सुखाच्या दिशेने
लहानपणी आई रागवली, तिने मारलं की आपल्याला त्या पारतंत्र्याचा प्रचंड राग येतो. आपल्याला स्वतःचं काही स्वातंत्र्य नाही. कशाला हे ठरवून दिलेलं आयुष्य जगतोय आपण! असं वाटून घर सोडण्याचे किंवा कधी तरी चक्क आत्महत्येचेच विचार मनात येतात. पण साधारण पंधरावीस वर्षे उलटली की तेच घर नावाचे "पारतंत्र्य' हवेहवेसे वाटू लागते. मग आपण लग्न करतो. मूल होऊ देतो. कुणीही कोणाला गुलाम बनवणे केव्हाही वाईटच. त्याचा सदैव निषेधच करायला हवा. पण जी गुलामी स्वखुशीने स्वीकारली जाते त्यात एक लोभसपणा आहे. (निष्ठावान, दास वगैरे शब्दांनी आपण तिचा अभिमानाने उल्लेख करतो) हा लोभसपणा ध्यानी आला की ओठावर शब्द येतात- "मी तुझा गुलाम मर्जीने! हा तुला सलाम मर्जीने!!' हिंदी कवयित्री संत मीराबाई म्हणते- "मैं तो अपने नारायण की आपही हो गई दासी रे।' ही अशी गुलामी पत्करावी. इतकी मोठी आणि प्रेमळ माणसे लाभणे हे केवढे तरी मोठे सुखच होय.
सुखाची दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुख प्रत्येकाचं वेगळं. एकाला ज्यात सुख मिळेल त्यात दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणून जर आपल्याला सुखी व्हायचे असेल तर आपण इतरांसारखं जगून चालणार नाही. आपण इतरांसारखे जगून सुखी व्हायचे म्हटले तर ते अवघड आहे. आपल्याला आपला मार्ग शोधायला हवा. प्रसंगी तो बांधायला हवा. मेहनतीने बांधायला हवा. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. इतरांच्या मार्गाने जायचे नाही. पण त्यांच्या मार्गाला कमीही लेखायचे नाही. आपण निवडलेला सुखाचा मार्ग हा एकमेव मार्ग नव्हे. तो आपत्यासाठी सुखाचा मार्ग आहे. सचिन तेंडुलकर फार शिकला नाही. पण तरीही तो महान ठरला. कारण त्याने आपल्या सुखाचा मार्ग निवडला. घडवला. गंमत पाहा, अब्जोपती असलेला सचिन आजही मैदानात घाम गाळतो. का माहीत आहे? कारण तोच त्याच्या सुखाचा मार्ग आहे.
काही वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. दोन मराठी वकिलांनी ते लिहिले होते. त्यात त्यांनी "मानवाभिमुखतेचे शास्त्र' ही कल्पना मांडली होती. त्यात त्यांनी म्हटलं आहे, " तुम्ही असे जगा की त्यामुळे इतरांना जगण्यास मदत होईल. थोडक्यात जगताना इतरांचा विचार करा. प्रत्येकजण असा इतरांचा विचार करू लागला तर अवघं जग सुंदर होऊन जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थामध्ये दिशादर्शक व विभागदर्शक पाट्या लावा. शहराचे नियोजन असे करा की बाहेरून आलेला इसम सहज वावरू शकेल. घर असे लावा की कोणती गोष्ट कोठे आहे ते कोणलाही सहज कळले.' त्यांनी मांडलेली कल्पना ही आदर्शची कल्पना होती. आदर्श सहसा हाती येत नाही. पण त्या दिशेने सुरू झालेला प्रवास आपले आयुष्य नक्कीच आनंदी करू शकतो. अनेक वर्षे छोट्या छोट्या पातळ्यांवर हा प्रयोग करून पाहिला आणि तो अमाप आनंद देणारा ठरला आहे. एखाद्याला माहीत नसलेला मार्ग दाखवणे, एखाद्याला गाडीत चढायला- उतरायला मदत करणे, एखाद्या अंधाला रस्ता ओलांडायला करण्यासाठी मदत करणे, एखाद्या आजोबांना आधाराला हात देणे या गोष्टीही अमाप सुख देणाऱ्या-मिळविणाऱ्या ठरू शकतात.
एखाद्याच्या मनाला उभारी येईल असे दोन शब्द बोललात तरी तो "सुखमय' होऊ शकतो. पण आपल्याकडे असे प्रोत्साहनपर शब्द उच्चारण्यापेक्षा एखाद्याला वास्तवाची कठोर जाणीव देण्याचं "पुण्यकर्म' करणाऱ्यांची सख्या जास्त. दुर्दैवाने "आपल्या वाट्यास आले तेच वास्तव' ही आपली कल्पना त्या दुसऱ्याच्या माथी मारतो. एका वक्त्याने या स्वभावाच्या मंडळींच्या अखंड "यज्ञाला' "दुःखी आत्मा मंडळ' नाव ठेवल्याचे ऐकले होते आणि हे दुःखी आत्मामंडळ जगभर कार्यरत असून नेटवर्क मार्केटिंग करणारी ही सर्वात मोठी कंपनी असल्याचे त्याने म्हटले होते. आपल्या स्पष्टीकरणात तो वक्ता म्हणाला होता, कोणीही काही चागले काम करू लागला की त्याला या दुःखी आत्मा मंडळाचा माणूस भेटतो आणि म्हणतो, हे शक्य नाही रे. तुझ्या सारखे छप्पन्न जण पाहिले करेन म्हणणारे. एकालाही जमले नाही. तू उगाच नाही ती स्वप्ने पाहू नकोस, गप्प मळलेल्या वाटेने चाल! त्याच्या या वास्तवाच्या कडव्या विचाराने बिचारा पुढे टाकलेले पाऊल मागे घेतो आणि स्वत: त्या दु:खी आत्मा मंडळाचा सभासद होऊन इतरांना मागे खेचत राहतो. तुम्ही या दु:खी आत्मा मंडळाकडे दुर्लक्ष करायला शिका .
सुखाच्या दिशेने जाताना आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायला हवी ती म्हणजे पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असायला हवा. आपण पैशाकडे दोन टोकाच्या भूमिकेत पाहतो. एकतर अतिगर्वाने पैसा कुत्राही खात नाही किंवा पैसा काय वेश्याही कमवते! अशी वाक्ये उच्चारली जातात किंवा पैसा पैशाकडे जातो बाबा! किंवा आमच्या नशिबात नाही तर येणार कुठे आमच्याकडे पैसा ही वाक्ये उच्चारली जातात. पैशाविषयी हा दृष्टिकोन वाईट आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. पण जगायला पैसा लागतो. पैशाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, पण अनेक प्रश्न केवळ पैशानेच सुटतात हे आपण समजून घेतले पाहिजे. खूप पैसा कमविणे वाईट नसते. वाईट मार्गाने कमविणे वाईट असते. दारिद्र्याचं समर्थन करण्यात कोणताच पुरुषार्थ नाही.
इथे आणखी एक गोष्ट म्हणजे आपण स्वत:ला , स्वत:च्या क्षमतांना आणि मर्यादांना ओळखायला हवे. आपली इतरांबरोबर तुलना न करता स्वत:चा मार्ग निवडायला हवा. तुमचा शेजारी, नातेवाईक तुमच्यासारखा नसतो. म्हणून त्याचे घर, कमाई, जीवन तुमच्यासारखे नसते हे ओळखा. तुलना अनेकदा दु:खाचे कारण होते. ती टाळा. रोज स्वत:ला स्वत:पेक्षा उंच करा. इतरांपेक्षा उंच होण्याचा अट्टाहास सोडा.
आहे ते अनुभवा! गृहित धरू नका! आपण अनेक गोष्टी गृहित धरतो. मग त्यापासून मिळणारे सुख आपल्याला आनंदच देईनासे होते. मी अनेकांना विचारतो, उन्हातून घरी गेल्यावर, फ्रिजचे पाणी पितांना आपण सुखी आहोत असे वाटते का रे? मला कुणीही याचें उत्तर "हो' असे देत नाही. वाटते ना, बरे वाटते, त्यात काय? असेच उद्गार बाहेर पडतात. हे झाले एक उदाहरण. आपण सुखसोयी खरेदी करतो पण त्याचे सुखच घेत नाही. हे सगळे सुख गृहित धरल्यामुळे उणे होते. ते तुम्ही टाळा. झेन संप्रदायात टी ड्रिकिंग नावाचा एक ध्यानप्रकार आहे. त्याचा अर्थ हाती आलेल सुख सर्वार्थाने अनुभवणे तुम्ही हा प्रकार करून पाहा.
आपल्या सुखाआड येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आजार. कोणताही आजार आपल्याला त्रास देतोच. पण त्या आजाराला कवटाळून बसण्यात अनेकजण धन्यता मानतात. आजार वेळीच दूर करण्याचा प्रयत्न करा. तो आज आहे आणि उद्या जाणार आहे या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहा. एका पुस्तकात एक वाक्य वाचले, आजाराचे दहन करता आले नाही तर दहन करायला शिका. त्याचा अर्थ तो आजार जात नाही. त्याला सोबत घेऊन आनंदाने कसे जगता येईल ते पाहा. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ लेखकाने, दर आठवड्याला डायलेसिस घेत संपूर्ण भारतभ्रमण करणाऱ्या एका जिगरबाज महिलेचे उदाहरण दिले आहे. आपल्या कोणत्याही आजारापेक्षा आपली आजाराची कल्पनाच अनेकदा खूप वाईट असते. तशी वाईट कल्पना करणे सोडायला हवे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुखाच्या दिशेने जाताना आपल्या वाटेवर आपण स्वत:च प्रकाश टाकायला हवा. दुसऱ्याने टाकलेल्या प्रकाशावर विसंबून भागायचे नाही. आपली वाट शोधा. स्वत:च्या बुध्दीच्या तेजाचेे दीप त्या वाटेच्या दोन्ही बाजूस उजळवा आणि दिमाखात चालत राहा. सुखाच्या दिशेने जाण्यासाठी तुमच्याच या सह प्रवाशाच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!
- वैभव बळीराम चाळके
No comments:
Post a Comment