Monday, September 12, 2016

जग बदलण्याचा राक्षसी वेग
जग नेहमीच बदलत आले आहे. अश्मयुगापासून आज सोशल मीडियाच्या युगापर्यंत आपण सतत बदलत आलो आहोत. बदल ही एकमेव गोष्ट शाश्वत आहे.  थांबला तो संपला, ही म्हण त्यातूनच निर्माण झाली. पण गेल्या काही वर्षांपासून आपण राक्षसी वेगाने बदलतो आहोत. परिवर्तन आणि बदल या दोन शब्दांकडे बारकाईने पाहिलेत की आपण परिवर्तन फार मागे सोडून आलोय आणि नुसतेच बदलू लागलोय हे लक्षात येईल. यातून झाले काय तर आपली नीतिमूल्ये गुणविवेकच हरवून बसला आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याने त्याच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे पूर्वी मोठे मासे छोट्या माणसांना खात असत. आता अधिक वेगाने जाणारे मासे कमी वेगाने जाणार्‍या माशांना खाऊ लागले आहेत.
मागच्या पिढीची अडचण
या राक्षसी वेगामुळे मागच्या पिढीची मोठीच अडचण झाली आहे. नव्या पिढीच्या या वेगाशी स्वतःला जुळवून घेणे त्यांना मोठे जिकरीचे झाले आहे. याबाबतीतील एक किस्सा तर मोठा भीषण आहे. एक वडील निवृत्त होतात. चांगली तीस-पस्तीस वर्षे इमाने इतबारे नोकरी केल्यामुळे त्यांना पंधरा वीस लाख रुपये निवृत्तीफंड मिळतो. आता आपल्या एकुलत्या एका मुलाला हक्काचे, मालकीचे घर घेऊन देता येईल, म्हणून ते खुशीत असतात.  मुलगा घरी येताच ते त्याला ही गोष्ट सांगणार असतात. पण तेवढ्यात मुलाचा फोन येतो. तो म्हणतो, पप्पा मला अमूकतमूक कंपनीत नोकरी लागली आहे. मला लाखभर रुपये पगार मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे कंपनीने एका बँकेसोबत होम लोनसाठी टायप केलेले असल्याने नोकरीसोबत वन बीएचके फ्लॅटही आपल्या नावावर होणार आहे. अभिनंदन बाबा, आपण आता आपल्या हक्काच्या घरात राहू. बदलाच्या या वेगामुळे बापाला हसावे की रडावे कळेना झाले.
बदलात मूल्ये हरवत आहेत
बदल शाश्वत आहे हे खरेच, पण पूर्वी बदल होत असताना त्या बदलांना मूल्यांशी जोडून त्याचे परिवर्तनात रूपांतर करता येत असे. आज इतक्या वेगाने आपण बदलतो आहोत, की मूल्यांचा विचार करायला वेळ मिळेना झाला आहे. नव्याचे कौतुक करण्यात आपण मूल्यभान विसरतो आहोत. आर्थिक व्यवहार हातातील मोबाईलवरून होऊ लागले. नाटक- सिनेमा सारे मोबाईलमध्ये दाखल झाले. त्यात ७० एमएम अनुभवाला आपण पारखे झालो. स्मार्टफोनने आपल्याला वरवर स्मार्ट केले आणि आतून बुद्धू करून ठेवले आहे. आपण रोज फेसबुक, वॉटस्ऍपवरून हजारो जणांना हाय हॅलो करतो. पण शेजारी शेजारी बसलेले लोक एकमेकांशी बोलणे विसरून गेले आहेत. मुले स्मार्टफोनवर सर्व गोष्टी करीत आहेत. त्यांचा की-बोर्डवर टाईप करण्याचा आणि स्क्रीनवर बोटं फिरवण्याचा वेग वाढला. पण शरीर स्थूल झालेय, त्यात चपळता उरली नाही. डोळे दिवसेंदिवस क्षीण होत आहेत. पाठीला पोक येऊ लागले आहे. हे आपल्या लक्षातच आलेले नाही.
मोफत वेगवान वायफाय!
मुतारी मात्र नाही
मुंबई लोकलच्या अनेक स्थानकांवर  मोफत वेगवान वायफाय उपलब्ध असल्याच्या मोठमोठ्या जाहिराती दिसतात. वायफाय अगदी चकटफू उपलब्ध आहे. पण त्याच स्टेशनवर लघवीला लागलेल्या प्रवाशाला तो तुंबला तरी मोकळे होता येईल, एवढ्या पुरेशा मुतार्‍या नाहीत. महिलांची तर याबाबतीत अवस्था आदिम काळापेक्षा भयानक आहे. तेव्हा किमान निर्जन आढोसे तरी होते. प्रगतीच्या या वेगाला आपण विवेकाची चाळणी लावणार नसू तर आपले भविष्य फार चांगले आहे, असे म्हणणे हे केवळ दिवास्वप्न ठरेल! सावधान!!

कवी कसा असावा?
काही काही दिवस अगदी विलक्षण असतात. परवा गुरुवारी असाच एक  विचित्र योगायोग घडून आला. ‘गुरुचरित्र’ लिहून मराठी कवितेत मानाचे स्थान मिळविणारे कवी गुरुनाथ सामंत यांनी मोजक्याच, पण दर्दी रसिकांसमोर जाहीर काव्यवाचन केले. (ते आध्यात्मिक गुरुचरित्र ते हे नव्हे!) आणि त्याच दिवशी काही तासांच्या अंतराने निसर्गकवी नलेश पाटील यांच्या निधनाची बातमी आली. एरवी जाहीर कार्यक्रमात कविता वाचन न करणारा एक कवी ऐकावयास मिळाल्याचा  आनंद अनुभवत असताना केवळ जाहीर कार्यक्रम हेच एकमेव माध्यम कवितेसाठी निवडलेला एक उमदा निसर्गकवी आपल्यातून निघून गेल्याचे दुःख
सामोरे आले.
या दोन घटनांच्या अनुषंगाने आज कवी कसा असावा? याविषयी मांडणी करावी वाटते आहे. कवी सामंतांचे जाहीर काव्यवाचन ऐकण्याची संधी मिळाली ती ‘रुची’चे संपादक सुदेश हिंगलासपूर आणि किरण येले यांच्यामुळे! त्यांनी ‘रुची’चा एकही कविता नसलेला विशेषांक काढला आहे आणि त्याचे प्रकाशन सत्यकथेची जेथे होळी करण्यात आली त्या मौजेच्या पायरीवर करण्यात आले. त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या कवी गुरुनाथ सामंतांच्या हस्तेे हे प्रकाशन झाले. विशेषकांचा संपादक म्हणून किरण येले यांनी कवी कसा असावा, याचा एक वस्तुपाठच घालून
दिला आहे.
दुसरी गोष्ट गुरुनाथ सामंत यांची! नव्या कविता लिहू लागलेल्या सामंत यांनी एकदा कविता स्पर्धेत भाग घेतला. कवी रमेश तेंडुलकर परीक्षक होते. (भारतरत्न सचिन तेंडुलकर हे रमेश तेंडुलकर यांचे सुपुत्र) सामंतांच्या कवितेला तुफान टाळ्या पडल्या. सर्वांना माहीत होते पहिला क्रमांक सामंत यांचाच येणार, पण तेंडुलकरांनी सामंतांना उत्तेजनार्थ बक्षीसही दिले नाही. ते आपल्या भाषणात म्हणाले, सामंतने कविता छान म्हटली. पण त्यांच्यावर रेगे आणि मर्ढेकरांचा प्रभाव आहे. मी त्याला बक्षीस दिले नाही, कारण बक्षीस दिले तर तो असाच कविता करीत राहील. ते तसे त्याने करू नये, स्वतःची कविता शोधावी, म्हणून त्याला आज बक्षीस दिलेले नाही! सामंतांनी तेंडुलकरांचे ऐकले. पुढची काही दशके काव्यसाधना केली. प्रसिद्धीच्या मागे न जाता उत्तम लेखन केले. कवी कसा असावा, त्याचा हा एक वस्तुपाठच आहे!
आता तिसरी गोष्ट निसर्गकवी नलेश पाटील यांची! नलेश पाटील चित्रकार कवी! रंगानी वेड लावलेला अवलिया! निसर्गात रमणारा! कल्पनांनी बहरणारा!  त्यांनी गावोगाव कविता गाऊन कवितेचा गाव रसरशीत ठेवला. पण गंमत पाहा, अवघ्या महाराष्ट्राला नव्हे बृहन्महाराष्ट्राला माहीत असलेल्या या कवीचा स्वतःचा कवितासंग्रह नाही. ‘कवितांच्या गावा जावे’ या संग्रहात त्यांच्या काही कविता आहेत तेवढाच काय तो त्यांच्या संग्रहित प्रकाशित काव्यसंसार! उरलेल्या कविता कुठेकुठे नियतकालिकांत वाचायला मिळतात! सांगायचा मुद्दा म्हणजे कवी म्हणून नाव व्हायला, लोकांच्या मनात जागा मिळवायला संग्रह काढायची आवश्यकता नसते, चांगली कविता लिहिली पाहिजे. कवी कसा असावा याचा हा वस्तुपाठ! महाराष्ट्रात कविता गवता ऐसी उगवत आहे. अशा वेळी सर्व कवींनी हे तीन वस्तुपाठ सदैव
लक्षात ठेवायला हवेत!
ग्रंथसत्ता
थोर विचारवंत पु.ग.सहस्रबुद्धे यांच्या लेखांचे ‘माझे चिंतन’ नावाचे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात ‘ग्रंथसत्ता’ नावाचा एक अत्यंत उत्तम असा लेख आहे. काही काही ग्रंथांनी समाजमनावर आपली सत्ता कशी चालविली, याविषयी त्यात सुरेख लेखन आहे. रामायण, महाभारत, गीता, बायबल, कुराण, गुरुग्रंथसाहेब असे धर्मग्रंथ त्या त्या समाजावर वर्षानुवर्षे सत्ता करीत आलेले आहेत. जगाच्या पाठीवर रोज हजारो ग्रंथ प्रकाशित होतात आणि प्रकाशहीनही होऊन जातात. मात्र काही मोजके ग्रंथ जनमानसावर राज्य करतात. प्रत्येक पुस्तकाचा राज्य करण्याचा काळ आणि परीघ थोडा कमी जास्त असतो एवढेच.
दास कॅपिटल
आधुनिक काळात लिहिलेली कोणती पुस्तके जनमानसावर राज्य करीत आहेत किंवा कोणत्या पुस्तकांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले, असा प्रश्‍न उपस्थित केला की, सर्वप्रथम कार्ल मार्क्स यांच्या दास कॅपिटल या ग्रंथाची आठवण होते. या एका ग्रंथाने जगाचा सगळा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. कामगाराला जगाच्या  केंद्रस्थानी आणले. त्याच्या बाह्यांमध्ये लढण्याची ताकद भरली. जगभरातील कामगार जागा होऊन संघटित झाला. कामगारांनी सत्ता उलथवून लावल्या.  सध्या जगभर भांडवलशाही फोफावली असली तरी एककाळ दास कॅपिटलने जगावर राज्य केले यात तीळमात्र शंका नाही. म्हणूनच आधुनिक काळात लिहिल्या गेलेल्या आणि जगावर राज्य करणार्‍या पुस्तकांत पहिला मान दास कॅपिटलला
दिला पाहिजे.
भारतातील ग्रंथसत्ता
भारतीय समाजमनावर वर्षानुवर्षे विविध ग्रंथांनी सत्ता गाजविली आहे. रामायण, महाभारत, गीता या ग्रंथांनी केवढा समाज अंकित केला आहे, हे सर्वांना माहीतच आहे. अलीकडच्या काळात भारतावर राज्य करणारा एकमेव ग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना होय. अवघा देश या ग्रंथाप्रमाणे चालतो आहे. सव्वाशे करोड भारतीयांच्या जगण्यामरण्याचा संबंध या ग्रंथांशी जोडलेला आहे. याच ग्रंथाने इथल्या करोडोच्या संख्येत असलेल्या दीनदुबळ्या गोरगरिबांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. थोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आकारास आलेला हा ग्रंथ सर्वच भारतीयांना वंदनीय असा आहे.
महाराष्ट्रातील ग्रंथसत्ता
महाराष्ट्राचा उल्लेख ज्ञानोबा, तुकारामांची भूमी असा केला जातो. अर्थातच महाराष्ट्रावर सत्ता करणार्‍या ग्रंथांच्या यादीत ज्ञानेश्‍वरांची ‘ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘तुकोबांची गाथा’ यांचा क्रमांक फार वरचा आहे. आज महाराष्ट्रातील विद्यापीठांपासून पायी वारीला जाणार्‍या गोरगरीब, अडाणी वारकर्‍यांपर्यंत या ग्रंथांनी आपली सत्ता चालविलेली दिसते. ज्ञानेश्‍वरी हे एक मोठे बंड होते. मराठी भाषेला संस्कृतच्या पंगतीला बसविणारे! तुकोबांनीसुद्धा तत्कालीन समाजाला जी शिकवण दिली, ती आजही अनुकरणीय वाटते. तुकोबांची गाथा म्हणूनच मनामनात रुजलेली आढळते. मराठी माणसाच्या तोंडी हमखास आढळणारी वचने पाहिली तर त्यातील निम्म्याहून अधिक तुकारामांच्या गाथेतील असल्याचे लक्षात येईल. या एवढ्या एका कसोटीवरून सुद्धा तुकारामांच्या गाथेने मराठी मनावर केवढी सत्ता गाजविली आहे ती सहज लक्षात येईल. या झाल्या मोठ्या ग्रंथसत्ता! या साम्राज्यांच्या आत विविध ग्रंथांच्या छोट्या छोट्या सत्ता अस्तित्वात होत्या आणि आहेत.