा
हाचि ठेव ठेवा - जन्मभरी!
अर्थात हे सारं नाजूक काम आहे. सरींच्या लेखणीने पाण्यावर लिहिण्याचं! कुणी म्हणेल पण म्हणजे काय? ते कसं कळेल? उत्तर सोपं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठाच्या अभंगात लिहून ठेवलं आहे-
भावबळे आकळे। एऱ्हवी ना कळे।

No comments:
Post a Comment