Monday, September 12, 2016

कवी कसा असावा?
काही काही दिवस अगदी विलक्षण असतात. परवा गुरुवारी असाच एक  विचित्र योगायोग घडून आला. ‘गुरुचरित्र’ लिहून मराठी कवितेत मानाचे स्थान मिळविणारे कवी गुरुनाथ सामंत यांनी मोजक्याच, पण दर्दी रसिकांसमोर जाहीर काव्यवाचन केले. (ते आध्यात्मिक गुरुचरित्र ते हे नव्हे!) आणि त्याच दिवशी काही तासांच्या अंतराने निसर्गकवी नलेश पाटील यांच्या निधनाची बातमी आली. एरवी जाहीर कार्यक्रमात कविता वाचन न करणारा एक कवी ऐकावयास मिळाल्याचा  आनंद अनुभवत असताना केवळ जाहीर कार्यक्रम हेच एकमेव माध्यम कवितेसाठी निवडलेला एक उमदा निसर्गकवी आपल्यातून निघून गेल्याचे दुःख
सामोरे आले.
या दोन घटनांच्या अनुषंगाने आज कवी कसा असावा? याविषयी मांडणी करावी वाटते आहे. कवी सामंतांचे जाहीर काव्यवाचन ऐकण्याची संधी मिळाली ती ‘रुची’चे संपादक सुदेश हिंगलासपूर आणि किरण येले यांच्यामुळे! त्यांनी ‘रुची’चा एकही कविता नसलेला विशेषांक काढला आहे आणि त्याचे प्रकाशन सत्यकथेची जेथे होळी करण्यात आली त्या मौजेच्या पायरीवर करण्यात आले. त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या कवी गुरुनाथ सामंतांच्या हस्तेे हे प्रकाशन झाले. विशेषकांचा संपादक म्हणून किरण येले यांनी कवी कसा असावा, याचा एक वस्तुपाठच घालून
दिला आहे.
दुसरी गोष्ट गुरुनाथ सामंत यांची! नव्या कविता लिहू लागलेल्या सामंत यांनी एकदा कविता स्पर्धेत भाग घेतला. कवी रमेश तेंडुलकर परीक्षक होते. (भारतरत्न सचिन तेंडुलकर हे रमेश तेंडुलकर यांचे सुपुत्र) सामंतांच्या कवितेला तुफान टाळ्या पडल्या. सर्वांना माहीत होते पहिला क्रमांक सामंत यांचाच येणार, पण तेंडुलकरांनी सामंतांना उत्तेजनार्थ बक्षीसही दिले नाही. ते आपल्या भाषणात म्हणाले, सामंतने कविता छान म्हटली. पण त्यांच्यावर रेगे आणि मर्ढेकरांचा प्रभाव आहे. मी त्याला बक्षीस दिले नाही, कारण बक्षीस दिले तर तो असाच कविता करीत राहील. ते तसे त्याने करू नये, स्वतःची कविता शोधावी, म्हणून त्याला आज बक्षीस दिलेले नाही! सामंतांनी तेंडुलकरांचे ऐकले. पुढची काही दशके काव्यसाधना केली. प्रसिद्धीच्या मागे न जाता उत्तम लेखन केले. कवी कसा असावा, त्याचा हा एक वस्तुपाठच आहे!
आता तिसरी गोष्ट निसर्गकवी नलेश पाटील यांची! नलेश पाटील चित्रकार कवी! रंगानी वेड लावलेला अवलिया! निसर्गात रमणारा! कल्पनांनी बहरणारा!  त्यांनी गावोगाव कविता गाऊन कवितेचा गाव रसरशीत ठेवला. पण गंमत पाहा, अवघ्या महाराष्ट्राला नव्हे बृहन्महाराष्ट्राला माहीत असलेल्या या कवीचा स्वतःचा कवितासंग्रह नाही. ‘कवितांच्या गावा जावे’ या संग्रहात त्यांच्या काही कविता आहेत तेवढाच काय तो त्यांच्या संग्रहित प्रकाशित काव्यसंसार! उरलेल्या कविता कुठेकुठे नियतकालिकांत वाचायला मिळतात! सांगायचा मुद्दा म्हणजे कवी म्हणून नाव व्हायला, लोकांच्या मनात जागा मिळवायला संग्रह काढायची आवश्यकता नसते, चांगली कविता लिहिली पाहिजे. कवी कसा असावा याचा हा वस्तुपाठ! महाराष्ट्रात कविता गवता ऐसी उगवत आहे. अशा वेळी सर्व कवींनी हे तीन वस्तुपाठ सदैव
लक्षात ठेवायला हवेत!

No comments:

Post a Comment