सामाजिक समतेचे प्रतीक
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं साखरपा हे माझं गाव. तिथे खंडवाडी नावाच्या छोट्या खेड्यात माझं बालपण गेलं. आज मुंबईत जगताना सगळ्या सण उत्सवांच्या वेळी ते जुने दिवस, त्या लोकरीती, त्या वेळेचे ते खेळ आठवतात. होळी अर्थात शिमगा आला की ते पंधरा दिवस गाव मनात पुन्हा जिवंत होतो. शाळा सुटल्यावर पळत पळत घरी यावं. पटापट दोनचार घास पोटात ढकलून कंबरेला आकडी बांधावी. त्यात कोयती सरकावून रानात शेवरीचा शोध घ्यायला निघावं. एखादी शेवर सापडली की तिला तोडून-किसून बांधावी आणि सजवून होळीच्या मळीत आणून उभी करावी. रात्री जेवून तिथेच आट्यापाट्या खेळाव्यात. मग होळी पेटवून दिंडे, आमट्या वाजवाव्यात. असा सगळा सुखाचा महासागरच त्या दहा दिवसांत झुलत असायचा.
होळी झाली की शिमग्याचा सण अर्थात वडे मटणाचा बेत असे. आणि मग दुपारपासून कोल्याचा नाच सुरू होई. वाडीतले सगळे जण देवळात जमत. मग एका तरुणाला साडी नेसवून गोमू बनवलं जाई. दुसऱ्याला मेकअप लावून कृष्ण बनवत. त्याला अनेकदा गोम्याही म्हणत. या गोमू आणि गोम्याला मध्यभागी ठेवून त्याच्या दोन्ही बाजूंनी मग इतर लोक दोन सरळ रेषांत वल्हे घेऊन उभे राहत आणि विशिष्ट पदन्यास करीत गाणी म्हणत नाचत. मधीच एखादी चाल मारली जाई. वल्हेधारी उभ्या रेषेत तर गोमू-गोम्या आडव्या रेषेत विशिष्ट लयीत झुलत राहत. एकजण डोलकी वाजवत असे. एक जण पुढे म्हणे. बाकीचे त्याच्या मागून म्हणत-
रायगड किल्ल्याला सोन्याच्या पाच पायऱ्या
तोरण बंाधिले भवानी देवीला
या गाण्यापासून
शेलारमामा म्हातारा ऐंशीया
वर्षांचा त्याने लढाय केली उदय भानूशी..
पर्यंतचा ऐतिहासिक आठवणी जागवणारी म्हटली जात.
आंबेवाडी फणसवाडी अलका हीच काय गो सासूरवाडी पासून गंगाजमना दोघी बहिणी ग पाणी जायजुय व्हाय। माशानं मारला दणका ग पाणी पाटाला जाय पर्यंतची रोजच्या जगण्याशी निगडित असलेली गाणी त्यात असत. त्याशिवाय सोंबा या देवा तू माझा सारथी देवाची आरती ओवाळू ये ओवाळू ये अशी आरती असे. त्यात देवानाच सारथी करून देवाच्या देवाला ओवाळलं जाई.
आमचं घर थोडं उंचावर आहे. म्हणून आमच्या घरी आल्यावर लोक हमखास वाळकेश्वरही हवा डोंगरी । बंगला बांधिला हवेवरी । त्या बंगल्याला दोन चार खिडक्या । हवा खेळे अति छान हो। हे गाणव म्हणत आणि त्यातील वाळकेश्वरी शब्दाच्या जागी चाळकेश्वरी असा शब्द वापरत तेव्हा छानच वाटत असे.
घरोघरी हा नाच फिरत राही. सर्वत्र गोमू गोम्या, ढोलकीवाला आणि नाचणाऱ्यांना ओवाळून दक्षिणाही दिली जात असे. रात्री उशिरापर्यंत हा नाच सुरू राही.
दुसऱ्या दिवशीपासून आमचा नाच बाहेर गावी जात असे आणि बाहेरचे नाच आमच्याकडे येत. त्यात जोयशीवाडीचा नाच खास असे. ते लोक जाकडी-नमनातील ड्रेस घालून नाचायला येत. त्यामुळे एक वेगळेच ग्लॅमर निर्माण होई. कधी गुरववाडीवरचा लिंगायत-गुरवाचा नाच येई. अधूनमधून सोंगे येत. आमचे खेळ, नाच यातले गुरू आणि हरहुन्नरी आप्पा सुर्वे कसलं तरी फर्मास सोंग काढीत. एकनाथांच्या कूट रचना म्हणत ते नाचत असत.
आम्ही मुलंही वह्यांच्या पुढ्यांचे मुखवटे बनवून रंगवून त्याला कोंबडीच्या पिसांचे तुरे खोवून सोंग काढायचो. किंवा मोठ्यांसारखा छोट्यांचा नाच काढत दारोदार फिरून धमाल करायचो. लोक मोठ्यांना पाच किंवा दहा रुपये दक्षिणा देत. आम्हाला चार आणे, वीस पैसे, आठाणे मिळत. आम्ही फक्त दहाबारा घरेच फिरायचो. पाच सहा रुपये जमायचे, ते वाटून घेतल्यावर श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं. गाण्यावाजवण्याचा आनंद मिळायचा तो वेगळाच!
कोल्याच्या नाचाचे एक फार मोठे वैशिष्ट्य मला अलीकडे जाणवले. या नाचाने वर्षानुवर्षे सामाजिक समतेची गुढी उभी ठेवली आहे. आमचं गाव किनाऱ्यापासून जवळजवळ 50 किमी दूर आहे. कोळी समाजाचा आणि आमचा जवळचा संबंध नाही, तरी कोळी समाजाचा हा नाच आमच्याकडे मोठ्या प्रेमाने केला जातो. तो कोळ्यांचा आहे असं आम्हाला वाटतच नाही. एरवी स्वतःला शहाण्णव कुळी म्हणणारे मराठे, ब्राह्मणांसारखे शुध्द शाकाहारी असलेले लिंगायत- गुरव आणि जाकडी, नमननाट्यात वाखाणलेले गेलेले कुणबी हे सगळेच कोळी नसून कोळ्यांचा हा नाच आपला मानतात. दर शिमग्याला त्याची मजा घेतात आणि इतरांना देतात. प्रत्यक्ष कोळी समाजात हा नाच होतो की नाही कुणास ठाऊक!
शिमगा म्हटलं की, होळी, फाग, आट्यापाट्या, पालखी, खुणा या सगळ्याबरोबरच कोल्याच्या नाचाला मोठे महत्त्व आहे. विशेषतः त्याच्या या सामाजिक समतेच्या संदेशामुळे... सामाजिक अभिसरणाच्या त्याच्या गुणामुळे!!
- वैभव बळीराम चाळके
तिने चुंबिलेली लिलीची फुले
लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले...!
लिलीची फुले
आता कधीहि
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
ही पु.शि.रेगे यांची कविता आहे. अवघ्या आठ ओळींची. अवघ्या अठरा शब्दांची. पण तिच्यात मावणारा अवकाश फार मोठा आहे. म्हणूनच कदाचित ती कविता प्रथम वाचली तेव्हापासून मनात घर करून राहिली आहे.
ही कविता आहे डोळ्यांतल्या पाण्याची-अर्थात अश्रूंची-आसवांची! अश्रूंचे आपल्या जीवनातील स्थान फार मोठे आहे. डोळे डबडबले आहेत हे विधान डोळे ठार कोरडे झाले आहेत या विधानापेक्षा अधिक सुंदर आहे, नाही का? म्हणूनच तर साने गुरुजींनी आपल्या कवितेत "फक्त माझे अश्रू नको नेऊ देवा हाचि ठेव ठेवा जन्मभरी!' अशी प्रार्थना केली आहे. आणि चारोळीचा जनक चंद्रशेखर गोखले यांनी पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, डोळे कुणाचे भरणार नसतील तर मरणही व्यर्थ आहे असं म्हटलं आहे.
वरील कविता आसवांशीच निगेेेडित आहे. माणसाला माणसापासून तोडणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आसवांची कविता आहे ही.
कुणी तरी एक ती... लिलीची फुले हाती घेऊन उभी असते. कवी तिला पाहतो. पुढच्याच क्षणी ती हातातली लिलीच फुले चुंबून घेते. ती लिलीची फुले चुंबत असताना तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. का? ते कवीला माहीत नाही. पण त्या लिलीच्या फुलांशी तिचं कुणीतरी माणूस जोडलेलं असणार. लिलीची फुले कधी तरी तिच्या प्रिय माणसाने तिला दिली असतील आणि आता तो नाही म्हणून तिच्या डोळ्यांत ही लिलीची फुले पाहून आसवं आली असतील. त्याच्या स्मृतीने उचंबळून येऊन तिने ही फुले चुंबली असतील किंवा असेच काही तरी...काही तरी खास आठवण त्या लिलीच्या फुलांशी जोडलेली आहे. म्हणून ती फुलं हाती घेतल्यावर चुंबावी वाटली आणि चुंबल्यावर डोळ्यांत पाणी आलं. कवीचा आणि तिचा काहीही पूर्वसंबंध नाही. तो ते एक दृश्य पाहतो एवढाच त्याचा तिच्याशी संबंध! पण तो कवी आहे. सुहृद आहे.( गंगाधर पाटलांनी पु.शि. रेगे यांच्या निवडक कविताचं सकलन केलं आहे, त्याचं नाव "सुहृदगाथा'असंच ठेवलं आहे.) त्यामुळे तिचे डोळे भरलेले पाहून तो तिच्या भावनांशी सहकंप पावतो. तिला तशी आसवांनी डबडबलेली पाहून त्याचंही मन भरून येतं.
पुढच्या चार ओळींत कवी सांगतो की, त्या घटनेचा परिणाम इतका खोल होता की आता कधीही, कुठेही लिलीची फुले दिसली की ती घटना आठवते आणि डोळ्यांत पाणी साकळू लागते. कवी एखाद्या प्रसन्न सकाळी बागेत जातो. अचानक सुंदर उमललेली लिली दिसते. त्याचा स्मृती जागृत होतात. पटकन डोळे भरून येतात. किंवा तो एखाद्या समारंभात जातो लिलीच फुले दिसतात, डोळ्यांत एकाएकी आसवं भरून येतात. त्याच्या संवेदनशील मनानं आणि आसवांनी त्या मुलीच्या आसवांशी आणि तिच्या अज्ञात कहाणीशी मोठे गोड भावबंध निर्माण केले आहेत. स्नेहसंबंधाचे एक हिरवे झाडच त्यांच्या आत रुजून आले आहे.
प्रथम वाचनात ही कविता पटकन कळत नाही. सोपी आहे तरी अवघड वाटते. कारण ती थेट काही न बोलता बरेच काही सुचवते. त्यात या कवितेची रचना थोडी आडवळणाची आहे. त्या आठ ओळींतील पहिल्या साधारण साडेतीन ओळीनंतर स्वल्पविराम येतो, तिथे थांबलात, "डोळां' शब्दातील "ळा' वर असलेला अनुस्वार म्हणजे डोळ्यांत हे समजून घेतलात( "कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबां गेलां' मध्ये "बा'वर अनुस्वार आहे, तो आदरार्थी अनेक वचनांवरचा आहे आणि तो "बाबांनो' असे सुचवतो.) आणि दुसऱ्या कडव्यातील "पाहता'नंतरचा स्वल्पविराम आणि पुन्हा "डोळां' वरील अनुस्वार समजून घेतलात तर कविता एकदम सोपी होत जाईल.
पु.शि. रेगे यांची कविता कळायला थोडे श्रम पडतात. पण कष्टाने कमावलेली भाकरी जो आनंद देते त्याला उपमा नाही. तुम्ही चांगल्या,े दर्जेदार कवितांच्या शोधात असाल आणि थोडे कष्ट करायची तयारी असेल तर पु.शि.रेगेंच्या कविता जरूर वाचा. तसे नसेल तर ही लिलीची फुले काही कमी महत्त्वाची नाहीत. गेली साधारण दहा-बारा वर्षे ती माझ्या ओंजळीत अगदी ताजीतवानी राहिली आहेत. त्यातली काही तुमच्या हाती देतो आहे. ती जपून ठेवा. कुणी रसिक भेटला तर त्यातली काही त्यासही द्या!!
-वैभव बळीराम चाळके
No comments:
Post a Comment