Tuesday, May 17, 2011

ऐकण्याची कला आत्मसात करायलाच हवी, तिने चुंबिलेली लिलीची फुले

ऐकण्याची कला आत्मसात करायलाच हवी!

एका छोट्याशा कंपनीतील ही गोष्ट आहे. त्या कंपनीत साधारण 15-20 कर्मचारी काम करत होते. विजय हा त्यातीलच एक. बऱ्यापैकी हुशार. कामसू सदैव तत्पर असणारा, पण आठवड्यातून एकदा तरी त्याचे सर त्याला सर्वांसमोर झापायचे. मग तो जिव्हारी लागल्यासारखा तडफडायचा आणि "माणसाची किंमतच नाही! कोण मेहनत करतो ते दिसतच नाही! माझे नशीबच फुटके' असे काहीबाही बरळत राहायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण कसे कामासाठी सदैव तत्पर असतो, हे दाखविण्यासाठी पुढेपुढे करू लागायचा. सरांचा कालचा राग जावा म्हणून आज प्रयत्न करू लागायचा. सरांनी एखादे काम सांगितले की, खूष होऊन ते उत्साहाने करायचा, परंतु त्यात हमखास चूक करून ठेवायचा आणि पुन्हा ओरडा खायचा.
कधी सर सांगायचे, "एक टेबल आणि दोन खुर्च्या हव्या आहेत आपल्याला, जरा किमती काढून ये.' दुसऱ्या दिवशी हा एखाद्या फर्निचर मालकालाच ऑफिसात हजर करायचा. त्या फर्निचरवाल्याला घरचा रस्ता दाखविल्यावर सर विजयला झापायचे, "तुला किमती काढायला सांगितल्या होत्या. फर्निचरवाल्याला बोलावून आणायला नव्हे.' मग याची बोलती बंद व्हायची. चेहरा कसनुसा व्हायचा. कधी सर सांगायचे, "तुझ्या घरच्या वाटेवर रद्दीवाला आहे ना, त्याला रद्दी घेऊन जायला सांग.' दुसऱ्या दिवशी रद्दीवाला दोन मुलांना घेऊन यायचा. सर रद्दीवाल्याला म्हणायचे,"ही दोन मुले कशाला घेऊन आला आहेस? दहा किलो तर रद्दी आहे अवघी!' तर तो म्हणायचा, " साहेब जुन्या खुर्च्या, टेबल आणि फॅन पण न्यायचा आहे ना?' "कोणी सांगितले तुला?' सर त्याच्यावर वैतागायचे. मग आपण त्याला उगाच बडबडतोय हे लक्षात येऊन, विजयला बोलावून त्या रद्दीवाल्यासमोर त्याची रद्दी करून टाकायचे. मग विजय संबंध दिवस वैतागत राहायचा. सायंकाळी सुटल्यावर तसाच वैतागत घरी जायचा आणि घरच्यांचीही सायंकाळ खराब करून टाकायचा.
आपल्या इज्जतीचे पार पोतेरे करून घेतले होते त्याने. त्याची चूक एकच होती- त्याला ऐकण्याची कला अवगत नव्हती. म्हणजे त्याला दोन कान होते, ते दोन्ही कान तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते. पण ऐकणे- उत्तम ऐकणे ही एक कला आहे याची त्याला जाणीव नव्हती. तो कोणाचेही संपूर्ण ऐकत नसे. संपूर्ण लक्ष देऊन तर त्याने कधीच काही ऐकलेले नाही. त्याचा दोष हा एवढाच होता. पण तोच फार मोठा होता. त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला हे सांगण्याचा एक-दोनदा प्रयत्न केला, तर तो त्या सहकाऱ्यावरच वैतागला आणि म्हणाला,"नीट ऐकून घेऊ म्हणजे काय? बोलणाऱ्याच्या तोंडाला कान लावू?' त्यावर तो सहकारी काहीच बोलला नाही. पुढे अनेक दिवस विजयचा घोर अपमान होत असताना "आजही नीट न ऐकल्यामुळेच!' याची तो सहकारी खात्री करून घेत असे.
मराठीतले एक नामवंत साहित्यिक पुण्यात राहत होते. त्यांच्या बाबतीतली एक गमतीदार गोष्ट आहे. काही दिवस ते आजारी होते. त्याच दरम्यान मुंबईचा एक पत्रकार पुण्यात आला होता. जाता जाता त्या साहित्यिकांना भेटण्यासाठी तो त्यांच्या घरी गेला. साहित्यिक घरी नव्हते. म्हणून त्याने शेजारी चौकशी केली. शेजारी म्हणाला,"ते गेले!' पत्रकाराने घाईघाईने मुंबई गाठली आणि "सुप्रसिद्ध साहित्यिक अमुकतमुक यांचे निधन' अशी बातमी छापून टाकली. गंमत म्हणजे "ते गेले!' असे सांगताना त्या शेजाऱ्याला "ते बाहेरगावी गेले' असे सांगायचे होते.
नीट बोलले पाहिजे, हे खरे पण दुसऱ्याने कसे बोलावे यावर आपले नियंत्रण नसते. म्हणून आपण नीट ऐकले पाहिजे.म्हणजे अशा जीवघेण्या गमतीजमती होणार नाहीत. बरे हे ऐकणे म्हणजे समोरच्याचे फक्त शब्दच ऐकणे नव्हे तर त्याचे म्हणणे ऐकणे होय. दरवेळी नुसते शब्द ऐकून बोलणाऱ्याला काय म्हणायचे आहे, हे समजून घेता येत नाही. त्यासाठी त्या शब्दांचा सूर त्यासोबत होणारी शरीराची हालचाल समजून घ्यायला हवी, "शहाणा आहेस!' हे एकच वाक्य आपण "शहाणे माझे बाळ ते!' आणि "मूर्ख कुठला!' अशा दोन्हीही अर्थाने वापरतो नाही का? "तो काल सकाळी कोल्हापूरहून आला.' हे एकच वाक्य माणूस कसा उच्चारतो त्याप्रमाणे बदलत जाते. समजा एखाद्याने "तो' वर जोर दिला तर त्याचा अर्थ "तो' आला "हा' आला नाही. एखाद्याने "काल'वर जोर दिला, तर "काल'आला, "आज' आला नाही. आणि "सकाळी'वर जोर दिला तर "सकाळी' आला "दुपारी' नव्हे असा अर्थ निघतो. "कोल्हापूर' आणि "आला' यावर जोर असेल तर अनुक्रमे मुंबई व दिल्लीवरून नव्हे तर "कोल्हापूर'हून आला आणि "गेला' नव्हे तर "आला' हे प्रामुख्याने सांगायचे असते.
आणखी एक गंमतीची गोष्ट अशी आहे. एका सकाळी एक पहेलवान जवळच्या टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याने धावण्याचा व्यायाम करीत असतो, वाटेत त्याला एक माणूस गाडी दरीत ढकलत असल्याचे दिसते. त्या किरकोळ शरीरयष्टी असलेल्या माणसाला गाडी काही जागची हलत नाही. म्हणून हा पहेलवान जाता-जाता एक धक्का देतो, त्याबरोबर ती गाडी थेट दरीत जाऊन पडते. तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस "थॅंक्यू' म्हणेल म्हणून पुन्हा धावू लागलेला पहेलवान मागे पाहतो, तेव्हा तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस त्याला शिव्या घालत असतो असे का होते, हे माहीत आहे? कारण त्या पहेलवानाला ऐकण्याची कला अवगत झालेली नाही. तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस गाडी ढकलण्यासाठी प्रयत्न करीत नसतो तर गाडीच्या आधाराने व्यायाम करीत असतो. पहेलवानाने थोडे लक्षपूर्वक पाहिले असते तर त्या किरकोळ शरीरयष्टीच्या माणसाच्या पायातले जॉगिंग शूज, हाफ पॅण्ट आणि स्पोर्टस्‌ टी-शर्टने हा माणूस व्यायाम करतो आहे, हे त्याला नेमके सांगितले असते, पण ऐकायची- नीट ऐकायची सवय नसल्याने अख्खी गाडी दरीत गेली.
आठवून बघा, तुम्ही कधी त्या विजयसारखे अपमानित झाला आहात? एखाद्याच्या जाण्याची भलतीच बातमी प्रसारित केली आहे? किंवा एखाद्याची गाडी अशीच दरीत ढकलून मोकळे झाला आहात? नाही म्हणू नका, जरा स्मरणशक्तीला ताण द्या. कधी ना कधी आपण ऐकण्याचा आळस करू मोठी चूक केलेली असते.
आता प्रश्न उरतो तो एकच- ही ऐकण्याची कला आत्मसात कशी करायची? उत्तर अगदी सोपे आहे. देवाने आपल्याला दोन कान दिले आहेत. ते आपण सैदव उघडे ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दोन कानांच्या मध्ये लक्ष ठेवायला हवे आणि मग तिथेच असलेले बुद्धी वापरून बोलणाऱ्या काय म्हणायचे आहे याचा नेमका अर्थ लावला पाहिजे. यासाठी पाच पैसेसुद्धा खर्च येत नाही. ईश्वराने या सर्व शक्ती आपल्याला मोफत दिल्या आहेत. आजपासूनच आपण ही ऐकण्याची कला अवगत करण्याचा प्रयत्न करूया!
-वैभव बळीराम चाळके



तिने चुंबिलेली लिलीची फुले


लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले...!
लिलीची फुले
आता कधीहि
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
ही पु.शि.रेगे यांची कविता आहे. अवघ्या आठ ओळींची. अवघ्या अठरा शब्दांची. पण तिच्यात मावणारा अवकाश फार मोठा आहे. म्हणूनच कदाचित ती कविता प्रथम वाचली तेव्हापासून मनात घर करून राहिली आहे.
ही कविता आहे डोळ्यांतल्या पाण्याची-अर्थात अश्रूंची-आसवांची! अश्रूंचे आपल्या जीवनातील स्थान फार मोठे आहे. डोळे डबडबले आहेत हे विधान डोळे ठार कोरडे झाले आहेत या विधानापेक्षा अधिक सुंदर आहे, नाही का? म्हणूनच तर साने गुरुजींनी आपल्या कवितेत "फक्त माझे अश्रू नको नेऊ देवा हाचि ठेव ठेवा जन्मभरी!' अशी प्रार्थना केली आहे. आणि चारोळीचा जनक चंद्रशेखर गोखले यांनी पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, डोळे कुणाचे भरणार नसतील तर मरणही व्यर्थ आहे असं म्हटलं आहे.
वरील कविता आसवांशीच निगेेेडित आहे. माणसाला माणसापासून तोडणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आसवांची कविता आहे ही.
कुणी तरी एक ती... लिलीची फुले हाती घेऊन उभी असते. कवी तिला पाहतो. पुढच्याच क्षणी ती हातातली लिलीच फुले चुंबून घेते. ती लिलीची फुले चुंबत असताना तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. का? ते कवीला माहीत नाही. पण त्या लिलीच्या फुलांशी तिचं कुणीतरी माणूस जोडलेलं असणार. लिलीची फुले कधी तरी तिच्या प्रिय माणसाने तिला दिली असतील आणि आता तो नाही म्हणून तिच्या डोळ्यांत ही लिलीची फुले पाहून आसवं आली असतील. त्याच्या स्मृतीने उचंबळून येऊन तिने ही फुले चुंबली असतील किंवा असेच काही तरी...काही तरी खास आठवण त्या लिलीच्या फुलांशी जोडलेली आहे. म्हणून ती फुलं हाती घेतल्यावर चुंबावी वाटली आणि चुंबल्यावर डोळ्यांत पाणी आलं. कवीचा आणि तिचा काहीही पूर्वसंबंध नाही. तो ते एक दृश्य पाहतो एवढाच त्याचा तिच्याशी संबंध! पण तो कवी आहे. सुहृद आहे.( गंगाधर पाटलांनी पु.शि. रेगे यांच्या निवडक कविताचं सकलन केलं आहे, त्याचं नाव "सुहृदगाथा'असंच ठेवलं आहे.) त्यामुळे तिचे डोळे भरलेले पाहून तो तिच्या भावनांशी सहकंप पावतो. तिला तशी आसवांनी डबडबलेली पाहून त्याचंही मन भरून येतं.
पुढच्या चार ओळींत कवी सांगतो की, त्या घटनेचा परिणाम इतका खोल होता की आता कधीही, कुठेही लिलीची फुले दिसली की ती घटना आठवते आणि डोळ्यांत पाणी साकळू लागते. कवी एखाद्या प्रसन्न सकाळी बागेत जातो. अचानक सुंदर उमललेली लिली दिसते. त्याचा स्मृती जागृत होतात. पटकन डोळे भरून येतात. किंवा तो एखाद्या समारंभात जातो लिलीच फुले दिसतात, डोळ्यांत एकाएकी आसवं भरून येतात. त्याच्या संवेदनशील मनानं आणि आसवांनी त्या मुलीच्या आसवांशी आणि तिच्या अज्ञात कहाणीशी मोठे गोड भावबंध निर्माण केले आहेत. स्नेहसंबंधाचे एक हिरवे झाडच त्यांच्या आत रुजून आले आहे.
प्रथम वाचनात ही कविता पटकन कळत नाही. सोपी आहे तरी अवघड वाटते. कारण ती थेट काही न बोलता बरेच काही सुचवते. त्यात या कवितेची रचना थोडी आडवळणाची आहे. त्या आठ ओळींतील पहिल्या साधारण साडेतीन ओळीनंतर स्वल्पविराम येतो, तिथे थांबलात, "डोळां' शब्दातील "ळा' वर असलेला अनुस्वार म्हणजे डोळ्यांत हे समजून घेतलात( "कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबां गेलां' मध्ये "बा'वर अनुस्वार आहे, तो आदरार्थी अनेक वचनांवरचा आहे आणि तो "बाबांनो' असे सुचवतो.) आणि दुसऱ्या कडव्यातील "पाहता'नंतरचा स्वल्पविराम आणि पुन्हा "डोळां' वरील अनुस्वार समजून घेतलात तर कविता एकदम सोपी होत जाईल.
पु.शि. रेगे यांची कविता कळायला थोडे श्रम पडतात. पण कष्टाने कमावलेली भाकरी जो आनंद देते त्याला उपमा नाही. तुम्ही चांगल्या,े दर्जेदार कवितांच्या शोधात असाल आणि थोडे कष्ट करायची तयारी असेल तर पु.शि.रेगेंच्या कविता जरूर वाचा. तसे नसेल तर ही लिलीची फुले काही कमी महत्त्वाची नाहीत. गेली साधारण दहा-बारा वर्षे ती माझ्या ओंजळीत अगदी ताजीतवानी राहिली आहेत. त्यातली काही तुमच्या हाती देतो आहे. ती जपून ठेवा. कुणी रसिक भेटला तर त्यातली काही त्यासही द्या!!
-वैभव बळीराम चाळके

No comments:

Post a Comment