मुंग्या
सखाराम अण्णाच्या घरावर सूर्य चढला की त्याची किरणं थेट खिडकीतून अजय झोपतो त्या खाटेवर येत. त्या चटक्याने अजय उठे आणि डोळे चोळत आंघोळीला निघे. आजही त्याच चटक्याने त्याला जागा आली. तो उठला आणि आंघोळीला निघाला.
शाळेला अभ्यासाची सुट्टी होती. दहावीची परीक्षा संपली म्हणजे नववीची सुरू होणार होती. अजय झेपेल तेवढा अभ्यास करी आणि कंटाळा आला म्हणजे गावात चक्कर मारून येई.
भाजावळीचे दिवस होते. गावाच्या आसपास सर्वत्र लोक भाजावळीच्या कामात दंग होते. दिवसभर एकेक तरवा भाजवळीसाठी तयार केला जाई आणि मग पहाटे पाचला उठून लोक तरव्यावर माती लावायला जात. यंदा नववीचा अभ्यास असल्याने अजयचे आईवडील त्याला घेऊन जात नव्हते. पण गेल्या वर्षापर्यंत तो आवर्जून जाई. सकाळी साधारण साडेसहा -सातपर्यंत माती खणून बारीक करून तरव्यावर पसरली जाई आणि तरव्याला पेट दिला जाई. म्हणता म्हणता आग भडके-धुराचे हत्ती आभाळाच्या दिशेने पळू लागत.
अजय उठला. घरामागच्या मोरीत जाऊन त्याने आंघोळ केली आणि भाजीभाकरी खाऊन तो अभ्यासाला बसला. वारं सुटल होतं आणि शेतं आगीनं पेटली होती. त्यामुळे गावावर आगीच्या झळा दौडत जात होत्या. घरात फारच गरम होतं म्हणून अजयने अभ्यासाचं गाईड घेतलं, घराला कडी मारली आणि तो आमटोऱ्याच्या सावलीत येऊन बसला. आमटोरा हे आंब्याचं झाड. त्याची फळं फार आंबट होती. ती कोणी तोंडातही घेत नसे, पण त्याची सावली मात्र एकदम गडद पडत असे. अजय परीक्षेच्या काळात इथेच अभ्यास करीत बसे.
आजही तो येऊन तिथल्या नेहमीच्या पाथरीवर बसला. अधूनमधून येणारे उष्ण वारे वगळता इथं थंड वातावरण होतं. म्हणूनच तो सुखावला होता. पण एका क्षणी तो धडपडत उठला. त्याचा हात प्रतिक्षिप्त क्रियेने कुल्ल्याकडे गेला होता. तोंडाने बोंबलत आणि कुल्यावर हात घासत तो वेडावाकडा नाचू लागला. वेदनेनं हैराण होत तो पुढची दोनचार मिनिटे तसाच कळवळत राहिला. त्याला लाला मुंगीने दंश केला होता. एकसारखा यग मारत होता. जरा वेदना शांत झाल्यावर त्याने ती मुंगी शोधून काढली आणि तिथल्याच एका दगडाने तिचा चेंदामेंदा केला. तिच्या अस्तित्वाची फक्त एक रेघ पाथरीवर राहिली.
अजयचे अभ्यासातून लक्ष उडाले. त्याला लहानपणीची आठवण आली- पाचवीत असताना एकदा हरे अभ्यासाला आलो तेव्हा अशाच एका मुंगीने मांडीवर चावा घेतला होता आणि वेदनेने कळवळत घरी जाताना आपण ढोपर फोडून घेतलं होतं. त्याला त्या मुंग्यांचा राग आला.
"आपण कळायला लागल्यापासून पाहतोय या आमटोऱ्याच्या मागच्या चिवारीच्या बाजूला या लालमुंग्यांची वारुळं आहेत. वारुळं नव्हे, साम्राज्याच आहे त्यांचं. त्या एरवी कुणाला त्रास देत नाहीत तरी एखाद्याला चावल्या म्हणजे तो असा एकदम फुगडी घालू लागतो.
"आपण यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे-' अजय मनाशीच बोलत होता.
दुसऱ्या दिवशी आईबाबा सकाळी भाजावळीसाठी बाहेर पडून गेले. उन्हं खाटेवर आली तसा अजय उठला. तोंडही न धुता तो काडीेपेटी खिशात टाकून घराला कडी मारून घराबाहेर पडला. गोठ्याच्या शेजारी गवताच्या वरंडी रचून ठेवल्या होत्या. त्यातली एक वरंड त्याने डोक्यावर घेतली.आमटोऱ्याच्या पाथरीवर त्याने वरंड उतरवून ठेवली. पुन्हा घरी जाऊन खोपीतली भाराभर लाकडे बांधून घेऊन आला.
आता त्याने त्या लालमुंग्यांच्या वारुळांभोवती गवताची एकेक पेंडी रचून गवताची तटबंदी उभारली. त्या पेंड्यांनी पेट घेताच वाऱ्यावर त्या उडून जाऊ नयेत म्हणून त्याने त्यावर लाकडे रचली. एकदम कडेकोट बंदोबस्त केला गेला. त्याला इतिहासातला पाठ आठवला, पुरंदर किल्ल्याला मुघल फौजेने वेढा घातला... आता एकही मुंगी जिवंत राहणे शक्य नाही! तो मनातल्या मनात म्हणाला. मग काडेपेटी काढून त्याने शिल्लक राहिलेल्या पेंड्यांमधली एक पेंडी पेटवली आणि त्या पेंडीने वारुळांभोवती रचलेल्या गवताच्या तटबंधीला आग लावली. सारीकडून गवत भरभरून पेटले. आतल्या मुंग्यांची कोण धावपळ झाली. असंख्य मुंग्या वारुळांतून बाहेर आल्या. प्रचंड वेगाने त्या सैरावैरा पळू लागल्या आणि शेकड्याच्या संख्येने जळून करपून मरू लागल्या. अजयला आता चेव चढला. त्याने उरलेल्या पेंड्या त्या वारुळांवर टाकल्या. आता त्याला त्यांचं सैरावरा पळणं पाहण्याची गरज उरली नाही. त्याला आता फक्त वारुळं, मुंग्या, गवत आणि लाकडाची राख उरलेली पाहायची होती.
हजारो मुंग्या मृत्युमुखी पडल्या. मघापासून गवताचा वास येत होता. आता त्या वासापेक्षा करपलेल्या मुंग्यांचा वास अधिक गडद झाला.
अजयच्या कुल्यावरच्या वेदना कमी कमी होत शांत झाल्या.
दुपारी आईवडील घरी परतले तेव्हा त्यांना हा सारा प्रकार समजला. वडील काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर ताण तेवढा दिसू लागला. पण आई करवादली, "काय केलंस हे गुलामा? देवाच्या मुंग्या होत्या त्या! सात पिढ्यांपासून आहेत तिथं. कुणाची हिंमत आली नाही त्यांना हात लावायची? आणि तू आज त्यांची राख रांगोळी केलीस! देव कोपला म्हंजी रं! काय ही अवदसा सुचली तुला?' आणि मग आवाजाची पट्टी बदलत आई हात जोडून म्हणाली, "संभाळ रं देवा माझ्या लेकरला. हातून चूक झाली आसल! लहान लेकरू हाय त्याला माफ कर!
आपण काही चूक केली आहे असं त्याला आतापर्यंत वाटत नव्हतं. पण आई रागवल्यावर आणि विशेषतः तिने देवाला साकडं घातल्यावर अजय घाबरला. आपण काही तरी अक्षम्य पाप केलं आहे आणि त्याची फळं आता आपल्याला भोगावी लागणार आहेत असं त्याला वाटू लागलं. आई देवापुढं पदर पसरत होती. अजयच्या नावानं शिव्या हासडत होती. मग अजयही मनातल्या मनात देवाला सॉरी म्हणाला. आई खूप खूप वैतागली आणि मग त्याला जवळ घेऊन रडरड रडली.
नेहमीप्रमाणे रात्री नऊला सगळे जण झोपी गेले. अजय एकटाच अभ्यास करत जागत होता. पण आज त्याचं मनच लागेना. त्याला तो दुपारचा प्रसंग पुन्हापुन्हा आठवत होता. मनात अनामिक भीती सळसळत होती. शेवटी साडेनऊला तो आपल्या खाटेवर झोपायला गेला.
आणि रात्री अकराच्या सुमारास...
"आई ग! हट... हट...' असा आवाज करीत तो उठला त्याच्या आवाजाबरोबर आई आणि बाबाही उठले. अंधारातच दोघे खाटेजवळ आले. अजय उठला होता, पण त्याचे डोळे मिटलेलेच होते. तो हातपाय झाडत होता. आणि अंगावरच्या मुंग्या झाडत होता. त्याच्या सर्वांगाला हजारो मुंग्या दंश करीत होत्या. वडिलांनी त्याचा हात धरला तर त्याने त्यांना भिरकावून दिले. आई "अजू, बाळा अजू' करीत त्याला समजवू पाहत होती. पण अजू शुध्दीवर नव्हताच मुळी! तो त्या हजार मुंग्यांच्या दंशांनी हैराण झाला होता. कधी तोंडावरून हात फिरवत होता. कधी पाठीवर तर कधी पायांवर! त्याने त्याच वेगाने शर्ट काढून फेकला. बरमोडा उतरवला. तरी हजारो मुंग्या त्याच्या अंगावर होत्याच्या तो त्यांना शिव्या पालत अगतिक होत धडपडत होता. फार केविलपणा झाला होता तो. आई त्याच्या जवळ गेली. पण त्याने तिला हिसकावून लावले. काय करावे ते कळेना तिला. इतक्यात तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. आणि विजेच्या वेगाने पुढे होत तिने होती नव्हती ताकद एकवटून त्याच्या कानफटात लागावली!
एकदम झालेल्या त्या आघाताने तो खडबडून जागा झाला आणि धडपडत आईकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहिला. अंगावर एकही मुंगी नाही हे पाहून तो सुखावला . पण भीतीने अंग थरथरत होते.
क्षणभर विसावलेली आई पुन्हा विसकटली..
"मुडदा बसविला रं सात पिड्यांचा परपंरेचा! अजाण लेकरू त्याला दोनदा चावताना लाज नाय वाटली. मला न्या तुम्हाला रक्ताचीच भूक लागली असेल तर. माझ्या पोराला पुन्हा शिवायच नाय! जाळून टाकीन... समदं घरदार... गाव जाळून टाकीन सगळं...'
- वैभव बळीराम चाळके
No comments:
Post a Comment